महाराष्ट्र अंनिसच्या राज्यव्यापी धरण्याच्या निमित्ताने काही महत्वाच्या विषयावर विविध मंत्री महोदयांशी अविनाश पाटील, नरेंद्र दाभोलकर, माधव बावगे व संजय बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. ती संक्षिप्त पुढीलप्रमाणे –
विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सुरू असलेल्या अनेक मालिका, जाहिराती स्पेशल रिपोर्ट अंधश्रद्धा समर्थन करणार्या आहेत. त्यांच्यामुळे नकारात्मक व भयग्रस्त मानसिकता असणारे समाजमन तयार होते आणि लहानमोठ्यांवर चुकीचे संस्कार होतात. उपलब्ध केबल, व टी.व्ही. अॅक्ट 1995 प्रमाणे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी याबाबत संबंधितांवर खटले दाखल करावेत या शिष्टमंडळाच्या मागणीला ना.आर.आर.पाटील यांनी सहमती दाखविली. समिती अशा विविध वाहिन्यांवरील मालिका, जाहिराती आणि स्पेशल रिपोर्ट त्यातील अंधश्रद्धा वाढविण्याच्या सादरीकरणाच्या चित्रफिती संबंधित अधिकार्यांना सादर करणार आहेत.
वारसा समाजसुधारकांचा हे प्रबोधनाचे महाअभियान समितीने संपूर्ण राज्यभर वर्षभर चालिवले. त्यातील विचार मंथनातून वारसा समाजसुधारकांचा-शैक्षणिक सनद करण्यात आली आहे. ही सनद शिक्षणमंत्री ना.राजेंद्र दर्डांना शिष्ट मंडळाने सादर केली आहे. त्यावर मी स्वत: या विचारांचा आहे त्यामुळे सनदेची कार्यवाही बाबत अधिवेशनाच्या नंतर समितीशी सविस्तर चर्चा करून शिक्षक व विद्यार्थी यांना प्रशिक्षित करण्यासाठीचे नियोजन करायची माझी तयारी आहे असे स्पष्ट मनोगत ना.दर्डांनी शिष्टमंडळाशी व्यक्त केले.
आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासीमधील अंधश्रद्धांचे सर्वेक्षण करणे, त्याबाबत आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांना वैज्ञानिक जाणिवांचे प्रशिक्षित देणे आणि आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अॅनिमेटेड फिल्म निर्मिती करणे, त्याबाबत आदिवासी विकास मंत्री ना.बबनराव पाचपुते यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा झाली. अधिवेशन संपताच यांच्या कार्यवाहीसाठी सविस्तर नियोजन बैठक घेण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाबाबत न्यायालयीन आदेश पर्यावरण मंत्री ना.संजय देवतळे यांच्यासमोर मांडण्यात आले. गणेशमूर्ती रंगविण्यासाठी विषारी रासायनिक रंगाचा वापर कटाक्षाने बंद करावा अशी न्यायालयाची सूचना मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणली. सर्वच सण धर्मभावनेचा आदर राखूनही पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरे करण्याच्या समितीच्या मोहिमेची माहिती मंत्रीमहोदयांसमोर मांडण्यात आली. या प्रयत्नांना प्रशासकीय बळ देण्याचे ना.देवतळे यांनी मान्य केले.