Categories
संस्था परिचय

दक्षिणेतील सत्यशोधक चळवळ द्रविड कळघम संघटना

वार्षिकांक - २०१९

तमिळनाडू येथील द्रविड या संघटनेला 75 वर्षे झाली. महाराष्ट्रातील महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा वारसा या संघटनेने पुढे नेला. या संघटनेचे संस्थापक पेरियार रामसामी नायर यांनी ब्रिटिशांच्या काळात व स्वातंत्र्योत्तर काळात जातीनिर्मूलन, स्त्री शिक्षण, विधवा विवाह, मंदिर प्रवेश या सारख्या सामाजिक प्रश्नांवरून संघर्ष उभे केले. चळवळ उभी केली. या संघटनेचे व पेरियार यांचे परिचयात्मक लेख ‘अंनिवा’च्या वाचकांसाठी देत आहोत; तसेच द्रविड कळघमचे सध्याचे अध्यक्ष डॉ. के. वीरमणी यांनी अंनिसच्या त्रिदशकपूर्तीच्या निमित्ताने आयोजिलेल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या वेळेस केलेल्या बीजभाषणाचे अनुवादही वाचकांसाठी देत आहोत.

द्रविड(र) कळघम याचा शब्दशः अर्थ ‘द्रविडांची परिषद’ असे आहे. मूळतः सामाजिक चळवळ उभारण्यासाठी स्थापन केलेली ही संघटना होती. याचे प्रवर्तक ई. व्ही. रामसामी नायकर होते. त्यांना ‘तंदै पेरियार’ वा ‘पेरियार नायकर’ म्हणूनही ओळखले जाते. ही संघटना मुळात जातिनिर्मूलनासाठी – विशेषकरून ब्राह्मणेतरांना समाजात सन्मान प्राप्त करून देण्यासाठी- स्थापित झाली. पुढील काळात तिचे रूपांतर, त्या काळातील तमिळ, तेलुगू, कन्नड व मल्याळम् भाषिक असलेल्या मद्रास प्रेसिडेन्सीतील केवळ तमिळ भाषक असलेल्या वेगळ्या ‘द्रविड नाडू’च्या मागणीसाठीच्या चळवळीत झाली. हीच संघटना पुढील काळात द्रविड मुन्नेत्र कळघम व ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम व इतर काही राजकीय पक्ष-संघटनांच्या उभारणीसाठी प्रेरणादायक ठरली. द्रविड मुन्नेत्र कळघम व ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हे पक्ष ठरवून दिल्यासारखे आळीपाळीने सत्तेवर असतात.

या चळवळीचे मूळ 1925 मध्ये पेरियार यांनीच स्थापन केलेल्या स्वाभिमानी चळवळ (Self Respect Movement) व जस्टिस पार्टी या संघटनेत सापडतील. गांधीजींच्या काँग्रेस पक्षाचे विश्लेषण करून त्या पक्षाची ध्येय-धोरणं राबविणारी संघटना म्हणून स्वाभिमानी चळवळीची सुरुवात झाली. नंतरच्या काळात लेनिनचा साम्यवाद, नास्तिकता व बर्ट्रांड रसेलचा विवेकवाद यांच्यामुळे या संघटनेवर डाव्या विचारांचा प्रभाव जाणवू लागला. तमिळ नाडूच्या मुख्यमंत्रिपदावर असताना सी. एन. अण्णा दुराई यांनी त्यांचा डीएमके पक्ष साम्यवादी तत्त्वानुसार चालेल, अशी ग्वाही दिली होती. नंतरच्या काळात एआयएडीएमके पक्षाचे मुख्यमंत्री झालेले एमजीआर यांनीसुद्धा त्यांचा ‘अण्णाइजम’ म्हणजे भांडवलशाही, समाजवाद व साम्यवाद यांचा सुरेख संगम असे वर्णन करत होते.

पेरियार यांचे काँग्रेस पक्षाबरोबर झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी वेगळी चूल मांडली. जस्टिस पार्टीची स्थापना 1916 मध्ये झाली व तिचाही उद्देश जाती निर्मूलनाचाच होता. ब्राह्मणेतरांच्या हितरक्षणासाठीच्या या संघटनेचे संस्थापक सर त्यागराज चेट्टियार होते. परंतु पुढील काळात या संघटनेत श्रीमंत ब्राह्मणेतरांचा शिरकाव झाला व ही एक ब्रिटीशधार्जिणी संघटना असे लोकांना वाटल्यामुळे संघटनेचा प्रभाव कमी-कमी होत गेला. या दोन्ही संघटनांचा पेरियार यांच्या नेतृत्वाखाली 1938 मध्ये विलिनीकरण झाले व 1944 मध्ये विलीन झालेल्या या नवीन संघटनेला ‘द्रविड कळघम’ असे नाव देण्यात आले. या नवीन संघटनेचे अध्यक्ष म्हणून पेरियार व सचिव म्हणून अण्णा दुराई यांची नियुक्ती करण्यात आली. सेलम येथील अधिवेशनात खालील ठराव मंजूर झाले ः

1. या पक्षाच्या सदस्यांनी ब्रिटीश सरकारकडून मिळालेल्या राव बहाद्दूर, दिवाण बहाद्दूर, रावसाहेब अशा पदव्यांचा त्याग करावा, तशी उपाधी नावापुढे लावू नये व भविष्यात अशा पदव्या स्वीकारू नयेत.

2. या पक्षाच्या सदस्यांनी मानद मॅजिस्ट्रेटसारख्या पदावर असल्यास त्या पदांचा राजीनामा द्यावा व भविष्यात असली पदे स्वीकारू नयेत.

3. या पक्षाच्या सदस्यांची जातिवाचक नावे असल्यास ती काढून टाकावीत व त्यांचा वापर करू नये.

अगदी सुरुवातीपासूनच या संघटनेने दक्षिण भारतातील

उदारमतवाद्यांबरोबर सलोखा प्रस्थापित करण्यास पुढाकार घेतला.

विशेषकरून समानता या मूल्यास अग्रक्रम दिला. या पक्षाची उद्दिष्टे

खालीलप्रमाणे होती ः

1. सामाजिक सुधारणा – धार्मिक अंधश्रद्धांचे निर्मूलन, महिलांचे सक्षमीकरण व जाती-जातींतील भेदभाव दूर करणे,

2. तमिळ नाडूतील शैक्षणिक संस्था व शासनातील ब्राह्मणांचा प्रभाव कमी करणे,

3.तमिळ नाडूतील राजकारणात व आर्थिक व्यवहारात उत्तरेकडील नेत्यांचा प्रभाव कमी करणे,

4. भारताची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारलेल्या हिंदी भाषेला विरोध दर्शविणे,

5.आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व तमिळ नाडू या चार राज्यांचा मिळून द्रविड नाडू नावाच्या वेगळ्या राष्ट्राची स्थापना करणे.

त्या काळी द्रविड वंशजांकडे फारच तिरस्कारयुक्त नजरेने बघितले जात होते. काळ्या वर्णाचे द्रविड म्हणजे अक्कलशून्य व केवळ चाकरी करण्यास लायक, असे स्वतःला आर्य वंशज म्हणवून घेणार्‍या उच्चवर्णियांना वाटत होते. या उच्चवर्णियांच्या ब्राह्मणी वृत्तीला विरोध करण्यासाठी ही संघटना कार्य करू लागली. या परिषदेच्या चौकोनी ध्वजात काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर एक लाल वर्तुळ असून काळा रंग द्रविडांची दुःस्थिती व लाल रंग त्याला तेथून बाहेर काढणारा क्रांतिसूर्य असे दर्शविते. ब्राह्मणी वृत्तीच्या सामाजिक, राजकीय व रूढी-परंपरांच्या विरोधात हा लढा होता. त्यातूनच नंतरच्या काळात दक्षिण भारतासकट वेगळा द्रविड नाडू किंवा तमिळ भाषकांचा वेगळा तमिळ नाडू या मागण्या पुढे आल्या. या संघटनेचे सदस्यसुद्धा गणवेश घातल्यासारखे काळे कपडे नेहमी घालतात व प्रस्थापितांबद्दल निषेध नोंदवत असतात.

पुढील काळात ही संघटना लोकप्रिय झाली. तमिळ नाडूत ठिकठिकाणी या संघटनेच्या शाखा उघडल्या गेल्या. कार्यकर्त्यांचे जाळे पसरले. राज्याबाहेरसुद्धा याच्या शाखा होत्या. सक्रिय कार्यकर्ते होते. परंतु सक्रिय कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावामुळे काही काळातच या संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर होण्यास वेळ लागला नाही. अण्णा दुराईंसहित बहुतेक कार्यकर्त्यांना निवडणुकीचे राजकारण करायचे होते. परंतु पेरियार यांना राजकारणात संघटना उतरल्यास सामाजिक प्रश्नांना दुय्यम स्थान प्राप्त होईल, अशी भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी या मागणीला विरोध दर्शविला. त्याच सुमारास पेरियार यांनी आपल्या मुलीच्या वयाच्या व त्यांच्यापेक्षा 40 वर्षांनी लहान असलेल्या मणियम्माशी लग्न केल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले व उघड-उघड विरोध करत ठिकठिकाणी त्यांचे पुतळे जाळले. द्रविड कळघम ही संघटना सुरुवातीपासूनच महिला सक्षमीकरणासाठी झगडणारी संघटना होती. परंतु संस्थापकच या तत्त्वाला हरताळ फासत आहेत, या समजुतीमुळे कार्यकर्ते चिडले. संघटनेत फूट पडली. त्यातूनच द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षाचा उदय झाला. पेरियारच्या मृत्यूनंतर द्रविड कळघम संघटनेचे नेतृत्व मणियम्माने केले. तिच्या मृत्यूनंतर डॉ. के. वीरमणी संघटनेची धुरा संभाळत आहेत. या संघटनेला नुकतीच 75 वर्षे पूर्ण झाली.

अहिंसक मार्गानं आंदोलनं, निदर्शने करण्यावर पेरियार यांचा भर होता. जाळपोळ, नाकांबदी, रास्ता रोको यांसारख्या जनजीवन विस्कळित करणार्‍या सामान्य जीवनव्यवहारांना वेठीस धरणार्‍या मार्गांचा त्यांना तिटकारा होता. हिंदीविरोधी वा ब्राह्मणविरोधी उग्र निदर्शने त्यांच्या संघटनेने केली असली तरी द्रविड कळघम संघटना राजकारणापेक्षा समाजकारणातच जास्तपणे कार्यरत होती. या संघटनेला उच्चवर्णियांची मक्तेदारी असलेल्या समाजव्यवस्थेलाच संपूर्णपणे बदलायचे होते. मंदिरांच्या मूर्ती असलेल्या गर्भगृहात द्रविडांना मुक्त प्रवेश असावा, ब्राह्मण अर्चकांऐवजी इतर जातीतील अर्चक असावेत, संस्कृतप्रचुर भाषेऐवजी सामान्यांना कळेल, अशा तमिळ भाषेचा वापर व्हावा, अशा प्रकारच्या मागण्यांसाठी ही संघटना लढत होती. बहुतेकांना यात ब्राह्मणविरोधच जास्त आहे, असे वाटत होते. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा पेरियार यांनी ब्रिटिशांकडून ब्राह्मणांकडे सत्तेची सूत्रे जातील, अशी भीती व्यक्त केली होती. पेरियार यांनी यासाठी जातींनुसार आरक्षण व त्यातून मागासवर्गाचे प्रतिनिधित्व यावर भर दिला. शिक्षण व नोकरीतही आरक्षण हवे, हा त्यांचा आग्रह होता. त्यांनी याची सुरुवात 1921 पासून केली होती.

मागासवर्गीयांसाठी लढणार्‍या या संघटनेमुळेच तमिळ नाडूमध्ये अनेक राजकीय पक्ष उदयास आल्या. तमिळ अस्मितेच्या मुद्द्यावर लढा देणारे राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले व हे पक्ष काँग्रेस पक्षाची सत्तेवरची पकड सैल करण्यात यशस्वी झाले. जरी द्रविड नाडू हे वेगळे राष्ट्र उभारण्यास त्या यशस्वी झाले नसले, तरी 70 च्या दशकात हिंदीविरोधी उग्र निदर्शने करून द्रविड अस्मिता जागी ठेवत सत्तेत टिकून राहिले. व्ही. पी. सिंग यांच्या काळातील मंडल आयोगाच्या शिफारसींच्या अंमलबजावणीला या संघटनेचीच तत्त्वप्रणाली कारणीभूत ठरली. श्रीलंकेतील तमिळ भाषकांच्या प्रश्नास याच संघटनेने धसास लावण्याचा प्रयत्न केला.