Categories
विज्ञान

जंतू आणि माणूस

जून - २०१९

मानवाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मानवाच्या शरीरातील काही चांगले जंतू नाहीसे होत आहेत. या जंतूविषयी विशेष माहिती या लेखात दिली आहे. वाचकांनी या लेखावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात.

जसजशी भारतीयांची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती होते, तसतशी त्यांची वैयक्तिक स्वच्छतेविषयीची जाणीव आणि काळजी वाढते. (त्या प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतेची काळजी वाढत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे; पण तो आजचा विषय नाही.) या स्वच्छतेच्या जाणिवेचे रूपांतर हळूहळू जंतूंविषयीच्या अवास्तव भीतीमध्ये होऊ लागले आहे. काही साबण वापराविषयीच्या शासकीय जाहिराती, टी.व्ही.वरील साबण, दंतमंजने (टूथपेस्ट), वॉटर फिल्टर यांच्या जाहिराती यामुळे या अवास्तव भीतीमध्ये वाढच होत आहे. त्यामुळे स्वच्छता म्हणजे निर्जंतुकता असे चुकीचे समीकरण शिकलेल्या माणसांच्या मनात तयार होत आहे. हे समीकरण माणसाच्या आरोग्यपूर्ण वाढीसाठी आणि जगण्यासाठी चुकीचे आहे, धोक्याचे आहे. हे जग म्हणजे विविध प्रकारच्या जंतूंचा आणि व्हायरेससचा महासागरच आहे. माणूस जातीच्या 3-4 लाख वर्षांपासूनच्या उगमापासून तो या जंतूंच्या महासागरातच वाढला, जगला आणि भरभराटीस आला. हे शक्य झाले. कारण माणसाच्या शरीरात विशेषत: आतड्यांमध्ये व अंगावर त्यांना अन्न, पाणी व जागा मिळाली; पण ते फुकटे प्रवासी नव्हते. त्यांनी माणसाला अन्न पचवण्यासाठी मदत केली. माणसाच्या रोगकारक जंतूविरुद्ध असलेल्या प्रतिकार शक्तीला (इम्यून सिस्टीमला) योग्य शिक्षण दिले व वळण लावले, रोगकारक जंतूंना जागा मिळू दिली नाही व इतर रीतीने वाढू दिले नाही.

निरोगी माणसाच्या मोठ्या आतड्यात तोंडात, डोळ्यात, नाकात, श्वसनमार्गात, योनीमार्गात व त्वचेवर संख्येने आणि विविधतेने मोठ्या प्रमाणात जंतू राहत असतात. त्यामुळेच तो निरोगी राहू शकतो. हा जंतूंचा समुदाय संख्येने व विविधतेने जितका समृद्ध असेल, तितका माणूस जास्त निरोगी राहू शकतो. प्राण्यांना जन्मापासून पूर्णपणे जंतूविरहित वातावरणात वाढवण्याचे प्रयोग केले आहेत. असे प्राणी नीट वाढत नाहीत आणि लवकर मरण पावतात. माणसाची मुले ही फार क्वचित अनुवंशिक वैगुण्यामुळे अजिबात प्रतिकार शक्ती नसलेली जन्मतात. त्यांनाही पूर्णपणे निर्जंतुक वातावरणात वाढवावे लागते; पण त्यांना अस्थिमज्जेचे प्रत्यारोपण करून किंवा अन्य प्रकारे उपचार करून शक्य तितक्या लवकर जंतुयुक्त वातावरणात आणावे लागते.

माणसाचे मूल ज्यावेळी नैसर्गिक मार्गेजन्मते त्यावेळी ते बाहेर येताना त्याला योनीमार्गातील जंतूंचा पहिला डोस मिळतो. त्यामुळे त्याच्या आतड्यामध्ये प्रथमच जंतूंच्या वसाहती वाढतात. त्यामुळे त्याची पचनाची शक्ती वाढते आणि रोगप्रतिकार शक्तीही वाढते. हे ज्ञान मिळाल्यानंतर आता सिझेरियन सेक्शनने जन्मलेल्या मुलांनासुद्धा आईच्या योनीमार्गातील स्त्रावांचा एक घुटका देण्याची पद्धत रूढ होत आहे.

तसेच आईचे दूध देखील निर्जंतुक नसते. त्यामधून बाळाला बायफिडो बॅक्टेरियम लॉन्गस इन्फन्टीस नावाचे जंतू मिळतात. हे जंतूदेखील बाळाला दूध पचविण्यास मदत करतात व त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

पहिल्या 4-5 वर्षांत बाळाला विविध प्रकारचे आजार होऊन जातात. उदा. सर्दी-पडसे, लहान-सहान ताप, हगवण, गोवर, कांजिण्या या आजारांनी बाळाच्या रोगप्रतिकार शक्तीला चांगले वळण लागते. थोड्याशा अस्वच्छ पर्यावरणात व इतर मुलांच्या सान्निध्यात वाढणार्‍या मुलांना हे लहान-सहान आजार जास्त प्रमाणात होऊन त्यांची रोगप्रतिकार क्षमता बळकट होते; पण अतिस्वच्छतेत व एकट्याने वाढणार्‍या मुलांमध्ये हे जंतुसंसर्ग पुरेशा प्रमाणात होत नाहीत व त्यांची प्रतिकार शक्ती रोगांविरुद्ध झगडण्यास तयार होण्याऐवजी चुकीच्या दिशेने वाढते व त्यांना अ‍ॅलर्जीचा त्रास होऊ लागतो. साधे शेंगदाणे खाल्ले, तर त्यांना प्राणावर बेतण्याइतका तीव्र अ‍ॅलर्जीचा त्रास होऊ शकतो किंवा गांधीलमाशी चावली, तरी तसेच होते. आहारातील अनेक गोष्टींची अ‍ॅलर्जी होते. विशेषत: विविध प्रकारच्या नट्सबद्दल डायफ्रूटसबद्दल हा त्रास होतो.

तसेच दमा, इसब वगैरे त्वचेचे आजार जास्त प्रमाणात होता. पूर्वी हे आजार मुख्यत: अमेरिकेत अतिस्वच्छ वातावरणात, वाढलेल्या मुलांमध्येच दिसत. आता भारतातदेखील उच्च मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या मुलांमध्येही हे आजार दिसू लागले आहेत. तसेच मोठेपणीही ऑटो-इम्युन आजार, इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज-अल्सरेटिव कोलायटिस, दमा, क्रॉन्स डिसीज हे जंतूजन्य नसल्याने अशा मुलांना जास्त प्रमाणात होतात आणि उपचारांना ते फारशी दाद देत नाहीत व कमी-अधिक प्रमाणात जन्मभर त्रास देत राहतात. अतिस्वच्छतेची अशी मोठीच किंमत द्यावी लागते.

सर्वसामान्य लोकांना उपकारक जंतूंची आठवण ही जंतुनाशक औषधे (ब्रॉड स्पेक्ट्रम अ‍ॅन्टीबायोटिक्स) घेतल्यानंतर पोट बिघडल्यावर होते. अशा वेळी डॉक्टर प्रो-बायोटिक नावाच्या जंतूंच्या पुड्या घ्यायला सांगतात किंवा ताक, दही वगैरे घरगुती गोष्टी खायला सांगतात. कारण जंतुनाशक औषधांनी आतड्यातील नैसर्गिक उपकारक जंतू नष्ट होतात व त्यामुळे पोट बिघडते. या जंतूंच्या पुड्यांनी किंवा ताकामुळे आतड्यांमध्ये नैसर्गिक जंतूंची पुन्हा वस्ती होईल, अशी आशा असते.

याचाच एक जीवघेणा प्रकार म्हणजे स्युडो मेंब्रॅनस कोलायटीस नावाची हगवण. ही हगवण फक्त तीव्र जंतुनाशक औषधांमुळे आतड्यातील नैसर्गिक जंतू जवळपास पूर्ण नष्ट होऊन त्यामुळे क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइल नामक रोगजंतूंची अनिर्बंध वाढ झाल्यामुळे होतो. हे जंतू कोणत्याच जंतुनाशक औषधाला दाद देत नाहीत. काही वर्षांपूर्वी व्हॅकोमायसिन नामक औषधाने ते नष्ट होतात; पण आता ते व्हॅकोमायसिनलाही जुमानत नाहीत व बर्‍याच वेळा रोगी दगावतो; पण एक नवीन रामबाण उपाय सापडला आहे तो म्हणजे निरोगी माणसाच्या विष्टेचा एनिमा देणे. त्यामुळे रोगी माणसाच्या मोठ्या आतड्याला नैसर्गिक जंतूंच्या साठ्याचा पुरवठा होतो व हे नैसर्गिक जंतू क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइलला मारून टाकतात व रोगी बरा होतो. हा एकमेव उपाय आता शिल्लक राहिला आहे. यालाच विष्टेचे प्रत्यारोपण (फीकल ट्रॅन्सप्लेंटेशन) असेही नाव आहे. याचे नवनवीन उपयोग सापडत आहेत. बोन-मॅरो ट्रॅन्सलॅटेशन पूर्वी रुग्णाच्या विष्टेचा नमुना घेऊन तो नीट साठवून ठेवतात. त्यानंतर अस्थिमज्जा प्रत्यारोपणापूर्वी आतड्यातील सर्व जंतू जंतुनाशकांनी मारले जातात व मग ते प्रत्यारोपण केले जाते. नंतर ज्यावेळी नवीन अस्थिमज्जा कार्यान्वित होऊन रोगप्रतिकाराचे काम करू लागते. त्यावेळी पूर्वी घेतलेली विष्ठा पाण्यात कालवून एनिमाने दिली जाते. त्यामुळे रुग्णाला त्याची पूर्वीची जंतुसमृद्धी प्राप्त होते व तो निरोगी जीवन जगण्यास सज्ज होतो. याला स्व-प्रत्यारोपण (ऑटो-ट्रॅन्सप्लॅटेशन) असे म्हणतात.

विष्टा प्रत्यारोपणाचे अजून काही उपयोग प्रायोगिक अवस्थेत आहेत. असे आढळून आले की, अतिलठ्ठपणा हा काही वेळा त्या माणसाच्या आतड्यांतील जंतूंच्या प्रकारांवर अवलंबून असतो. त्याला उपचार म्हणून निरोगी सडपातळ माणसाची विष्टा एनिमावाटे दिल्यास त्याचा लठ्ठपणा कमी होतो; पण हे उपचार अजून प्रायोगिक अवस्थेत-संशोधनात-आहेत.

सर्व प्रकारच्या नैसर्गिक पाणी साठ्यांमध्ये/स्त्रोतांमध्ये विविध प्रकारचे जंतू आढळतात. त्यात मानवी विष्टेमधील इ. कोलाय नावाचे जंतूही काही प्रमाणात असतात. हे असे जंतुसहित पाणी पिणे हेच नैसर्गिक (फिजीओलॉजिकल) व आरोग्यदायी आहे, असे दिसते. पूर्णपणे निर्जंतुक केलेले, उकळून, फिल्टर करून वगैरे किंवा बाटलीबंद केलेले पाणी सतत पिणे हे आरोग्यदायी नाही. त्याचा एक प्रकार म्हणजे ब-12 जीवनसत्वाचा अभाव. कोणत्याही शाकाहारी पदार्थात निसर्गत: ब-12 जीवनसत्व नसते. मग सर्वच शाकाहारी माणसांना ब-12 जीवनसत्व कमी का पडत नाही? तर असे आढळून आले की, प्रदूषित पाण्यात जे जंतू असतात ते ब-12 जीवनसत्व तयार करतात. विशेषत: या प्रदूषित पाण्यात जर डाळी भिजत घातल्या तर त्यात हे जीवनसत्व भरपूर तयार होते. त्यामुळे पूर्वी शाकाहारी लोकांनाही ब-12 जीवनसत्व फारसे कमी पडत नसे. पूर्वी ब-12 जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा अ‍ॅनिमिया अगदी दुर्मिळ होता; पण सध्या शहरातील पाणी पुरवठा स्वच्छ पाण्याचा असतो. क्लोरिनेट पाण्याचा असतो. त्यात घरी उकळलेले, फिल्टर केलेले पाणी वापरतात. त्यामुळे आता ब-12 जीवनसत्वाची कमतरता वारंवार दिसून येते. पुण्यातील जनतेची ब-12 जीवनसत्वाच्या रक्तातील प्रमाणाची पाहणी काही वर्षांपूर्वी केली. त्यात आढळले की, झोपडपट्टीतील माणसाच्या रक्तात ब-12 जीवनसत्व सर्वांत जास्त होते. कनिष्ठ मध्यम वर्गात त्यामानाने कमी होते. तर उच्च मध्यमवर्गात ते सर्वांत कमी होते! अतिस्वच्छतेचा परिणाम, दुसरे काय?

आपल्या मोठ्या आतड्यातील जंतू खूप ब-12 जीवनसत्व तयार करतात; पण मोठ्या आतड्यातून त्याचे शोषण होत नसल्याने त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही. ज्यांना ब-12 जीवनसत्वाची खूप कमतरता आहे, त्यांना नैसर्गिक प्रेरणेने विष्ठा खाण्याची तीव्र इच्छा होते व विष्ठा खाल्ल्यास त्यांना ब-12 जीवनसत्व मिळते. कारण लहान आतड्यातून त्याचे शोषण होऊ शकते (असाच प्रकार लोहाची तीव्र कमतरता असलेली मुले व गरोदर बायका यांच्यामध्ये दिसून येतो. त्यांना माती खाण्याची तीव्र इच्छा होते आणि मातीमध्ये लोहकण भरपूर असल्याने माती खाल्ल्यावर त्यांची लोहाची गरज भागते!) जठरातील हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडमुळे ब-12 जीवनसत्व नष्ट होत नाही; पण पाण्यातील किंवा विष्टेतील जंतू मात्र हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडमुळे नष्ट होतात. त्यामुळे मोठ्या आतड्याला जंतू पुरवण्यासाठी एकतर एनिमाद्वारे जठरात विष्टा द्यावी लागते किंवा जठरातील अ‍ॅसिडमध्ये न विरघळणार्‍या; पण नंतर लहान आतड्यात विरघळणार्‍या कॅप्सुलमध्ये भरून द्यावी लागते.

प्राणी जगतामध्ये एकमेकांची किंवा स्वत:ची विष्टा खाणे किंवा स्वत:च्या पिलांचे, इतरांचे गुद्द्वार चाटून साफ करणे या गोष्टी सर्रास घडतात. ससे जे अन्न खातात. त्यातील अन्न घटक आतड्यातील एका फेरीत पूर्ण वापरले जात नाहीत. त्यामुळे ते नेहमीच स्वत:ची/इतरांची विष्टा खातात. त्यामुळे अन्नातील अन्नांश त्यांना पूर्णपणे मिळवता येतो. इतरही काही फायदे मिळतात असे दिसते.

जंतुप्रमाणेच जंत हे देखील माणसाच्या आणि सर्वच प्राण्यांच्या आतड्यातील पूर्वापारचे रहिवासी आहेत; पण माणसाच्या बाबतीत येत्या काही वर्षांतच जंत हे माणसाच्या आतड्याचे रहिवासी होते हे म्हणण्याची वेळ येणार आहे. फार परिणामकारक अशी जंतनाशक औषधे आणि उघड्यावर मलविसर्जन करणे बंद होणे यामुळे मानवी जंत आता इतिहासजमा होणार, अशी लक्षणे आहेत. याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. जंतामुळे होणारा लोह कमतरता-रक्तक्षय (आयर्न, डिफिशिअन्सी अ‍ॅनिमिया) हा रोगही आता इतिहासजमा होऊ लागला आहे. जंत नष्ट होण्याचे वाईट परिणाम अजून तरी फारसे दिसलेले नाहीत. माणसाच्या जातीला होमो इकॉनॉमिक्स वगैरे काही नावे दिली आहेत. तसे होमो डिवर्मिस (जंतहीन माणूस) असे नवीन नाव द्यायला हरकत नसावी. कारण भविष्यात माणूस हा एकमेव जंतहीन प्राणी असेल! कदाचित जंत नसण्याचे काही दुष्परिणाम आणखी काही वर्षांनी लक्षात येईल. तोपर्यंत सर्व जंत नष्ट झाल्याने फार उशीर झालेला असेल. आताच काही आतड्याच्या रोगांवर उपचाराचे प्रयोग करण्यासाठी डुकरांतील जंत वापरण्याची पाळी आली आहे.

वैद्यकीय कचर्‍याला आपले सरकार सध्या फार घाबरते. रोग्यांच्या शरीरातील रोगजंतू वैद्यकीय कचर्‍याद्वारे पसरून त्याने रोग पसरतील, अशी भीती वाटते. ही भीती बरीचशी अवास्तव आहे. कारण रोगजंतू हे खूप नाजूक, मिजासखोर असतात. मानवी शरीरात त्यांना उबदार घर, बर्‍याच शत्रूंपासून संरक्षण, आवडते अन्न अशा सर्व गोष्टी मिळतात. मग ते भराभर वाढतात. बाहेर त्यांना 370 सेंं. तापमान मिळत नाही. खायला पुरेसे अन्न-साखर, नत्रयुक्त पदार्थ मिळत नाहीत. ते कोरडे पडल्याने, उन्हाने, हवेतील ऑक्सिजनमुळे मरतात. इतर जंतू किंवा व्हायरस त्यांना खाऊन टाकतात. त्यामुळे ते शरीराबाहेर फार काळ जगू शकत नाहीत. मानवी शरीराबाहेर पडण्याचा विष्ठा व लघवी हा मार्ग त्यांना सर्वांत जास्त सोयीचा असतो. कारण मग ते बराच काळ पाण्यात राहून कोरडे पडत नाहीत. तसेच अंडरग्राऊंड ड्रेनेज पाईपमधून ऊन, ऑक्सिजनपासून संरक्षण मिळत नदीला जाऊन मिळतात- थेट. कारण भारतातील कोणतेच मल प्रक्रिया केंद्र सर्व मल पाण्यावर पूर्ण प्रक्रिया करत नाही. त्यांची क्षमता अपुरी पडते. उदाहरणार्थ कोल्हापुरातील दुधाळी नाल्यावर बांधलेले मल प्रक्रिया केंद्र रोज 20 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेले आहे; पण प्रत्यक्षात दुधाळी नाल्यातून 32 ते 35 दशलक्ष लिटर पाटी केंद्रापर्यंत येते. त्यातील फक्त 20 दशलक्ष लिटर पाणी केंद्र उचलते व त्यावर प्रक्रिया करते. उरलेले 15 दशलक्ष लिटर पाणी तसेच वाहत जाऊन नदीला आणि कसबा बावडा येथील पंपाने शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उचलले जाते. इतके प्रदूषित पाणी पुन्हा पिण्याइतके शुद्ध करणे अवघड असते, ते काम अपुरे राहते व कोल्हापूरला अशुद्ध पाणी पुरवले जाते.

तसेच नदीकाठच्या इतर गावांजवळ इतकी देखील पाणी शुद्धिकरण व्यवस्था नसते. त्यामुळे रोगजंतूंना पुन्हा मानवी शरीरात प्रवेश मिळण्याचा हा राजमार्ग आहे. त्यामानाने वापरलेली ड्रेसिंग, सिरिंजेस, प्लॅस्टर, सलाईन सेट याद्वारे बाहेर पडणारे जंतू फार कमीपण असतात व ते सूर्यप्रकाश, कोरडेपणा, ऑक्सिजन यामुळे लवकरच मरण पावतात. इतर जंतूही त्यांना खाऊन टाकतात. शहरातील नेहमीच्या कचर्‍याबरोबर हा कचरा जाऊन त्याचे कंपोस्ट केल्यास किंवा नुसताच बरेच दिवस पडून राहिल्यास त्यातील रोगजंतू सहज मरून जातात आणि काही थोडे जास्त जगल्यास त्यांना मानवी शरीरात परत प्रवेश मिळणे सहज शक्य होत नाही. कचर्‍याच्या कोंडाळ्यात पडलेली ड्रेसिंग, प्लॅस्टर वगैरे आपल्या सौंदर्य दृष्टीला खुपतात हे खरे; पण ते खरे फार कमी धोकादायक असतात. रोगजंतूंना वाढवणे किती अवघड असते, हे पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांना विचारा. त्यांना प्रथम निर्जंतुक केलेल्या डिशमध्ये खास प्रकारचे खाद्य पसरून मग 37 सें. तापमानास 24 तास ठेवल्यावर मग ते वाढतात. मोठी मिजास ठेवायला लागते त्याची. कचर्‍याच्या ढिगांवर त्यांची वाटच लागते. खरे नुकसान होते ते वैद्यकीय कचरा हाताळण्याच्या/जाळण्याच्या कायदे कानूनमुळे. या कायदे कानूनमुळे हा कचरा जाळणे हा कायदेशीर मार्ग शिल्लक राहतो. या कचर्‍यामध्ये प्लॅस्टिक असणे अपरिहार्य असते. हे सर्व जाळताना हानीकारक विषारी वायू निर्माण होऊन हवेचे प्रदूषण वाढते. कचरा जाळण्याच्या भट्ट्या बर्‍याच वेळा शहराच्या मध्यभागी किंवा शहराच्या जवळ असतात. त्यामुळे हे प्रदूषण जास्त घातक ठरते; शिवाय या विल्हेवाटीचा खर्च अवास्तव जास्त असतो व तो अखेर रुग्णांनाच भरावा लागतो. अवास्तव भीतीमुळे हे होते. या बारीक फटी बुजवताना अंडरग्राऊंड ड्रेनेजमुळे रोगप्रसाराचा राजमार्ग मात्र चालूच राहतो.

नाही तरी मानवी विष्ठेच्या विल्हेवाटीच्या तंत्रज्ञानाचा फेरविचार केलाच पाहिजे. सध्या प्रचलित असलेली अंडरग्राऊंड ड्रेनेज व मलप्रक्रिया केंद्रे ही व्यवस्था सर्वांत जास्त रानटी/मागासलेली आहेत. आपल्या पिण्याच्या पाण्यात आपली विष्ठा सोडण्याच्या या पद्धतीला सुसंस्कृत कसे म्हणता येईल? निसर्गत: उघड्यावर पडलेली विष्टा वाळून, उन्हामुळे, ऑक्सिजनमुळे, जंतूपासून मुक्त होते. इतर जनावरे, कृमी, कीटक ती खाऊन नष्ट करतात. जमिनीवर मातीत मिसळल्याने ती उत्तम खत म्हणून काम करते. पावसाळ्यात थोड्या प्रमाणावर वाहून जाऊन नदीला मिळाली, तर प्रचंड डायल्युशनमुळे व प्रवाहाच्या वेगामुळे कमी प्रभावी होते; शिवाय एक लोटाभर पाणी एका फ्लशपेक्षा खूपच कमी असते. त्यामुळे पाण्याची बचतही खूप होते.

भारतातील कोणत्याही शहरातील पूर्ण मैला पाण्याची पूर्ण प्रक्रिया होत नाही व आर्थिक दारिद्य्र, भ्रष्टाचार व निखळ अकार्यक्षमता यामुळे या परिस्थितीत येणारी शंभर वर्षेसुधारणा होणार नाही. झाला तर बिघाडच होईल. कारण शहरे प्रचंड वेगाने वाढत आहेत; पण काही चमत्कार झाला आणि आपण उत्तम दर्जाची आणि पूर्ण क्षमतेची प्रक्रिया केंद्रे चालवू शकलो, तरी एक मूलभूत अडचण शिल्लक राहतेच. मलप्रक्रियेमध्ये आपण सर्व रोगजंतू मारू शकू. सर्व सेंद्रिय पदार्थाचे अ‍ॅनरोबिक डायजेशन किंवा ऑक्सिडेशन करून त्यांचे असेंद्रिय रासायनिक पदार्थामध्ये रूपांतर करून बी.ओ.डी.(बायालॉजिकल ऑक्सिजन डिमांड) आणि सी.ओ.डी. (केमिकल ऑक्सिजन डिमांड) किमान पातळीवर आणून ठेवू शकू; पण उरलेले असेंद्रिय रासायनिक पदार्थ मात्र आपण नष्टही करू शकत नाही आणि बाजूलाही काढू शकत नाही. या पदार्थामुळे मुख्यत: फॉस्फरस, पोटॅशियम आणि नायट्रोजन हे घटक असतात. शेतामध्ये वापरले, तर ते खत म्हणून काम करतात. तोच त्यांचा योग्य वापर; पण इतक्या मोठ्या शहरांचे उत्सर्जित पाणी शेतीसाठी वापरणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे व ते कोठेच जमलेले नाही. ते नदीतच सोडावे लागते व तेथेही ते खत म्हणूनच काम करते. त्यामुळे पाण्यात शेवाळे व इतर पाणवनस्पती प्रचंड प्रमाणात वाढतात व नंतर मोठ्या प्रमाणावर मरण पावतात व कुजतात. कुजताना नदीच्या पाण्यातील ऑक्सिजन संपवतात. त्यामुळे जलचर प्राणी मरण पावतात, मासेमारी शक्य होत नाही. पाणी काळे दिसू लागते व त्याला वास येऊ लागतो. त्यामुळे कितीही प्रयत्न आणि खर्च केला तरी जोपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना आहेत, तोपर्यंत गंगा शुद्धीकरण, पंचगंगा शुद्धीकरण, कृष्णा शुद्धीकरण या योजना यशस्वी होणं अशक्य आहे म्हणून भुयारी गटार योजनांना पर्याय शोधणे, त्यासाठी संशोधन करणे आवश्यक आहे.

एक पर्याय आहे दोन खड्ड्यांचा संडास. यामध्ये खड्ड्यांमध्ये मलप्रक्रिया होते. मिथेन निर्माण होत नाही आणि घन स्वरुपात खत तयार होते. ते सहजपणे बागेत किंवा शेतात वापरता येते, नदीत सोडावे लागत नाही. फक्त हे संडास अनेक मजली इमारतीत वरच्या मजल्यावरही कसे वापरता येतील, याविषयी संशोधन होणे गरजेचे आहे. दुसरा पर्याय आहे बायोगॅस प्लँटचा. अनेक मजली इमारतींमध्ये किंवा इमारत समूहांमध्ये केवळ मानवी विष्ठेवर चालणारे बायोगॅस प्लँट बांधता येतात. त्यापासून निघणार्‍या मिथेनचा स्वयंपाकासाठी शेगडीत वापर करता येतो आणि निघणारे खत पाणी तेथीलच बागेत वापरून टाकता येते.

नवीन बांधल्या जाणार्‍या इमारतींना हल्ली रेन-वॉटर-हार्वेस्टिंगची सक्ती केली जाते. अशीच सक्ती बायोगॅस प्लँटबद्दलही करता येईल. अगदी दाट वस्तीमध्ये जेथे त्यातून निघणारे खत पाणी वापरण्यास रिकामी जागाच नाही. तेथील निघणारे खत पाणी सक्शन पंपाने टँकरमध्ये भरून इतरत्र शेतीसाठी वापरता येईल.

लहान-लहान सेप्टीक टँक हा पर्याय; मात्र शक्य तो वापरू नये. कारण त्यात निर्माण होणारा मिथने वायू न वापरता, न जाळता हवेत सोडला जातो व मिथेन वायू हा कार्बन डायऑक्साईडपेक्षाही प्रभावी हरितगृह वायू आहे व तो हवेत सोडल्याने पृथ्वी तापण्याची क्रिया जास्त तीव्र होईल, जे सर्वच जीवसृष्टीला घातक आहे.

एकूण मित्रजंतूंच्या सहाय्याने आपण पुढील गोष्टी करू शकतो

1. मित्रजंतूंना शरीरात जागा देऊन मदत करून रोगजंतूंना मारू शकतो.

2. आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो.

3. अ‍ॅलर्जी, दमा अशा रोगांना प्रतिबंध करतो.

4. त्यांच्या सहाय्याने मानवी विष्टेवर विकेंद्रित स्वरुपात प्रक्रिया करून पाणी वाचवतो. नदीचे प्रदूषण थांबवतो आणि बागेसाठी/शेतीसाठी खत मिळवतो.

असे फक्त आपणच करतो, असे नाही. टोमॅटोची झाडेसुद्धा मुळांमधून काही अशी द्रव्ये बाहेर सोडतात की, त्यामुळे मित्रजंतूंची वाढ होते व असे करणारी झाडे ही अधिक निरोगी व जंतू रोगांना सहज दाद न देणारी असतात.

पृथ्वीवर अक्षरश: कोट्यवधी प्रकारचे जंतू आहेत. जंतू, विषाणू (व्हायरस), बुरशी (फंगस), अमिबा (प्रोटोझोआ) व कृमी – जंत यांच्यासह साधारण मानाने 1400 जीव माणसामध्ये रोग निर्माण करू शकतात. त्यातले फक्त शंभरपेक्षा कमी जंतू रोगकारक आहेत- म्हणून आपले शत्रू आहेत. त्यातले देखील बरेच थोडे दिवस टिकणारा सौम्य आजार देतात; पण प्रतिकारशक्तीला प्रशिक्षण देऊन दीर्घकाळचा फायदा करून देतात. उरलेल्या पैकी लाखो जंतू हे मित्रजंतू आहेत. त्यांच्यापैकी बरेच आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती काही कारणांनी खूपच कमी झाली, तर मग मात्र त्यांच्यामुळे रोग निर्माण होऊ शकतो. उरलेले कोट्यवधी जंतू हे मित्रही नसतात आणि शत्रूही नसतात; पण त्यांचे अस्तित्व जमिनीचे, पाण्याचे, वनस्पतींचे, इतर प्राणी/कीटक यांचे आरोग्य राहावे यासाठी आवश्यक आहे.

शंभरपेक्षा कमी रोगजंतूंशी लढण्यासाठी आपण सर्वच लाखो मित्र किंवा उदासीन जंतूंशी युद्ध पुकारणे हे माणसाला नुकसानकारक, अनारोग्यकारक, तर आहेच; पण पर्यावरणाला धोकादायक आहे.

हे सर्व वाचल्यावर आपण वैयक्तिक वागणुकीत काय बदल करावे?

1. फक्त संडासला जाऊ आल्यावर (आणि दाढी करताना) व कपडे धुण्यासाठी साबण वापरावा. अंघोळीसाठी साबण वापरल्यामुळे आपल्या अंगावरील मित्रजंतू आणि त्वचेवरील नैसर्गिक बुरशीनाशक आणि रोग जंतूनाशक तेलकट आवरण नष्ट होतात. त्यामुळे त्वचेचे रोग वाढतातच. त्यामुळे आंघोळीसाठी साबण वापरू नये. ऊठसूट हात धुण्यासाठी साबण किंवा इतर जंतुनाशक द्रव्ये किंवा हँडवॉश वापरू नये. त्यांचा वापर रुग्णालयांमध्ये आवश्यक असतो; घरी नाही.

2. उकळलेल्या किंवा फिल्टर केलेल्या किंवा बादलीबंद पाण्याचा पिण्यासाठी शक्यतो वापर करू नये.