Categories
संपादकीय

हिग्ज बोसॉनचे विज्ञान आणि पुराण

ऑगस्ट - २०१२

हे विश्व कशाचे बनले आहे. याबद्दल मानवाला सतत कुतुहल वाटत आले. त्याचबरोबर हे विश्व चालते कसे या प्रश्नाचाही पाठपुरावा माणूस सातत्याने करीत आला आहे. विज्ञानपूर्वकालात या प्रश्नाची सोपी उत्तरे धर्माने व अध्यात्मवाद्यांनी दिली. हे विश्व पंचमहाभूताचे बनले आहे आणि ह्या विश्वाचे नियंत्रण देव करतो अशी ही उत्तरे हजारो वर्षांपासून आपण स्वीकारत आलो.

            कोपर्निकन क्रांतीनंतर म्हणजे 17 व्या शतकापासून या प्रश्नांबद्दल वेगळे विचार मांडायला सुरवात झाली. वैज्ञानिक क्रांतीचे जनक गॅलिलिओ व न्यूटन यांनी विश्व हे स्वयंचलित आहे. ते नियमांनी चालते व त्यात देव हस्तक्षेप करत नाही असा विचार मांडला. सृष्टीला कार्यकारणभाव आहे या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंमल युरोपमध्ये सुरू झाला. विज्ञानाची कळ माणसाला सापडली आणि जणू काय निसर्गाची अलिबाबाची गुहा उघडली व निसर्गाचे ज्ञान आपल्या हाती पडू लागले.

            आता पंचमहाभूतांची जागा हायड्रोजन ते युरेनियमपर्यंतच्या मूलद्रव्यांनी घेतली. त्यांचे गुणधर्म समजू लागले व पदार्थांचा विविध अंगांनी अभ्यास सुरू झाला. न्यूटनचे गतीचे नियम, गुरूत्वाकर्षण व विद्युत चुंबकीय बल यांच्या शोधाने यंत्रयुग सुरू झाले व भौतिक समृद्धीचे मार्ग खुले झाले.

            पण तंत्रविज्ञानाच्या जोडीला विज्ञान पदार्थाच्या अंतरंगाचा शोध घेतच होते. यातून मूलकणांचा शोध सुरू झाला. ग्रीक कालापासून अणुची कल्पना मांडली गेली होती. पदार्थाचा सर्वात लहान कण म्हणजे अणू. पण अणुचेही घटक नंतर सापडू लागले. प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन हे ते घटक. इलेक्ट्रॉनच्या शोधाने इलेक्ट्रॉनिक युग सुरू झाले. शुद्ध विज्ञानाने मूलकणांचा शोध सुरूच ठेवला. पार्टीकल फिजीक्स ही भौतिक विज्ञानाची शाखा मूलकणांचा शोध घेत राहिली.

            या पार्श्वभूमीवर पीटर हिग्ज याने हिग्जबोसॉन कणाची कल्पना मांडली. 1964 मध्ये त्याने एका कणाची कल्पना मांडली जो प्रोटॉन, इलेक्ट्रॉन इ. कणांना जन्म देतो. भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांनी 1924 मध्ये मूलकणांचे गणिती गुणधर्म सांगितले होते. या हिग्ज बोसॉन कणांचा पडताळा घेणे हे विज्ञानापुढचे आव्हान होते. महास्फोटात ऊर्जा मुक्त झाली. पण या उर्जेपासून प्रोटॉन, न्यूट्रॉन आदि मूलकण कसे बनले हे गूढ होते. हिग्ज बोसॉन ह्या कणापासून मूलकण मिळतात हे सर्नच्या प्रयोगात सिद्ध झाले. या बोसॉनचे गुणधर्म भविष्यकाळात तपासले जातील व विश्वनिर्मितीचे कोडे सुटण्यास मदत होईल. हा विज्ञानाचा रोमहर्षक प्रवास पुढे चालूच राहील.

            हे विश्व समजून घेण्याचा हा विज्ञानाचा प्रयत्न म्हणजे मानवाची उत्तुंग बौद्धिक झेप आहे व त्याबद्दल विज्ञान क्षेत्रातील या दिग्गजांना धन्यवाद दिले पाहिजेत.

            पण विज्ञानाचे शोध आमच्या पूर्वजांनी पूर्वीच लावलेत असा पुकारा अध्यात्मक्षेत्रातील मंडळींनी चालविला आहे व त्याला प्रसारमाध्यमे साथ देत आहेत. हिग्ज बोसॉन म्हणजे देवकण आहे. या शोधाने देवाचे अस्तित्व सिद्ध झाले. आमच्या पूर्वजांना हे आधीच माहीत होते ते सिद्ध करण्यासाठी विज्ञानाला एवढा आटापिटा व सर्न प्रयोगशाळेतील महाखर्चीक महाप्रयोग करण्याची गरजच काय असा सवाल ही मंडळी करू लागली आहेत. जे जे नवीन संशोधन विज्ञान करीत आहे ते आम्हाला आधीच माहीत होते ही शुद्ध बकवास आहे. आमच्या पूर्वजांना अग्नीबाण माहीत होते त्यांना टी.व्ही.माहीत होता, त्यांना अणुबाँबही माहीत होता. ही बडबड म्हणजे पुराणातील वांगी होत.

            काही आध्यात्मिक मंडळीच्या शरीरातून देवकणांचा वर्षाव झाला व हे कण त्यांच्या साधकांना सापडले अशा अफवाही प्रसृत झाल्या. काहींना सोनेरी देवकण चपलावर पडलेले सापडले तर काहींना केरात हे कण सापडले. काही कण सोनेरी तर काही चंदेरी. गंमत अशी की, हिग्ज बोसॉन हा कण सेकंदाचा काही भाग एवढाच वेळ टिकतो. तो अदृश्य असतो. त्याचा प्रोटॉन किंवा मूलकण बनतो कसा याचा मेकॅनिझम अजूनही नीट समजायचा आहे. तोपर्यंत हे बोसॉनरूपी देवकण या अध्यात्मवाद्यांच्या अंगातून पावसासारखे बरसले व ते केरात व चपलात सापडले हा निव्वळ आचरटपणा होय.

            गंमत अशी की, ज्या पीटर हिग्जने या कणांचे निदान केले तो स्वत: नास्तिक होता. तेव्हा अध्यात्मवाद्यांनी हिग्ज बोसॉनला देवकण संबोधून स्वत:ची, ते मानत असलेल्या देवाची व समाजाची फसवणूक न करणे हे शहाणपणाचे होईल.