Categories
संतविचार

दुष्काळात यज्ञ घालून पाऊस पाडता येत नाही

जून - २०१९

संपूर्ण महाराष्ट्र सध्या दुष्काळामध्ये होरपळत आहे. अशा दुष्काळाच्या काळातही काही लोकं सर्वसामान्य लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांची लूट करण्याचा प्रयत्न करतात. या लुटीचे प्रमुख माध्यम आहे यज्ञ. पाऊस पडत नसेल, तर यज्ञ करावा, असा सल्ला ही मंडळी देत असतात; परंतु वारकरी संतांनी मात्र यज्ञाच्या माध्यमातून होणार्‍या शोषणातून समाजाला मुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. योग-याग करून कुणालाही सिद्धी प्राप्त होत नाही, तर उलट अहंकार होतो, असं ज्ञानेश्वर हरिपाठातील अभंगात म्हणतात – योग-याग विधी येणे नोहे सिद्धी। वायाची उपाधी दंभ धर्म॥

याग म्हणजे यज्ञ करून सिद्धी तर प्राप्त होत नाही, उलट अहंकार होतो, असे महाराज म्हणतात, तर अन्य एक अभंगात संतांनी सल्ला दिला आहे की,

न लगे दंडन मुंडन। न लगे पंचाग्नी साधन॥

यातील पंचाग्नी साधन हा उल्लेख यज्ञांसाठी आहे. इतकी सुस्पष्ट मांडणी यज्ञाबाबत केलेली असताना काही लोक मात्र पाऊस पडण्यासाठी यज्ञ करण्याचा सल्ला देतात. इतकेच नव्हे, तर तसे करण्यास लोकांना प्रवृत्त करतात. त्यामुळे अगोदरच दुष्काळाच्या संकटात होरपळणार्‍या जनतेची आणखीनच परिस्थिती खालवते. अशा वेळी संत वचनाच्या आधारे समाजामध्ये प्रबोधन होण्याची गरज आहे. यज्ञ करून पाऊस पडत नाही; उलट पाऊस न पडण्यासाठी जी अनेक कारणे आहेत, त्यात यज्ञ एक आहे. काही लोक म्हणतील, ‘ते कसे?’

तर पावसाचे प्रमाण कमी होण्याचे जे मुख्य कारण आहे, ते पर्यावरणाची हानी आणि मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड. निसर्ग नियमाप्रमाणे पावसाचे प्रमाण योग्य राहण्यासाठी आपले पर्यावरण योग्य असले पाहिजे. त्यासाठी आपले वनक्षेत्र हे 33 टक्क्यांच्या पुढे असले पाहिजे. मात्र महाराष्ट्र राज्याचे वनक्षेत्र 17.95 टक्के आहे. दुष्काळाचा सर्वाधिक सामना करणार्‍या लातूर, बीड, उस्मानाबाद, जालना या जिल्ह्यांतील वनक्षेत्राची स्थिती तर अत्यंत चिंताजनक आहे. लातूरचे वनक्षेत्र तर केवळ 0.7 टक्के आहे. म्हणजे एक टक्का गाठण्यासाठी 93 पॉईंट पुढे जावे लागणार आहे. उस्मानाबादचे वनक्षेत्र 0.57 आहे. असा वनक्षेत्राचा र्‍हास केल्यामुळेच या जिल्ह्यावर वारंवार दुष्काळाचे संकट घोंगावत आहे.

म्हणूनच 900 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या सावधानतेचा इशारा देताना वनक्षेत्र लागवडीचा सल्ला दिला होता. महाराज म्हणतात –

नगरेची रचावी। जलाशये निर्मावी।

महा वने लावावी। नाना विद्या॥

म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी महावनाची गरज आहे; पण यज्ञासाठी तर वृक्षतोड करून त्यात लाकडं जाळावी लागतात. इतकेच नव्हे, तर तूप जाळावे लागते. त्यामुळे वनक्षेत्र कमी होते. म्हणून दुष्काळ घालवायचा असेल, तर यज्ञात तूप जाळण्याची नाही, तर पाणलोटाची कामे करण्यासाठी घाम गाळण्याची गरज आहे.