जातवार संघटना सामाजिक परिवर्तनाला व एकात्मतेला मारक आहे. स्वातंत्र्यानंतर आपण प्रजासत्ताक लोकशाही राज्य व्यवस्था स्वीकारली आहे. प्रजासत्ताक लोकशाही राज्य व्यवस्थेमध्ये समाजवादी लोकशाही मूल्ये जोपासणारा समाज निर्माण करावा लागतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही लोकशाही मूल्ये आहेत. आज जगात स्वातंत्र्याचा गुपचूप बोलबाला होतो आहे. पण समता व बंधुता मात्र राजकीय अजेंड्यावरून हद्दपार होते आहे. याचे एक कारण हे आहे की, राज्यव्यवस्था संसदीय लोकशाहीची आहे. पण अर्थव्यवस्था भांडवलशाहीची आहे. अर्थव्यवस्था लोकशाही समाजवादी समता निर्माण करणारी नाही. त्यामुळे आज विषमता, बेकारी, दारिद्य्र, असुरक्षितता हिंसा व भय निर्माण झाले आहे. यामुळे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर समाजात समता प्रस्थापित करणे गरजेचे आहे. यासाठी समाजवादी अर्थव्यवस्था ज्यातून समता निर्माण होईल अशी अर्थव्यवस्था असणे गरजेचे आहे.
भारतात जातीव्यवस्था ही श्रमविभागणी या तत्वामुळे निर्माण झाली. कृषी, उत्पादन, सेवा न्यायनिवाडा शासन हे श्रम विभाजन गाव पातळीवर हेते. गाव स्वावलंबी होते. अर्थव्यवस्था स्वतंत्र स्वावलंबी होती. विकेंद्रित होती. यातूनच जाती संस्था निर्माण झाल्या. काळाच्या ओघात जातीव्यवस्था बंदीस्त झाली. त्या व्यवस्थेत श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना निर्माण झाली. सत्ता संपत्ती, ज्ञान श्रेष्ठ जातीकडे केंद्रित झाले. कनिष्ठ जातीमध्ये अज्ञान, दारिद्य्र, दुर्बलता निर्माण झाली. अन्याय, शोषण, विषमता वाढली ह्यातच परकिय आक्रमणे व गुलामगिरीची भर पडली. यात संपूर्ण देशाचेच शोषण झाले.
स्वातंत्र्याचा लढा, समता व सामाजिक न्यायासाठीच्या सामाजिक चळवळी, लोकशाही स्वातंत्र्याचा पुरस्कार, यंत्रतंत्रज्ञान, विज्ञानाने समाजात घडविलेले परिवर्तन यामुळे भारतातील बंदीस्त जातीव्यवस्था खिळखिळी झाली व खुले स्तरीकरण सुरू झाले. खुल्या स्तरीकरणातही विषमता वाढतेच आहे. पूर्वीच्या विकेंद्रित मर्यादित गावपातळी व्यवस्थामध्ये जाती व्यवहार ठळकपणे नजरेत येत होते. आज व्यापक विस्तारित शहरीकरणात व व्यवस्थामध्ये जात व्यवहार ठळकपणे नजरेत येत नाहीत. दैनंदिन कार्यव्यवहार व सामाजिक कार्यव्यवहारात जातीयता सैल झाली आहे. स्वातंत्र्याच्या काळात राष्ट्रीय भावना वाढीस लागली. लोकशाही स्वातंत्र्य समता बंधुतेचा स्वीकार केला. या चळवळीत जातीय भावना, व्यवहार खिळखिळीत झाले. विज्ञान यंत्रतंत्र ज्ञानाच्या समाज व्यवस्थेतही जातीय भावना व्यवहार क्षीण झाले. परंतु नोकरशाही व सामाजिक संस्थामधून मात्र जातीयता ठळक स्वरूपात दिसून येते. रोटी व्यवहारात शिथील झालेली जातीयता बेटी व्यवहारात मात्र ठळकपणे दिसून येते. भाषेतून, संभाषणेतून जातीयता हद्दपार झाली पण मनातून व कृतीतून जातीयता गेली नाही. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर कालखंडातील जातीयतेचे स्वरूप बदललेले आहे.
स्वातंत्र्योत्तर कालखंडातील जाती व्यवस्थेचे स्वरूप समूह सूचक आहे. मानसिक अस्मितेचे प्रतिक आहे. समूह ओळखीचे साधन आहे. याचा वापर निवडणुकीत मतदानांची गणिते मांडून निवडणूक जिंकल्यासाठी केला जातो. यामुळे जातवार संघटना फोफावतात. आरक्षण व सोई सुविधांचा लाभ या समाजात समता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने निर्माण झाला. परंतु समाजातून समता हे मूल्य हद्दपार झाले व त्याजागी विकास हे मूल्य आज प्रस्थापित झाले आहे. विकास सर्वांचाच व्हायला पाहिजे म्हणून सर्वांनाच आरक्षण सोई सुविधा लाभ पाहिजे. यासाठीही जातवार संघटना फोफावत आहेत. जागतिकीकरणाच्या व्यापक विस्तारीत समाज व्यवस्थांमध्ये विविधता नाहीशी होऊन एक सपाटीकरण येत आहे. माणसाला जीवनाची उंची, सखोलता, लांबी, रूंदी वैशिष्ट्ये यांची एक आसक्ती असते.. याचा आग्रह असतो, आणि ते टिकवून ठेवण्याची जैविक प्रेरणा असते. सामुहिक ओळखीची ही जी जैविक प्रेरणा आहे. तीही जातवार संघटना निर्माण होण्यास, वाढण्यास कारणीभूत आहेत. आज जातवार संघटना अशा अनेक कारणांमुळे फोफावत आहेत.
हे सगळे जातीविषयक कार्यव्यवहार लोकशाहीला मारक आहेत. मुळात भांडवलशाही अर्थव्यवस्था, निव्वळ निवडणूक प्रधान राजकीय व्यवस्था, उपभोगप्रधान पुस्तकी शिक्षण देणारी नोकरशाही निर्माण करणारी शिक्षणव्यवस्था समाजात विकासाच्या मुद्द्यावरच सर्व समाजव्यवस्थांचा कार्यव्यवहार करणे हे सगळेच लोकशाहीला घातक आहे. समाजपरिवर्तन हे प्रजासत्ताक समाजवादी लोकशाही समाज निर्माणासाठी आहे. महात्मा गांधी, महात्मा फुले, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटीशांच्या विरोधात मानवी मूल्यासाठी लढा दिला त्याच वेळेस समाजात समतेच्या चळवळी उभारल्या. कारण समता व बंधुतेशिवाय स्वातंत्र्याचे अस्तित्व टिकूनच राहू शकत नाही. आज समाजातून विकास हे मूल्य हद्दपार करून समता हे मूल्य अजेंड्यावर घ्यायला पाहिजे. तरच जातवार संघटनाच्या स्वरूपात व कार्य व्यवहारात अमूलाग्र परिवर्तन होईल व मानवी समुहाच्या अस्मिता, ओळख व कार्य लोकशाहीशी सुसंगत होतील.
–शोभा शिरढोणकर