Categories
ज्योतिष

जगभरातील शास्त्रज्ञ म्हणतात, ज्योतिष हे शास्त्र नाही!

फलज्योतिष आणि शास्त्रज्ञांचा इशारा

अमेरिकेतील ‘द ह्युमॅनिस्ट’ मासिकाच्या सप्टेंबरऑक्टोबर, 1975 मधील अंकातील डॉ. एस. चंद्रशेखर आणि इतर अठरा नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञांसहीत 186 प्रतिथयश शास्त्रज्ञांचे निवेदन

आम्ही खाली सही करणारे खगोलशास्त्रज्ञ, खगोल-भौतिकतज्ज्ञ आणि इतर क्षेत्रातील शास्त्रज्ञ जनतेला, फलज्योतिषकारांनी खाजगी किंवा सार्वजनिक पद्धतीने जी भाकिते दिली आहेत, त्यासंबंधी धोक्याचा इशारा देत आहोत. ज्यांचा फलज्योतिषाच्या भाकितावर विश्वास आहे, त्या भाकितांना शास्त्रीय आधार नाही, असे सांगावेसे वाटते.

पुरातनकाळी फलज्योतिषांनी केलेल्या भाकितांवर आणि सल्ल्यांवर लोकांना नभोमंडलातील तारे, ग्रह इत्यादी म्हणजे देवांची स्थाने किंवा शकुन आहेत, असे वाटत असे. याचा पृथ्वीवरच्या जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे, असे वाटते. त्यांना ग्रह आणि तारे पृथ्वीपासून किती प्रचंड अंतरावर आहेत, याची कल्पना नव्हती. आता ही अंतरे अचूक मोजली गेली आहेत. ग्रह, तारे यांच्या गुरुत्वाकर्षणाचे बल अतिशय कमी आहे. अतिदूरच्या तार्‍याचे बल तर नगण्य आहे.

जन्माच्या वेळी हे तारे किंवा ग्रह यांच्या बलांचा आपल्या जीवनातील घटनांवर परिणाम होतो, ही कल्पनाच चुकीची आहे. त्याचप्रमाणे दूरवरचे तारे आणि ग्रह यामुळे काही दिवस लाभकारक किंवा काही काळ विशिष्ट घटनांसाठी अनुकूल असतो किंवा ज्या राशीत एखादी व्यक्ती जन्माला आलेली असते ती व्यक्ती इतरांशी सुसंगत किंवा विसंगत वागते, हे सुद्धा खरे नाही. मग लोकांचा फलज्योतिषावर विश्वास का बसतो? आजच्या ताणतणावाच्या दिवसात लोकांना सुखकारक निर्णय घेण्यासाठी मार्ग हवा असतो. त्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या बलांमुळे आपले विधिलिखित ठरत असावे, याचा त्यांचा असतो. आपले विधिलिखित किंवा भविष्य हे आपल्या स्वत:वर अवलंबून असते; हे तारे किंवा ग्रहांवर अवलंबून नसते.

आजच्या काळात बहुप्रसारित शिक्षण आणि माहिती यामुळे अंधश्रद्धा आणि जादूंवर आधारित अशा समजुतीचे सत्य स्वरूप उघड करून दाखवणे सहज शक्य आहे, तरीसुद्धा आजच्या आधुनिक समाजात फलज्योतिष सर्वत्र पसरले आहे. वृत्तपत्रे, मासिके आणि पुस्तके यामधून फलज्योतिषांची भाकिते आणि तर्क प्रसिद्ध झाल्यामुळे आपण गडबडून जातो. केवळ तर्कद़ृष्टता, कल्पनारंजन आणि प्रतिगामिता यांचाच प्रसार होतो. या भोंदू ज्योतिषांच्या अहंकारी वल्गनांना थेट आणि जोराने आव्हान देण्याची वेळ आली आहे. फलज्योतिषांच्या भाकितांना कोणताही शास्त्रीय आधार नाही; उलट त्यांच्या फोलपणाबाबत बरेच पुरावे उपलब्ध आहेत, तरीसुद्धा अतिशहाणे लोक त्यावर विश्वास ठेवतात.