भारतासहित जगातील बहुतेक सगळी प्राचीन कॅलेंडरं ही चांद्रमासावर आधारित आहेत. एक चांद्रमास हा सुमारे साडे एकोणतीस दिवसांचा असतो. त्यामुळे अशा बारा महिन्यांचे दिवस एकत्र केले तर त्यांची बेरीज(354) सौर वर्षापेक्षा सुमारे 11 दिवसांनी कमी होते. असं दीर्घ काळ होत राहिलं तर कॅलेंडर आणि ऋतू यांचा मेळ बसेनासा होईल. म्हणून कालगणना निर्दोष रहावी यासाठी दर तीन वर्षांनी एक जादा महिना घालावा लागतो. याला पाश्चात्य देशात ‘इंटरकॅलरी मंथ’ असं म्हटलं जातं. भारतीय परंपरेत याला ‘अधिक महिना’ किंवा ‘मलमास’ असं म्हणतात. चैत्र ते अश्विन या पहिल्या सात महिन्यांपैकीच कोणतातरी एक ‘अधिक’ होऊ शकतो. ज्या महिन्याच्या मूळ जागी हा महिना घातला जातो. त्या महिन्याचं नाव त्याला दिलं जातं. सध्या जगभर प्रचलित असलेलं ग्रेगरियन कॅलेंडर 365 दिवसांचं असल्यामुळे त्यात दर चार वर्षांनी एक ‘अधिक’(इंटरकॅलरी) दिवस घालणं पुरेसं ठरतं. फेबु्रवारीचे दिवस 29 असणार्या अशा वर्षाला आपण ‘लीप’ वर्ष म्हणतो. यंदाचं वर्ष हे ‘लीप’ वर्ष आहे. ही सगळी चर्चा आज इथं करण्याचं कारण म्हणजे अठरा ऑगस्टला श्रावण संपला आणि 20 ऑगस्ट शनिवारपासून ‘अधिक भाद्रपद’ सुरू झाला. यंदाच्या शालीवाहन शके 1934, ‘नंदन’ नाम संवत्सरातला हा तेरावा महिना….
पावसाचं प्रमाण यंदा सरासरीपेक्षा आणि अपेक्षेपेक्षा कमी राहिलंय. उरलेल्या महिन्याभरात पावसाची थकबाकी भरून निघाली नाही तर दुष्काळसदृश स्थिती होऊ शकेल. तसं झालं तर ‘दुष्काळात तेरावा महिना’ ही म्हण खरी ठरण्याची शक्यता निर्माण होईल. ‘दुष्काळात तेरावा महिना’ ही म्हण आपल्याकडे आली तरी कशी? आपल्याकडे वर्षातले बाराही महिने काही ना काही व्रत, वैकल्य, सण, उत्सव साजरे केले जातात. या सगळ्या धार्मिक कर्मकांडात बराच खर्च होत असतो. एकूण प्राप्ती आणि हा खर्च याची तोंडमिळवणी करता करता आधीच आपली दमछाक होत असते. अशा वेळी(खरं तर अवेळी!) उपटसुंभासारखा अधिक महिना टपकतो. आधीच नेहमी होणार्या खर्चानं आपण मेटाकुटीला आलेलो असतो. त्यात अधिक महिन्याच्या निमित्तानं करायच्या दानधर्माची भर पडते! म्हणून ‘दुष्काळात तेरावा महिना!’
अधिक महिन्यात दानधर्म का करायचा? कारण भटजीबुवा तसं सांगतात. ते असं का सांगतात? पोथीत लिहिलंय म्हणून. पोथीत काय लिहिलंय? अधिक महिना हा अशुभ, अपवित्र आणि उपसर्गकारक आहे. म्हणूनच त्याला ‘मलमास’ असंही म्हणतात. त्याचा आणि व्रतं-दानधर्माचा काय संबंध? त्याचीही कथा पोथीत आहे-अशुभ म्हटल्यामुळे ‘मलमास’ दु:खीकष्टी झाला आणि भगवान विष्णूंकडे गेला. ते त्याला श्रीकृष्णाकडे घेऊन गेले(कृष्णा हा विष्णूचा अवतार ना? मग असं कसं शक्य आहे? श्श… प्रश्न विचारायचे नाहीत. पोथीत लिहिलंय ना? बरोबर असणार ते!) श्रीकृष्णानं त्याला ‘पुरूषोत्तम मास’ असं नाव दिलं आणि या महिन्यात जो भक्तीपूर्वक व्रत करेल त्याला सगळं ऐश्वर्य प्राप्त होईल असं सांगितलं. म्हणून अधिक महिन्यात ब्राम्हण पती पत्नींना भोजन द्यावं, सुवर्णदान द्यावं. अधिक मासाचं व्रत करणार्यांना सुखसमृद्धी लाभेल. पण व्रताकडं दुर्लक्ष करणार्यांना अपार क्लेश भोगावे लागतील. पांडवांच्या नशिबी वनवास आला कारण त्यांनी अधिक मासाच्या व्रताकडं दुर्लक्ष केलं होतं.(कोण म्हणतं ते ‘स्वत:च्या करणीनं द्युतात हरले’ म्हणून?) स्वत: श्रीकृष्णानंच त्यांना तसं सांगितलंय! अजून पुरावे हवेत? घ्या. नारदमुनी सांगतात, दृढधन्वा राजाला मुलगा नव्हता. त्यानं श्रीकृष्णाची प्रार्थना केली तेव्हा गरूड प्रकटला(प्रभारी?) आणि म्हणाला की, पुत्र होईल पण तो अल्पायुषी असेल. तसंच झालं. राजपुत्र शुक पाण्यात खेळताना बुडून मेला. राजानं श्रीकृष्णाची प्रार्थना केली तेव्हा श्रीकृष्णानं त्याला जिवंत केलं. त्यानंतर वाल्मिकी मुनींनी(रामायणातले?) राजाला अधिक मासाच्या व्रताचं महात्म्य सांगितलं. आणखी एक कथा… चमत्कार नामक नगरीत मणिग्रीव नावाचा एक दुष्ट शुद्र रहात होता. त्याला लोकांनी गावाबाहेर वाळीत टाकलं होतं.(गावकुसाच्या आत शूद्रांना कधीतरी स्थान होतं का? श्श… भलते प्रश्न विचारू नका!) त्यानं एका मुर्च्छित ब्राम्हणाला शुद्धीवर आणून त्याची सेवा केली. ब्राम्हणानं खूष होऊन त्याला अधिक मासाचं व्रत सांगितलं. ते केल्यावर त्याची भरभराटी झाली. इत्यादी.. इत्यादी…
या सगळ्याला भाकडकथा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? धार्मिकतेचं वलय आलं की आपली विचारशक्तीच जणू कुंठित होते आणि आपण सगळ्या गोष्टी निमूटपणे स्वीकारतो…. जे सत्यनारायणाच्या किंवा शनी महात्म्याच्या कथेचं तेच अधिक मासाच्या कथेचं! बरीवाईट फलश्रुती सांगून कर्मकांडं तगवायचा धर्माच्या दलालांचा पद्धतशीर कावा! एखाद्या कालखंडाला सोयीसाठी वेगळं नाव दिलं म्हणून तो अशुभ कसा होईल? यंदाच्या महिन्यापुरतं बोलायचं तर गंमतच आहे. निर्णयसागर किंवा दाते पंचांगाप्रमाणे चालू महिन्याचा कालखंड हा अधिक भाद्रपद म्हणून अशुभ आहे. तर टिळक पंचांगाप्रमाणे कालनिर्णय घेणार्यांचा गणपती त्यांचा भाद्रपद ‘नेहमीचा’ असल्यामुळे याच महिन्यात येतो, म्हणजे त्यांचा हाच कालखंड शुभ झाला! मुळात अधिक मास म्हणजे काही अस्मानी, दैवी, अद्भुत संकट नव्हे. कालगणना आणि ऋतूचक्र
यांचा मेळ घालण्याचा तो मानवी बुद्धीचा गणिती प्रयत्न आहे. एखादं व्रत केलं नाही तर वाईट प्रसंगाला तोंड द्यावं लागेल असं सांगून काहीतरी उदाहरणं दिली की भोळ्या भाविकांना त्याची भीती वाटते. ‘विषाची परीक्षा कशाला’ म्हणून ते बिचारे निमूटपणे व्रतं पाळतात. हा तर धार्मिक दहशतवाद झाला! त्याला बळी पडून असलेले खर्च वाढवायचे का? अशुभ महिन्याच्या खुळचट समजुतीवर विश्वास ठेवायचा का? त्यासाठी आपला वेळ, श्रम, बुद्धी, पैसा वाया घालवायचा का? विचार तर कराल….
–डॉ.आशुतोष मुळ्ये