प्रति,
मा.डॉ.मनमोहनसिंग पंतप्रधान महोदय
भारत सरकार नवी दिल्ली यांचे सेवेत.
विषय : मद्यनिर्मिती व विक्री धोरणाचा फेरविचार – आवाहन
महोदय,
वरील प्रकरणी आपल्या निदर्शनास आणून देण्यात दु:ख वाटते की, केवळ शासनाला मिळणार्या महसुलासाठी शासनाने देशभर दारू निर्मिती व दारू विक्रीच्या धंद्याला प्रोत्साहन दिलेले आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू निर्मिती व विक्री होत आहे. त्याचाच दुष्परिणाम म्हणून देशातील अनेक राज्यांमध्ये दारू पिणार्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांसह देशाचे उद्याचे आधारस्तंभ असणारे तरूण तरूणी देखील दारूच्या व्यसनाच्या सापळ्यात अडकत चालली आहेत. एवढेच काय पण शाळकरी अल्पवयीन मुले मुली देखील दारूच्या व्यसनाच्या सापळ्यात अडकत चालली आहेत. अगदी गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील पुण्यामध्ये जवळ जवळ 800 अल्पवयीन मुले मुली एका गोपनीय पार्टीमध्ये दारू प्राशन करून मोठ्या आवाजांतील गाण्यांवर मद्यधुंंद अवस्थेत नाचत होती. पोलिसांनी छापा टाकून अटकही केली. शिवाय गेल्या 1-2 वर्षांत महाराष्ट्रात बेकायदेशीर व गुप्तपणे आयोजित केलेल्या रेव्ह पार्ट्या उघडकीस आल्या आहेत. त्यातील तरूण तरूणी तोटक्या कपड्यावर व दारू प्राशन करून डॉल्बीच्या आवाजातील गाण्यावर नाचताना पोलिसांनी त्यांवर छापे टाकून कार्यवाही केलेली आहे.
या शिवाय दारूच्या व्यसनामुळे महाराष्ट्रात व देशातील इतर राज्यांमध्ये दररोज हजारो व्यक्ती निरनिराळ्या प्रकाराने मृत्यूमुखी पडत आहेत. त्यांची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे.
दारू पिण्यास पैसे न दिल्याने अथवा दारू पिण्यास अडथळा केल्यामुळे कित्येक व्यक्तींनी त्यांची पत्नी, मुलगा अथवा मित्रांचे खून केलेले आहेत. तर व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळून हजारो महिलांनी अनेक मार्गाने आत्महत्या केलेल्या आहेत. तर अतिमद्य सेवनाने व्यसनी व्यक्तींचे मृत्यू झाल्याची हजारो उदाहरणे घडलेली आहेत. तर व्यसनी व्यक्तींनी दारूच्या नशेत अनेक मार्गाने आत्महत्या केलेल्या हजारो घटना घडलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर बेकायदेशीर मार्गाने सुरू असणार्या दारू दुकानांतील विषारी दारू प्राशन केल्यामुळे एकाचवेळी पाच दहा नव्हे तर शेकडो माणसे मृत्यूमुखी पडल्याच्या घटना महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पंजाब, गुजरात, पश्चिम बंगाल, बिहार इ. राज्यात घडलेल्या आहेत.
विशेष दु:खाची गोष्ट म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सर्व काँग्रेसजनांना व देश बांधवांना दारूबंदीचा अमूल्य संदेश दिला. महसूल वाढविण्याच्या हव्यासापोटी महात्मा गांधींचा दारूबंदीचा अमूल्य संदेशही केंद्रशासनाने व बहुसंख्य राज्यसरकारे पायदळी तुडवीत आहेत. महात्मा गांधींच्या वास्तव्याने पवित्र झालेला महाराष्ट्रातील वर्धा जिल्हा हळूहळू दारूच्या विळख्यात अडकत चालला आहे. महात्मा गांधींच्या दारूबंदीच्या संदेशाचे पावित्र्य राखायचे भानदेखील महाराष्ट्र शासनाला राहिलेले नाही. तसेच गुजरात राज्य महात्मा गांधींची जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून देशाला परिचित आहे. तेथेही गुजरात सरकारने दारूबंदीचा अवलंब केलेला आहे. त्या गुजरात राज्यांमध्येही विषारी दारूच्या सेवनाने एकाच वेळी अनेकांचे बळी गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
माझ्या खालील मागण्या
पंतप्रधान महोदय,
1) दारूमुळे मृत्यूमुखी पडणार्या हजारो नागरिकांचा विचार करून व महात्मा गांधींचा दारूबंदीचा संदेश व कार्याची आठवण ठेवून आपण 2 ऑक्टोंबर 2012 च्या गांधी जयंतीपूर्वी दारूनिर्मिती व विक्री हळूहळू कमी करण्याचा निर्णय घ्यावा.
2) अन्यथा त्याबाबत आपले काय मत आहे ते येत्या गांधी जयंती पर्यंत मला कळवावे.
3) देशात दारूसेवनामुळे दररोज मृत्यूमुखी पडणार्या हजारो नागरिकांच्या वतीने भारत सरकार विरूद्ध योग्य वेळी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल याची आपण नोंद घ्यावी.
कळावे
आपला विश्वासू
एस.के.शिंदे(समाजसेवक व अं.नि.स.कार्यकर्ता)
मंगळवार पेठ, परांडा, जि.उस्मानाबाद(महाराष्ट्र)
या निवेदनाच्या प्रती – मा.सरन्यायाधिश व न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय नवी दिल्ली तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. व दारूबंदी धोरणाबाबत फेरविचार न केल्यास महाराष्ट्र शासनाच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल असे जाहीर केले आहे.