कोल्हाटी-डोंबारी ही एक भटकी जमात आहे. कोल्हाटी-डोंबारी समाजातील लोक पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांत वास्तव्य करून आहेत. यांची साधारणपणे लोकसंख्या 30 ते 35 हजार इतकी आहे. अन्य भटक्या जमातीप्रमाणे या समाजातही ‘जात पंचायत’ चालवली जात होती. या जात पंचायतीला त्यांच्या लोकभाषेत ‘बारा’ असे म्हटले जाते. या ‘बारा’(जात पंचायती) चे काम पाटील, पंच व गुरव या पंचामार्फत चालवले जात होते. या जातीमध्ये अनेक ‘बारा’(जात पंचायत) चालवल्या जात होत्या परंतु इस्लामपूरची ‘बारा’(जात पंचायत) अतिशय महत्वाची होती. कारण या जात पंचायती अंतर्गत 80 टक्केच्या आसपास समाज येत होता.
समाजातील मुलांमुलींचे विवाह ठरवणे किंवा विवाहास मान्यता देणे, ज्या मुलांमुलींनी आंतरजातीय विवाह केले असतील त्यांना समाजातून ‘बहिष्कृत’ करणे. त्यांचे जिवंतपणी श्राद्ध घालणे, पंचाच्या हुकुमाचे पालन न करणार्यास वाळीत टाकणे, पुर्नविवाहास विरोध करून परित्यक्ता किंवा विधवा स्त्रियांना त्यांच्या मर्जीविरूद्ध देह विक्रयाचा व्यवसाय करणेस भाग पाडणे, स्त्रीने तसे करण्यास विरोध केल्यास तिची नाचक्की व बदनामी करणे अशा प्रकारचे जात पंचायतीमार्फत न्याय निवाड्याच्या गोंडस नावाखाली उद्योग केले जात होते.
याच समाजातील सुशिक्षित तरूणांनी समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून खपलर्श्रीीळेप नावाची एक संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न चालवला होता. त्याचाच एक भाग म्हणून इस्लामपूर येथे एका मेळाव्याचे आयोजन केले होते. ‘शिक्षण विषयक जागृती’ हा मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.सतीश चौगुले व चंद्रकांत कांबळे या अंनिसच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित केले होते. त्यावेळी आम्ही मुद्दामच जात पंचायतीच्या विरोधात तरूणांना आवाज उठवण्याचे आव्हान केले होते. त्याचाच परिणाम म्हणून आष्टा येथे जातपंचायती विरोधात 23 मे 2014 रोजी मेळाव्याचे आयोजन रमेश व रवी मोरे या तरूणांनी केले. मेळाव्याला समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी डावळकर, लाला पाटणकर तसेच आष्टा येथील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, अॅड.राहुल माळी उपस्थित होते. तसेच अंनिसच्या वतीने प्रा.सतीश चौगुले हेही उपस्थित होते.
जात पंचायतीच्या विरोधात मेळावा घेतला म्हणून रमेश मोरे, रवी मोरे, प्रकाश मोरे यांना व त्यांच्या कुटुंबियांना इस्लामपूर येथील जातपंचायतीने वाळीत टाकले. त्यानंतर वाळीतून समाजात घेण्यासाठी रूपये 50 हजार दंडाची मागणी केली. घाबरून समाजातील लोकांनी या दंडापैकी काही रक्कम जातपंचायतीला दिली. त्यावेळी ही घटना अंनिसच्या कार्यकर्त्यांना समजली त्यांनी बहिष्कृत कुटुंबांना आधार दिला. पुढे 30 मे 2014 रोजी पोलीस उपअधिक्षक, इस्लामपूर यांच्याकडे या संदर्भात तक्रार दाखल केली. सांगली येथे पोलीस अधिक्षकांनाही निवेदन देण्यात आले. सामाजिक दबाव वाढल्याने जातपंचायतीच्या पंचावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली.
जात पंचायतीचे पाटील पंच हे मुजोर वृत्तीचे होते. जामीनावर सुटताच त्यांनी पुन्हा जात पंचायतीमार्फत आपले कारनामे सुरू केले. आष्टा येथील एका महिलेच्या अल्पवयीन मुलीचा इस्लामपूर येथील व्यसनाधिन असणार्या तरूणाशी विवाह करण्याचा हुकूम दिला त्यावेळी संबंधित महिलेवर बलात्काराचाच प्रयत्न केला. समाजातील लोकांच्यात आता चांगलीच जागृती होऊ लागली होती. संबंधित घटनेसंदर्भात आष्टा येथील कोल्हाटी-डोंबारी समाजातील स्त्रियांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून गुन्हा नोंद करण्यासाठी दबाव आणला. त्याचवेळी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुख यांना संबंधित घटनेसंदर्भात निवेदन देण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले. त्यावेळी राजकीय क्षेत्रातील लोकांनीही मोर्चात सहभाग घेतला आणि त्यानंतर जात पंचायतीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला.
अशा पद्धतीने जात पंचायतीच्या विरोधात तक्रारी दाखल करण्याचे बळ लोकांच्यात येऊ लागले होते. अनेकजण तक्रारी दाखल करण्यास पुढे येऊ लागले होते. त्याचवेळी जाचपंचायतीचे पाटीलपंच आणि त्यांचे पाठीराखे असणार्या राजकीय मंडळींचे धाबे दणाणू लागले होते.
अखेर अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्या पुढाकाराने 24 डिसेंबर 2014 रोजी एका बैठकीचे पोलीस ठाण्यात आयोजन करण्यात आले. जात पंचायतीच्या वतीने पाटील दिलीप जावळे व निवास लाखे हे पंच उपस्थित होते. तक्रारदार रमेश मोरे, माजी आमदार विलासराव शिंदे, माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, वैभवराव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष विजय मोरे, नगराध्यक्ष सुभाष सुर्यवंशी, अॅड. राहुल माळी तर अंनिसच्या वतीने प्रा.सतीश चौगुले, अॅड. अमित शिंदे, अवधूत कांबळे, अंकुश चव्हाण, संजय बनसोडे इ. उपस्थित होते.
सुरवातीला चर्चेत आपण जात पंचायत चालवत नाही असे जात पंचायतीचे पाटील दिलीप जावळे ठामपणे सांगत होते. संघटनेचे कार्यकर्ते, राजकीय नेते, पोलीस अधिकारी, त्यांच्या आक्रमक भूमिकेने जात पंचायतीच्या पंचांना नमते घ्यावे लागले. इतकेच नाही तर सर्वांसमोर आपण इथून पुढे जात पंचायत चालवणार नसल्याचे लिहून द्यावे लागले. त्यानंतर पोलीस स्टेशनच्या परिसरात जमलेल्या शेकडो नागरिकांच्या व मीडियाच्या समोर जात पंचायतीच्या पंचांनी इथूनपुढे जात पंचायत बंद केल्याचे जाहीर केले.
कोल्हाटी डोंबारी समाजाचे लोक ज्या-ज्या गावात रहात होते त्या-त्या गावात ही बातमी समजली. त्यानंतर कराड, औंध सारख्या अनेक गावात फटाके वाजवून या घटनेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कोल्हाटी-डोंबारी समाजातील अनेक व्यक्तींनी प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करून जात पंचायत बंद करण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल अंनिसचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले, अभिनंदन केले.
– प्रा. सतिश चौगुले, इस्लामपूर
लेखक संपर्क : 9421218658