मंगळवार दिनांक 20 ऑगस्टची सकाळ. आकाशात पूर्व क्षितीजावर सूर्य उगवत होता. लाल रंगाची प्रकाशाची उधळण करीत होता. याच वेळी पुण्यात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव झाला. विचारसूर्य जमिनीवर कोसळला व लाल रक्ताने फूटपाथ भिजून गेला.
दाभोलकरांचे मारेकरी वायूवेगाने पसार झाले. त्याच वेगाने ही बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यापर्यंत पसरली. दूरदर्शनवर दाभोलकरांच्या खुनाची व त्यांच्या कर्तृत्वाची महाचर्चा सर्व चॅनेलवर सुरू झाली. मन हेलावून टाकणारे जनक्षोभाचे दर्शन सर्वांना होत राहिले. मारेकर्यांच्या धिक्काराच्या प्रतिक्रिया दूरदर्शनवर दाखविल्या गेल्या. विशेषत: तरूणाईने या घटनेचा निषेध करताना जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला तो लक्षात घेता आपण ठामपणे म्हणू शकतो की, दाभोलकरांचे मारेकरीच मेले. दाभोलकर अमर झाले.
डॉक्टर दाभोलकरांच्या व्यक्तीमत्वात असे कोणते रसायन होते की, ज्यामुळे त्यांनी तिमिरातून तेजाकडे जाणारा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प केला? विवेकाच्या वाटेवर हजारो कार्यकर्त्यांना आकर्षित करून अंधविश्वासाचा अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न केला? बर्ट्रांड रसेल या विश्वविख्यात तत्वज्ञाने म्हटले आहे, ‘तीन प्रेरणांनी माझे जीवन व्यापून राहिले आहे. उत्कट प्रेम, उत्कट ज्ञानलालसा व अपार करूणा’. युद्धाने भयग्रस्त जगात अणुयुद्धाची भीती वाढत असताना रसेल अणुयुद्धाच्या विरोधात वयाच्या 89 व्या वर्षी तुरूंगात गेला. अज्ञान, अंधविश्वास, धार्मिक वेडेपणा व क्रूरता यांच्या विरोधात अपार करूणा व उत्कट प्रेमाच्या प्रेरणा घेऊन दाभोलकरांनी महाराष्ट्राला ज्ञानाधिष्ठित विवेकाची वाटचाल करावयास स्फूर्ती दिली. 1980 पासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत अखंड 25-30 वर्षे त्यांचा अविवेकाच्या विरोधात संगर चालू होता.
आयझॅक अॅसिमॉव्ह या विज्ञान लेखकाने ‘अज्ञानाच्या महासागरातील विवेकाचा दीपस्तंभ’ असे सत्पुरूषांचे वर्णन केलंय. डॉ.दाभोलकर हे जातीयता, धर्मांधता, अंधश्रद्धा या व अशाच अविवेकाच्या सागरातील विवेकाचा दीपस्तंभ होते. त्यांच्या कार्याचे समग्र दर्शन ‘तिमिरातून तेजाकडे’ या त्यांच्या ग्रंथातून आपणास वाचावयास मिळेल.
गंध, टोपी, टिळा व रंगीत वस्त्रे पांघरणारे दांभिक बुवा हे सत्पुरूष कसे? पण समाजातील मेंढरे त्यांना संतपद देतात हे कटु वास्तव आहे. अशा मेंढरांना जागे करण्याचे कार्य दाभोलकरांनी हाती घेतले. साने गुरूजी, कर्मवीर भाऊराव पाटील, गोपाळ गणेश आगरकर, गाडगेबाबा, बाबा आमटे, आदी समाजसुधारकांचा वारसा त्यांनी पुढे चालविला. कोण संत आणि कोण बुवा यातील भेदाची मर्मग्राही चिकित्सा ते आपल्या लेखनातून व भाषणातून करीत. आणि याचमुळे बुवा-बाबा व त्यांना साथ देणारे संप्रदाय दुखावले. त्यांनीच या विवेकाच्या दीपस्तंभाला विझवले असणार.
संघटन कौशल्य, लेखन व वक्तृत्व अशा विविध कौशल्यांचा त्यांच्या ठिकाणी संगम झाला होता. पण या सर्वांच्या मुळाशी होती मानवी करूणा व अज्ञानभेदाची तळमळ. बुवाबाजीला फसलेले लोक, व्यसनाला बळी पडलेली तरूणाई, जातीच्या जाचाला बळी पडलेल्या मुली यांच्या व्यथांनी ते अस्वस्थ होत. पायाला भिंगरी बांधून ते महाराष्ट्रात फिरत व चळवळीतील मित्रांना प्रेरणा देत. जात, धर्म व दुष्ट प्रथा यांच्या प्रभावाखाली होणारे यौन शोषण, आर्थिक शोषण व जुलूम यांच्या विरोधाची लढाई प्रखर करण्यासाठी त्यांनी जादूटोणा विरोधी कायदा व्हावा म्हणून सतत 18 वर्षे संघर्ष केला. हा कायदा होणे हे अंनिसचे यश आहे. पण खरी लढाई पुढेच आहे. धर्मनिरपेक्ष शोषणविरहित राष्ट्र की दहशतवादी धर्मराष्ट्र हा भविष्यकाळातील मोठा संघर्ष असेल. या संघर्षासाठी तयार असणे दाभोलकरांना अभिप्रेत होते.
वैज्ञानिक द़ृष्टिकोनाचा आग्रह दाभोलकरांनी सतत धरला. विज्ञान तंत्राने खरं तर आखिल मानव जातीचे भौतिक प्रश्न सोडविता येणे शक्य केले आहे. जात, धर्म यावर आधारीत गट-तट व संघर्षाची या विज्ञान युगात गरज नाही. समता व न्यायाच्या आधारावर भारतीय समाज उभा करणे भारतीय घटनेच्या सामर्थ्याने शक्य आहे. त्यासाठी प्रयत्नशील रहाणे हे दाभोलकरांना अभिप्रेत असलेले स्वप्न होते.ते पुरे करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. धर्मांधांचा निर्भयपणे मुकाबला करण्यासाठी ‘हम सब तैयार है!’