दि. 5 जुलै 2012 रोजी सकाळी हातात पडलेल्या पेपरची मुख्य बातमी होती, ‘देव घावला कणाकणांत’—- दै.सकाळ,
‘अखेर वैज्ञानिकांनी शोधला देव’—- दै.पुढारी,
‘कोई गॉड मिल गया’— दै.नवभारत टाईम्स,
‘The God of all particles is here, almost’——The Times of India,,
‘विश्वाचे रहस्य उलगडले? देवाचा अंश दिसला’—- दै.लोकमत
सर्व बातम्यांचा मतितार्थ होता ‘वैज्ञानिकांनी शोधला देव.’ मनात प्रश्न पडला, असं असेल तर मग महान कोण? शोधलेला, की शोधणारा! अर्थात विचार केला तरच असले प्रश्न पडणार. स्विर्त्झलंड जवळील जिनीव्हा येथे सुरू असलेल्या महाप्रयोगातील शोधाची 5 जुलैची मुख्य बातमी ‘विश्वातील सर्वात लहान कणाचा अर्थात ‘हिग्ज बोसॉन’चा वैज्ञानिकांनी शोध लावला.’ अशी असायला हवी होती. परंतु अशा प्रकारचा मथळा असलेला एकही पेपर नव्हता हे विशेष. सदर बातमीला दैवी अथवा आध्यात्मिक बाज देण्याची अजिबात गरज नव्हती. परंतु सदर बातमीमुळे विज्ञान आणि अध्यात्म यांच्या श्रेष्ठत्वावरील रंगतदार चर्चेला उधाण आलं.
5 जुलै 2012 अशा प्रकारे बातम्यांनी भरून यायला कारणीभूत होती दि.4 जुलै 2012 रोजी आंतरराष्ट्रीय उच्च ऊर्जा भौतिकशास्त्र परिषद, मेलबोर्न येथे सर्न(CERN) मधील अॅटलस या विभागाच्या प्रमुख फॅबिओला जियानोत्ती (Fabiola Gianotti) यांनी वैज्ञानिक शोधाची केलेली अधिकृत घोषणा “We observe in our data clear signs of a new particle, at the level of 5 sigma, in the mass region around 126 GeV. The outstanding performance of the LHC(Large Hardon Collider) and ATLAS (A Torodial LHC Apparatus) and the huge efforts of many people have brought us to this exciting stage. A little more time is needed to finalize these results, and more data and more study will be needed to determine the new particle`s properties. The search is more advanced today than we imagined possible. The Higgs Boson is an unstable particle, living for only the tiniest fraction of a second before decaying into other particles.”
याचा मराठी अनुवाद होतो. ‘आम्हाला जी वैज्ञानिक माहिती मिळालेली आहे त्यावरून 126 गिगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी ऊर्जा असलेल्या व 5 सिग्मा पर्यंत सांखिकीय पुरावा असलेल्या कणांचा शोध आम्हाला लागलेला आहे. हा महत्वाचा शोध लावण्यात अनेकांच्या प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा कारणीभूत आहे. ही माहिती परिपूर्ण करण्यासाठी व या कणांचे गुणधर्म शोधण्यासाठी आम्हाला आणखी कालावधी लागेल. हा शोध हा पूर्वीपेक्षा अत्यंत आधुनिक आहे. हिग्ज बोसॉन कण हे अस्थिर आहेत आणि अतिशय कमी कालावधीमध्ये दुसर्या कणांमध्ये रूपांतरीत होतात.’

जिनिव्हा येथे सुरू असलेल्या महाप्रयोगातून विश्वातील लहानात लहान कण ज्यांना हिग्ज बोसॉन कण असे संबोधतात त्यांचे अस्तित्व वैज्ञानिकांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले हा या शोधाचा मतितार्थ होता. पीटर हिग्ज व भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांनी गणिती प्रणालीतून मांडलेला सिद्धांत प्रयोगाद्वारे सिद्ध झाला होता. भारतीयांचा उर वैज्ञानिक अंगाने भरून येण्याची गरज होती न की दैवीअंगाने.
फॅबीओला जीयानोत्ती यांनी केलेल्या घोषणेमध्ये कोठेही ‘God Particle’ अथवा ‘देव कण’ असा शब्दप्रयोग नाही तरीसुद्धा प्रसारमाध्यमांनी या शोधाचं रूपांतर देव कणामध्ये करून वैज्ञानिकांच्या प्रयत्नाला व शोधाला देवापुढे कमी लेखण्याचा प्रयत्न केला. वैज्ञानिक माहिती धार्मिक किंवा दैवी शक्तीशी जोडली की मगच सर्वसामान्यजन उत्सुकतेपोटी वाचणार आणि मग आपल्या बातमीच मूल्य वधारणार हे पत्रकारांपेक्षा इतरांना कसं समजणार?
वैज्ञानिक God Particle हा शब्दप्रयोग करत नाहीत तर वैज्ञानिक संकुलाव्यतिरिक्तचे लोक हा शब्दप्रयोग करतात. God Particle हा शब्दप्रयोग आला कसा हे जाणून घेणं मनोरंजक ठरेल. अमेरिकन वैज्ञानिक व सन 1988 चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक प्राप्त लिऑन लिडरमन हे मूलभूत कणांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ. म्युऑन न्युट्रीनो या मूलभूत कणांच्या शोधाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांनी मूलभूत कणांच्यावरचे एक पुस्तक ‘God damn Particle’ या नावाने प्रकाशनासाठी प्रकाशकाकडे दिले. परंतु प्रकाशकाला आर्थिक व पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी ते नाव योग्य वाटले नाही. प्रसिद्धीसाठी यापेक्षा वेगळे नाव असणे गरजेचे आहे या अनुषंगाने त्याने ‘God Particle : If the Universe Is the Answer, What Is the Question?’ असे नामाधिनाम केले. विश्वातील लहान कणांना म्हणजे हिग्ज बोसॉन कणांना गॉड कण म्हणून संबोधणे हिग्ज सहीत अनेक वैज्ञानिकांना आवडलेले नव्हते. सदर टोपणनाव धार्मिक लोकांच्या भावना दुखावल्यासारखे होईल असे हिग्ज यांचे मत होते. परंतु प्रसिद्धीसाठी प्रकाशकाने वैज्ञानिकांच्या मताला केराची टोपली दाखवली. आणि ‘God Particle : If the Universe Is the Answer, What Is the Question?’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले आणि देव कण अर्थात ‘God Particle’ हा शब्द रूढ केला. प्रकाशकाला जे साध्य करायचे होते ते त्याने निर्विवादपणे साध्य केले. परंतु वैज्ञानिक अशा प्रकारच्या बाष्फळ चर्चेत गुंतून न पडता आपला संशोधनाचा वसा पुढे चालवतो आणि युवा पिढीला नाविन्याची, आधुनिकतेची आणि प्रगल्भ होण्याची कास धरण्यापासून परावृत्त करत असतो.
हिग्ज बोसॉन कण : भौतिकशास्त्रामध्ये स्टँडर्ड मॉडेल (Standard Model) हे पदार्धामधील मूलभूत कणांचा एकमेकाशी असलेल्या संबंधाचे विश्लेषण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. विश्व मूलभूत कणांपासून बनलेले आहे आणि या कणांचे विभाजन होत नाही असा या मॉडेलचा मतितार्थ आहे. मात्र काही कणांना वस्तुमान आहे तर काहींना का नाही या प्रश्नाचं उत्तर देण्यामध्ये हे मॉडेल अपुरे पडत होते. तो अपुरेपणा पूर्ण केला हिग्ज यांनी. ब्रिटनचे भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांनी इतर पाच जणांच्या बरोबरीने (Robert Brout, C.R.Hagan, Gerald Guralink, Francois Englert, Tom Kibble). हिग्ज मेकॅनिझम या वैज्ञानिक प्रणालीद्वारे 1964 मध्ये हिग्ज बोसॉन कण सुचित केले होते. हे कण व संबंधित हिग्ज फिल्ड मुळेच इतर वस्तुमान प्राप्त होते. हे त्यांचे अनुमान होते. सदर कणांचे अस्तित्व लार्ज हेड्रॉन कोलायडर मध्ये जुलै 2012 मध्ये स्पष्ट झाले. आणि हिग्ज बोसॉन कण हे विश्वातील लहानात लहान कण म्हणून निर्विवादपणे रूजू झाले. हिग्ज बोसॉन हा स्टँडर्ड मॉडेल मधील एक हरवलेला कण सापडल्याचा आनंद हिग्ज यांना त्यांच्या कार्यकालात अनुभवता आला. या कणापासून नंतर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन व इतर मूलभूत कणांची निर्मिती होते व कालांतराने दिर्घीका, सूर्य, पृथ्वी व सजिवांची.

सत्येंद्रनाथ बोस : 1 जानेवारी 1894 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांना प्रामुख्याने गणितीय भौतिकीमध्ये रस होता. 1913 मध्ये बी.एस्सी. व 1915 मध्ये एम.एस्सी पूर्ण करून कालांतराने ढाका व कोलकाता विद्यापीठामध्ये त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले. बोस यांनी 1924 मध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आदी मूलभूत कणांच्या समूहाचे संख्यशास्त्रीय नियम बोस आईन्स्टाईन स्टॅटीस्टिक्स या नावाने शोधून काढले. या कणांना बोसॉन यांच्या स्मरणार्थ बोसॉन्स म्हटले जाते. भारत सरकारने 1954 मध्ये पद्मविभूषण ने सन्मानित केलेल्या बोस यांना रॉयल सोसायटीचे मानद सदस्यत्व प्राप्त झाले होते. अशा या महान वैज्ञानिकाचे 4 फेबु्रवारी 1974 रोजी कोलकाता येथेच निधन झाले आणि भारत आजच्या या वैज्ञानिक आनंदमयी क्षणाला मुकला.
जीनिव्हाजवळील प्रयोगशाळेत हा निष्कर्ष काढण्यात आला तो कोणत्या प्रयोगातून साध्य झाला हे जाणून घेणे उचित ठरेल. 8 TeV(Tera electron volt) एवढी ऊर्जा असलेले प्रोटॉन 27 कि.मी. परिघ असलेल्या वर्तुळाकृती कक्षेतून एकमेकाच्या विरूद्ध दिशेत फिरवून एकमेकावर आदळण्यात आले. जवळ जवळ 1 दशलक्ष अब्ज वेळा ते आदळण्यात आले. त्यावेळेस निर्माण झालेल्या स्फोटातून सुरवातीला जे कण बाहेर पडले त्यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातूनच हिग्ज बोसॉन कणांचा निष्कर्ष बाहेर आला. हिग्ज बोसॉन अर्थात हिग्ज कणांचे वस्तुमान उर्जेच्या भाषेत सांगायचे झाले तर 126 GeV(Giga electron volt) होते. 10-25 किलोग्रॅम अथवा 133 प्रोटॉन एवढे वस्तूमान. भौतिकशास्त्रामध्ये वस्तुमान आईन्स्टाईनच्या सुत्रानुसार(E=mc2) उर्जेच्या भाषेत सांगण्याची पद्धत आहे. हिग्ज बोसॉन कण नंतर दोन फोटॉन मध्ये अथवा चार लेप्टॉन्स रूपांतरीत होतात. एखाद्या शोधाची सिद्धता मोजण्याचे एकक सिग्मा आहे. 3 सिग्मा असेल तर शोध खरा आहे तर 5 सिग्मा असेल तर तो शोध म्हणून मान्यता देण्याचा प्रघात आहे. सदर शोध 5 सिग्मा दर्शवतो म्हणून हिग्ज बोसॉन कण सिद्ध झाले असे विज्ञान मानते.
1921 आणि 1964 मध्ये गणिती प्रणालीद्वारे सूचित केलेल्या हिग्ज बोसॉन कणांची प्रयोगाद्वारे प्रचिती 4 जुलै 2012 रोजी आली यामध्येच वैज्ञानिकांची प्रगल्भता स्पष्ट होते. ध्येयवेडेपणा काय असू शकतो याची झलक यामुळे प्रत्यक्षात अनुभवत आली. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असेल तर सदर ध्येयवेडेपणाची चेष्टा इतर गोष्टींशी करून खिल्ली उडवणार्यांना तो अनुभवता येणार नाही.
(*Tera म्हणजे 1012 Giga म्हणजे 109)