शारीरिक आजाराबरोबरच कोणत्याही कौटुंबिक समस्या कोंबडा-कोंबडी, बकरे कापून व विधी करून सोडविण्याची हमी देऊन सर्वसामान्यांना लुबाडणार्या वाळवा(जि.सांगली) तालुक्यातील पेठ येथील पारूबाई निगडीकर उर्फ श्रीमती नंदाबाई लक्ष्मण साळुंखे या बुवाबाजी करणार्या पन्नास वर्षीय महिलेच्या कारनाम्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश करून तिला इस्लामपूर पोलिसांच्या स्वाधीन केले.
पेठ गावात गेल्या दहा ते 12 वर्षांपासून वास्तव्यास असणारी श्रीमती पारूबाई निगडीकर ही बुवाबाजी करीत असल्याची माहिती मिळताच अंनिसचे कार्यकर्ते तिच्या दरबारात दाखल झाले. त्यांनी मानसिक त्रास आहे, बायको नांदत नाही व घरी खूप त्रास होतो, अशा तक्रारी करताच पारूबाई निगडीकर यांनी कौल लावून बाहेरची बाधा झाली आहे. लागीर लागले आहे. त्यावर आपल्याकडे जालीम इलाज असल्याचे सांगून पारूबाई निगडीकर यांनी एक कोंबडा-कोंबडी व बकरे द्यावे लागेल. तसेच पूजा अर्चा असा विधी करण्यासाठी पाच हजार रूपयांचा खर्च येईल म्हणून अंनिसच्या कार्यकर्त्यांकडे पैशाची मागणी करताच तेथे पाचारण करण्यात आलेले पोलीस हवालदार के.एन.आबदर, महिला पोलीस रजनी जाधव, पोलीस संदीप पाटील व रामजी पाटील यांनी तिला ताब्यात घेतले.
पारूबाई निगडीकर या बुवाबाजी करणार्या महिलेच्या कारनाम्याचा पर्दाफाश करणार्या कारवाईत संजय बनसोडे, दिलीप क्षीरसागर, प्रा.सतीश चौगुले, अवधूत कांबळे व श्रीमती सईदा चौगुले या अंनिसच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.
– अंकुश चव्हाण, इस्लामपूर