गेल्या महिन्यात चंद्रग्रहण होते. ‘स्टार माझा’ या वृत्तवाहिनीने या निमित्ताने एक चर्चा घडवून आणली. ग्रहणाबाबत विविध मान्यवरांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घ्यावे व एकविसाव्या शतकातही वैज्ञानिक साक्षरता जनमानसात कितपत पोचली आहे हे जाणून घेण्यास ‘स्टार माझा’ चे संयोजक उत्सुक होते. या चर्चेतील काही वक्त्यांनी अंधारयुगाकडे नेणारे जे भन्नाट अविचार प्रदर्शन केले त्यातून खूपच करमणूक झाली.
आकाशस्थ ग्रहगोल व तारे यांच्याबद्दल विज्ञानाने जी माहिती आपणास मिळाली ती शाळेतील मुलेही जाणतात. आकाशातील काही गोल आपल्या जागा बदलतात. ते कधी पूर्व क्षितीजावर दिसतात तर कधी पश्चिमेकडे उगवतात. सूर्य व चंद्र तसेच डोळ्यांना दिसणारे शुक्र, मंगळ इ.ग्रहांची गती व स्थाने अनियमित आढळली तरी न्यूटन-गॅलिलिओ प्रणित विज्ञानामुळे त्यांच्या गतीचे कारण व गतीविषयक नियम आपणास माहीत झाले. सूर्य हा आगीचा जळता गोळा आहे तर चंद्र, शुक्र, मंगळ हे परप्रकाशित आहेत हेही आपणास माहीत झाले. या गोलांना मन नाही व ते पृथ्वीवासीयांवर राग, प्रेम, द्वेष किंवा वक्रदृष्टीचा प्रभाव गाजवीत नाहीत. विज्ञानपूर्वकालात या ग्रहांना व तार्यांना जे गुण चिकटवले गेले ते अज्ञानापोटी हेही आपणास माहीत झाले आहे. पण हे स्वीकारण्यास काही मंडळी तयार नाहीत याचाच अनुभव ‘स्टार माझा’वरील वादसंवादात दिसला.
ग्रहणासारख्या आकाशातील नाट्यात अद्भूतता आहे. पण अद्भुताचा भेद विज्ञान करते. उलट अद्भुततेला भितीचे व इतर भावभावनांचे वलय जोडून धर्म मार्तंडांनी विविध कर्मकांडांचा प्रसार केला व स्वत:चे आर्थिक आणि इतर प्राबल्य माजविले. ग्रहणाला अशुभ घटना मानून, ग्रहणकाळात साधना केली तर अशुभाचे निवारण होते असा प्रचार केला. विज्ञानाच्या प्रकाशात हे शुभअशुभाचे ग्रहण सुटायला हवे. पण हितसंबंध संपतील म्हणूनच अज्ञानाचे समर्थन करायलाच हवे हे चाणाक्ष मंडळींनी हेरले व ग्रहणाबाबतच्या कल्पनांना ते चिकटून राहिले व समाजही या प्रभावाखाली रहावा अशी व्यवस्था बळकट करण्यास नैसर्गिक घटनेला धर्माचे वलय त्यांनी जोडले. याचे दर्शन ‘स्टार माझा’वरील ग्रहणाच्या चर्चेत पदोपदी दिसत होते. ‘ग्रहण हा सावल्यांचा खेळ आहे.’ या सत्याला केला जाणारा विरोध इतका हास्यास्पद होता की आमची चांगलीच करमणूक झाली. पण या मंडळींना हे कळले नाही की त्यांनी आपले हसे करून घेतलंय. वृत्तवाहिनीचे सूत्रधारांच्या उपरोधी वाक्यातही याचीच प्रचिती येत होती. या चर्चेतील दोनच विधानाचा समाचार घेतला तरी वरील टीका स्पष्ट होईल.
धार्मिक अंगाने ग्रहणाचे समर्थन करणारी व्यक्ती अभिनिवेशाने सांगत होती की, चंद्र स्वयंप्रकाशित आहे. दुसरी व्यक्ती सांगत होती चंद्र हा मनाचा कारक आहे. आता चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो हे शाळेतल्या पोरालादेखील माहीत आहे. चंद्रावर यान उतरले. तेथील माती नासाच्या अंतराळवीरांनी पृथ्वीवर आणली हेही आता उघड सत्य आहे. चंद्र हा जड माती-खडकाचा गोळा आहे. त्याला मन कोठून आले? मन नसलेला चंद्र मानवी मनावर परिणाम करतो म्हणजे काय? परप्रकाशित चंद्राचे चांदणे शीतल असते व त्या प्रकाशात फिरताना आनंद वाटतो हे खरेच. पण अवसे-पुनवेला माणसांचे वेडांचे झटके वाढतात व ग्रहणात गर्भावर परिणाम घडतो हे धादांत असत्य आहे.
सत्याला शरण जाणे हा नीती-धर्म आहे. तो स्वीकारायचा सोडून जुन्या जळमटांना चिकटून रहाणे म्हणणे विवेकाचा अवमान करणे होय. चंद्राचे ग्रहण सुटते कारण तो सावल्यांचा खेळ आहे; पण अज्ञानमूलक धर्मकल्पनांना चिकटून विवेकाला लागलेले ग्रहण कधी सुटणार?
सरत्या वर्षात राजकीय व आर्थिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल विधेयक मंजूर व्हावे म्हणून जोरदार उठाव झाला. पण हे विधेयक अपुरेच राहीले. देशपातळीवर विवेकाचा आवाज रोखला गेला. महाराष्ट्रात तसेच घडले. हिवाळी अधिवेशनात ‘जादूटोणा विरोधी विधेयक’ मांडण्यात आलेच नाही. उलट धर्माच्या नावाखाली विविध पातळ्यांवर या विधेयकाला व डॉ.नरेंद्र दाभोलकरांना बदनाम करण्याची मोहीम राबविली गेली. खेदाने असे म्हणावेसे वाटते की, अजूनही नाही उजाडत! पण आज सरत्या वर्षात अविवेकाचा अंधार विवेकाला झाकोळण्यात यशस्वी झाला असे नाही म्हणता येणार. येत्या वर्षात नक्कीच उजाडेल आणि राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील अंधाराचे मळभ दूर होऊन विवेकाचा सूर्य प्रकाशेल याची आम्हाला खात्री आहे. कारण रात्र सरून उष:काल येतोच.