बिचारा बैल. तेल्याच्या घाण्याला जुंपलेला. घाण्याभोवती फिरून फिरून दमायचा. वाळलेले गवत नाईलाजाने चघळायचा. पण बैल असला तरी त्याला मन आहेच की. रानात जावं, हिरवे गवत खावं. असं त्यालाही वाटू लागलं. पण घाण्याभोवती फिरायचं काही सुटेना. शेवटी त्यानं गवत खाणंही सोडून दिलं. मग तेल्याला त्याची दया आली. त्यानं मग एक उपाय शोधला. हिरवा चष्मा मिळविला व बैलाच्या डोळ्यावर बांधला. आणि काय आश्चर्य ते वाळलेलं गवत बैलाला हिरवं दिसू लागलं. तो खूष झाला. ते गवत खाऊ लागला व आनंदाने घाण्याभोवती फेर्या मारू लागला.
धकाधकीच्या आयुष्यात विविध प्रश्नांना सामोरे जाताना सामान्य लोकही या बैलासारखे मनाने आजारी होतात. त्यांना हिरवा चष्मा घालणारे धूर्त तथाकथित अध्यात्मवादी पदोपदी आढळतात. शुष्क अध्यात्माचे वाळलेले गवत या आध्यात्मिक हिरव्या चष्म्यामुळे त्यांच्या संप्रदायातील भक्तांना व शिष्यांना हिरवे दिसू लागते. त्यांना तात्पुरते बरे वाटू लागते. पण? बैलाला काही कळेना. आपण दिवसेंदिवस रोडावतच का चाललोय? हिरवे गवत खाऊनसुद्धा? एकदा काय झालं! बैलाच्या डोळ्यावरचा चष्मा खाली सरकला. आणि बैलाची गवताकडे नजर गेली. ते हिरवे कसदार गवत नव्हतेच. वाळलेल्या काड्याच होत्या. बैल मनातल्या मनात हिरमुसला. पण यातून सुटका नव्हती. त्यासाठी बंड करावे लागेल. चौखूर उधळून जंगलात जावे लागेल. बैलाने विचार केला. हे फारच अवघड आहे. डोळ्याचा वापर आता शक्य नाही. पायाचे खूरही झिजलेत. त्याने आपली मान उंचावून चष्म्याला परत डोळ्यावर घेतले व ते वाळलेले पण हिरवे दिसणारे गवत खायला त्याने सुरवात केली. आपले नशीब! दुसरे काय? तो स्वत:ची समजूत घालू लागला.
आपल्या आजूबाजूला पहा. कुणी हॅप्पी थॉटस्चा चष्मा घातलेला आढळतो तर कुणी ब्रह्मविद्येचा. कुणी सुदर्शन क्रियेचा तर कुणी गण गण गणात बोतेचा. कुणी आध्यात्मिक गुरू सांगतात नाक दाबून धरा-कॅन्सर बरा होईल. कुणी सांगतात श्वास जोरात सोडा-अल्सर बरा होईल. कुणी म्हणतात ओंकार साधना करा मन:शांती मिळेल तर कुणी सांगतात येशूची प्रार्थना करा-आंधळ्याला दिसायला लागेल, पांगळ्याला पाय येतील व मुक्याला वाचा फुटेल. कुणी सांगतात अमुकतमुक ग्रंथातील अमुकतमुक मंत्र म्हणा तुमच्या पोटातील मुलीच्या गर्भाचा बदल होऊन तो मुलगा होईल. कुणी सांगतात दर्ग्यात दुवा घ्या, सर्पाचे विष ओसरेल. सर्व धर्मात सर्वत्र हिरव्या चष्म्याच्या अशा तथाकथित उपायांची दुकानदारी थाटलेली आढळते.
एकीकडे हे चित्र, तर दुसर्या बाजूला वास्तवाला भिडून विविध समस्यावर खरीखुरी मात करणारे वीरदेखील समाजात पदोपदी दिसतात. कोणी विंचवाच्या दंशावर मात करणारी लस शोधण्यासाठी कित्येक वर्षे धडपडून यशस्वी होतात तर कोणी एव्हरेस्टचे शिखर पार करतात. ‘कोलंबसचे गर्वगीत’ या कवितेत कुसुमाग्रज लिहितात,
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती,
कथा त्या खुळ्या सागराला,
अनंत आमुची ध्येयासक्ती,
अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला.
या कोलंबसाप्रमाणे कुणी पृथ्वीचे धु्रव जिंकतात तर कुणी गोबीचे वाळवंट. याच विजिगिषु वृत्तीने माणसानी चंद्रही जिंकला. परिस्थितीवर यशस्वीपणे मात करायची असेल तर खोटी आश्वासने झुगारून विज्ञानाचा खराखुरा चष्मा वापरला पाहिजे. प्रश्नांची उकल चिकित्सकपणे केली पाहिजे, धैर्य वाढविले पाहिजे, पूर्वग्रह बाजूला सारले पाहिजेत. विचाराची जडता टाकून दिली पाहिजे. या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून जेन्नर यांनी देवीची लस शोधून काढली. त्यामुळे देवीचा आजार हद्दपार झाला. रोनॉल्ड रॉस याने 7 वर्षे निरीक्षण करून मलेरियाचे कारण डास असल्याचे सिद्ध केले. आनंदवनात बाबा आमटेंनी कुष्ठरोगावर मात केली. माणसांचे प्रश्न सुटत गेले. पण अध्यात्माचे खोटे हिरवे चष्मे घालणारे बुवा-बाबा महाराज प्रश्न सोडवत नाहीत. फक्त ते लोकांना भुलवतात व अनेकजण त्याला बळी पडतात. सहज व सोपा मार्ग पण जो फसवा असतो तो लोकांना भावतो ही यातली मोठी अडचण आहे.
अज्ञानमूलक हिरव्या चष्म्याने घडवलेली एक हृदयद्रावक घटना नुकतीच पुण्यात घडली. पालकर नामक कोण्या गृहस्थाने ज्योतिषाचा हिरवा चष्मा वापरून अशी समजूत करून घेतली की, शनी व मंगळ यांची युती त्याला भविष्यकाळात सतावेल. त्याने स्वत: आपली पत्नी व दोन मुले यांना झोपेच्या गोळ्या दिल्या. पत्नी व मुले मरण पावली. पालकर मृत्यूशी झुंज देतोय. फसव्या हिरव्या चष्म्याचा असाही भीषण परिणाम घडतो. या महिन्यात विज्ञान दिन आहे. विज्ञानाचा खराखुरा चष्मा लावा व अज्ञानाचा फसवा चष्मा फेकून द्या हाच संदेश विज्ञानदिनी घेऊ या !
पर्यावरणीय होळी स्पर्धा
पर्यावरणीय पद्धतीने सणांना पर्यायी रूप देण्याच्या समितीच्या प्रयत्नांना नागपंचमी, गणेशोत्सव, दिवाळी या वेळेला चांगलेच यश आले आहे. याच प्रकारे पर्यावरणीय होळीसाठी यावर्षी अधिक व्यापक व सघन प्रयत्न केले जाणार आहेत. एका बाजूला कचर्याची होळी, पोळीचे दान व दुर्गुणाचे प्रतिक असलेल्या राक्षसाची होळी अथवा स्वत:मधील एखाद्या दुर्गुणाची होळी करण्याचा संकल्प करणे, अशा विविध मार्गांनी समिती ही चळवळ चालविते. लोकसहभागासाठी या होळीच्या वेळी पर्यावरणीय होळी स्पर्धा समिती घेणार आहे. समितीचे प्रभावी काम असलेल्या सुमारे 100 तालुक्यात या स्पर्धेच्या निमित्ताने 1 लाख रूपयांची बक्षिसे वाटली जातील. तसेच सहभागी सर्व संस्थांना प्रमाणपत्र दिली जातील.
पन्नालाल राजपूत यांना अंनिसचा पुरस्कार भटका विमुक्त समाज फार मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचा बळी आहे, त्यामध्ये काम करणार्या एका कार्यकर्त्यास समितीतर्फे आता रू.11000/- रकमेचा पुरस्कार देण्यात येणार आहे. पहिल्या पुरस्कारासाठी पन्नालाल राजपूत(नागपूर) यांची निवड झाली असून ता.11 फेबु्रवारीला चंद्रपूर येथे माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात येईल. पन्नालाल राजपूत यांची सामाजिक कार्याची माहिती देणारा लेख पुढील अंकात आम्ही प्रसिद्ध करित आहोत.- संपादक