‘साने गुरूजी मला भेटले’.....! साने गुरूजी मला भेटले.... इंटरनेट कॅफेत नातवाबरोबर. अभियांत्रिकी शाखेचा प्रवेश अर्ज ऑन लाईन भरताना....! मला म्हणाले हॅलो प्रोफेसर तुम्ही भेटलात बरे झाले.....! राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रचलित शिक्षण व्यवस्थेवर साधनेच्या अंकासाठी तुम्हीच लिहिले पाहिजे! मी म्हणालो माफ करा गुरूजी... तुमच्याकाळी शिक्षणक्षेत्र हे तीर्थक्षेत्र होतं! आज त्याची बाजारपेठ झाली! दिशा कधीच हरवली दशा फक्त उरली आहे! तुम्ही लिहा म्हणालात.... पण... लिहायचं तरी काय? गुरूजी... जे आहे... ते असं आहे! फुले म्हणून गेले.... गती विना नीती गेली! आज गती पुढे नीती हरली! कधी काळी ‘विद्या सर्वार्थ साधनम् होती आज केवळ ‘अर्थसाधनम् उरली! हिंगण्याच्या कर्व्यांनाही आपली स्वप्ने विकावी लागली! शिक्षणाचे दिवे.... खेड्यात पोहोचले... मात्र सातार्यात ‘भाऊराव’ तर गावोगावी ‘खाऊराव’ झाले! तुम्ही जिला चळवळ म्हणालात तिला धंद्याचे स्वरूप आले! गुरूजी.... जे आहे ते असे आहे! मायबाप सरकारने सरस्वतीची वीणा काढून घेतली अनुदानास नकार दिला तेव्हाच सरस्वतीने पोटावर ताशा बांधला! संस्था चालकांनी मात्र... ‘दे दान.... विनाअनुदान... सुटे गिराण’ म्हणत आपला हात पुढे केला इथूनच.... आधी डोनेशन.... मागाहून अॅड्मिशन.... गुरूदक्षिणेचा उलटा प्रवास सुरू झाला! गुरूजी, जे आहे, ते असे आहे! ‘ज्ञानदान’ हा तुमच्यासाठी ‘वसा’ होता.... आमच्यासाठी ‘व्यवसाय’ आहे! हयातभर वसा सांभाळून.... तुम्ही काय मिळवलंत गुरूजी? अंमळनेरातल्या खोलीवरचा साधा पन्हाळी पत्रा देखील तुम्हाला बदलता आला नाही! मी मात्र कौलारातून ए.सी.बंगल्यात आलो! जरूर.... तुम्ही मला प्रज्ञावंत म्हणालात पण, सहाव्या वेतन आयोगाने ‘धनवंत’ ही झालो आहे! हे कबूल की... मास्तरकी बरोबरच आम्ही चार जोडधंदे काढले! भावाच्या नावावर क्लासेस उघडले मुलाच्या नावाने गाईड लिहिले मुलीच्या नावे प्रकाशन सुरू केले नाही तरी गुरूजी.... तुम्हीच सांगा... घर-दार, शेतीवाडी.... आई वडिलांचं उतार वयातलं आजारपण बायकोचा हट्ट.... लेकराबाळांचं शिक्षण पुतण्यांची लग्नं.... भाच्यांना मार्गी लावणं... पगाराच्या चार टिकल्यांवर एवढे व्याप तरी काय रेटले असते? गुरूजी.... जे आहे... ते असे आहे! तुमच्या जाण्यानंतर... शिक्षणव्यवस्थेत नवे प्रयोग झाले! काही पचनी पडले... काही मोडीत काढले! चार-चौघांच्या भल्यासाठी काही चालूही ठेवले! विचारू नका....! प्रौढ शिक्षणात प्रगती किती झाली! एवढे खरे की.... अनेकांची कित्येक वर्षे दिवाळी झाली! कर्जावरच्या ‘खडू फळा’ योजनेत अवघ्या शाळांची चंगळ झाली! त्याही पुढे.... पोषण आहाराने धमाल केली! शाळेची खानावळ झाली! ‘सरकारच्या नावानं चांगभलं’ म्हणीत पोरं मास्तरांना राईस प्लेट मागू लागली! गुरूजी.... तुमच्या काळी.... विद्यार्थी आणि शिक्षकांत थोडं बहुत का होईना अंतर होतं! आज ‘ग्लोबलायझेशन’मुळे अवघं जग जवळ आलं! विद्यार्थी आणि शिक्षकातलं अंतर ही कमी झालं! आज काल.... शिक्षक आणि विद्यार्थी पहिल्यांदा ‘मद्यालयात’ भेटतात.... नंतर ‘विद्यालयात येतात’ याला.... ‘कालाय तस्मै: नम:’ म्हणू नये तर.... काय म्हणायचं? गुरूजी.... जे आहे... ते असं आहे! गुरूजी.... तुमच्या पिढीतील शाळा सर्वार्थानं शाळा होती! त्या शाळेत ‘सामाजिक घुसळण’ होती! आज टोलेजंग इमारत वातानुकुलित वर्ग खोल्या... भरमसाठ फी.... आकर्षक गणवेश.... गोंडस विद्यार्थी आणि ‘स्मार्ट’ शिक्षक.... अशी श्रीमंताची शाळा वेगळी झाली! गोर-गरीबाच्या वाट्याला मात्र झेड.पी. आणि म्युन्सीपाल्टीची शाळा आली! शाळा-महाविद्यालयांचे असे स्तर-निहाय ‘वर्गीकरण’ झाले! मग शिक्षकांचे ही ‘जाती-वर्ण’ आले! ट्रेंड-अनट्रेंड आधीच होते त्यात पदवीधरांची भर पडली.... केंद्रप्रमुख, विषयतज्ञांची सोय झाली! प्रशिक्षणार्थींच्या जोडीला कंत्राटी शिक्षण सेवक आले नव्याने भर म्हणून ‘आंतरवासी’ आले! पूर्णवेळ, अर्धवेळच्या साठमारीत तासिकांचे ही तत्व निघाले! प्राथमिक माध्यमिक या जाती सोबत ज्युनिअर-सिनिअरच्या जमाती आल्या! डी.एड., बी.एड.चे दुकान मांडले नेट-सेटचे खुळ झाले आणि एम.फिल, पी.एच.डी.चे फॅड आले! शिक्षणाच्या बाजारपेठेत शासनानेच.... मास्तरांचे नवे नवे ‘ब्रॅण्ड’ आणले ....आणि व्यवस्थेलाच ‘रांड’ केले! गुरूजी... जे आहे... ते असं आहे! भाऊरावांचे तरी काय? म्हणे... ‘कमवा आणि शिका’! तुम्हीच सांगा गुरूजी सारे आयुष्य का राबण्यात घालवायचं? जेव्हा, मी प्राध्यापक म्हणून चिकटलो... तेव्हा... आमचे आबा म्हणाले... कारभारी... मोजली नोटांची बंडलंच्या बंडलं तवाचं तुमाला चिकटवता आलं! गुरूजी... शिक्षक भरतीत आता... ‘गमवा आणि शिकवा’ टेक्निक आलं! गुरूजी जे आहे... ते असं... आहे! म्हणून आम्ही... मनाशी खूण गाठ बांधली स्वत:चीच शिक्षण संस्था काढली! दारावर मात्र.... ‘मोजा आणि शिका’ हीच पाटी लावली! खरं सांगतो... गुरूजी.... आज काल शिक्षक होण्यापेक्षा संस्था चालक होणं परवडतं! बस्स... थोडसं, लिंकींग पायजेल हाय... बाकी... सारं... म्यानेज करता येतं! गुरूजी... हे आहे.... ते असं आहे! गुरूजी आधीच हळवे.. मात्र, माझं ऐकून गंभीर झाले! निर्धारपूर्वक मला म्हणाले.... पाटीलबुवा... मी स्वप्नातही पाहिले नाही.... ...असे हे वास्तव आहे! या पुढे.... पुन्हा नव्याने रान उठवायला हवे! नव्याने रान पेटवाया हवे! मी म्हणालो... माफ करा गुरूजी.... आधीच सारे पेटले आहे! तुमच्या काडीची कुठे गरज आहे? ‘अडवा आणि जिरवा’चा प्रयोग नको.... ‘काम्प्रोमाईज’चे बोलूया.... फार झालेच तर.... त्याला आपण ‘समन्वय’ म्हणू या! गुरूजी... सरकार दरबारी तुमच्या शब्दाला तसं वजन होतं एखादं दुसरं पॉलिटेक्निक, मेडिकल, तुम्हाला सहजासहजी जमलं असतं! पण.... तुम्ही पडलात ‘बामण गडी’ त्या वाटेला गेला नाहीत! यात आमचा काय दोष आहे? कालपर्यंत या क्षेत्रात पटवर्धन-नाईक.... श्रीमाळी.... मुदलीयार...कोठारी.... असे तुमच्या वर्गातले मिरासदार होते! आता.... कुठे.... आमच्यातल्या दूध.... साखर... सूत.... सहकार... सम्राटातून नवे, ज्ञानोबा, विनोबा, पांडोबा..... असे बहुजनातले वतनदार आले! गुरूजी... तुमचंच सारं ऐकायला मी काही बनगरवाडीचा पाटील नाही! आम्ही त्यांचेच धडे गिरवले! गुरूजी.... जे आहे... ते असे आहे! झेड.पी.अध्यक्षाच्या नातवंडाला... आम्ही वरच्या वर्गात ढकलले दुसर्याच वर्षी आदर्श शिक्षकांत... आमचे नाव झळकले! तेव्हापासून सत्ताधार्यांत उठ बस ठेवली विरोधकांशी जवळीक साधली! अक्कल फारशी नव्हतीच मात्र शक्कल चालवली! शासनाच्या विविध समित्यांवर आपली वर्णी लावून घेतली! संस्थेसाठी नियुक्त्या करताना जात-कुळी-सोयरा-धायरा-शोधीत गेलो! स्वत:साठी मात्र काळाबरोबर बदलत राहिलो! वाढत्या वयाबरोबर माथ्यावरचे केस पिकले पण खरं सांगतो गुरूजी.... आम्ही त्याचेसुद्धा मार्केटिंग केले! कालपर्यंत शिक्षणमहर्षी होतो आज ‘ज्ञानतपस्वी’ झालो विरोधक लाख म्हणोत मला ‘सरकारी संत’ पण ज्येष्ठ विचारवंतात माझेही नाव आले! गुरूजी जे आहे ते असे आहे! गांधीजींच्या विश्वस्त संकल्पनेला आम्हीच मूर्त स्वरूप दिले शिक्षण संस्थेसाठी बायको-मेहुणा-लेक-जावयाबरोबरच साडू भावाला तहहयात विश्वस्त नेमले! अध्यक्षपद मात्र-मुलग्यासाठी वंशपरंपरेने कायम ठेवले! आज माझ्या अखत्यारित के.जी.पासून डिग्रीपर्यंत कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय व्यवस्थापन, सर्व शाखा आहेत. ‘जिथे संधी तिथे आम्ही’ या न्यायाने एकही फॅकल्टी सोडली नाही चार-चौघा मास्तरांसारखा डीम नाही राहिलो डिमड् युनिव्हर्सिटीचा ‘चॉन्सलर’ झालो देशाने ‘पद्मश्री’, विद्यापीठाने ‘डी.लीट’ तर समाजाने ‘ऋषीतुल्य’ म्हणून गौरवलं आहे गुरूजी जे आहे.... ते असे आहे! गुरूजी, तुमच्या आग्रहाखातर लिहिणं मला भाग आहे! पण बरं कसं लिहू? खरं तेच लिहितो आहे! गुरूजी तुमचं जगणं आणि झगडणं हे समाजासाठी होतं म्हणून तर तुम्ही ‘काल’ मरून आज देखील मागे उरलात तुमचं मरण हे मरणं नव्हतं मरणानंतरचं जगणं होतं! आम्ही मात्र मरणाबरोबर सरणार आहे कारण आमचं मरण हे मरण आहे फक्त खुर्चीतून भिंतीवर लटकणं आहे! माफ करा गुरूजी जे आहे.... ते ... असं आहे!
-सुनीलदत्त पाटील, सांगली.
देवा.... देवा तुझी किती अगणित माया! जगण्याच्या पोटी आम्ही गेलो वाया! मोजता संपेना तुझी धनराशी! कवडीही नाही साधी आम्हापाशी! देवा तुझा कसा अजब रे न्याय! एक खाई साय एक रडे धाय! सोड आता तुझे कमरेचे हात! उघडुनी डोळे ये रे! माणसात! वाहुनी आमच्या दु:खांची पखाल! होऊनी रहा खरा लोकपाल!
-चंद्रकांत बारामतीकर, कोल्हापूर
ज्योतिबा
ज्योतिबा धन्यवाद. चूलमूल रांधावाडा! उष्टी काढा करणार्या अबलेला तुम्ही उंबरठ्याबाहेर आणलंत. तथ दध पफ बभ शिकवून शहाणं केलंत. आता ती वाचू शकते लिहू शकते. अंगठ्याच्या ठिकाणी सही करते. किती तरी फरक पडलाय तिच्यात पण ज्योतिबा, ती अजून पूर्ण सबला झाली नाहीय. आहे ती अजून अबला. आता तिच्या पुढं वासनेनं वखवखलेली भूतं नाचतात. त्यांच्या वासनेला, अत्याचाराला तिला बळी पडावं लागतंय. तिच्या मनीची स्वप्नं भंगतात. तिला निराशेच्या गर्तेत ढकलून देतात. अखेर, तिला आत्महत्या करावी लागतेय. सांगा ज्योतिबा कधी होणार ही अबला सबला! ज्योतिबा, खरंच अजून ती अबलाच राहिलीय. ही अबला सबला कधी होणार? का तुम्हा दोघांना नवा जन्म घ्यावा लागणार?
-सुभाष एम.बारी. पुणे
देवांचा बाजार
देवाचं करून भांडवल मंदिराचं दुकान केलं! देवळाच्या गाभार्यात पुजार्याला सेल्समन केलं॥ भक्तीची करून जाहिरात भावनेला आव्हान केलं। धनदांडग्यांच्या देणग्यांनी देऊळ मोठं केलं॥ सामान्य व्यापार्यांनी नारळ, उदबत्त्यांचं स्टॉल मांडलं। आंधळ्या, पांगळ्या भिकार्यांचं भिक्षेचं ठिकाण बनलं॥ चिंतेचा भाव चेहर्यावर नवसाचा नारळ हातावर। भक्त उभे तिष्ठत देवळाच्या दारावर॥ पुजार्याचं लक्ष भक्तांच्या दक्षिणेवर। भक्तांचं लक्ष पायरीवरील पादत्राणावर॥ देवांच्या बाजारात व्यापारी नि दलालांचं फावलं। भोळ्या भाबड्या भक्तांना त्यांनी कर्मकांडातून लुबाडलं॥
-विजय वर्षा, सातारा
अजूनही हाती आला माऊस बरसला कृत्रिम पाऊस अजूनही सोडेना जपमाळ माणूस... झेपावला अग्नीबाण फोफावला संकरित वाण अजूनही भागेना मोक्षाची तहान.... एकलव्य अग्रदूत प्रयत्नानेच होते जीत अजूनही उतरेना नशिबाचे भूत.... रक्ताचे चारच गट एकाच मातीत सर्वांचा शेवट अजूनही तुटेनात जातींचे तट.... विवेकच श्रेष्ठ प्रमाण मानवतेलाच मिळे प्रणाम अजूनही माणूस धर्माचा गुलाम.... विज्ञानाची स्वीकारली सृष्टी विसरलो सम्यक दृष्टी अजूनही माणूस खूपच कष्टी....
-नवनाथ चौगुले, पंढरपूर
ईश्वर पाहिला आहे का?
ओढा आटतो नदीचे पात्र निर्वस्त्र होते तळ्याचा गाळ उघडा पडतो पण तू एखादा सागर आटल्याचं कधी ऐकलं आहे काय? जमीन धसते डोंगरकडे ढासळतात ओणवलेल्या नदीकाठांचे धडेच्या, धडे खचतात पण आभाळ कधी कोसळल्याचं पाहिलं आहे काय? दिवे मालवतात निरांजन मुके होते कंदील भडकून, भडकून विझून जातो. मेणबत्ती वितळून जाते माणसाची प्राणज्योतही अचानक मालवते पण सूर्य विझलेला कुणी पाहिला आहे काय? सागराला अमरत्व देणार आकाशाला शाश्वत आयुष्य देणारा सुर्याला अक्षय अपरिमित तेज देणारा मंदिरांमधून व घरांमधून पुजिला जाणारा ईश्वर तुम्ही कोणी पाहिला आहे काय?
-गोविंद मोतलग, अकोला
कॅनव्हास....!
तिचा कॅनव्हास आहे भूतकाळातल्या रानटी इतिहासाचा, जन्मत:च पाण्यात बुडविणार्या, तिच्या पदार्पणाला आक्रोश करणार्या, गर्भाशयातच मारणार्या पुरूषप्रधान संस्कृतीचा. लक्ष्मी-दुर्गेची रूपक मिरवितांनाच शेणाचे गोळे खात सावित्रीचं अस्वस्थ जिणं जगत, ‘रूपकंवर’च्या आक्रोशाच्या भेसूर अन पुण्यक्षेत्री घाटावरच्या बोडख्या तरूण-गलीतगात्रांच्या करूण चित्रात बंदिस्त, ती जगतेच आहे! डान्सबारच्या दरबारात पैशांचा पाऊस चिंब करतो रंभा-उर्वशीचा पौराणिक वारसा तेव्हा, घरा घरात जपली जाते सीता-अहिल्या चारित्र्यावरील संशयाची परंपरा! काहीच असतात पुरूषी सत्तेच्या अहंकाराला ठोकरणार्या इंदिरा-प्रतिभा.... तर काही बेडर विजिगिषू हिमालय आणि अवकाशाला गवसणी घालणार्या ‘बच्छिंद्री’ अन ‘कल्पना’, बाकी मात्र जगतात चूल-मूल आणि नात्यांचा फास गळ्याभोवती आवळलेल्या उदात्ततेच्या कोमात! इच्छा मरणही चॉईस नसलेल्या ‘अरूणा शानबाग’ होऊन! आता मात्र.... ती बाहेर पडते आहे... समूहाने पुरूषी अहंकाराचा उंबरठा ओलांडून! लढते आहे जिद्दीनं आणि क्षमतेनं जुन्या मळकट कॅनव्हासच्या बदलासाठी. रूढी परंपरांचं लोढणं झुगारून सन्मानानं जगण्यासाठी! रंगवू पहाते संपूर्ण स्पेस समता, स्वातंत्र्य, माणुसकीच्या आणि सन्मानाच्या रंगानी म्हणूनच.... उशीरा का होईना तिचा कॅनव्हास बदलू लागलाय होय.... तिच्या स्वप्नांचं इंद्रधनुष्य अपार कष्टांच्या तुषारांवरती हळू हळू उभरू लागलयं!
जीवाचं दान आई..... इवलीशी मी कळी गं उमलण्याआधीच तू खोडू नको तुझ्याच वेलीवरचं मी फूल सुगंधी फुलण्याआधीच तू तोडू नको आई..... मला जगात येऊ दे, श्वास घेऊ दे भूक लागताच आई मला तुझ्या अमृताचे दोन थेंब पिऊ दे त्रास मी नाही देणार तुला छकुली मला तुझी होऊ दे आई.... वंशाला हवा दिवा म्हणून पणतीला तू विझवू नको तुझाच मी गं गर्भ कोवळा अश्रूत मला तू भिजवू नको तो दीप कुलाचा असला तरी ज्योती घरची मला होऊ दे आई.... चार दिवस जातील तुच्या अंगणात नंतर चिमणी होऊन उडेन आकाशात मी एक; पण घरटी दोन मला जोडू दे आई, बहीण, पत्नी अशी नाती जपून तुझं ऋण गं मला फेडू दे जीवाचं दान मागते तुला शोभा घराची मला होऊ दे -श्रीकांत विनायक चंदनशिवे, पंढरपूर
चारोळ्या
एक होते सत्य साईबाबा भक्तांची गर्दी तोबा-तोबा! हवेमध्ये फिरवीत हात सोन्याची चेन येई हातात! पण टी.व्ही.कॅमेर्याने केला घात, हातचलाखीवर झाली मात!! ***
एक पुजारी कौल लावायचा भारी, कुणाला नोकरी, कुणाला छोकरी, कुणा कोर्टाची पायरी, कोणी आजारी! सर्वांचे प्रश्न देवाला टाकी, आणि एकटाच वसूल करी बाकी! ***
एक बाहुली काळी सुख नव्हते तिच्या भाळी, कोणी उलटी टांगे, कोणी टोची टाचण्या मागे! शेवटी बाहुली, फार कावली, म्हणाले, या अंधश्रद्धेतून तूच सोडव अंनिस माऊली!! ***
ज्योतिषांच्या सहाय्याने त्यांनी बांधली वास्तू तरीही प्रधानकी गेली! असता लोकमतांचा ठिसूळ पाया, काय करील, ज्योतिषांचा तथास्तु! ***
एक बाई अवसे पुनवेस, अंगात घेई! लग्ने जुळवी, पुत्र देई म्हणून भक्तांची उसळी घाई! पण बाई, स्वत: मात्र झाली नाही आई!! ***
एक मंगळ करी ज्योतिषांची चंगळ! आला पुढे तर लग्न अडे! दक्षिणा वाढवली तरच योग घडे!! ***
एक बुवा उठसूठ विरोधकांवर, मारायचे मूठ, पण ‘कारगीलला’ जा म्हणताच दैवी शक्तीत आली तूट!!
-अनिल चव्हाण, कोल्हापूर
बुद्धीवंत? बाजारात मेंदूंना बरे दिवस आले. बरेच बुद्धिवंत आता बुद्धीविके झाले. लाभदायी भोंदू स्वामी तसबीरीत आले, भिंतीवरचे शाहू, फुले कुठं बरं गेले? ***
पातिव्रत्य? पती आंधळा असला तर डोळ्यावर पट्टी बांधणे आलेच, पतीच्या अंधानुकरणाला ‘पातिव्रत्य’ म्हटले म्हणजे झाले. ***
विरोध? सरकारी कर्मचारी गोंधळात पडले, भ्रष्टाचारविरोधी ‘लसी’वरून, प्रश्न पडलाय, ती घेणार कशी? टेबलावरून की टेबलाच्या खालून? ***
श्रद्धा? श्रद्धावंतांचे असावे लागतात मुळात इरादे नेक, जातीय दंगली होतातच कशा, जर सबका मालिक एक
-प्रा.अनिल सोनार, धुळे
चंद्रावरच्या पाण्याचे माणसाला अप्रूप आहे पृथ्वीवर पाण्याची मात्र नासधूस खूप आहे ***
श्रद्धा-अंधश्रद्धेचा सुटत नाही गुंता श्रीमंत झाली देवस्थाने गरीब झाली जनता ***
पैसे डबल करून देतो म्हणताच एकच गर्दी सुटली पण मुदत भरण्याआधीच शाळा सुटली, पाटी फुटली. ***
कशाला चार पैशांसाठी उपसायची ढीगभर माती जर चार प्रश्नांची उत्तरं देऊन बनता येतं ‘करोडपती’ ***
ग्रहण अशुभ म्हणून काही दारं-खिडक्या लाऊन बसतात वैज्ञानिक पर्वणी सोडून अंधश्रद्धेच्या ग्रहणात फसतात ***
-आनंद देशमुख, शिरपूर, जि.धुळे.
वैज्ञानिक दृष्टिकोन हीच जीवन शैली ज्योतिष आणि बुवाबाजी पैसे भरण्याची थैली ***