Categories
संपादकीय

फसवी भाषा – उलटे वास्तव

फेब्रुवारी – २०१३

सामाजिक व्यवहारात दांभिकतेचा प्रत्यय पदोपदी येतो. शेतकरी व कामगारांना शेतकरी राजा, कामगार राजा असं म्हटलं जातं. बाईला देवी म्हटलं जातं(अरूणादेवी, प्रभादेवी इ.) ज्याला वस्तू विकायची तो ग्राहक. ग्राहकाचा उल्लेखही ग्राहकराजा असा केला जातो.

            राजा, राणी, देवी हे शब्द आदर भावना सुचवितात. ते आपल्यापेक्षा थोर आहेत अशी भावना त्यातून व्यक्त होते. पण वास्तव काय आहे?

            ज्याला थोर मानायचे त्याचे शोषण करणे ही कसली वर्तणूक? शेतकरी सर्वांना निर्वाह साधन देतो म्हणजे तो आपणाला जगवतो. पण त्याने पिकविलेले धान्य, फळे किंवा इतर माल पाडून मागायचा व त्याला गरीब ठेवायचे किंवा त्याने आत्महत्या करावी अशी परिस्थिती निर्माण करायची याला दांभिकता म्हणायची नाही तर काय म्हणाचये?

            जिला देवी म्हणायचे तिच्यावर सार्वजनिक वाहनात बलात्कार करायचा असला अत्याचार राजधानीत घडतो. हे पुरेसे नाही म्हणून गर्भातच तिला मारून टाकायचं या क्रौर्याला सीमाच नाही.

            ग्राहक राजाबाबत अशीच परिस्थिती आहे. त्याचे पैसे घ्या व भेसळ केलेले दूध त्याला विका. त्याचे चेक पेमेंट घ्या व तकलादू इलेक्ट्रॉनिक वस्तू त्याला कुरियरने पाठवा. गिर्‍हाईकाकडून रोख नोटा घ्यायच्या व कासेला विषारी पाला चोळून म्हैस दुधाची आहे असे सांगायचे व फसवणूक करायची. फसवाफसवीचा हा बाजार राजरोस चालू आहे. ज्याला राजा म्हणायचे त्यालाच असं फसवायचं?

            स्वार्थमूलक व्यवहार वाढला तर समाज चालणार कसा? म्हणून याच समाजात कायदे बनविले जातात. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी असाच कायदा बनविला गेला. ग्राहक संरक्षण कायदा असं त्याचं नामाविधान झालं.

            पण या कायद्यात ग्राहक कोण? जो पैसे मोजून वस्तू किंवा सेवा घेतो तो ग्राहक. जो पैसे स्वीकारतो तो विक्रेता. विक्रेता पावती देतो. ग्राहक ती पावती घेतो. फसवणूक झाली तर ती पावती पुरावा म्हणून सादर करावयाची व संरक्षण मागायचे. ग्राहक संरक्षण कायदा हे संरक्षण पुरवितो.

            पैसे देऊन पावती घेणे व त्या व्यवहारात फसणे ही झाली एक प्रकारची फसवणूक पण पावती न देता पैसे घेऊन जी फसवणूक होते त्याचं काय? धर्माच्या किंवा अध्यात्माच्या नावानं जी बुवाबाजी चालते ती फसवणूकच होय. या प्रकारच्या फसवणुकीत विक्रेता(बुवा) कधी पैसे मागतो तर कधी पैसे त्याच्या पायावर आपोआप टाकले जातात. या पैशाची गिर्‍हाईकं(भक्त) कधीच पावती मागत नाहीत. या ग्राहक राजाचा सुपर राजा म्हणजे बुवाबाबा सुपरराजाने त्याला बेमालूम फसवायचे याबद्दल ग्राहक संरक्षण कायदा कुठं आहे?

            काही उदाहरणे पाहू या. एक गृहस्थ वार्तापत्राच्या कार्यालयात आले. त्यांच्या मुलाचा कारखाना नीट चालत नव्हता. वास्तुशास्त्र्याने सल्ला दिला(म्हणजेच सल्ला विकला). तुमचे राहते घर लाभत नाही. ते ताबडतोब सोडा. या सल्ल्याची फी 10,000 रू. पण विनापावतीच्या ह्या सल्ल्याप्रमाणे घर सोडूनही कारखाना चालला नाही. उलट नुकसान वाढायला लागले. आता या ग्राहकाला संरक्षण कसे देणार? कारण यांच्याकडे 10,000 रू.ची पावतीच नाही.

            संतान प्राप्ती, आजारावरचे उपाय, निवडणुकीतील यश, पैशाचा पाऊस मिळवू इच्छिणारे या सर्वांजवळ त्यांच्यावर जे दैवी उपाय केले जातात त्याच्या पावत्या नसतात. मग ही फसवणूक कशी रोखायची?

            काही दिवसांपूर्वी एका बुवाला पकडला. तो पोटदुखीवर मंत्र सांगे. दुकान चालत नाही त्यासाठी ताईत देई. तो पैसे मागत नसे. प्रश्न विचारणारे त्याच्यासमोर पैसे ठेवीत. मी कुठे पैसे मागतो? लोकच देतात. या बिनपावतीच्या खरेदी विक्रीवर कोणता कायदा लावणार?

            सामान्य ग्राहकांच्या सामान्य व्यवहारातील पैशाची देवघेव फारशी मोठी नसते. पण दैवी व्यापारात 10,000 रू., 20,000 रू., 50,000 रू. अशा उलाढाली होतात. भक्तरूपी ग्राहकराजाच्या खिशातील हे पैसे काढणार्‍या बुवामहाराज नामक विक्रेत्यावर कायद्याचा जरब बसवण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा हवाच. पण हा कायदा होऊच नये यासाठी धर्माचे विक्रेते विरोध करत आहेत. त्यांना राजकीय बुवांची साथ मिळत असेल तर कायदा होणार कसा? म्हणून धर्माच्या क्षेत्रातील ग्राहक राजाने स्वत:च शहाणे व्हायला हवे.

            ग्राहक राजा ही फसवी भाषा आहे. वास्तव उलट आहे. यात बदल करण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा आध्यात्मिक क्षेत्राला लावणे व त्याच्या जोडीला जादूटोणा विरोधी कायद्याचा चाप लावणे. यातील पहिले कलम ज्योतिषासाठी हवे.


कृतज्ञता

            फोंडा गोवा येथे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात प्रसिद्ध झालेल्या एका लेखामुळे संस्थेची बदनामी झाली. यासाठी सनातन संस्थेने समितीच्या वार्तापत्रावर फौजदारी खटला घातला होता. या खटल्यामध्ये फोंडा कोर्टात समितीच्या वार्तापत्राची निर्दोष मुक्तता झाली होती. या निर्णयाच्या विरोधात सनातन संस्थेने पणजी हायकोर्टात अपील केले होते. हे अपील समितीच्या वतीने गोव्यातील ख्यातनाम वकील अ‍ॅड. अमृत कासार यांनी चालविले. आणि याचाही निकाल पूर्णपणे समितीच्या बाजूने लागला. विशेष म्हणजे हा निकाल हीच माझी फी आहे अशी भावना अ‍ॅड.अमृत कासार यांनी व्यक्त केली. या त्यांच्या सहकार्याबद्दल व उदारतेबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांची अत्यंत आभारी आहे. पुरोगामी चळवळींना प्रतिगाम्यांच्या विरूद्ध लढताना हिंमत आणि मदत देणारा हा निकाल आहे, असे समितीला वाटते.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती


महाराष्ट्र शासनाचा डॉ. दाभोलकर यांच्या ग्रंथास पुरस्कार

महाराष्ट्र शासनाच्यावतीने अर्थशास्त्र व समाजविज्ञान या विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथाचा पुरस्कार डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित ‘तिमिरातून तेजाकडे’ या ग्रंथास जाहीर झाला आहे. रुपये पन्नास हजार व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 27 फेब्रु. 2013 रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. अभिनंदन!


प्रा. प.रा.आर्डे आणि कुमार मंडपे यांना महाराष्ट्र अंनिसचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक प्रा.प.रा.आर्डे आणि अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्त कुमार मंडपे, सातारा यांना यावर्षीचा महाराष्ट्र अंनिसचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. आर्डे व मंडपे हे दोघेही अंनिसच्या स्थापनेपासून सक्रिय कार्यरत आहेत. दि. 10 मार्च 2013 रोजी सातारा येथे मअंनिसचे अध्यक्ष प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण अतिवाडकर यांचे निधन

बेळगांव येथील अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते नारायण अतिवाडकर यांचे नुकतेच निधन झाले. अतिवाडकर गुरुजींनी शिक्षकी पेशाचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ सामाजिक कार्यास वाहून घेतले होते. गाव तेथे ग्रंथालय हा उपक्रम त्यांनी बेळगांव परिसरासाठी सुरु केला होता. मुलांच्यासाठी लेखन, विविध नाटके त्यांनी लिहिली. मअंनिसचा गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार त्यांना मिळाला होता. अंनिसचा एक क्रियाशील कार्यकर्ता आज आपल्यातून निघून गेला. अतिवाडकर गुरुजींच्या कुटुंबियांच्या दुःखात मअंनिस सहभागी आहे.

– संपादक