श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत झाले तर घरच नव्हे तर समाज उद्ध्वस्त होतो. असाच काहीसा प्रकार नागपूर जिल्ह्यातील भांडेवाडी परिसरात उघडकीस आला. जादूटोण्याचा आरोप लावून वस्तीतील काही लोकांनी एकत्र येऊन एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत घडली.
नागपूर येथील भांडेवाडी, हनुमाननगर येथील मायाताई ताराचंद डोंगरे हिच्यावर जादूटोणा करते, तुला काळी जादू येते, आमच्या घरावर येणार्या समस्यांना तूच भुताटकीच्या माध्यमातून आमच्या नाशास कारणीभूत होते आहे, असे एक ना अनेक आरोप तिच्यावर करीत हल्ला करण्यात आला. फिर्यादी महिलेस बेदम मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी तिच्या घरात प्रवेश करून संसार उपयोगी सामानाची नासधूस केली. टी.व्ही.ची तोडफोड करण्यात आली. तसेच 6 हजार रूपये रोख, दागिने आणि पंखासुद्धा उचलून नेला. आधीच हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारी मायाताई व तिचा पती ताराचंद डोंगरे आरोपींच्या या दहशतीमुळे घाबरलेले असून घटनेच्या दिवसापासून ते नातेवाईकांकडेच राहात आहेत. वस्ती सोडा अन्यथा परिणामाला तयार रहा, अशी धमकी दिल्याची तक्रार फिर्यादी माया डोंगरे यांनी कळमना पोलीस स्टेशन येथे केली आहे.
– ज्योती डब्बावार, यवतमाळ