छोट्या दोस्तांनो, तुम्हाला ‘मुनिया’ जातीचे पक्षी माहीत आहेत का? रंगीत चिमण्याच म्हणा ना! चॉकलेटी, लाल अशा निरनिराळ्या रंगांच्या मुनिया असतात. पूर्वी त्या पिंजर्यात पाळल्या जायच्या. आता त्यावर बंदी आहे. कुठलाही स्वदेशी पक्षी, अगदी पोपटसुद्धा पिंजर्यात ‘जन्मठेप’ देऊन ठेवता येत नाही. तर अशीच एक रंगीत मुनिया होती. तिचं नाव होतं मुनू. एका ज्योतिषीबुवाने तिला पिंजर्यात ठेवलेलं होतं. ‘भविष्याची’ चिठ्ठी उचलण्यासाठी तिला पिंजर्यातून बाहेर काढलं जायचं. मुनूचे पंख आधीच कातरलेले असायचे. त्यामुळे बिचारीला उडता यायचं नाही. कुठलीतरी एक चिठ्ठी ती रागाने चोचीत उचलायची. त्या चिठ्ठीवर ‘होय’ किंवा ‘नाही’ असं उत्तर लिहिलेलं असायचं. ‘भविष्य बघायला आलेल्या माणसाने प्रश्न विचारलेला असायचा. चिठ्ठी उचलल्याशिवाय मुनियाला खायला दाणे दिले जात नसत. या भविष्यात तसं काही तथ्य नसायचं. ‘किती दिवस लोकांना फसवायचं? या बुवाबाजीला काय म्हणून साथ द्यायची? असा विचार मुनिया करू लागली. त्या छोट्या पिंजर्याचा आणि भविष्याचा तिला कंटाळा आला होता. बुवाचं लक्ष नाही असं पाहून ती टुण् टुण् उड्या मारत पसार झाली. लपूनच बसली. एका प्रेमळ खारकुंडीने तिला मदत केली. खारीच्या घरात, झाडाच्या ढोलीत मुनू लपून बसली. तो भविष्यवाला तिला शोधून दमला. ती काही सापडली नाही. पिंजर्याचं दार उघडं राहिलं आणि मुनूने सुटका करून घेतली.
खारीच्या घरी मुनूला बरं वाटलं, पण शेवटी ती पाहुणी! किती दिवस तिथे राहणार ना? पंखांत बळ आल्यावर खारीचे आभार मानून मुनू उडून गेली. गवतरान जणू तिला हाक मारत होतं. गवताचं बी तिला फार आवडायचं.
गवताळ प्रदेशात मुनूला मित्रमैत्रिणी मिळाल्या. मुन्ना नावाचा रानचिमणा तर तिच्याशी छानच गप्पागोष्टी करू लागला. मुन्ना अगदी लाल लाल रंगाचा होता. बरं का! पावसाळ्यात तर त्याच्या पंखांचा रंग जास्तच गडद व्हायचा. किती छान दिसायचा तो! साध्या चिमण्या म्हणायच्या ‘किती छान दिसतो हा मुन्ना! आपल्याला जातीच्या बाहेर लग्न करायची परवानगी नाही म्हणून, नाहीतर आपल्यापैकी कुणीतरी मुन्नाशी जोडी जमवली असती.’ जातपात मानणं चांगलं नाही, पण पक्ष्यांचे नियम फार कडक होते. जातीचे नियम मोडणार्या पाखराला कठोर शिक्षा दिली जायची. मुनूला वाटायचं, ‘कधी बदलणार हे पाखरंचं रानटी जग? ज्याला जे पटेल, आवडेल ते त्याने करायला हवं. तुम्ही कोण जुने नियम लादणार?
मुनू आणि मुन्ना मजेत फिरायचे. अंधाराचीही त्यांना कधी भीती वाटली नाही. रात्री फिरणारा रातवा पक्षी त्यांच्या ओळखीचा झाला होता. रातव्याने मुन्नाला सांगितलं, ‘तुला कळलं की, नाही, छोटे प्राणी आणि पक्षी शाळेत जातच नाहीत. जाम घाबरतात. अंधार पडता पडता शाळेत विचित्र प्रकार सुरू होतात. कुणीतरी माणसासारखं हसतं. एक विचित्र आकृती मुंगुच्या अंगावर धाऊन आली…. मुंगू हे मुंगुसमामाचं पिल्लू होतं. त्याने मग सगळ्यांना सांगायला सुरवात केली की, ‘शाळेत जाऊ नका, परिक्षा देऊ नका. नापास झालात तरी चालेल. पण शाळेपासून दूर रहा.’ तिथं विचित्र प्रकार घडत आहेत. माणसासारखं हसणारी सैतानी शक्ती एकेका प्राण्याचा बळी द्यायला बघतेय. मी जेमतेम वाचलो. ससेसरसुद्धा रजेवर गेले आहेत. सैतानी शक्तीसमोर ससेसर तरी काय करणार ना?’…. अशा वार्ता लगेच पसरतात. प्राण्यांची शाळा बंद पडली की राव! कासव तर मंदच होतं. ते म्हणाले, ‘बरंच झालं! तळ्यातून बाहेर या, त्या शाळेत जा, अभ्यास करा…. भानगडच नको!’ मैनेचं पिल्लू म्हणालं, ‘मम्मी, मला दुसर्या डोंगरीच्या शाळेत घाल. इकडे नको. मलाच सैतानाने धरलं तर? त्याला भयानक आवाज काढताना मी ऐकलंय!’
मुनू माणसांकडे राहून आली होती. शहाणी होती ती. तिला अनेक ‘सोंगं ढोंगं’ माहीत होती. तिने आणि तिच्या मित्राने, मुन्नाने ठरवलं की, आपलं पाखरशाळेतलं शिक्षण पूर्ण झालं असलं, तरी मुद्दाम काळोख पडताना शाळेत जायचं. कोण आहे, काय प्रकार आहे ते बघायचं. शेवटी आपण पक्ष्यांच्या त्या शाळेचे ‘माजी विद्यार्थी’ आहोत. शाळा बंद पडत असताना तिला असं कसं वार्यावर सोडायचं? आपली शाळा आहे ती! खरं काय ते शोधून घाबरट प्राण्यांना सांगायला हवं. नाहीतर ते शाळा सोडून घरीच बसतील.’…..

मग मुनू आणि मुन्ना उडत उडत मुद्दाम संध्याकाळी उशिरा शाळेत गेले. कुणीच नव्हतं तिथे. सगळा शुकशुकाट. रंग बदलणारा सरडा कुंपणावर बसला होता. तो त्यांना ओरडला. म्हणाला, ‘रानचिमण्यांनो, तुमचं काय ठेवलंय इकडे? उडून जा आधी. बंद पडलेल्या शाळेकडे आलात कशाला?’ सरडा काही शाळेच्या सेवत नव्हता. रिकामा होता. रिकामं राहू नये. इतरांच्या उचापती करायला वेळच मिळता कामा नये. सरडा वेळ वाया घालवायचा. त्याचं मुनूने ऐकलं नाही.
सरडा चरफडत निघून गेला. अंधार पडताच खरोखरच विचित्र आवाज येऊ लागले. कुणीतरी माणसासारखं हसत होतं, पण ते माणूस असणं शक्य नव्हतं. मग कोण बरं?
मुलांनो, तुमचा काय अंदाज आहे? कोण असेल? माणसासारखं कोण हसेल? हुश्शार मुलांनी बरोबर ओळखलं! तो एक तरस होता. इंग्रजीत काय म्हणतात? हाईना! हिंदीत काय शब्द आहे? लकडबग्गा! लब्बाड होता लकडबग्गा. विचित्र आवाजात गाणंही म्हणायला लागला. ‘हाईना’ का बैना, घेतल्या बिगर जाईना’
तरसाचा आवाज हसल्यासारखा येतो. छोट्या पक्ष्यांनी तरस कधी पाहिलाच नव्हता. त्यामुळे त्यांना वाटलं सैतान आहे! शाळा त्याने ताब्यात घेतलीय. मुनू मुनिया ,घाबरली नाय बा! विचित्र तरस पाहून मुन्ना उडून गेला नाय ब्बा! तिथंच तरसासमोर हजर झाले ते. मुनूने विचारलं, ‘काय बेत काय आहे तुझा? शाळा बंद पाडायचीय? छोटे प्राणी बिचारे घाबरतात. आम्ही त्यातले नाही. जंगल सोडून तू इथे गवतरानात आलास कशाला? माणसाला गावलास तर प्राण्यांच्या पिंजर्यात अडकवतील! कायमचा कैदी होशील!’ तरसाच्या हे लक्षातच आलं नव्हतं. आता तोच घाबरला! छोट्या दोस्तांनो, जो आपल्याला घाबरवतो, त्यालाच आपण घाबरवायचं असतं. पळ काढायचा नाही. बरोबर ना?
तरस उसनं अवसान आणत म्हणाला, ‘छोटे प्राणी अंधार पडण्याआधी इथं खायचे पदार्थ आणून ठेवतात. मला ते आयते मिळतात. तुम्हाला बघवत नाही का ते?’
मुन्ना म्हणाला, ‘मेहनत कर की! आपलं अन्न आपण शोधावं. लबाडी करून फुकटचं कशाला मिळवतोस? विचित्र आवाजाचा फायदा घेऊन छोट्यांना घाबरवतोस. सगळ्यांना जाऊन सांगतो आता.’ मुनू चिवचिवाट करत म्हणाली, ‘तरसू, तू नेमका शाळेतच कसा आलास रे? हे प्रकरण काही इतकं साधं नाही. शाळा बंद पाडण्यासाठी तुला कुणीतरी बोलावलेलं दिसतंय.’ तरसाने उत्तर देण्याआधीच मस्तीखोर मुंगू तिथे येऊन उभा राहिला. मुंगू या मुन्नाला आणि मुनूला पाहून एकदम चपापला. त्याला वाटलंच नव्हतं की, कुणी यावेळी शाळेकडे जायचं धाडस करेल. मुन्ना म्हणाला, ‘अरे वा! सगळे इतर प्राणी शाळेकडे यायला घाबरतात, पण हे मुंगुसपिल्लू मात्र अंधार पडल्यावर हळूच इकडे येतं. ‘हाईना का बैना’ वाल्याशी दोस्ती आहे असं दिसतंय’ हे ऐकल्यावर मुंगू जास्तच घाबरला. त्याचा चेहरा पडला. मुनूने मग थेट विचारलं, ‘मुंगू, तू शाळा बुडवून रानाकडे जातोस असं ऐकलं होतं. तेव्हाच या तरसाशी मैत्री केलीस ना? तू बोलावल्याशिवाय तो कसा येईल शाळेत? आपले विभागप्रमुख वाघोबादादा जाम कडक आहेत. त्यांच्याकडे मी तुझी तक्रार करणार आहे. मग ते सभा घेतील. त्यांची ताकद तुला माहीत आहे. तसं होण्यापेक्षा खरं काय ते मला सांगून टाक. तू लहान आहेस. पहिलीच मोठी चूक आहे तुझी. तुला माफी मिळेल.’ मुंगू मग खरं बोलू लागला. म्हणाला, ‘मला दरवर्षी नापास करतात. मला शाळा आवडत नाही. परीक्षा होऊ नये असं वाटतं. मीच तरसाला ही शाळा दाखवली. भीतीची लाट पसरवली. कोकीळसरसुद्धा दुपारी पटकन शाळेत येऊन जायचे. थांबायचे नाहीत. मग परीक्षा कशी होणार? मला तेच हवं होतं.
मीच प्राण्यांना सांगत फिरलो की, हसणारा सैतान माझ्या स्वप्नात आला. रोज काहीतरी मांसमच्छी शाळेपाशी त्याच्यासाठी ठेवत चला. त्याप्रमाणे तरसाला आयतं अन्न मिळायला लागलं. त्याला ती चटकच लागली बाप्पा! मुनियाच्या जोडीने बुद्धी वापरली, म्हणून बरं! मुन्ना म्हणाला, ‘मुंगू, झालं ते झालं. ‘हाईना का बैनांने यानंतर इकडे येता कामा नये. वाघोबादादापर्यंत प्रकरण जावं असं वाटत नसेल, तर ताबडतोब हे सगळं थांबलं पाहिजे. तुला अभ्यास करायला काय होतं रे? नापास होतोस म्हणून अख्खी शाळा बंद पाडतोस? शोभतं का तुला? शाळेचा अभिमान वाटला पाहिजे. आगाऊ कुठला!’ मुंगू रडू लागला. त्याने नंतर कोकीळ सर आणि ससेगुरूजींसमोर सगळं कबूल केलं. तरस तर वाघोबादादाचं नाव काढताच ‘पुन्हा नाही असं होणार’ म्हणत दाट जंगलाकडे पळून गेलाच. परत काही शाळेपाशी दिसला नाही की, माणसासारखा हसला नाही.
आता शाळा नीट सुरू झालीय. मुंगुससुद्धा अभ्यासाला लागलाय. मुन्ना स्वत: त्याला अभ्यासात मदत करतो. तरसाची संगत त्याने सोडून दिलीय. छोटे प्राणी मुन्ना आणि मुनूच्या धीटपणाचं कौतुक करत आहेत. तुम्हीपण ते करताय ना? ओ.के.!
-माधव गवाणकर
लेखक संपर्क: वडाचा कोंड, दापोली, जि. रत्नागिरी