Categories
अभिवादन

महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

एप्रिल - २०१३

            महर्षी’ हा शब्द उच्चारला की, डोळ्यासमोर साधूपुरूषाची धीरगंभीर आकृती तयार होते. ‘महर्षी’ या विशेषणाचा सन्मान महाराष्ट्रात लागला तो विठ्ठल रामजी शिंदे या थोर समाजसुधारकाला. महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा उघडण्यात फुले-शाहू-आंबेडकर या त्रयींचा सिंहाचा वाटा कबूल करावाच लागेल. त्याचबरोबर या सर्वांना सहाय्यभूत व पूरक कार्य करून ज्या महापुरूषांनी महाराष्ट्राची आजची ‘पुरोगामी’ ओळख बनवण्यात मोलाचा वाटा उचलला त्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचं नाव घ्यावं लागेल.

            भारत देशाच्या इतिहासात त्यातही महाराष्ट्राला घडवण्यात ज्यांनी आपले आयुष्य वेचले त्या महाराष्ट्राच्या मानकर्‍यांमध्ये काही खर्‍या-खुर्‍या यथार्थ मानकर्‍यांचा समावेश केला गेलेला नाही ही महाराष्ट्राच्या इतिहासाची शोकांतिका आहे. या शोकांतिकेच्या नायकांमध्ये अग्रक्रमाने ज्यांचा विचार करावा लागेल असा ‘महाराष्ट्र गौरव पुरूष’ म्हणजे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे होत. ज्या बहुजन समाजाच्या उत्कर्षासाठी, उन्नतीसाठी कर्मवीरांनी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या त्या समाजानेच त्या महान माणसाची उपेक्षा करावी, त्यांच्या विचार कार्याला अनुल्लेखाने दुर्लक्षित करावे हे त्या समाजाचेच बौद्धिक व नैतिक अध:पतन म्हणावे लागेल.

            23 एप्रिल 1873 रोजी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झाला त्याचवर्षी क्रांतिबा फुलेंनी बहुजन समाजजागृतीसाठी ‘सत्यशोधक समाज’ स्थापन केला होता. पुढे महात्मा फुलेंच्या विचारांशी ‘नाळ’ जुळली आणि त्यातूनच बहुजन समाज उन्नतीसाठी संघर्ष करण्याचा स्थायीभाव कर्मवीरांच्यात निर्माण झाला. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या ध्यासाने कर्मवीर आयुष्यभर कार्यरत राहिले. ‘बहुजन’ या शब्दाची विचार प्रवर्तक व्याख्या कर्मवीरांनी केली. “विद्याबळ, द्रव्यबळ आणि अधिकारबळ नसणारे सर्व जातीधर्मातील लोक म्हणजेच बहुजन होत.” जातीचा व वर्गाचा संयोग साधून, समन्वय राखून केलेली बहुजनांची ही व्याख्या कर्मवीरांच्या विचारांचे वेगळेपण दर्शवते. सर्व जातीधर्मातील शोषित व दुर्बल याबरोबरच ज्या सर्वांचे हितसंबंध समान ते सर्व बहुजन असं सांगून कर्मवीरांनी ‘बहुजन पक्ष’ स्थापन केला होता. बहुजन पक्षाचा जाहिरनामाही प्रसिद्ध केला होता.

            अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन करणे हे कर्मवीरांचे ध्येय होते. अस्पृश्यवर्गाची स्थिती सुधारणेसाठी 1906 साली इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. पुढे ऑक्टोबर 1906 मध्येच “डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया” ही संस्था स्थापन केली. अस्पृश्यांच्या सर्वांगीण सुधारणेसाठी अखिल भारतीय पातळीवर कार्य करणारी ही पहिलीच संस्था होय. अस्पृश्यवर्गीय स्त्री समाजासाठी ‘निराश्रीत सेवासदन’ ही संस्था त्यांनी स्थापन केली. या वर्गातील लोकांसाठी दवाखाना उघडला. राष्ट्रीय सभेने अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घ्यावा म्हणून 8 वर्षे सातत्याने प्रयत्न केला. कर्मवीरांच्या या अथक प्रयत्नांमुळेच डॉ. अ‍ॅनी बेझंट यांचे अध्यक्षतेखाली पुस्तकरूपाने अस्पृश्य वर्गाची स्थिती मांडली. ‘डिस्प्रेस्ड क्लासेस’ हा शब्दप्रयोग डॉ.आंबेडकरांच्या मनाला भावला व आपल्या पहिल्या वृत्तपत्राचे नावच त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ असे ठेवले.

            ‘मुरळी’ सोडण्याची प्रथा बंद व्हावी म्हणून 1907 मध्ये मुंबईत संस्था उभारली. ‘शिमगा’ या सणाच्या वेळचे बीभत्स प्रकार टाळणेसाठी नागपूरमध्ये सभा लावून व्याख्यान दिले. मुलांप्रमाणे मुलींनाही सक्तीचे मोफत शिक्षण मिळावे म्हणून लोकमान्य टिळकांच्या विरोधात जाऊन चळवळ केली. 1920 साली कायदे कौन्सिलची निवडणूक ‘जातीय तत्वाला विरोध’ म्हणून राखीव असणार्‍या मराठा समाजाच्या जागेवरून न लढता सर्वसाधारण मतदारसंघातून लढवली. शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करणेसाठी 1926 पासून शेतकरी परिषदांमधून अभ्यासपूर्ण भूमिका मांडली. 1928 च्या मुंबई इलाखा शेतकरी परिषदेत अध्यक्ष या नात्याने “सारावाढीचे बील हे सरकारचे जुलमी कृत्य आहे.”असं ठासून सांगितले. शेतकर्‍याच्या तोंडातून घास काढून होणारा जमीनदार अन् कामगारांची पिळवणूक करणारा मालक हे दोन्ही भांडवलदार असून शेतकरी-कामगार वर्गाचे प्रमुख शत्रू आहेत असं कर्मवीरांनी निक्षून सांगितले. महात्मा गांधीचे नेतृत्व मानून स्वातंत्र्यलढ्यात तुरूंगवास भोगला.

            एवढी अलौकिक कार्येकरूनही महाराष्ट्राने महर्षींची उपेक्षा का केली? महर्षींच्या हयातीतच ‘विद्वान’ म्हणून नावाजलेल्या लोकांनीही त्यांची उपेक्षा करावी हे खेदजनक आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये ‘फी’ मध्ये सवलत मिळावी म्हणून कर्मवीर, गोपाळ गणेश आगरकर यांचेकडे गेले असता बुद्धीप्रामाण्यवादी ‘सुधारकांनी’ फी मध्ये सवलत नाकारली. महर्षीची भगिनी जनाक्का परितक्त्या म्हणून जीवन जगत होत्या. त्यांच्या पुढील आयुष्याची सोय व्हावी म्हणून महर्षी, धोंडो केशव कर्वेयांच्याकडे गेले. माझ्या बहिणीला आश्रमात प्रवेश देता काय? अशी विचारणा केली. “ब्राम्हणेतरांच्या मुलींना आश्रमात प्रवेश देण्याचा हा काळ नाही.” असे स्पष्ट उत्तर ‘भारतरत्न’ धोंडो केशव कर्वेयांनी दिले. पुन्हा महर्षींनी आपल्या बहिणीसाठी पंडिता रमाबाई यांच्या संस्थेत विचारणा केली पण ‘पंडिता’ म्हणवणार्‍या रमाबाईंनी प्रवेश घेण्यासाठी ख्रिस्ती होण्याची अट सांगितली. अस्पृश्यांना मंदीर प्रवेशाचे श्रेय बर्‍याचदा साने गुरूजींच्या नावे नोंदले जाते. तथापी साने गुरूजींच्या पूर्वी कर्मवीरांनी सयाजीराव गायकवाडांच्या साहाय्याने अस्पृश्यांना मंदिर खुले करण्याचे कार्य केले होते. खाजगी जीवनात अस्पृश्यता पाळणारे व मुलींना शिक्षण नको म्हणणार्‍या लोकमान्य टिळकांना आणि अस्पृश्योद्धाराला तिसरा क्रमांक देणार्‍या महात्मा गांधींना कर्मवीरांनी खडे बोल सुनावले.

            एवढी उपेक्षा पदरी पडूनही बहुजन समाजाच्या उद्धाराचे हाती घेतलेले कार्य कर्मवीरांनी जीवनभर निष्ठेने केले. तरीही एवढे अफाट अन् असामान्य कार्य करणार्‍या विठ्ठल रामजी शिदेंच्या कार्याकडे बहुजन समाज पाठ का फिरवतो? महाराष्ट्राची कूपमंडूकवृत्ती व अनुल्लेखाने मारण्याचे तंत्र याला जबाबदार आहे. महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा प्रमुख मार्ग म्हणून ब्राम्हण, मराठे व अस्पृश्य यांच्या एकजुटीची आवश्यकता सांगणार्‍या कर्मवीरांच्या विचारांची आज सर्वाधिक ‘प्रस्तुतता’ आहे. कर्मवीरांची उपेक्षा बहुजन समाजाला परवडणारी नाही. ही उपेक्षा महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानंतर तरी किमान थांबावी कारण कर्मवीरांच्या विचारांचे लोण तळागाळापर्यंत पोहोचवण्याची तयारी करून भारताच्या नवनिर्माणात समाजाला सर्वांगीणदृष्ट्या कार्यरत करणे ही आज तातडीची गरज आहे. कर्मवीरांच्या विचारप्रसाराने भारतीय नागरिक विवेकी व जबाबदार बनून राष्ट्र उभारणीत आपला वाटा निश्चितपणे उचलतील. 2013 हे वर्ष विठ्ठल रामजी शिंदे यांचे 140 वे जयंती वर्ष. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या उपेक्षित मानकर्‍याची उपेक्षा थांबावी आणि त्याच्या पुरोगामी विचार-कार्याची ओळख व्हावी एवढीच अपेक्षा.

-उमेश सूर्यवंशी

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र साहित्य