Categories
चळवळ शिबिर

धर्मांधाचे मनसुबे उधळले शांतीवन शिबीर यशस्वी

ऑगस्ट - २०१२

            महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय नवइच्छुक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर दि.8, 9 व 10 जून 2012 रोजी कुष्ठरोग निवारण समिती, शांतीवन(नेरे), ता.पनवेल, जि.रायगड येथे संपन्न झाले. शिबीराला राज्यभरातून 81 कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. शिबीर सर्वार्थाने यशस्वी झाले. कारण हे शिबीर ‘धर्मांध शक्तींवर घटनात्मक मार्गाने विजय मिळविता येतो’ हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना देऊन गेले. शिबिराची तारीख निश्चित झाल्यावर सुमारे दीड महिला आधीच शांतीवनमध्ये संपर्क करून तीन दिवसांच्या शिबिराची नोंदणी केली. शांतीवनमध्ये दर वर्षी समितीची शिबीरे उत्तमप्रकारे पार पडतात पण यावेळी मात्र त्याला छेद गेला. 28 मे रोजी शांतीवनामधून महेंद्र नाईक यांना फोन आला की, ‘काही लोकांचा शिबिराला विरोध आहे. ते अंनिसचं शिबीर घेऊ नका’ असे सांगून गेले. महेंद्र नाईक यांनी शांतीवन प्रशासनाबरोबर चर्चा केली. समितीच्या प्रधान सचिव सुशीला मुंडे यांनीसुद्धा शांतीवनामध्ये संपर्क साधून सविस्तर चर्चा केली व अशा दडपशाहीला बळी पडू नये असे सांगितले परंतु 29 मे ला पुन्हा शांतीवनमधून फोन आला व ‘आज काही स्थानिक ग्रामस्थ येऊन शिबीर न घेण्याविषयी सांगून गेले. तसेच त्यांनी धमकी दिल्याचे सांगितले.’ शांतीवन ही पुरोगामी विचारांची संस्था असून अशा धर्मांध शक्तींना बळी पडू नये असे त्यांना पटवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला; परंतु त्यांनी दुसर्‍या दिवशी विरोधक व अंनिस कार्यकर्ते यांची एकत्रित बैठक आधीच ठरवली होती. अशा धर्मांध शक्तींबरोबर आम्ही कोणतीही चर्चा करणार नाही अशी समितीने भूमिका घेतली. त्यानंतर राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी शांतीवनचे कार्यवाह शंकर बगाडे यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यावेळी बगाडे यांनी ‘शंतीवनने बैठकीचा शब्द दिला आहे तरी कार्यकर्ते बैठकीला पाठवा.’ असा आग्रह धरला. शांंतीवनच्या शब्दाखातर मिटींगला जाण्याचे अविनाश पाटील यांनी सांगितले. रात्री उशिरा तसा मेसेज मिळाला.

            दि.30 मे ला महेंद्र नाईक, आरती नाईक, निलेश घरत, नेहा घरत, उल्हास ठाकूर, संतोष टकले बैठकीला गेले. विरोधकांकडून 17-18 लोक उपस्थित होते. त्यामध्ये जवळच्या गावातले आजी-माजी सरपंच, वारकरी संप्रदायाचे नेते, नरेंद्र महाराजाचे भक्त व इतर संघटनांचे प्रतिनिधी होते. बैठकीत या मंडळींकडून नेहमीच केले जाणारे आरोप, कागदपत्रांचे कात्रणांचे पुरावे वगैरे होते. अंनिसतर्फे यावेळी अशी भूमिका घेण्यात आली की, ‘आपण या आरोप-प्रत्यारोपांच्या चर्चेसाठी जमलेले नसून फक्त शिबिराबाबत चर्चा करणार आहोत. तुमचे प्रतिनिधी शिबिराला पाठवा आणि आक्षेपार्ह असेल त्यावर कायदेशीर कारवाई करा.’ मात्र विरोधकांना गोंधळ घालण्यापलिकडे काही ऐकून घ्यायचे नव्हते. शांतीवन प्रशासन बैठक हाताळताना एकतर्फी राहिले व आम्हाला बोलण्यापासून रोखत राहिले. शिवाय शिबीर होणे अथवा न होऊ देण्याचा निर्णय सरपंचांच्या हाती सोपवण्यात आला. याचवेळी शांतीवनच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले. शांतीवनला निर्णय कळवण्याचे सांगून आम्ही बाहेर पडलो. खरेतर मिटींगपूर्वीच, किती लोकांना आत घ्यावे या संबंधाने बगाडे यांच्याशी चर्चा केली होती. परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. या बैठकीत हे लक्षात आले की, स्थानिक ग्रामस्थांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सनातनी विरोधात आहेत व शांतीवन प्रशासन पूर्णत: दबावाखाली आहे.

            दरम्यान डॉ.दाभोलकर व शांतीवन विश्वस्त कमिटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांची फोनवर चर्चा झाली होती. न्या.धर्माधिकारी यांनी शिबीर होणारच असे सांगितले होते. 30 तारखेच्या बैठकीनंतर डॉ.दाभोलकरांनी न्या.धर्माधिकारी यांना पत्र लिहून समितीची भूमिका मांडली व शिबीर नाकारल्यास शांतीवनामध्ये तीन दिवस उपोषणास बसू असे सांगितले. शांतीवनकडून काहीच निरोप न आल्याने डॉ.दाभोलकरांनी शांतीवनच्या कार्यवाहांना फोन केला. त्यांनी  शिबीर होत असल्याचे सांगितले. त्यामुळे अनिश्चितता संपली पण विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता होतीच म्हणून सुशिला मुंडे यांच्या सोबत चर्चा करत कार्यकर्त्यांनी आखणी केली व पोलिसांना निवेदन देत प्रा.मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी नवीन पनवेल पोलिस स्टेशनला संरक्षण पुरवण्याची मागणी केली. एक प्रत पोलिस उपायुक्तांनाही देण्यात आली.

            5 जूनला आरती नाईक, महेंद्र नाईक, उल्हास ठाकूर यांनी शांतीवनला जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. विरोध होणारच हे जाणवले. संध्याकाळी पुन्हा पोलिस स्टेशनला जाऊन गोपनीय शाखेचे जितेंद्र म्हात्रे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजारे यांची भेट घेतली. दोघांनीही संरक्षण देत असल्याचे कबूल केले. 6 जूनला मात्र पूर्ण वातावरणच बदलून गेले व संपूर्ण दिवस नाट्यमय घटनांनी भरून गेला. 6 जूनला हिंदुत्ववादी संघटना ‘हिंदू जनजागृती समिती’ व शांतीवन परिसरातील पाच गावातील सरपंचांनी ग्रामस्थांच्या सह्यानिशी पोलिस स्टेशनला शिबिरावर बंदी आणण्याचे निवेदन दिले. त्यामुळे पोलिस यंत्रणा अधिक गंभीर झाली. त्यांनी शांतीवन पदाधिकारी व प्रा.मुंडे यांनाही फोन करून बोलावून घेतले. त्याचदरम्यान शांतीवनमधून निरोप मिळाला की, शांतीवनचे उपाध्यक्ष मोतीलाल बांठिया यांची भेट घ्या त्याप्रमाणे महेंद्र व आरती नाईक तेथे गेले. शांतीवनचे बगाडे, बांठिया व आम्ही दोघे यांच्यात चर्चा झाली. बांठिया यांनी सकारात्मकतेने चर्चा केली व आम्ही पोलिस स्टेशनला पोहोचलो. प्रा.मुंडेही पोहोचले. सर्वांनी पोलिस निरीक्षक पोळ यांची भेट घेतली तर पोळ यांनी कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न सांगून शिबीर न घेण्यासंबंधी पत्र देत असल्याचे सांगितले. प्रा.मुंडे यांनी समितीची भूमिका ठामपणे मांडली परंतु शांतीवनचे कार्यवाह बगाडे यांच्या नकारार्थी भूमिकेमुळे अंनिस व शांतीवन यांच्यामध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसले. त्यामुळे पोळ यांनी सायंकाळी 5.30 वाजता विरोधक, अंनिस व शांतीवन पोलीस यांची संयुक्त बैठक बोलावली. तेथून उठून सर्वजण पोलिस उपायुक्त शेवाळे साहेबांना भेटायला गेलो. शेवाळेसाहेब धुळ्याहून बदलून पनवेल येथे आलेले असल्याने धुळे जिल्ह्यातील अंनिसचे काम अविनाश पाटील, डॉ.दाभोलकर यांच्याशी परिचित होते. त्यांच्या सकारात्मक आश्वासनामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला.

            संध्याकाळी मिटींगला प्रा.मुंडे आणि महेंद्र नाईक, शांतीवनतर्फे बगाडे व उपाध्यक्ष बांठिया व गवई आले. विरोधी संघटनांचे 8-9 प्रतिनिधी आले. त्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ 2 तर इतर सनातनचे व हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते जास्त होते. दोन ग्रामस्थ म्हणजेच सरपंच होते व त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आले की, त्यांना अंनिसवरील आरोपांविषयी, कामाविषयी माहितीच नव्हती ते केवळ हिंदुत्ववादी संघटनांच्या सांगण्याला बळी पडले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजारे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. समितीतर्फे मुंडे यांनी ‘हे शिबीर नोंदणीकृत कार्यकर्त्यांचे असून ग्रामस्थांचा काहीही संबंध नाही.’ हे स्पष्ट केले. शांतीवनने  याला दुजोरा दिला. हिंदुत्ववादी संघटना नेहमीचे आरोप, पुरावे मांडू लागल्यावर मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजारे यांनी हे स्पष्ट केले की, ‘तुम्ही मांडता ते जाहीर किंवा खुल्या कार्यक्रमातले.’ ‘हा बंदिस्त जागेतला व त्यांच्या कार्यकर्त्यांसाठीचा कार्यक्रम आहे. कार्यक्रम होण्याआधीच तुम्ही आरोप कसे सांगता? तसेच आक्षेपार्ह आढळल्यास आम्ही कारवाई करू.  तुमचे व आमचे प्रतिनिधी शिबिरात असतील.’ असे पोलिसांनी सांगितले. पण विरोधक काहीच मान्य करीत नव्हते. शेवटी बाजारे यांनी शांतीवनचे कार्यवाह बगाडे यांना प्रश्न विचारला की, ‘तुम्ही शिबीर घेण्यास तयार आहात का?’ यावर बगाडे यांनी अनपेक्षितपणे पटकन ‘नाही’ असे उत्तर दिले. प्रा.मुंडे यांनी ‘तुम्ही वेळेवर नाही कसे म्हणू शकता? आम्ही कोणत्याही परिस्थितीत शिबीरासाठी येणारच असे सांगितले. त्याचवेळी उपाध्यक्ष बांठिया यांनीही ठामपणे सांगितले की, ‘हे बगाडेंचे वैयक्तिक मत झाले. माझे म्हणणे आहे की, शिबीर घेणार.’ अंनिसची भूमिका व बांठिया यांचा स्पष्ट होकार यामुळे पोलिसांपुढे प्रश्न निर्माण झाला. त्यांची टीम उपायुक्तांना भेटण्यास गेली. तोपर्यंत सगळेच अनिश्चित होते.

            वरिष्ठांबरोबरच्या चर्चेनंतर व पोलिस निरीक्षक बाजारे यांनी त्यांचे अंतिम मत सांगितले की, शिबीर होईल. पोलिसांमार्फत निरीक्षक बसवले जातील. आक्षेपार्ह आढळल्यास कार्यवाही करण्यात येईल. विरोधकांनाच ठाम विरोध करत हाच निर्णय अंतिम ठेवण्यात आला. त्याचबरोबर सर्वांना कलम 349 अंतर्गत नोटीसा बजावून आपल्यालाही काही अटी घालून बैठक संपली. यानंतर दि.8, 9 व 10 तिन्ही दिवशी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली. शिबिराच्या दुसर्‍या दिवशी शांतीवनचे उपाध्यक्ष बांठिया व पोलीस उपायुक्त शेवाळे साहेब यांनी शिबिरार्थींना डॉ.दाभोलकरांनी घेतलेल्या शिबीराचा आपल्यावर प्रभाव पडला असे सांगितले. शिबिरार्थींना यामुळे प्रेरणा तर मिळाली आणि आपण घटनेच्या चौकटीत विधायक काम करतो तेव्हा संविधानाला बांधील यंत्रणा आपल्यापाठी खंबीरपणे उभी राहते, याचा प्रयत्क्ष अनुभव नवेच्छुक कार्यकर्त्यांना मिळाला.

            पनवेलमध्ये काम करताना हा अनुभव नवीन नाही. तरीही यात खूप वेगळेपण आहे. एरव्ही हिंदुत्ववादी संघटना थेट विरोधात असतात. इथे त्यांचे नावही पुढे नव्हते तर स्थानिक ग्रामस्थांच्या नावे सर्व सुरू होते. इथे थेट पोलिसांना निवेदन न देता शांतीवनसारख्या संस्थेवर दबावाचे प्रयत्न होते. म्हणजे अंनिस व सनातनी यांच्यामध्ये शांतीवन व ग्रामस्थ या दोन संस्था होत्या त्यामुळे प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनला होता. या मंडळींनी आपला मार्ग बदलला आहे.

            शिबीराच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी पनवेल शाखेच्या वतीने जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवलेला होता. कार्यक्रमस्थळी गेल्यानंतर लक्षात आले की, आमच्या आधी पोलीस हजर होते. चौकशीअंती समजले की, कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी आले आहेत. कारण ‘हिंदू जनजागरण समितीने’ कार्यक्रमाविरोधात बंदीचे निवेदन दिले होते. पोलिसांनी आमच्याशी संपर्क करण्यापूर्वीच त्यांना नोटीस बजावून बंदोबस्त दिला होता. उठसूठ त्रास देणार्‍या या संघटनांविषयी त्यांनी संतापही व्यक्त केला. तसेच पनवेल शहर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी स्वत: भेट देऊन सुरक्षेची पाहणी केली.

            हे सर्व पाहिल्यानंतर जाणवलं, ‘अंतिम विजय शेवटी आपलाच आहे.’

– महेंद्र नाईक