Categories
परिसंवाद

कला म्हणजे प्रज्ञानाचे प्रकाशन – डॉ. यशवंत मनोहर

वार्षिकांक - २०१९

आदिसांख्य, लोकायत, बुद्ध, बाबासाहेब, हिर्रोक्विटस, प्रोटॅगोरस असे हजारो प्रज्ञावंत इहवादी आहेत. मी या जागतिक तत्त्वज्ञानाच्या परंपरेत उभा असलेला साहित्यिक आहे. अध्यात्म आणि विज्ञान, धर्मविरुद्ध विज्ञान, ईश्वर विरुद्ध विज्ञान, परलोक विरुद्ध इहलोक, विषमता विरुद्ध समता आणि मनू विरुद्ध संविधान असाच तो झगडा आहे. आंबेडकरवादी साहित्यात विज्ञान, इहलोक, समता, संविधान या छावणीतले साहित्य आहे.

ज्येष्ठ व विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांचे बालपण अत्यंत गरिबीत नागपूर जिल्ह्यातील येरला या छोट्याशा खेड्यात गेले. खूप हालअपेष्टा सोसत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. नागपूर विद्यापीठातून त्यांनी पीएच. डी. मिळविली व नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागातून 2003 साली ते निवृत्त झाले.

1960 पासून डॉ. यशवंत मनोहर कविता आणि वैचारिक लेखन सातत्याने व गंभीरपणे करीत आहेत. त्यांच्या कविता इंग्रजी, हिंदी, उर्दू, बंगाली, कन्नड, गुजराती आदी भाषांमध्ये अनुवादित झालेल्या आहेत. त्यांचे अनेक कवितासंग्रह व वैचारिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे ते अध्यक्ष होते. तसेच त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे व इतर अनेक प्रतिष्ठानांतर्फे पुरस्कार मिळालेले आहेत.

समाजातील धर्मांधता, जातीउतरंड, दलित-वंचितांचे होत असलेले शोषण, अंधश्रद्धा इत्यादींच्या विरोधात ते सातत्याने आपले विचार जाहीरपणे मांडत असतात. समता, स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांच्या बाजूने लढणार्‍या या कवीशी आम्ही केलेला संवाद.

केवळ मनोरंजन म्हणून किंवा कलेसाठी कला की हे जग आहे, त्यापेक्षा अधिक सुंदर करण्यासाठी कला? मानवमुक्तीसाठी कला? आपणास नेमके काय वाटते?

कलानिर्मिती ही अधिकच गंभीर, अधिकच जबाबदार आणि उच्चनैतिक अशीच निर्मिती आहे. कला ही शब्दांची रचना नव्हे, तर ती अधिकाधिक सभ्य जीवनाचीच रचना असते. माणूस ही जीवनाचीच निर्मिती असते आणि या माणसातील कलावंत ही या जीवनाचीच निर्मिती आहे. आहे त्यापेक्षा अधिक सभ्य जीवनाची वा अधिक चांगल्या जीवनाची निर्मिती, हीच मानवी प्रज्ञेमागील आणि प्रतिभेमागील प्रेरणा आहे. विज्ञान, तत्त्वज्ञान आणि साहित्य अशा सर्वच क्षेत्रांमधील माणसाची निर्मिती याच प्रेरणांची निष्पत्ती आहे.

जुन्या स्वप्नांना वंदनपूर्वक निरोप देणे आणि नव्या स्वप्नांची निर्मिती करणे, हा माणसाचा स्वभावच आहे. स्वप्ने कुठेच नसतात, ती माणसाच्या प्रकृतीतूनच जन्माला येतात. स्वप्ने ही माणसाचीच निर्मिती आहे. पण खुद्द माणूसही स्वत:च्या स्वप्नाचीच निर्मिती आहे. त्याहून नव्या स्वप्नांची मी निर्मिती करतो म्हणून मी माणूस आहे. आहे त्याहून अधिक चांगली गोष्ट निर्माण करण्याची अपार तहान मला लागलेली आहे, म्हणून मी माणूस आहे, असेच या माणसाचे घोषणापत्र.

या माणसातल्या साहित्यिकाचाही हाच ध्यास असतो. तो स्वत:तील अनिष्टांचे निर्मूलन करीत राहतो आणि स्वत:तील इष्टत्व अधिक उन्मत करीत राहतो. त्याच्या स्वत:च्याच सुसभ्यीकरणाची ही प्रक्रिया, मग माणूस या वैश्विक घटनाच्याच सुसभ्यीकरणाची प्रक्रिया होऊन जातो.

मानवाचे रंजन करणार्‍या खूप गोष्टी जीवनात आहेत. कला आणि खरी कला सर्जन करते. हे सर्जन सवंग, उथळ वा प्रचारी होत नाही. कारण ते निर्मितीचेच प्रकाशन असते. पोटजात, जात, धर्म, पंथ, वंश अशा पातळ्यांवर थांबलेली मने म्हणजे उपाधिक मनेच असतात. ही माणसांची मने असू शकतात; पण साहित्यिकांची मने ही निरुपाधिकच झालेली असतात. वरील मर्यादांमध्ये अडकलेली मने साहित्यिक मने नसतात. म्हणून ती स्वतंत्र आणि प्रचारी होतात. खरे निरुपाधिक साहित्यिक मन हे वैश्विक झालेले असते. ती मनाची सर्वोपकारक पातळीच असते. विचारांना, ज्ञानांना आणि तत्त्वज्ञानालाही कुठल्या तरी चौकटीच्या सीमा असतात. पण प्रज्ञानाला सीमा नसतात, जे कुठल्याच चौकटीची बाजू घेत नाही. त्यालाच आपण ‘प्रज्ञान’ म्हणतो. सर्वांना समान न्याय, सर्वांना समान सन्मान या पातळीवर गेलेल्या वृत्तीला आपण प्रज्ञान म्हणतो. प्रज्ञानाचा संपूर्ण प्रकाशन सोहळा असेच कलेचे स्वरूप असते. कारण तिचा निर्माताही प्रज्ञान झालेला असतो. या प्रज्ञानाशी जो प्रामाणिक असतो, तोच मानवी सौहार्दाचा, सीमातीत सौंदर्याचा म्हणजे प्रज्ञानाचाच आविष्कार करीत असतो. त्याच्या निर्मितीला प्रचारी होण्याची, सवंग होण्याची कोणतीही शक्यता नसते. अशी कला कलेसाठी कधीच नसते. ती प्रज्ञानाच्या प्रकाशनासाठीच असते.

कलावाद हा वाङ्मयातील फॅसिझम आहे, असे तुम्हाला का वाटते?

याचे कारण कलावादी मीमांसक कलेला शासक-शोषक समाजाच्या घरी पाणी भरायला लावतात. उच्च वर्णाव्यतिरिक्त कोणी लिहू नये, वाचू नये; फक्त सेवा-चाकरी करीत निर्विचार जगावे. कारण लिहिले तर व्यवस्थेसंबंधी प्रश्न निर्माण होतील. वाचले तर व्यवस्थेचा खोटेपणा, दांभिकपणा वा अमानुषपणा लोकांच्या लक्षात येईल. म्हणून फसवणुकीला चिरंतनत्व मिळवून देण्यासाठी शोषक-शासक यंत्रणा शिक्षणबंदी, विचारबंदी, लेखनबंदी वा वाचनबंदी करीत असत.

शोषक-शासकांच्या हिताचे तेवढेच बोला. या समाजातील संबंध शोषक-शोषित असेच असतात. या संबंधांना धक्का लागेल, असे त्यांना काहीही नको असते. ही वृत्ती फॅसिझमचीच असते. एकाधिकारशाहीचीच असते. चातुर्वर्ण्य ही ब्राह्मण वर्चस्वकेंद्री रचना आहे. बाकींच्याचा सेवक हाच दर्जा असतो. या वृत्तीला वा रचनेला ‘फॅसिझम’ म्हटले जाते. कलावाद या विषम वा असमान वा अन्याय्य संबंधांचा पुरस्कार करतो, म्हणून कलावादाला मी ‘फॅसिझम’ म्हणतो.

शिक्षण संपतासंपता औरंगाबादला संघपरिवारातील सामाजिक समरसता मंचाच्या विरोधात तुम्ही जे लेखन केले, त्या लिखाणाविरुद्ध तुमच्यावर त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होताहे प्रकरण नेमकं काय होतं?

‘आरएसएस’च्या सामाजिक समरसता मंचाचे उद्घाटन संघाने एका दलिताकडूनच 1988 साली पुण्यात केले होते. त्या व्यक्तीवर त्या काळी टीकेची झोड उठली, अनेक लेख लिहिले गेले. ‘सुगावा’सारख्या मासिकाने विशेषांक प्रकाशित केले होते. आंबेडकरी चळवळीच्या हिंदूकरणाची ती प्रक्रिया होती. तुम्ही आमच्यात समरस व्हा; बाहेर जाऊ नका. आमच्यात म्हणजे वर्ण-जातीसंरचनेतच आनंदाने राहा. या सर्व संरचनेच्या विरोधातच तर बाबासाहेबांनी संविधानातील तरतुदी, धम्म आणि त्यांचे सर्व तत्त्वज्ञान उभे करून ठेवले. बुद्धांना अवतार ठरवणार्‍यांनी, महायानाच्याद्वारे समरसतेचाच प्रयोग इसवीसनोत्तर काळात केला होता. अनेक लोकांनी मग समरसता मंचावर जाण्यात गौरव मानला. ज्यांच्या विरोधात बाबासाहेबांनी बंड केले, त्यांच्याशी समरस कसे होणार? असे असताना सामाजिक समरसता मंचाचे उद्घाटन करण्याचे वा समरसता मंचावर जाऊन भाषणे देण्याचे काय कारण होते? खूप लोकांनी विरोध केला. मीही या खूप लोकांमधला एक होतो. पण सुरेश भट, विलास वाघ यांच्यावरही दावे करण्याचे जाहीर केले गेले. पण अंतिमतः फक्त माझ्यावर दावा केला गेला. औरंगाबादेच्या कोर्टात तीन-चार वर्षे तो दावा समरसता मंचाच्या निमित्ताने जे रान उठले, त्यामुळे आंबेडकरवादी साहित्यात सामाजिक समरसतेचे नाव घेणेही पुढे बंद झाले. पुढली पिढी सावध झाली.

मानवी मूल्याच्या संवर्धनार्थ आपला लेखनप्रवास आहे. या लेखनप्रवासाच्या जडणघडणीत तुमची वाटचाल नास्तिकतेकडे कशी झाली?

या प्रश्नाच्या संदर्भात मी खूप ठिकाणी लिहिले आहे. पण मी एवढेच सांगेन की, माझे भाऊ सदाशिवराव नास्तिक होते. त्यांचे पाहून मीही नास्तिक झालो. तो पाचवी-सहावीत शिकत असतानाचा काळ असावा, पुढे मी लोकायत, बुद्ध, बाबासाहेब असे तत्त्वज्ञ वाचले आणि माझे नास्तिक्य बुलंद करीत गेलो. हे नास्तिक्य आजवरही मी बुलंद करतोच आहे. जागतिक तत्त्वज्ञानात आपल्याशी जुळणार्‍या प्रकाशगोलांचा शोध घेतोच आहे. प्रा. रा. ग. जाधव, वा. ल. कुळकर्णी, भालचंद्र फडके, यू. म. पठाण असे नामवंत अध्यापक मला लाभले. या सर्वांनी अतोनात प्रेम केले.

मी माझे नास्तिक्य म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञाननिष्ठा, पुनर्रचनाशीलता आणि मानवी सौहार्दाचे प्रज्ञान यांचे एकजीव तत्त्वज्ञान माझ्या इहवादी सौंदर्यशास्त्रात मांडले आहे. ईश्वर, आत्मा, मोक्ष, पूर्व-पुनर्जन्म, परलोक, स्वर्ग-नरक अशा कोणत्याही लोकमान्य अंधश्रद्धांना माझ्या जीवनदृष्टीत आणि साहित्याच्या सौंदर्यदृष्टीत स्थान नाही.

आजच्या परिस्थितीत तुम्ही एकूणच साहित्य क्षेत्राकडे आणि विशेषत: आंबेडकरी साहित्य क्षेत्राकडे पर्यायी प्रगल्भतेच्या दृष्टीने कसे बघता?

आदिसांख्य, लोकायत, बुद्ध, बाबासाहेब, हिर्रोक्विटस, प्रोटॅगोरस असे हजारो प्रज्ञावंत इहवादी आहेत. मी या जागतिक तत्त्वज्ञानाच्या परंपरेत उभा असलेला साहित्यिक आहे. अध्यात्म आणि विज्ञान, धर्मविरुद्ध विज्ञान, ईश्वरविरुद्ध विज्ञान, परलोकविरुद्ध इहलोक, विषमताविरुद्ध समता आणि मनूविरुद्ध संविधान असाच तो झगडा आहे. आंबेडकरवादी साहित्य यात विज्ञान, इहलोक, समता, संविधान या छावणीतले साहित्य आहे. मुस्लिम साहित्याने, ख्रिश्चन साहित्याने, स्त्रीवादी साहित्याने, भटक्या-विमुक्तांच्या साहित्याने, आदिवासी साहित्याने, ग्रामीण साहित्याने याच इहवादी छावणीशी आपले नाते जोडावे, असे मला वाटते. भारतीय ही मूल्य संकल्पना आहे. वैदिक-ब्राह्मणी या धारणेशी तिचा कायम संघर्ष आहे. मी सर्वस्वी भारतीय आहे. या संकल्पनेचा अर्थ मी पूर्णपणे वैश्विकही आहे, असाच आहे. हे वैश्विक प्रज्ञानाशीच नाते जोडणे असते. आपल्या जीवनदृष्टीत दुनियेतील सर्वच इहवादी उजेड वस्तीला आलेले आहेत, असेच सर्वच प्रतिभावंतांना वाटायला हवे, असे मला अंत:करणपूर्वक वाटते.

मानवी मूल्यांचा जागर तुमच्या कवितेतून, तुमच्या वैचारिक लेखनातून पदोपदी जाणवतो. मानवतावादी मूल्यांचा प्रभाव वाढविण्यात कलेचा सहभाग किती व कसा असतो?

वर म्हटले त्या इहवादी मूल्यछावणीचे पडघम माझ्या साहित्यातून वाचकांना ऐकायला येतातच. साहित्य पुनर्रचना प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका वठवते. प्रज्ञानाचे प्रकाशन हे अज्ञानाचे निर्मूलन वा समीमतेचेच निर्मूलन असते. प्रज्ञानाच्या कक्षेत मानवी मन घेऊन जाणे म्हणजे एक प्रकारचे सीमोल्लंघनच असते. ही जबदरस्तीची, हिंसेची वा दमनाची प्रक्रिया नसते. ही रक्तविहीन प्रक्रिया असते. शेवटी नवी रचना मनाचीच करायची असते. नव्या रचनेसाठी मनाचीच मशागत करायची असते. मनाची बंद दारे उघडणे हेच तर साहित्याचे जन्मप्रयोजन आहे. साहित्य हे मानवी संबंधांची अधिक विधायक, अधिक परस्परोपकारक रचना करते. ही प्रक्रिया परिवर्तनप्रवण, पुनर्रचनाप्रवण मते तयार करण्याचीच प्रक्रिया असते.

पुढची लढाई ही धर्म की संविधान?

पुढची लढाई धर्माच्या विरुद्धच होईल आणि संविधानच ती लढाई सुरू करेल, असे मला ठामपणे वाटते.

लोकशाही मूल्यव्यवस्थेत दलित राजकारणाची पुढील दिशा काय आणि कशी असावी?

कोणाही गटाचे राजकारण यापुढे अपयशीच ठरेल. तो गट सामाजिक असो वा धार्मिक असो; यापुढचे राजकारण दोन वर्गांमध्येच होईल. एक गट संविधानाचा असेल आणि दुसरा गट धर्मवाद्यांचा असेल. ज्यांना समता, स्वातंत्र्य, समान न्याय, समान सन्मान हवा आहे, त्यांनी संविधान या मूल्यवर्गात सामील व्हावे, असे सामील होण्याच्या मार्गात आडव्या येणार्‍या अस्मितांचा आपल्या अहिताच्या म्हणून त्याग करावा. या राजकीय प्रज्ञानाची आता गरज आहे.