सोनाली ही एका तमाशा मंडळातील केवळ सतरा वर्षांची नृत्यांगना. फडाचा मुख्य आधार. हसरी, खेळकर व बडबडी मुलगी. आईचे आजारपणामुळे निधन झालेले. वडील वाहन चालक असले तरी कायम घरात दारू पिऊन पडलेले. पाठीशी तीन भावंडं. मोठी असल्यामुळे कुटुंबातील सर्व जबाबदारी तिच्यावरच. घरच्या संसाराचा गाडा चालविण्यासाठी काका व आत्या असलेल्या तमाशात काम करू लागली. आत्या थकल्याने सोनाली पायात चाळ बांधून नाचू लागली. तीन वर्षांपासून मनातल्या सर्व इच्छा मोडून तिने हे जीणं स्वीकारलं. मागील वर्षी पोटदुखीने ती त्रस्त झाली. उपचार झाले पण गुण आला नाही. सर्वांना वाटू लागले की, हे बाहेरचे आहे. शेवटी आत्या जेजुरीच्या खंडोबाला नवस बोलली, ‘सोनालीच्या पोटातला आजार बरा होऊ दे. वर्षभरात तुझ्याशी तिचं लग्न लावेन.’ नंतर काही दिवसांनी तिची पोटदुखी थांबली. सोनालीला हे लग्न साफ अमान्य होतं. परंतु तिच्या मयत आईच्या आजारपणात आत्याने कर्ज काढून इतका खर्च केला होता की, त्या दबावाखाली सोनालीला निमूटपणे होकार द्यावा लागला. चारचौघीप्रमाणे शिकून संसार करण्याचे सोनालीचं स्वप्न मात्र अधुरच राहणार होतं. कारण देवाकडून मागवून घेतलेली मुदत संपत आली होती. दि.6 मे पर्यंत तमाशाच्या सर्व सुपार्या संपल्यानंतर 8 मेला सोनालीचा विवाह जेजुरीच्या खंडोबाशी होणार होता.
ही बातमी नाशिक अंनिसचे कार्याध्यक्ष महेंद्र दातरंगे व मध्यवर्तीचे मिलिंद देशमुख यांना कळाली ती विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यकर्तीकडून. अॅड.अभिलाषा खोहर तिचं नाव. सर्वांनी मिळून ह्या मोहिमेची जबाबदारी माझ्यावर सोपविली. तो दिवस होता 1 मे. तमाशाचं नाव, सोनालीचं पूर्ण नाव किंवा पत्ता, दूरध्वनी नंबर नसताना तिच्यापर्यंत पोहचणं अशक्य वाटत होतं. परंतु मी ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली. कारण एकच-सोनालीला माणूसपण मिळवून द्यायचं होतं. अन्यथा तिच्या दु:खाचे हुंदके घुंगराच्या आणि शिट्ट्यांच्या उन्मादात लपून बसलं असतं. सुरू केली मग शोधमोहीम. दै.लोकमतमध्ये ही बातमी देणार्या पुण्याच्या बातमीदारांकडून मिलिंद देशमुखांनी दूरध्वनी नंबर मिळवून मला दिला. त्या नंबरवरून ती सिन्नर तालुक्यात असल्याचं समजलं. फडाचं नाव कळालं. तालुक्यात कोणत्या गावी यात्रा आहेत त्याचा शोध घेतला. त्या यात्रेमध्ये कोणता तमाशा आहे याचा शोध घेतला मात्र हाती काहीच आलं नाही. दुसर्या दिवशी सोनाली शिर्डीत असल्याचे कळाले. मग वृत्तपत्राचे वार्ताहर, मित्र, नातेवाईक यांची मदत घेत भरउन्हात शिर्डी व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला तरी हातात काहीही यश आलं नाही. पुन्हा सोनालीने मला नाशिकमधील येवला हे गाव सांगितलं. आणि पुन्हा तेच. मग मात्र नक्की झालं की, सोनाली खोटं बोलते परंतु नाईलाज होता. मग ‘मोबाईल टॅ्रकर’ वापरून ती नाशिक जिल्हात नसल्याचं स्पष्ट झालं. मग मी मोर्चा वळविला शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात. कारण तमाशाच्या परतीच्या वेळी पुण्याकडे जाताना हा जिल्हा जवळ आहे. सोनालीच्या दूरध्वनीवरून मी नेहमी बोलल्यामुळे तमाशामालकाला संशय आला. ‘आम्हास तुमच्या फडाची तारीख पाहिजे आहे म्हणून मी सोनालीला संपर्क करतो’ माझं हे सांगणं त्यांना रूचलं नाही. कारण संपर्कासाठी मालक किंवा व्यवस्थापक असल्यावर सोनालीबरोबर बोलायचं काम नाही व आम्ही तुम्हास भेटू इच्छित नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मग सोनालीपर्यंत पोहचणं आणखीच अशक्य वाटायला लागलं. वाटलं सोडून द्यावं येथेच. परंतु मन तयार होईना. सोनालीने सांगितलेल्या ठिकाणाकडे मी दुर्लक्ष केले. कुठे-कुठे यात्रा आहे याचा शोध सुरू केला. मग त्या गावात कुणाच्या ओळखीचं कोण आहे त्यांना तमाशा शोधण्यासाठी पाठवलं जायचं. या कामी माझे मित्र विजय चव्हाणके व कमलेश गायकवाड यांची फार मदत झाली. तमाशा बघण्यासाठी इतक्या दूर येणार का? या प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला वेळ नव्हता. कारण एक-एक दिवस निघून चालला होता. मिलिंद व अभिलाषाचा दबाव माझ्यावर वाढत चालला होता. अचानक दै.सकाळमध्ये पिंपळगाव पिसा, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर येथे यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा अशी बातमी वाचनात आली. कमलेशचे काका त्याच गावचे असल्यामुळे आम्ही त्यांना संपर्क केला. त्यांनी यात्रेच्या ठिकाणी जाऊन तमाशाच्या नावाची चौकशी केली. आणि नाव तर तेच निघालं. वेळ न घालवता मी व कमलेश निघालो. मात्र काही वेळाने कळालं तमाशा आज नाही तर उद्या आहे. आमची निराशा झाली पण आनंद याचा की, तयारीसाठी एक दिवस मिळाला. श्रीगोंद्याचे अंनिसचे कार्यकर्ते डॉ.प्रा.आनंद गोरे यांना मी ही माहिती कळविली. दुसर्या दिवशी पहाटेच निघून आम्ही श्रीगोंदा पोलीस स्टेशन गाठलं. प्रा.गोरेंबरोबर प्रा.प्रकाश साळवे आले. आम्हा चौघांचा उत्साह बघून पोलीस निरीक्षक अजय जाधवराव यांनी संबंधित बेलवंडी पोलीस स्टेशनला दूरध्वनी केला. व पोलीस बंदोबस्त देण्याचं आश्वासन दिलं. नंतर साधारण 1 वाजता आम्ही बेलवंडी पोलीस ठाण्याला पोहोचलो. मात्र चार वाजले तरी पोलीस आमच्याबरोबर येण्यास तयार होईना. शेवटी कारण कळालं. शेजारीच सोनालीच्या जातीमधील एका मुलीचं दोन वर्षांपूर्वी देवाबरोबर लग्न झालं. एका युवकाबरोबर त्या हवाई सुंदरी असलेल्या मुलीचं लग्न मोडताना या सर्वांनी मार खाल्ला होता. कारण त्या मुंबईच्या युवकाचं व त्या मुलीचं प्रेमप्रकरण होतं. ‘तुमच्यापैकी कुणाचं तसं असेल तर आम्ही मार खाऊ’ असं त्यांनी आम्हाला सांगितलं. नंतर मात्र आम्हाला त्यांचच प्रबोधन करावं लागलं. शेवटी काय तर देवाचं लग्न मोडायला सतराशे विघ्नं. अंधार पडण्यापूर्वी फडात पोहोचविण्याचं नक्की केलं होतं. कारण तमाशाच्या वेळी गोंधळ झाला असता तर तमाशा रद्द होऊ शकतो असं गावकर्यांना वाटलं असतं. मग आमचाच तमाशा झाला असता. कसंतरी पाच वाजता आम्ही फडात पोहोचलो. पोलिसांनी फडमालकाशी आमची ओळख करून दिली. फडमालक(संभाजी जाधव) यांनी आम्हास सोनालीस भेटण्यास नकार दिला. सोनालीला भेटल्याशिवाय आम्ही फडाच्या बाहेर जाणार नाही अशी आम्ही भूमिका घेतली. अंनिसचे लोक बातमी वाचून इथपर्यंत येऊन सोनालीला घेऊन जातील असं अगोदरच वाटलं होतं असं त्यांनी सांगितलं. आम्ही मात्र सोनालीचं मनपरिवर्तन करण्यास आलो आहोत व सोनालीला फडातून आम्ही घेऊन जाणार नाही अशी भूमिका जाहीर करताच त्याने सोनालीला आमच्यासमोर हजर केले. सोबत तिचे काका(वाघुजी नानाची औंधकर) व आत्या (चिला नानाजी औंधकर) पण होते. तासभर आम्ही त्यांचं प्रबोधन केले.
देवाशी लावले जाणारे लग्न खरे तर ब्रिटीशांनी 1934 साली केलेल्या कायद्याप्रमाणे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्यासंदर्भात कायदा केला आहे. वेळोवेळी त्यात प्रभावी बदल केले आहेत. त्यानुसार असे लग्न झाल्यास या सर्वांनाच अटक होऊ शकते. याची त्यांना जाणीव करून देण्याबरोबरच सोनालीचे आयुष्य कसे उद्धवस्त होऊ शकते. तिचं आयुष्यभर कसं शोषण होऊ शकते याची जाणीव करून दिली. देवाला दिलेला शब्द मोडला तर सोनालीला पुन्हा पोटदुखीचा त्रास होईल असं आत्याला वाटलं. सोनालीच्या प्रकृतीला काही झाले तरी तिच्या उपचारासह खर्चाची सर्व जबाबदारी अंनिस घेत आहे असा शब्द देऊन त्यांना आश्वासित करण्यात आले. तासाभराच्या सुसंवादानंतर सर्वांच्या संमतीने हे लग्न मोडण्यात आले. आणि तसे त्यांनी लिहून दिले. तमाशा मालकाने अंनिसच्या कार्याचे कौतुक करत सोनालीच्या खर्याखुर्या लग्नासाठी 25 हजार रूपये देण्याचे कबूल केले. सोनालीच्या वडिलांना व्यसनमुक्त करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत समिती करणार आहे. लग्न मोडल्यानंतर सोनाली तिचं हसू लपवू शकली नाही. आम्ही सर्व आनंदी चेहर्याने फडाच्या बाहेर पडलो. कारण एका मुलीच्या आयुष्यात आम्ही बदल केला होता.
अहमदनगरचे पोलीस अधिक्षक कृष्णप्रकाश यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. डॉ.दाभोलकर यांनी सर्व घटनेची सूत्रे पडद्यामागून प्रभावीपणे हलविली. महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रांनी ह्या घटनेची ठळकपणे नोंद घेतली. आय.बी.एन.लोकमतने ह्या घटनेची दखल घेतली. ह्या मोहिमेकडे पाहताना अनेकांनी माझ्याकडे हळहळ व्यक्त केली. सोनालीच्या लग्नासाठी (खर्याखुर्या) व पुनर्वसनासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. काहींनी वर्हाडी म्हणून बोलवा असं सांगितलं.
ह्या सर्व घटनेकडे बघतांना मला अभिमान याचा वाटतो की, अंनिस ही माणसाचं माणूसपण जपण्याची चळवळ आहे हा विचार समाजासमोर नेण्याचा मी केवळ प्रयत्न केला.
– कृष्णा चांदगुडे