धुळे शहरात रविवार दि.17 जून रोजी शिवसाधना ध्यान केंद्र(गुजरात), फिजिक्स क्लासेसचे प्रा.मिलिंद जोशी व शशिकांत येवले यांच्यामार्फत ‘श्री.पारद शिवलिंग महापूजन व महायज्ञ’ आयोजित करण्यात आला होता. त्यांच्यामार्फत पत्रकार परिषद घेऊन व शहरात अनेक ठिकाणी मोठे डिजीटल बॅनर्स लावून जाहिरातीद्वारे काही बेकायदेशीर व अवैज्ञानिक दावे करण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य धुळेकर व इतर नागरिकांची दिशाभूल होऊन त्यांच्याकडून सदर कृती केल्यास शरीरास घातक प्रकार घडू शकतात यासाठी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.
शिवतपस्वी दादाश्री(गुजरात) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्या सदर महापूजन व महायज्ञ कार्यक्रमात सुमारे 100 लोकांनी पुजेत सशुल्क नोंद करून सहभागी होण्याचे आवाहन केले गेले होते. पारा या विषारी धातूपासून (मानवी शरीरात ग्रहण केल्यास) पासून बनविलेले शिवलिंगाचा अभिषेक केल्यास वाईट भास होत नाहीत, आर्थिक अडचणी दूर होतात व धनप्राप्ती होऊन प्रगती होते, साडेसातीपासून होणारा त्रास कमी होतो हे दावे करण्यात आले आहेतच. शिवाय अशा पार्यापासून बनविलेल्या शिवलिंगाचे जल प्राशन केले असता शरीराला उपकारक असते असाही दावा करण्यात आला होता.
कालिकत विद्यापीठाच्या संशोधनानुसार कुठलाही रासायनिक पदार्थ पाण्यासोबत सेवन करून आजार बरा करणेविषयी त्याचा तपासणी संशोधनविषयी अहवाल उपलब्ध नसल्यास धोकादायक आणि बेकायदेशीर आहे. कारण पारा हा मानवी शरीराला सेवन करण्यास अत्यंत विषारी पदार्थ आहे. त्यामुळे अशा प्रकारे धार्मिक पुजेच्या नावाने जाहिरात करून आणि शुल्क आकारून अवैज्ञानिक व फसवे बेकायदेशीर दावे करणार्या सदर कार्यक्रमास रोखण्यात यावे. त्यापासून लोकांची फसवणूक व दिशाभूल होऊ नये म्हणून भारतीय दंड विधान(आय.पी.सी.) कलम 284, 326, 511 आणि 34 नुसार संयोजक व दावे करणार्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावेत. तसेच मेडिकल प्रॅक्टीशनर अॅक्ट-1954 नुसार देखील गुन्हा दाखल करावा अशी तक्रार आम्ही म.अं.नि.स., धुळे शाखेच्या वतीने केली. या तक्रारीमुळे संयोजकांनी महाराज आजारी असल्याचे कारण सांगून कार्यक्रम रद्द केला.
-ए.ओ.पाटील, धुळे