Categories
संपादकीय

लहान मानवाचा महान पराक्रम

सप्टेंबर - २०१२

एडिंग्टन वा वैज्ञानिकाने मानव म्हणजे सागरातील जहाजाच्या तळाला ठेवलेल्या बटाट्यातील किडा असं म्हटले. विश्वाचे आकलन म्हणजे या किड्याने समुद्राचा अर्थ लावण्यासारखे आहे. पण माणसांनी हा महान पराक्रम केला हे वास्तव आहे.

            चालू वर्षात(2011-2012) या पराक्रमाच्या दोन घटना विज्ञानाच्या क्षेत्रात यशस्वी झाल्या. त्यातील पहिली घटना म्हणजे जिनिव्हाजवळ सर्नने घेतलेला बोसॉन कणाचा शोध. महास्फोटाच्या सुरवातीला नेमके काय घडले, स्फोटातून मुक्त झालेल्या उर्जेचे प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन या कणात कसे रूपांतर झाले असावे या विषयीचा हा प्रयोग होता. दुसरी घटना म्हणजे नासाने मंगळावर उतरवलेली क्युरिऑसिटी ही बग्गी.

            57 कोटी किलोमीटरचा प्रवास करून 26 नोव्हेंबर 2011 ला प्रवासाला निघालेली ही बग्गी दि.6 ऑगस्ट 2012 रोजी सकाळी 11 वाजता मंगळावर सुखरूप उतरली. अत्यंत साहसपूर्ण अशी ही मोहीम मंगळाबाबतच्या अनमोल माहितीचा खजिना नासांकडे पाठविणार आहे.

            बोसॉन ते मंगळ ही शोधमोहीम राबवून वैज्ञानिकांना काय मिळवायचे आहे? मंगळावर वस्ती करावयाची, तिथल्या खनिजाचा शोध घ्यावयाचा? तेथे पूर्वी जीवसृष्टी होती का हे माहीत करून घ्यावयाचे? हे संशोधन करण्यास खगोल शास्त्रज्ञ उत्सुक आहेत. पण मला या मोहिमेचे कौतुक दुसर्‍याच कारणासाठी करावेसे वाटते. ते कारण म्हणजे माणसांची ज्ञानवृद्धीसाठीची अखंड जिज्ञासा. मंगळावरील बग्गीला क्युरिऑसिटी म्हणजे कुतुहल हे नाव सार्थच आहे.

            नासाच्या मंगळावरील स्वारीची घटना वाचली आणि मला अर्नेस्ट हेंमिग्वे या नोबेल पारितोषिक विजेच्या साहित्यिकाची ‘दि ओल्डमॅन अ‍ॅण्ड दि सी’ ही लघु कादंबरी आठवली. या कादंबरीत आपल्या होडीच्या दुप्पट आकाराचा प्रचंड मासा गळाला लावून त्याच्याबरोबर झालेल्या संघर्षाचे वर्णन आहे. तीन दिवस व तीन रात्री कोळी आणि मासा परस्परांना ओढत असतात. यावेळी तो कोळी माशाला उद्देशून उद्गारतो, ‘अरे माशा, कोण कुणाला जिंकेल? जिंकणे राहू दे बाजूला. पण एक लक्षात ठेव. जिंकणे किंवा हार महत्वाचे नाही. महत्वाचे आहे तुझ्याबरोबरचा संघर्ष!’

            गॅलिलिओने 1609 साली चंद्रावर दुर्बीण रोखली तेव्हापासून आजतागाईत वैज्ञानिकांचा विश्वात साहसी सफर करण्याचा पराक्रम चालू आहे. त्यात अनेक मोहिमा अयशस्वी झाल्या. काही अंतराळवीरांना आपला जीव गमवावा लागला. पण मानवाचे विश्वसंचारासाठीचे संघटीत अभियान थांबलेले नाही. हे विश्व केवढे आहे. या भव्य विश्वाचे स्वरूप काय? तसेच सूक्ष्म विश्वात काय लपलंय याचा अखंड शोध माणूस घेतो आहे.

            मंगळावरील मोहिमेतून शास्त्रज्ञांना कदाचीत तेथील जीवसृष्टीबद्दल माहिती मिळणारही नाही पण एक गोष्ट मात्र नक्की. भूतकाळातील अशा मोहिमामधून मंगळाबद्दल विविध प्रकारची इतर मौलिक माहिती मिळत गेली आहे. त्याचा आकार, त्याचा पृष्ठभाग व त्याची गती, तो लाल का दिसतो? इत्यादी.

            या माहितीतून एक बाब पुरेशी स्पष्ट झाली आहे. मंगळ हा पृथ्वीसारखाच दगडमातीचा गोळा आहे. त्याला भावना नाहीत. तो काहींच्या कुंडलीत ठाण मांडून बसत नाही. मंगळाचे वैज्ञानिक ज्ञान, कुंडली मांडणार्‍या ज्योतिषांना इशारा देतंय- “बाबांनो, तुमचा अडाणीपणा सोडा व तरूण तरूणींना कडक मंगळाची भीती घालून आपली पोटं भरू नका.’

            मुलाला मंगळ असेल त्याची शांती करून त्याला कोणत्याही मुलीशी विवाह करता येतो. पण मुलीला मंगळ असेल तर मंगळ्या मुलाशीच लग्न करावे लागते. मंगळ्या मिळत नाही म्हणून कित्येक मुलींना विवाहापासून वंचित ठेवणारे ज्योतिषी स्त्रीवर्गाचे गुन्हेगार होत.

            खगोल संशोधनाचा प्रसार भारतात सर्वसामान्य माणसापर्यंत वेगाने झाला पाहिजे तरच मंगळ्या मुलगा व मंगळी मुलगी अशा खुळचट कल्पनांपासून लोक मुक्त होतील. इतर काही लाभ, अशा संशोधनातून होवोत अगर न होवोत पण अंधश्रद्धेची कवचे गळून पडली तरी बरेच काही चांगले समाजात घडेल.