Categories
नाट्य-चित्र परिक्षण

‘देऊळ’ च्या निमित्ताने

जानेवारी - २०१२

            गेल्या काही वर्षात मराठी सिनेमा वर्तमानकालीन वास्तव प्रश्नांना सामोरे जाताना दिसतो आहे. दिग्दर्शन, अभिनय, तंत्र, आशय यामध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. गार्भीचा पाऊस, वळू, विहीर, टिंग्या आणि ‘देऊळ’ हे चित्रपट पाहिले तर याचा प्रत्यय येतो. ‘देऊळ’ मध्ये तर निर्मात्याने धाडसी धोका पत्करून आजच्या वर्तमान प्रश्नाला भिडण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे. या चित्रपटातील एका गाण्यावर हिंदुत्ववाद्यांनी आक्षेप घेऊन ते गाणे वगळावे नाही तर चित्रपट बंद पाडू अशी धमकीही दिली होती; पण या चित्रपटाच्या निर्मात्याने आणि दिग्दर्शकांनी त्याला भीक घातली नाही.

धर्माशी, देवाशी, निगडीत कुठल्याही गोष्टींबद्दल चांगल्या अर्थाने जरी आपण बोललो तरी ‘धार्मिक’ भावना दुखावल्या म्हणून बोंब मारणारी एक जमात (जमातवादी) आज महाराष्ट्रात धुमाकुळ घालते आहे. त्यांनी नुसती पोलिसांकडे तक्रार केली की, पोलीस पण काहीही शहानिशा न करता ताबडतोब ज्यांच्या विरुद्ध तक्रार केली जाते त्यांना जेरबंद करण्यासाठी सरसावताना दिसतात. धर्म आणि अंधश्रद्धा यांची सीमारेषा इतकी पुसट आहे की, धर्मातून अंधश्रद्धा निर्माण झाल्या आहेत की धर्माचा आधार घेऊन अंधश्रद्धा उभ्या आहेत हे कळेनासे होते. त्यामुळे कुठल्याही अंधश्रद्धांचा धर्माशी, देवाशी संबंध जोडून ‘धार्मिक भावना’ दु:खावल्याची बोंब मारली जाते. या वस्तुस्थितीमुळे अंधश्रद्धाविरोधी कायदा पास होण्यासाठी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी समजल्या जाणार्‍या राज्यात नको तितका वेळ लागत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला ‘देऊळ’ या सिनेमाने पुढे आणलेल्या प्रश्नांचा विचार करायला हवा.

या चित्रपटाची कथा अगदी साधी आहे. गुरे राखण्याचे काम करणार्‍या एका गुराख्याला तो उंबराच्या झाडाखाली झोपला असताना ‘श्री दत्ताचे दर्शन’ झाल्याचा भास होतो साक्षात श्री दत्ताने दर्शन दिल्याचे तो सर्व गावात सांगत सुटतो आणि पुढे या गोष्टीभोवती गावचे राजकारण फिरू लागते. आज इतर घटनात असतो तसा ‘मिडीया’चा रोल इथेही महत्वाचा आहे. गावातील बेरोजगार तरुणांना त्यांचा पत्रकार मित्रच असा सल्ला देतो की ज्या ठिकाणी श्री दत्ताचे दर्शन झाले आहे तेथे देऊळ बांधूया आणि स्वयंभू देवस्थान म्हणून प्रचार करूया. एकदा ‘स्वयंभू देवस्थान’ निर्माण झाले की लोक दर्शनाला येतील, मग देणग्या गोळा होतील, तुम्हाला अनेक प्रकारची दुकाने थाटता येईल, ट्रस्ट स्थापन करता येईल. एकंदरीतच तुमच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल आणि आमचा पेपरही खपेल. त्याप्रमाणे गावातील बेरोजगार मुलं ‘देऊळ’ निर्मितीचा आग्रह धरतात. वर्तमानपत्रातून स्वयंभू देवस्थानाबद्दल सुरस बातम्या येऊ लागतात. वास्तविक गावचा पुढारीही ‘दत्त दर्शनाची’ घटना काहीतरी वेडपटपणा म्हणून उडवून लावीत असतो. त्याला गावासाठी हॉस्पिटल व्हावे अशी इच्छा असते. त्यासाठी सर्व तजवीजपण झालेली असते. पण मध्येच हे ‘देऊळ’ प्रकरण येते. तर पुढार्‍याच्या हॉस्पिटलचा आग्रह चालूच राहतो. पण हा पुढारी ज्या पक्षाचा असतो त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देवळाची ‘आयडीया’ एकदम पसंत पडते. त्यात जसे आर्थिक फायदे असतात तसेच राजकीय फायदेही असतात. लोकभावनेचा आदर करण्याच्या नावाखाली हॉस्पिटलची कल्पना मोडीत निघते. गावाचा विकास व्हावा गावात आधुनिक सुविधा व्हाव्यात या मताचा असणारा पुढारी देऊळ निर्मितीतील आर्थिक फायदे पाहून आणि गावच्या बहुमताचा कल पाहून ‘देऊळ’ निर्मितीचा निर्णय मान्य करतो.

‘देऊळ’ निर्माण होते आणि मग अपेक्षेप्रमाणे सर्वांचाच ‘धंदा’ तेजीला येतो. देवदर्शनासाठी लोकांचा महापूर आणि पैशांचा महापूर सुरू होतो. पण ज्या गुराख्याला ‘श्री दत्त’ दर्शन झाल्याचा भास झालेला असतो तो मात्र या सगळ्यापासून वंचित राहतो. कारण त्याला देवाच्या नावाने मांडलेला बाजार मान्य नसतो. व्यथित होऊन एक दिवस तो देवाची मूर्ती चोरून दूर नदीमध्ये सोडून देतो. त्याला वाटते आता हे थांबेल. पण लगेचच ‘श्री दत्ताची’ अगदी लखलखीत नवी मूर्ती आणली जाते आणि बाजार सुरूच राहतो.

एकीकडे संत चळवळीने सांगितलेला केवळ देव दर्शनाची आस असणारा स्वार्थातीत धर्मभोळेपणा, तर दुसरीकडे या भावनेचा पूर्णपणे धंदेवाईक उपयोग करू इच्छिणारा रोखठोक अधार्मिक व्यावहारिकपणा असा एकंदर ‘देऊळ’ मध्ये मध्यवर्ती संघर्ष आहे. धर्म भावनेचे बाजारीकरण असा शब्द आपण वापरू शकतो आणि दिग्दर्शकाला तोच अर्थ अभिप्रेत आहे. इथपर्यंत ठीक आहे, पण पुढे जाऊन आपल्याला या मार्गातील कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे. दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाची इथेच कसोटी लागते. स्वार्थातीत धर्मभोळेपणा योग्य की धर्मभावनेचा बाजारीकरण योग्य असा प्रश्न समोर आल्यानंतर त्याचे स्वाभाविक उत्तर स्वार्थातीत धर्मभोळेपणा योग्य असेच दिले जाईल. पण त्यामुळे पुन्हा काळा-गोर्‍या रंगात चित्र पुढे येईल. कारण काळ्या-गोर्‍या रंगात चित्र रेखाटून प्रश्न संपत नाही. तर माणसे अशी का वागतात यामागील सामाजिक, आर्थिक, राजकीय कारणांचा, वस्तुस्थितीचा शोध घेणे आणि असा शोध घेत पुढे जाऊन ‘कलाकृतीतून’ एक तर्कशुद्ध दृष्टिकोन पुढे आणणे गरजेचे आहे. तरच कलाकृती अशा उंचीवर जाऊ शकते की तिला वैश्विक संदर्भ प्राप्त होतात; ती अमर होते.

सरकारने स्विकारलेल्या नवउदारवादी धोरणांचा आणि या धोरणांतून बोकाळलेल्या चंगळवादाचा, बाजारवादाचा, माणसाच्या वागण्यावर कसा परिणाम झाला आहे यावर जास्त भर देणे गरजेचे होते. तसा प्रयत्न झालेला आहे पण तो अगदी पुसटपणे. कारण चित्रपटाच्या अखेरीस जे अध्यात्मिक गारूड रचले गेले आहे, त्यामुळे चित्रपट पुन्हा दिशाहीनतेत अडकला आहे, गोंधळलेला आहे.

आजच्या बाजारवादी संस्कृतीच्या प्रभावाने सर्वच गोष्टींची ‘दुकाने’ होऊ लागली आहेत. देवळं त्याला पूर्वीही अपवाद नव्हती आणि आता तर नाहीतच नाहीत आणि ‘स्वयंभू देवस्थाने’ म्हणजे सुपर मार्केटच झाली आहेत. देऊळ मधून ही आर्थिक कमाईची बाजू पुढे आणतानाच आणखी एक अत्यंत महत्वाची बाजू पुढे आणण्याचा प्रयत्न झाला आहे. जे गाणे वगळावे अशी हिंदुत्ववाद्यांची इच्छा होती त्या गाण्याच्या आशयात ही बाजू स्पष्टपणे पुढे येते ती म्हणजे देवावर भरोसा ठेवून जगण्याची प्रवृत्ती आपल्यासमोरील वास्तव प्रश्नाबद्दल, समाजात बदल घडवण्याबद्दल उदासीन राहण्याची ही प्रवृत्ती माणसाला कार्यशून्य तर बनवतेच पण सभोवताली घडणार्‍या घटनामागील कारणांचा अर्थबोध होऊ देत नाही. त्यामुळे आजच्या शोषणावर आधारीत सामाजिक-आर्थिक व्यवस्थेला अभय देण्याची वृत्ती समोर येते. देवच सर्व घडवतो म्हटल्यानंतर माणसाने फक्त देवाला शरण जाणे इतकेच त्याच्या हातात उरते. मार्क्सने याच गोष्टीला ‘अफुची गोळी’ म्हटले होते. ‘वास्तव दु:खाचा विसर पडणे’ असा त्याचा अर्थ आहे. अफु खाल्ल्यानंतर माणूस जसा गुंगीत राहतो आणि आजूबाजूच्या घटनांचे त्याला ज्ञान होत नाही किंवा तो त्या घटनांपासून स्वत:ला अलिप्त करतो तेच काम ती देवावर भरोसा ठेवण्याची प्रवृत्ती करीत असते. देवावर भरोसा ठेवून शोषणाने नाडली जाणारी जनता विद्रोह करण्यापासून आणि परिवर्तनाच्या लढ्यापासून अलिप्त राहते. कारण तिच्या दु:खाची कारणे ती कर्मवादात व दैववादात शोधते. मागील जन्मात केलेल्या पापात शोधते. लोकांमध्ये ही भावना रुजवण्याचे काम कुठलीही शोषक व्यवस्था करीत असते. मुंबईत जेव्हा गिरणी धंदा सुरु झाला तेव्हा गिरण्यांच्या आत गेटजवळ गिरणी मालकांनी दोन गोष्टींची सोय केली होती. एक देऊळ आणि दोन दारूचे दुकान. म्हणजे अपार कष्ट करून कामगार जेव्हा घरी जावयास निघत असे तेव्हा या दोन गोष्टींना हमखास भेट देतच पुढे जात असे. त्याचा शोषणाविरुद्धचा सारा असंतोष या दोन गोष्टींत वितळून जावा अशी ती रचना गिरणी मालकांनी केलेली होती. लाल बावट्याची युनियन स्थापन झायानंतर त्यांना सुरुवातीला हे दारू गुत्ते नष्ट करावे लागले. त्यामुळे ‘देऊळ’ ही काही साधीसुधी निरूपद्रवी संकल्पना नाही. ती एका शोषण व्यवस्थेचा भाग आहे. ती केवळ धार्मिक अध्यात्मिक नाही, तर धर्मभावनेचा उपयोग स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी कसा केला जाईल या दृष्टीची ती निर्मिती आहे.

देऊळ’ हा चित्रपट एका अर्थाने बाजारू संस्कृती विरुद्धचे एक निदर्शन आहे. आंदोलन आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि नाना पाटेकरांचा अभिनय अगदी लाजबाब आहे. आधुनिक काळातला थोडाफार आधुनिक तरीही आपला ग्रामीण ढंग न सोडलेला पुढारी त्यांनी समर्थपणे उभा केला आहे. तो लक्षात राहतो. अखेरीस आपल्याला निष्कर्ष काढायचा झाला तर आपण असे म्हणू शकतो की, भांडवली अर्थव्यवस्थेत प्रत्येक गोष्ट ही विक्रीची गोष्ट बनते आणि त्याला मानवी भाव – भावना-नाते संबंध, यांच्या बरोबरीने प्रत्यक्ष ‘देव, धर्म’ या संकल्पना ही अपवाद ठरत नाहीत. खरेदी-विक्री महासंघ असेच स्वरूप या समाजव्यवस्थेला येते आणि माणसाचे माणूसपणही नष्ट होते. हे थांबवायचे असेल तर मुळातूनच ही भांडवली समाजरचना उखडून टाकणे गरजेचे आहे.

-सुभाष थोरात


देऊळ हा चित्रपट पहात असताना आजच्या काळात समाजात सर्वसाधारणपणे वावरणार्‍या तीन प्रवृत्तींचे चित्रण माझ्यासमोर आले. साक्षात्कार झालेला गुराखी (गिरीश कुलकर्णी) मला सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी वाटला ज्याची भावना केवळ निस्वार्थी भक्तिभावाची आहे. हा वर्ग बहुसंख्येने आहे, पण आपल्या रोजच्या रोजीरोटीचीच भ्रांत असल्यामुळे ती मिळविण्यातच तो मग्न आहे, पिचून गेला आहे. दुसरा वर्ग आहे धनाढ्य राजकारण्यांचा. या चित्रपटात याचे प्रतिनिधीत्व भाऊ (नाना पाटेकर) ही व्यक्तिरेखा करीत आहे. बर्‍यापैकी आर्थिक परिस्थिती, उच्च जात त्यामुळे गावाच्या राजकारणावर नियंत्रण, पक्षश्रेष्ठींकडे वजन, गावातील बेकार तरुणांवर वचक, आधुनिक विचारांचे महत्व कळत असले तरी परिस्थितीनुसार लवचिक होण्याची तयारी, कोणत्याही मूल्यात्मक राजकारणापेक्षा हितसंबंधी राजकारणाला प्राधान्य. ही आजच्या काळातील प्रस्थापित राजकीय नेतृत्वाची सर्व वैशिष्ट्ये भाऊ या व्यक्तिरेखेत आपल्याला दिसतात. तिसर्‍या प्रवृत्तीचे प्रतिनिधीत्व बुद्धीवादी, वैज्ञानिक दृष्टीकोन मानणारे अण्णा कुलकर्णी (दिलीप प्रभावळकर) ही व्यक्तिरेखा करते.

साक्षात्कार झालेला गुराखी दत्ताचे झालेले बाजारीकरण पहात असतो. त्या बाजारीकरणातून त्याच्या गायीलाही सोडले जात नाही. दत्ताची गाय म्हणून तिला पिंजर्‍यात उभी करून तिच्या दर्शनाचा आणि चार्‍याचाही बाजार मांडला जातो. गाय आजारी पडते. तिच्या दर्शनाला बडे बडे व्हीआयपी येतात. पण गुराख्याला मात्र अटकाव केला जातो. विरोध केल्यावर गुराख्याला मारहाण केली जाते. गुराखी विचार करू लागतो. त्याच्या मनातील देव सर्वव्यापी, सर्व प्राणीमात्रांवर दया असणारा. पण इथला देव तर काही जणांच्या ताब्यात, कैदेत असलेला. बाजाराच्या विळख्यात सापडलेला. याला सोडविला पाहिजे. हा बाजारू विळखा सोडविण्यासाठी तो या बाजाराच्या विरोधात आपल्यासारखा सर्वसामान्यांना संघटीत करून संघर्षासाठी उभा राहात नाही तर तो ती मूर्ती गावच्या नदीच्या पाण्यात विसर्जित करण्याचा मार्ग स्विकारतो. स्वत:ला बुद्धीप्रामाण्यवादी मानणारे अण्णा कुलकर्णी या बाजारीकरणाच्या विरोधात असतात. त्यांनी भाऊबरोबर गावच्या हॉस्पीटलची योजनाही बनविलेली असते. परंतु त्यांनाही या बाजारीकरणाच्या विरोधात निर्भयपणे, धैर्याने उभे राहाणे शक्य होत नाही. उलट ते गाव सोडण्याचा पळपुटेपणा करतात. आमच्या समाजातील प्रतिष्ठित बुद्धीवादी जीवनात असा प्रसंग आल्यावर कसा पळपुटेपणा करतात ह्याचेच जणू हे चित्रण आहे. भाऊ सुरवातीला साक्षत्काराची चेष्टा करतात. गावासाठी करावयाच्या हॉस्पीटलसाठी आग्रह धरतात. पण राजकीयदृष्ट्या अडचणीत आल्यावर कोलांटी उडी मारतात आणि सगळा डोलारा उभा करण्यात अग्रभागी राहातात एव्हढेच नव्हेतर मूर्ती चोरीला गेल्यावर सगळी सूत्रे हातात घेऊन पुन्हा मूर्तीची प्रतिष्ठापना करून पुन्हा सर्व सुरळीत चालू करतात. माध्यमांची तर या सगळ्याला पक्की साथच.

या चित्रपटात देवाच्या, धर्माच्या बाजारीकरणाविरोधात ज्या सर्वसामान्य जनतेने संघर्षासाठी ठामपणे उभे राहावयास पाहिजे ती जनता मूर्ति विसर्जित करण्याचा पलायनवाद स्विकारते. बुद्धिवादी त्या प्रश्नापासून दूरच पळतात तर राजकारणी, समाजकारणी बाजाराशी तडजोड करीत आपआपले हितसंबंध साधतात. त्यामुळे चित्रपट तपशील देत राहतो. बाजारीकरणाची खिल्ली उडवत रहातो पण त्यापलिकडे तो जात नाही. जर या बाजारीकरणाच्या प्रचलीत व्यवस्थेविरोधात भाऊ, अण्णा किंवा केशव ठामपणे उभे राहिले असते तर चित्रपट खूपच वेगळ्या पातळीवर गेला असता असे वाटते.

चित्रपट पाहिल्यावर मंगेश पाडगांवकरांच्या कवितेतल्या ओळी आठवल्या.

आपण शोधायचे नाही

आपण लढायचे नाही

आपण भिडायचे नाही

आयुष्याला….

– नंदकिशोर तळाशीलकर व सुनीता ओक, मुंबई