Categories
चळवळ

जादूटोणा कायद्याबाबत शरद पवारांकडे शिष्टाई

ऑक्टोबर - २०१२

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष ना.शरद पवार यांची भेट महाराष्ट्र अंनिसच्या शिष्टमंडळाने सातारा विश्रामगृहात डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली घेऊन जादूटोणा कायदा संमत होण्याबाबत निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली. हा कायदा एक वर्षात करण्याचे लेखी आश्वासन सध्याच्या सत्तारूढ शासनाने 1999 साली दिले होते. हा कायदा 2005 ला विधानसभेत मंजूर झाला. परंतु विधानपरिषदेत बारगळला आणि आता पुन्हा जुलै 2011 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेत हे बील नव्याने आले आहे. मात्र गेल्या तीनही अधिवेशनात यावर साधी चर्चाही झाली नाही ही बाब शिष्टमंडळाने ना.शरदरावजी पवार यांच्यासमोर मांडली. 4 एप्रिलला ना.अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अर्थसंकल्पी अधिवेशनातच कायदा करण्याचा आग्रह धरला होता इकडेही ना.पवार यांचे लक्ष वेधले व त्यांनीच पुढाकार घेऊन हा कायदा व्हावा यासाठी मदत करावी अशी विनंती केली. ना.शरद पवार यांनी ती मान्य केली. निवेदनात शिवसेनेचा कायद्याला विरोध आहे असा उल्लेख होता. त्याबद्दल शरदरावजींनी तो का आहे याची चौकशी करून त्या विरोधाबाबत आश्चर्य व्यक्त केले. हा कायदा धर्मविरोधी आहे असा अपप्रचार मुद्दामहून करण्यात आला आणि म्हणून स्वत:ला धर्मरक्षक म्हणून घेणारी शिवसेना त्याला अकारण विरोध करत आहे. तेव्हा राजकीय इच्छाशक्ती वापरूनच कायदा मंजूर करून घेण्याची विनंती शिष्टमंडळाने केली. शरदरावजींनी आवश्यक ती माहीती पालकमंत्री ना.राजराजे निंबाळकर व जिल्हाध्यक्ष ना.शशिकांत शिंदे यांच्याकडून घेतली. या भेटीमुळे कायदा पारीत होण्याची शक्यता गतीमान झाली आहे असे समितीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. शिष्ट मंडळात प्रशांत पोतदार, वसिम बागवान, सचिन पोळ, समीर कांबळे यांचा समावेश होता.

-प्रशांत पोतदार, सातारा.