Categories
अनिष्ट रुढी - परंपरा

मडे स्नान : ब्राह्मणांच्या उष्ट्यावरून दलितांनी लोळण्याची प्रथा

फेब्रुवारी – २०१२

            अत्याधुनिक आय.टी.शास्त्राचे केंद्र मानले जाणारे राज्य अशी कर्नाटक राज्याची ओळख आहे. पण तिथेच ‘पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण आम्ही चालू देणार नाही’ अशा गर्जना करत पब्मध्ये जाणार्‍या युवतींना ठोकून काढणार्‍या संघटनाही आहेत, हे आपल्याला ठाऊक आहेच. पण याच कर्नाटकात हीच मंडळी हिंदू धर्मातील अनिष्ट आणि अन्यायी प्रथाविरूद्ध मात्र आवाज काढत नाहीत, उलट त्या तशाच चालू रहाव्या म्हणून आग्रह धरत असतात, याचे एक वाईट उदाहरण नुकतेच समोर आले आहे.

            दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कुक्के सुब्रह्मण्यम् मंदिरात चंपाषष्ठीच्या दिवशी ब्राह्मणांनी जेवून थुंकलेल्या उष्ट्यावर दलित समाजातील काही लोक उघड्या अंगाने लोळण घेत असतात. असे केल्याने आपले कल्याण होईल अशी त्यांची समजूत असते. ही देवता 9 तोंडाचा नाग अशा स्वरूपात असते, आणि ती 4000 वर्षे पुराणी आहे असे सांगतात. संतती प्राप्तीसाठी केल्या जाणार्‍या नारायण नागबळीची ही प्रमुख देवता आहे आणि ऐश्वर्या बच्चन, सचिन तेंडुलकर असे रथी महारथी या देवतेचे भक्त आहेत.

            या अपमानास्पद प्रथेवर कायद्याने बंदी घालावी अशी काही सुधारणावादी संघटनांची मागणी आहे. कर्नाटकात सध्या भाजपाचे शासन आहे. ए.नारायणस्वामी हे सामाजिक स्वास्थ्य मंत्री स्वत: दलित असल्यामुळे त्यांचा या प्रथेला कडवा विरोध आहे. ते म्हणतात, “भले ब्राह्मण जरी या उष्ट्यावर लोळत असले तरी ही घृणास्पद आणि अशास्त्रीय प्रथा बंद व्हायलाच हवी.” व्ही.एस.आचार्य हे ब्राह्मण मंत्री मात्र अशा बंदीच्या विरोधी आहेत. ते म्हणतात, “उगीचच या प्रथेला दलित विरोधी स्वरूप दिले आहे. ब्राह्मणसुद्धा नवस फेडण्याकरता यात सहभागी होतात. शेकडो वर्षे चालत आलेली ही लोकांची श्रद्धा आहे. इथे लोळा अशी कोणावर सक्ती नसते. तेव्हा शासनाने यात लुडबुड करायचे कारणच नाही.” अनेक हिंदुवादी, ब्राह्मण संघटना यांचा तसेच संघ परिवाराचा त्यांना पाठींबा आहे.

            या वर्षी अनेक साहित्यिक आणि चळवळकर्त्यांनी मागणी केल्यामुळे या विभागाचे उपविभागीय अधिकारी चेन्नप्पा गौडा यांनी या प्रथेवर बंदी जारी केली. लगोलग संघ परिवार, काही सनातनी संस्था आणि यात हितसंबंध गुंतलेले काही दलित यांनी दबाव आणून ही बंदी मागे घ्यायला लावली.

            प्रथा पार पडली. या प्रथेविरूद्ध निदर्शन करणार्‍या शिवराम नावाच्या म्हैसूरच्या सुधारकाला बदडून काढण्यात आले. धर्मस्थळ प्रमुख हेगडे आणि पेजावर मठाचे विश्वेश तीर्थ यांनी या प्रथेत काहीही आक्षेपार्ह नसल्याचा निर्वाळा दिला.

            के.जयराम आचार्य हे फलज्योतिषी या प्रथेचे खंदे पुरस्कर्ते आहेत. ते तर याही पुढे जाऊन बजावतात की, “इथे जेवणारे ब्राह्मण साक्षात सुब्रह्मण्यम् देवाचे प्रतिनिधी असतात. त्यांचे उष्टे म्हणजे देवाचेच उष्टे. मी स्वत: 16 वर्षांचा असताना इथे लोळलेलो आहे, आणि त्यामुळे माझा त्वचारोग बरा झाला. साक्षात श्रीकृष्णाचा मुलगा सांब, त्याला महारोग झाला होता तो इथे ब्राह्मणांच्या उष्ट्यावर लोळल्याने बरा झाला असे स्कंद पुराण सांगते. इथे सगळ्या जातींचे लोक भाग घेतात. असे केल्याने आपल्या समस्या दूर होतील अशी त्यांची श्रद्धा असते. हा मानसोपचाराचा प्रकार आहे. आयुर्वेदात या प्रकाराचे मूळ सापडते. उगीच याला जातीय स्वरूप देऊ नका आणि काही वैज्ञानिक पुरावा असल्याशिवाय बंदीची भाषा करू नका.”

            काही अन्य जातीचे लोक या कर्मकांडात भाग घेतात हे खरे आहे, पण अन्य काही मध्यम जातवाले आपल्या वतीने पैसे देऊन दलितांना इथे भाग घ्यायला पाठवतात. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि सुधारक के.वाय.नारायणस्वामी यांचा या प्रथेला कडाडून विरोध आहे. ते म्हणतात, “वाद आणि चर्चा कसली करता? माणसाच्या स्वाभिमानाला हा कलंक आहे. यावर बंदी घातलीच पाहिजे.”

            मुख्यमंत्री गौडा यांना आपल्या मंत्रीमंडळातील या मतभेदांना तोंड द्यावे लागत आहे. पण ते धूर्तपणाने दोन्ही डगरीवर पाय ठेवून आहेत. ते म्हणतात, “मी स्वत: या प्रथेवर बंदी घालावी या मताचा आहे. पण आधी अनेक लोकांची या विषयात खात्री पटवावी लागेल; त्यामुळे या सगळ्याला वेळ लागणार.” धर्मावर आधारित अनिष्ट प्रथा दूर करायचे म्हटले की सनातन्यांचा “तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे हो, पण आधी लोकांची समजूत घालावी लागेल, मग कायदा काय केव्हाही करता येईल.” हा युक्तिवाद आपण असंख्य वेळा ऐकला आहे, होय ना?

– डॉ. शरद अभ्यंकर