Categories
अभिवादन

एक लढाई, जी बांगलादेशने जिंकलीच पाहिजे

मे - २०१५

मेहफुझ अनाम

अविजित हा तरूण विज्ञान, मानवता, समानता, करूणा आणि विवेक यावर आधारीत, अंधश्रद्धा, धर्मांधता, अतिरेकीपणा, घातक रूढीपरंपरा यांपासून मुक्त समाज उभारू पाहत होता आणि हाच त्याचा गुन्हा ठरला. अविजित डॉ.दाभोलकर आणि कॉ.पानसरे यांच्यासारखाच धर्मांध अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाला. आपल्या पत्नीबरोबर बांगलादेशात पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आलेल्या अविजित रॉयला धर्मांध अतिरेक्यांनी भर दिवसा भर रस्त्यावर दिनांक 26 फेबु्रवारीला ठार मारले. त्याच्या शहीदत्वाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अभिवादन करीत आहे 12 मार्च 2015 ला इंडियन एक्सप्रेस या दैनिकात आलेल्या मेहफुझ अनाम (संपादक, द डेली स्टार, ढाका) यांच्या लेखाचा आलोक देशपांडे यांनी केलेला अनुवाद देत आहोत….. संपादक)

या खुनाची पूर्वसूचना खूप आधीच देण्यात आली होती. खुनाआधी साधारण एक वर्ष म्हणजे फेबु्रवारी 9, 2014 रोजी या खुनातील मुख्य आरोपी शफिउर रहमान फराबी याने फेसबुक वरील आपल्या मित्रांना सांगितले होते की, अविजित रॉय अमेरिकेमध्ये राहतात. “त्यामुळे त्याला आता मारणे शक्य होणार नाही. जेव्हा तो परत येईल तेव्हा त्याला मारता येईल,” असे तो म्हणाला होता.

फराबी सध्या अटकेत आहे. त्याने नंतर अविजीत यांच्या कुटुंबाचे फोटो तसेच त्यांच्या अमेरिकेतील पत्त्याचा ठावठिकाणाही शोधला होता. त्याने अविजीत यांच्या मित्रांकडेही चौकशी केली होती. फराबी याला दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती व सहा महिन्यामध्ये त्याची जामिनावर सुटका झाली होती. ‘मुक्त विचारांना’ पाठींबा देणार्‍या सर्व ब्लॉगरना मारण्याच्या त्याच्या प्रयत्नांना त्याने तात्काळ परत सुरवात केली होती. त्यावेळी सुटकेनंतर त्याने लिहिले की, “माझ्या मते नास्तिक लोक म्हणजे किड्यासमान आहेत आणि किडे हे मेलेलेच बरे.”

फराबी आणि अविजीत यांचा मुक्त विचार आणि धार्मिक मूलतत्ववाद या विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून वाद झाला होता. मात्र फराबीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्यावर अविजीत यांनी सर्व संभाषण बंद केले होते. त्यानंतर फराबीने त्यांना मोबाईलवर धमक्यांचे संदेश पाठविण्यास सुरवात केली. या सर्व पार्श्वभूमीवर अविजीत यांनी आपल्या पत्नीसोबत बांगलादेशला भेट देण्याचे ठरविले होते. त्यांची ही भेट केवळ कौटुंबिक नव्हती तर देशातील सर्वात मोठ्या म्हणवल्या जाणार्‍या पुस्तक जत्रेमध्ये ते त्यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन करणार होते. दहशतवाद्यांच्या धमकीला कमी लेखण्याची चूक त्यांनी केली आणि त्यांना आपल्या प्राणात मुकावे लागले.

हुमायुन आझाद या बांगलादेशातील प्रसिद्ध लेखकालाही 2004 मध्ये अशाच प्रकारच्या हिंसक हल्ल्याला तोंड द्यावे लागले होते. युद्धकाळातील गुन्ह्यांसंबंधित खटल्याला समर्थन देणार्‍या विद्यार्थी उठावानंतर 15 फेबु्रवारी 2013 रोजी राजीब हैदर या ब्लॉगरचाही खून करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 अतिरेकी संघटनांवर बांगला देशात सध्या बंदी आहे. हे गट वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या नावांनी काम करतात. अद्याप बंदी न आलेले जवळपास छोटे-मोठे असे डझनभर गट अजूनही अधूनमधून डोके वर काढीत असतात.

अतिरेकी विचारसरणीच्या अनेकांना बांगलादेश सरकारने अटक केलेली आहे. बंदी घातलेल्या संघटनाच्या 51 अत्युच्च नेत्यांना फाशी सुनावण्यात आली आहे, 178 जणांना जन्मठेप तर 245 जण वेगवेगळ्या कालावधीसाठी जेलमध्ये आहेत.

2000 च्या सुरवातीस ही अतिरेकी विचारसरणी बांगलादेशमध्ये झपाट्याने पसरली. यांचा म्होरक्या होता ‘बांगला भाई’, ज्याचा स्वघोषित कायदेरक्षक गट लोकांमध्ये भीती पसरविण्यासाठी ‘मृत्यूदंड’ सुनावित असे आणि प्रेते झाडावर लटकवित असे. ‘जमात-उल-मुजाहिदीन बांगला देश’ या संघटनेचा प्रमुख या नात्याने देशाच्या उत्तर भागावर वर्चस्व गाजविण्यास पुरेशी ताकद त्याच्याकडे होती. मजेची गोष्ट म्हणजे त्यावेळच्या पंतप्रधान खालिदा झिया यांनी ‘बांगलाभाई’ याचे अस्तित्वच नाकारले होते आणि त्याला केवळ मीडियाने उभारलेला बागुलबुवा असे संबोधिले होते. याच पंतप्रधानांच्या मंत्रीमंडळामध्ये जमात-ए-इस्लामीचे जे दोन मंत्री सहभागी करून घेण्यात आले होते, ज्या दोघांवरही युद्धकाळातील गुन्ह्यांबद्दल खटले चालू आहेत.

ऑगस्ट 2005 मध्ये या दहशतवादी कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली. जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेशने बांगलादेशातील 64पैकी 63 जिल्ह्यांमध्ये एकामागोमाग एक असे 459 स्फोट घडवून आणले. तीन महिन्यांच्या आत या गटाने पुन्हा हल्ला चढविला आणि दोन न्यायाधीशांची हत्या केली. त्यापाठोपाठ अनेक स्फोट आणि हत्या करण्यात आल्या. अखेरीस 2007 मध्ये ‘जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश’ चे अब्दुल रहमान आणि बांगलाभाई या अत्युच्च नेत्यांसह सहा उच्च नेत्यांना फासावर लटकविण्यात आले. या संघटनेचे अनेक सदस्य अटक करण्यात आले. ज्यामुळे ही बंदी घालण्यात आलेली संघटना बर्‍याच अंशी कमजोर झाली आहे.

2008 च्या अखेरीस सत्तेत परत आलेल्या शेख हसीना यांच्या सरकारने या अतिरेक्यांच्या विरोधात अतिशय जोमाने व तत्काळ कारवाई सुरू केली आणि 2009 ते 2013 या कालावधीमध्ये बराच मोठा पल्ला गाठण्यात त्यांना यश आले. मात्र, पुन्हा तीव्र झालेला हिंसाचार यामुळे या सर्व धार्मिक मूलतत्ववादी गटांना पुन्हा एकत्र येण्यास नवी संधी मिळाली. अटकेत असलेले अनेक अतिरेकी जामिनावर बाहेर पडले, तसेच अनेक अतिरेकी गट तयार झाले. यातीलच एक म्हणजे ‘अन्सारूल्ला बांगला’ ज्याने अविजीत यांच्या खुनाची जबाबदारी घेतली आहे. या दरम्यान धार्मिक प्रवचने देण्यासोबतच आपल्या धार्मिक मतांपेक्षा दुसरी मते असणार्‍यांच्या विरोधात खुनाची धमकी देण्यासाठीही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला होता. बांगलादेशच्या दहशतवादविरोधी मोहिमेतील सर्वात मोठी कमतरता म्हणजे राष्ट्रीय पातळीवर दहशतवादविरोधी सामाजिक-सांस्कृतिक व धार्मिक चळवळीचा अभाव. सात वर्षांपूर्वी पंतप्रधान हसीना यांनी अशा प्रकारची मोहीम सुरू केली होती. या संकटाशी दोन हात करणार्‍या समाजाच्या सर्व थरातील लोकांना एकत्र आणणारी ही कल्पना चांगली आणि समयोचित होती. मात्र विशिष्ट मार्गदर्शनाअभावी ती मागे पडली.

हिंसाचाराने भरलेल्या विरोधी पक्षांच्या आंदोलनाला तोंड देण्यात सरकार गर्क असल्याने, अतिरेकी प्रवृत्ती या संधीचा आपली पाळेमुळे घट्ट करण्यासाठी कसा उपयोग करतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अर्थात, एक गोष्ट आम्हाला नक्कीम माहीत आहे ती म्हणजे ही एक अशी लढाई आहे जी बांगलादेशने जिंकलीच पाहिजे आणि आमचा विश्वास आहे की, ती आम्ही जिंकू!

मराठी अनुवाद आलोक देशपांडे