Categories
व्यक्तिविशेष

महाराष्ट्रातील शोषितांचा आवाज : प्रा. एन. डी. पाटील

वार्षिकांक – २०१३

अनंत काणेकरांच्या एका निबंधात मानवी मनाच्या कमकुवतपणावर मार्मिक भाष्य केलंय. बुद्धीला पटतं पण मनाला कसंसंच वाटतं!तर्काला पटेल तेच करणार असं वागणारी मंडळी कमीच. महाराष्ट्र अंनिसचे अध्यक्ष एन.डी.पाटील यांची कणखर विवेकनिष्ठा हा आमचा अभिमान आहे. टीका व सहकार्‍यांची नाराजी यांनी विचलित न होता एन.डी.सरांनी शोषितांसाठी राजकीय चळवळी राबविल्या. त्याचबरोबर शोषितांच्या मानसिक गुलामीविरोधात डॉक्टर दाभोलकरांना त्यांनी मन:पूर्वक साथ दिली. एन.डी.सरांच्या कार्याचा गौरव करणे हे आमचे कर्तव्य आहे. या संदर्भातला त्यांचा जीवनकार्य परिचय वाचकांना प्रेरणा देईल.

प्रा. एन. डी. पाटील नेहमी म्हणतात, “महाराष्ट्रात दोनच खरे पाटील, एक कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांनी शिक्षणाची गंगा खेडोपाडी नेली आणि दुसरे क्रांतिसिंह नाना पाटील, ज्यांनी पत्रीसरकारच्या प्रतीसरकार लढ्यातून शेतकरी आणि कष्टकर्‍यांच्या राज्यासाठी प्राण पणाला लावले. बाकीचे आम्ही सगळे केवळ नावाचे पाटील.” खरे तर त्यांच्या अथक चाललेल्या लोक लढ्यांसाठी त्यांचाही समावेश या दोन पाटलांच्यामध्ये करावा लागेल.

इतिहास म्हणजे राजे रजवाडे, सम्राट, बादशहा, चक्रवर्ती राजे यांच्या पराक्रमाचा इतिहास ही आजपर्यंतची संकल्पना. लोकशाहीमध्ये अर्थहीन ठरते. कारण शेती कसून समाजाचे भरण पोषण करणारा, कारखान्यात राबून उपयुक्त माल तयार करणारा, देशाच्या सीमेवर खडा पहारा करणारा सैनिक, अंतर्गत संरक्षण करणारे पोलीस दल, पोस्ट ऑफीस, दळणवळण, वहातूक आणि समाजाची एकूणच धारणा आणि स्थैर्य निर्माण करणारा वर्ग हा श्रमिकांचा आणि कष्टकर्‍यांचा आहे. या श्रमिकांचा इतिहास हाच खरा इतिहास. लोक लढ्यांचा इतिहास आणि ते लढविणार्‍या लोकनायकांचा इतिहास ही लोकशाहीमधली इतिहासाची तर्कसंगत मांडणी होऊ शकते. या लढ्यांनी श्रमिकांना एकसंघ केले, बळ दिले, स्वत:च्या हक्कासाठी आणि अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी सामर्थ्य दिले.

ब्रिटीश गेले आणि देश स्वातंत्र्य झाला. काही विचारवंतांच्या मते हे स्वातंत्र्य नव्हते तर केवळ सत्तांतर होते. प्रा.एन.डी.पाटलांच्या मते स्वातंत्र्यानंतर झालेला बदल म्हणजे ‘पिर्‍या गेला आणि काळ्या आला’. बळी वंशाचे नाव सांगणार्‍या या शेतकर्‍याची आज सर्व बाजूंनी कोेंडी झालेली दिसते. सहानुभूतीशून्य राज्यकर्ते, मतलबी आणि लबाड मध्यस्थ, व्यापारी, मुजोर सहकार सम्राट आणि शिक्षणसम्राट गैरप्रकारांचे आगर असणार्‍या जिल्हा भू-विकास बँका, सहकारी बँका आणि पतसंस्था, बी-बियाणे, खते, जंतुनाशके विकणारे आजचे ‘कुर्‍हाडीचे दांडे’, पीक पाण्यासंदर्भातील नियोजन आणि अर्थकारणाचे अडाणीपण, नवा आर्थिक वसाहतवाद, जागतिकीकरण, सेझचे समर्थन करणारे आणि जागतिकीकरणाच्या आणि भांडवलदारांच्या कुशीतल्या उबेत, व्यक्तिगत संपत्तीच्या राशी रचणारे बहुसंख्य राज्यकर्ते, शेतकर्‍यांच्या एकीची वज्रमूठ शेणामेणाची करणारी, जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद, उच्चनीचता, जमिनीची विषम वाटणी, घोर अज्ञान, यांनी झापडबंद केलेली समाजव्यवस्था, यात भर म्हणून धर्माच्या पगड्यातून आलेली पूर्वकर्मे, संचित, पूर्वजन्म, पुन:र्जन्म, पुरोहित, मुल्ला मौलवी, ज्योतिष या संकल्पनात गुलाम झालेली मानसिकता, अनिश्चित पाऊसकाळ, भ्रामक भक्ती आणि मुक्तीमार्ग यात भरकटलेल्या शेतकर्‍यांतील नवशिक्षित तरूण वर्ग आणि या सगळ्यात रसातळाला जाणारा बळीचा वंश हे सर्व सामान्यांचे आजचे जग आहे. यातील बदल हे केवळ सामर्थ्यसंपन्न, करारी बांधिलकी मानणार्‍या नेत्याकडूनच होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर प्रा.एन.डी.पाटलांनी लढविलेल्या आणि यशस्वी केलेल्या सर्व लोक लढ्यांचा विचार करावा लागेल.

पासष्ट वर्षांच्या त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचा आलेख म्हणजे महिन्यातील सत्तावीस दिवस घराबाहेर, त्याच बिछान्यावर दुसर्‍या दिवशी झोपणे नाही, जिथे जे मिळेल ते पाणी पिण्याची सवय, बेळगाव जिल्ह्यापासून ते महाराष्ट्राच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत संचार, सततचे वाचन, जितके वाचन तितके चिंतन, तेवढेच बोलणेही. धरणे, मोर्चे, निदर्शने, उपोषणे, अधिकारी आणि मंत्र्यांना धारेवर धरणे हा त्यांचा नित्यक्रम. न्यायाची चाड, अन्यायाची चीड हे ब्रीद. पारदर्शी, प्रामाणिकपणा, भविष्याचा वेध घेणारे द्रष्टेपणा, कोणत्याही आव्हानाला यशस्वीपणे टक्कर देण्याचा आत्मविश्वास आणि यातून निर्माण झालेले त्यांचे स्वयंभू आणि विश्वसनीय नेतृत्व. शेतकरी आणि शेती धोक्यात असताना वयाच्या 82 वर्षांनंतरही प्राणांतिक उपोषण करत प्राण पणाला लावण्याची तयारी. शेतकर्‍यांच्या हिताशी द्रोह करणारा कोणीही सूर्याजी पिसाळ कितीही मोठा असो, त्यांच्या दाहक आणि घणाघाती टीकेचा आसूड अशा खोटेपणाच्या चिंध्या उडवणार. व्यक्तिगत आयुष्यात त्यांच्या मनात कुणाबद्दलच द्वेष नाही. सगळ्याच पुरोगामी चळवळींचा आधार आणि महाराष्ट्राच्या ‘विवेकाचा आवाज’ ही प्रा.एन.डी.पाटील यांची ओळख आहे.

शालेय वयात 1942 च्या क्रांतीच्या आणि महात्मा गांधींच्या प्रभावातून त्यांनी वडगावच्या दारूच्या दुकानावर पिकेटिंग केले आणि तुरूंगवास सोसला. ढवळी ते आष्टा ही माध्यमिक शाळेची वाटचाल करताना आठ मैलांची रपेट हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यांना भेटलेल्या दलित शिक्षक वेताळराव खैरमोडेनी त्यांना वाचनाची आवड लावली. स्वत:ला टी.बी.झालेले खैरमोडे नारायण या आपल्या लाडक्या विद्यार्थ्याकडून विचारवंतांची पुस्तके वाचून घेत असत. गावातला एक आड त्यांच्या कुटुंबाच्या मालकीचा होता तो सर्व गावाला पाणी पिण्यासाठी खुला. पण दलितांना स्वत: पाणी भरायला परवानगी नसे. त्यांना पाणी वरून वाढले जात असे. त्यांनी घरच्यांना सांगितले, मला हा भेदभाव चालणार नाही. आणि दुसर्‍या दिवसापासून आड सर्वांसाठी खुला झाला.

राजाराम कॉलेजला विद्यार्थी असताना डाव्या विचारांची बांधिलकी असणारी वृत्तपत्रे आपल्या हातात घेऊन ते चौकाचौकात विकत असत. त्यांना पदवी मिळाली त्या दरम्यान त्यांचे बंधू आणि वडील यांचे आकस्मिक निधन झाले. कर्मवीरांनी आई कृष्णाईला धीर दिला की, येथून पुढे नारायण यांची जबाबदारी मी घेत आहे. कर्मवीर या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

काही काळ एन.डी.पाटलांनी आष्ट्याच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम केले. तेथे अब्दुल गणी आत्तार हे प्राचार्य होते. गांधीजींच्या खुनानंतर देशपांडे या शाळेतील शिक्षकाचा वाडा जाळायला जेव्हा संतप्त जमाव जमला तेव्हा याच प्राचार्य आत्तारांनी देशपांडेंच्या वाड्यावरील चार कौले काढली, तेथे आढ्याला तिढी मारून बसले आणि जमावाला सांगितले हा वाडा जाळायचा असेल तर माझ्यासह जाळावा लागेल. अर्थातच जमाव परत फिरला. असे हे कर्मवीरांच्या धर्मनिरपेक्षतेचे तत्वज्ञान जगणारे प्राचार्य आत्तार.

एन.डीं.नी. विलिंग्डन कॉलेजमधून अर्थशास्त्रात एम.ए.केले. त्यानंतर सातार्‍यातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक, वसतीगृहाचे रेक्टर आणि लेबर स्किमचे प्रमुख झाले. त्यावेळी त्यांचे विद्यार्थी एवढे खडी फोडत की, जिल्हा परिषदेला खडी पुरविण्याचे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतले आणि पारही पाडले. अचानक शेतकरी कामगार पक्षाचे नेते दाजीबा देसाई त्यांना भेटले आणि या पक्षातील आघाडीचे नेते काँग्रेसवासी झाल्यामुळे एन.डी.नी प्राध्यापकाची नोकरी सोडून गिरणी कामगार संघटनेत काम करावे ही इच्छा त्यांनी प्रकट केली. दाजीबांचा शब्द प्रमाण मानून त्यांनी प्राध्यापकी सोडून मुंबईचा रस्ता धरला. त्यांच्या सातारच्या काळात त्यांना बॅ.पी.जी.पाटलांसारखा एक सच्चा मित्र मिळाला. या दोघांनीही एकमेकांची पाठराखण आयुष्यभर केली. प्रा.एन.डी.पाटलांनी कष्टकर्‍यांच्या, कामगारांच्या चळवळीत काम करण्यास अग्रक्रम दिला. युनियचा पदाधिकारी म्हणून त्यांचे काम खडतर होते. मानधन अत्यल्प होते. त्यातून प्रवासखर्चही भागत नसे. त्यामुळे सकाळी पोटासाठी मिसळपाव खाणे आणि संध्याकाळी मिळाले तर अन्न नाहीतर पोटभर पाणी पिऊन झोपणे हा त्यांचा नित्यक्रम होता. परिस्थितीच्या धगीत त्यांच्या ध्येयवादाची, बांधिलकीची आणि निष्ठेची कसोटी लागली होती. पण ही भूमिका ते सर्वस्व पणाला लावून जगले. कामगारांचे संघटन, गेट मीटिंग, विविध गिरण्यांत भ्रमंती, कामगारांचे शंका निरसन आणि कामगारांच्या, श्रमिकांच्या शक्तीची वज्रमूठ बांधणे हे त्यांचे काम होते. 1957 मध्ये मुंबई गिरणी कामगार संघटनेचे ते सरचिटणीस होते.

त्यांनी एकूण 13 पुस्तिका लिहिल्या. महागाई, ग्राहकाची ससेहोलपट, शेतजमिनीवरील कमाल मर्यादा कायदा, समाज विकास योजनेतील अपयश, शिक्षण बहुजनांच्यासाठी आहे का? नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे चरित्र, पूर्व जर्मनीतील त्यांचे अनुभव आणि शेतीमालाची किफायतशीर किंमत या विविध विषयांवर पुस्तिका लिहिलेल्या आहेत. पहिली पुस्तिका 1962 मध्ये तर शेवटची पुस्तिका 2001 मध्ये लिहिली. शेतीमालाच्या किफायतशीर किंमतीची कैफियत ही त्यांची शेतकर्‍यांचा कैवार घेणारी आणि शेतीमालाला न्याय देणारी महाराष्ट्रातील कदाचित पहिली पुस्तिका. ही कैफियत शेतकर्‍यांच्या स्वयंपूर्णतेचा जाहिरनामा आहे. 1948 या शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापना दिनापासूनच पक्षाने शेतीमालाच्या किफायतशीर किंमतीचा प्रश्न धसाला लावलेला आहे.

या पुस्तिकेत शेतीमालाचे भाव निश्चित करताना वर्षाच्या कामाची वेतन हमी, प्रत्यक्ष कामाचे दिवस, बैलांची वर्षभराची वैरण, रोजंदारी गडी, वीज, पाणी, बियाणे, खते, जंतुनाशके, अवजारे, कर्ज व व्याज तसेच वाहतूक खर्च यासहित किफायतशीर किंमतीचे तर्कसंगत वास्तव आणि शास्त्रशुद्ध विचार मांडलेला आहे. यानुसार किफायतशीर किंमती दिल्या तर शेतकर्‍याला नादान करणारे कर्जमाफीचे दान करण्याची गरज नाही आणि त्याचा कणा ताठ ठेवणे शक्य आहे. ही प्रा.एन.डी.पाटील यांची मांडणी आहे.

यानंतर ‘शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी?’ ही पुस्तिका. बहुजनांच्या शिक्षणात येणारा अडथळा धुडकावून लावण्याचा केलेला भगिरथ प्रयत्न म्हणजे ही पुस्तिका. कंसाने मुले जन्माला आल्यानंतर मारली होती पण शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांची श्वेतपत्रिका खेड्यापाड्यातील ‘सुशिक्षित’ जन्माला येण्यापूर्वीच त्यांना गर्भावस्थेत ठार करणारी होती. नोकर्‍या नाहीत तर सुशिक्षित निर्माण करणेच बंद करायचे अघोरी कारस्थान होते.

खरे तर ही श्वेतपत्रिका मनुस्मृतीची गोंडस रूपात मांडलेली नवी आवृत्ती होती. ठराविक शाळांचे विद्यार्थी ‘नवे अस्पृश्य’ ठरणार होते. या ग्रामीण शाळांमध्ये आठवीपूर्वी इंग्रजी सक्तीचा विषय राहणार नव्हता आणि 10 वी नंतरही तो सक्तीचा विषय राहणार नव्हता. तीच अवस्था गणित आणि विज्ञानाची.

भल्या भल्या विचारवंतांच्या, शिक्षणतज्ञांच्या, आमदार आणि शिक्षण मंत्र्यांच्याही लक्षात ही गोष्ट आली नव्हती. प्रा.एन.डी.पाटील यांनी ‘श्वेतपत्रिकेचे कृष्णस्वरूप’ ही श्वेतपत्रिकेची चिरफाड करणारी, परखड वस्तुनिष्ठ विवेचन करणारी पुस्तिका लिहिली. ‘धन्याला धतुरा आणि चोराला मलिदा’ देणारे साधारण आणि असाधारण असे दोन अभ्यासक्रम या श्वेतपत्रिकेने ठेवले होते. यातून बहुजनांच्या शिक्षणाची विल्हेवाट लागली असती.

यासाठी एन.डीं.नी रान उठवायचे ठरविले. कारण समाज जेव्हा बहुसंख्येने अन्याय नाकारतो तेव्हा अन्याय करण्याची हिंमत राज्यकर्तेकरूच शकत नाहीत. बॅ.पी.जी.पाटील यांनी त्यांच्या या कामात त्यांना जिद्दीने साथ दिली. या दोघांनी महाराष्ट्राच्या विविध भागात 400 सभा घेतल्या.

त्यावेळचे लोकनेते आणि उपमुख्यमंत्री बाळासाहेब देसाई यांना एन.डीं.शी चर्चा केल्यानंतर या श्वेतपत्रिकेचे शेतकरी कष्टकर्‍यांवरील होणारे दूरगामी भयाण परिणाम जाणवले. त्यांनी एक सूचना केली की, विधानपरिषद आणि विधानसभा यामधील आमदार-नामदार असणार्‍या सर्व लोकप्रतिनिधींची सभा घ्यावी आणि त्यांना या श्वेतपत्रिकेचे स्वरूप समजावून द्यावे. त्याप्रमाणे सर्व आमदारांच्या सभेत चार तास सज्जड पुराव्यानिशी घणाघाती भाषण करून एन.डी.पाटील यांनी सर्व आमदारांना श्वेतपत्रिकेचे कृष्णस्वरूप स्पष्ट करून सांगितले. दुसर्‍या दिवशी सरकारी ठराव असूनही आणि सभागृहात पाशवी बहुमत असूनही शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरींना हा ठराव मागे घ्यावा लागला. अन्यथा बहुजन समाजातील युवा पिढीला शिक्षण आणि त्यातून येणार्‍या प्रचंड संधी यांना मुकावे लागले असते आणि समाज शेकडो पिढ्या मागे लोटला गेला असता.

1972चा दुष्काळग्रस्तांवरील गोळीबारइस्लामपूर

एन.डीं.च्या शब्दात चिमणीलासुद्धा प्यायला थेंबभर पाणी नाही असा हा 1972 चा दुष्काळ. सरकारी यंत्रणा नेहमीप्रमाणे सुस्त आणि आपल्याच अधिकाराच्या मस्तीत दंग. सर्व सामान्यांना ना प्यायला पाणी, ना खायला अन्न, ना शेतात पीक, ना हाताला काम. त्यातून स्वत:ची अवजारे घेऊन कामावर या ही अट. एन.डी.पाटलांनी वाळवा तालुकाभर सभा घेतल्या आणि त्याची परिणीती म्हणजे सगळ्या मागण्यांची दाद मागण्यासाठी 19 ऑक्टोबर 1972 रोजी काढलेला 15 ते 20 हजार शेतकरी आणि शेतमजुरांचा विराट मोर्चा. हा ‘धडक मोर्चा’ इस्लामपूरच्या मामलेदार कचेरीसमोर जाऊन आपल्या गार्‍हाण्यांची दाद मागणार होता. याच स्वरूपाचा आणखी एक मोर्चा वैराग तालुका बार्शी येथे काढण्यात आला होता. या वैराग येथील मोर्चावर गोळीबार झाला आणि त्यात आठ हुतात्मे झाले. इस्लामपूर येथील मोर्चातील दुष्काळग्रस्तांच्या ठळक 13 मागण्या होत्या.

1) वाळवा तालुक्यात टंचाईची परिस्थिती जाहीर करणे.
2) काम मागणार्‍या प्रत्येकाला कामाचा हक्क आहे.
3) मजूरांची किमान मजूरी 4 रूपये दिली पाहिजे.
4) मजुरांना शासनाने अवजारे पुरविली पाहिजेत.
5) स्त्री-पुरूषांचे मजुरीचे दर समान असले पाहिजेत.
6) आठवड्याची मजुरी आठवड्याला मिळाली पाहिजे.
7) जनावरांसाठी वैरण, तगाई तातडीने मिळाली पाहिजे.
8) सारा वसुली आणि सर्व कर्ज वसुली स्थगित झाली पाहिजे.
9) कोरड्या पडलेल्या विहिरीवरील शेती पंपाचे विजेचे किमान वीज बील बंद झाले पाहिजे.
10) खुजगाव धरण बांधले पाहिजे.
11) इस्लामपुरातील तलावांची बांधबंदिस्ती करणे, गाळ काढणे आणि नागठाणे बंधार्‍याचे काम सुरू केले पाहिजे.
12) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती उतरविणे आवश्यक.
13) विद्यार्थ्यांना दरमहा भोजन खर्चासाठी 50 रूपये मिळावेत.

मोर्चा पूर्ण शांततेने वाटचाल करत होता. त्याला मामलेदार कचेरीपर्यंत येण्यासाठी हरकत घेण्याचे कारण नव्हते. परंतु एन.डीं.चे उभरते नेतृत्व अनेकांना खुपत असावे याचा परिणाम म्हणजे सरकारी अधिकार्‍यांनी बंदी रेषा आखली. बंदी रेषेवर मोर्चा पोलीसदल आणि एस.आर.पी.यांच्या बळावर अडविण्याचा निर्णय घेतला. मोर्चा बंदीरेषेजवळ आल्यानंतर भाई रंगराव पाटील यांच्याकडे सभा सोपवून ‘बंदी रेषा उठवा’ ही विनंती करण्यासाठी एन.डी.कचेरीकडे गेले. स्थानिक अधिकार्‍यांना निर्णयासाठी पुरेसा वेळ देऊन ते परतले. त्यांनी निर्णय स्थानिक अधिकारी आणि सांगलीचे अधिकारी यांच्यावर सोपवला होता. एन.डी. बंदी रेषेवर येऊन पोलिसांना सांगत होते की, आसपासची बघ्यांची गर्दी हटवा. यावेळी झाडाच्या सावलीत मोर्चातील 200 स्त्रिया शांतपणे बसल्या होत्या.

अचानक एस.आर.पी.नी एन.डी.ना लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण सुरू केली. लाठीचा एक तडाखा त्यांच्या हातावर बसला, हातातील माईक गळून पडला आणि ते हातगाड्यावर कोसळले. त्याच अवस्थेत त्यांना गाडा ढकलत मामलेदार कचेरीत नेण्यात आले आणि सब इन्स्पेक्टर मोरे यांनी त्यांना ‘अटक केली आहे’ असे सांगितले. वस्तुत: प्रांताधिकारी कांबळे यांनी डी.वाय.एस.पी.वानखेडे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी पोलीस बंदोबस्त पुरेसा आहे. बंदी रेषा रद्द केली तरी चालेल, मोर्चा कचेरीच्या गेटपर्यंत आला तरी चालेल असा सल्ला दिला होता. प्रांताधिकार्‍यांनी डी.एस.पी.वेंकटायलम यांच्या कानावर ही गोष्ट घातली. पण वेंकटाचलम बंदी रेषा न उठविण्यावर ठाम राहिले.

परिणाम प्रारंभी लाठीमार, त्यानंतर अश्रुधूर आणि शेवटी गोळीबार या मार्गांचा अवलंब अधिकारी आणि पोलीस दलाने केला. याही वेळी अश्रुधूराचे गोळे फुटल्यानंतर एन.डी.सांगत होते, ‘मला फक्त 5 मिनिटे बाहेर सोडा मी लोकांना घरी जाण्याची विनंती करतो, विनाकारण रक्तपात करू नका, पण अधिकार्‍यांनी त्यांचे म्हणणे धुडकावून लावले.

या गोळीबारात सुरेश शंकरराव पाटील, राजेंद्र रंगराव पाटील, दिलीप निलाखे ही कोवळ्या वयाची शाळकरी मुले बळी पडली. तसेच रंगा बाळा गायकवाड हा जकराईवाडीचा तरूण जागेवरच मरण पावला.

सरकारी अधिकार्‍यांची कल्पना अशी होती की, शासकीय पातळीवरील आयोग त्यांच्या कारवाईची चौकशी करेल. त्यादृष्टीने त्यांनी बरीच रंगसफेदी त्याचप्रमाणे खोटेनाटे सोयीस्कर साक्षी पुरावे आणि साक्षीदारांची फौज उभी केली होती.

पण विधान मंडळात गोळीबार प्रकरणावर खूप संतप्त प्रतिक्रिया आल्यानंतर सरकारला सातारचे न्यायाधीश न्यायमूर्ती पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली एक न्यायालयीन आयोग नेमावा लागला. या पाटकर आयोगाने साक्षी पुराव्यांची काटेकोर छाननी करत काही प्रमाणात दुधाला दूध आणि पाण्याला पाणी म्हणणारा निर्णय दिला.

पाटकर आयोगाचा अहवाल

पाटकर आयोगाने मोर्चाने मागणी केलेल्या 13 मागण्यांपैकी 9 ठळक मागण्या पूर्णत: योग्य असल्याचा निर्णय दिला. तसेच 4 मागण्या तत्वत: मान्य पण काही मामलेदाराच्या कार्यकक्षेत न येणार्‍या मागण्या तसेच क्रमांक 13 च्या मागणीसंदर्भात पुरेसे वस्तुस्थिती दाखविणारे साक्षीपुरावे सादर केले नाहीत यासाठी अमान्य केले म्हणजेच 9 मागण्या पूर्णत: आणि उर्वरीत 4 मागण्या दुष्काळाच्या संदर्भात तत्वत: योग्यच होत्या हे मान्य केले. म्हणजेच मागण्या योग्य असतील तर मोर्चा समर्थनीय होता हे सिद्ध होते.

त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट अशी की, सरकारी यंत्रणा निर्विकार, निष्क्रिय आणि सुस्त होती. योग्य असणार्‍या 9 मागण्यांच्या संदर्भात शीघ्रगतीने निर्णय झाला असता, कृती झाली असती तर दुष्काळाची तीव्रता कमी झाली असती आणि लोकांना जगणे सुसह्य झाले असते. या अर्थाने झालेला गोळीबार, लाठीमार मनुष्यहानी याला सरकारी यंत्रणा जबाबदार होती. आणि माणसांचे बळी निष्कारण आणि अट्टाहासापोटी घेतले होते.

हा दुष्काळग्रस्त जनतेचा, खास करून प्रा.एन.डी.पाटील यांच्या अभ्यासू चिकित्सक बिनतोड युक्तिवादांचा, अधिकार्‍यांचे पितळ उघडे पाडणार्‍या त्यांनी सादर केलेल्या वायरलेस संदेशांचा लेखी पुराव्याचा, वकील-साक्षीदारांच्या खोटारडेपणाचे पुरावे त्यांच्या तोंडावर फेकण्याच्या हिमतीचा परिणाम होता. एक-एक साथीदार खोटा पडत गेला तसे सरकार पक्षाने मारून-मुटकून उभी केलेली साक्षीदारांची फौज सपशेल मागे घेतली.

बंदी रेषा ओलांडली असेच सांगणार : एन.डी.पाटील

शेतकरी कामगार पक्षाचे वकील व्ही.एन.पाटील यांनी असा सल्ला एन.डीं.ना दिला की, त्यांनी आपण बंदी रेषा ओलांडली हे नाकारावे. यामुळे सरकार पक्षाची बाजू दुबळी होणार होती. त्यांना एन.डीं.नी स्पष्टपणे सांगितले की, मी बंदी रेषा ओलांडलेली आहे हे हजारो लोकांनी पाहिले आहे. मी असत्य बोलणार नाही मी सत्यच बोलणार. भले त्याचे परिणाम काहीही होवोत. त्यांचे ज्येष्ठ मित्र असणार्‍या व्ही.एन.पाटील यांचा सल्ला त्यांच्या रागालोभाची पर्वा न करता त्यांनी धुडकावून लावला.

योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा

प्रा.एन.डी.पाटलांना प्रत्यक्षात दुपारी 3.30 वाजता अटक केली होती. पोलीस कोठडीत त्यांची रवानगी दु.4.30 वाजता केली. पण पोलिसांना उशीरा शहाणपण सुचले आणि त्यांनी अटकेची वेळ सायंकाळी 6.30 वाजताची दाखविली. हा एक बनाव होता.

लाठीमारानंतर घडलेल्या(तथाकथित आणि बनावट) विध्वंसक कृतींमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि त्यांना भरीला घालणारे आणि नंतर नामानिराळे होणारे त्यांचे सूत्रधार होते.

ही बदललेली अटकेची वेळ एन.डी.पाटील सदस्य असलेल्या विधानपरिषदेच्या अध्यक्षांना एक दिवस उशीरा कळविण्यात आली. न्यायाधीशांनी हे मान्य केले की, अटकेची वेळ बदलण्यामागील दुष्ट हेतू सिद्ध झाला होता. या परिस्थितीत विधानपरिषद गृहाचा अपमान आणि विशेष हक्क भंग चौकशी समितीने दोन्ही पोलीस अधिकार्‍यांना दोषी ठरविले.

जबर शिक्षा

या अपराधाची शिक्षा ही जबर होती. हा विधानपरिषदेचे सदस्य असलेल्या आमदार एन.डी.पाटील यांच्याविरूद्ध केलेला घोर आणि दंडनीय अपराध होता. त्याची शिक्षा म्हणजे अधिकार्‍यांना नोकरीतून काढून टाकणे आणि सेवानिवृत्तीनंतरचे सर्व आर्थिक लाभ रद्द करणे हा होता.

संबंधित अधिकार्‍यांनी त्यांच्या लेखी माफीपत्रात विधानपरिषदेसमोर बिनाशर्त आणि सपशेल माफी मागितली. हात समोर बांधून आणि खाली मान घालून त्यांनी ही माफी मागितली. त्यांना माफ करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त ज्यांच्या बाबत अपराध घडला त्या एन.डीं.च्या हातात होता. ज्यांनी घोर अपराध केले, ज्यांच्या अट्टाहासामुळे लाठीमार, अश्रूधूर, गोळीबार झाला, चार हुतात्मे झाले आणि ज्यांच्यामुळे एन.डी.पाटलांना अमानुष लाठ्या-काठ्यांच्या वर्षावाला सामोरे जावे लागले, अशा अधिकार्‍यांना माफ करायचे होते.

प्रा.एन.डी.पाटलांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्यांना माफ केले.

पाटकर आयोगाचे गोळीबाराबद्दलचे मत

सरकारी पाटकर आयोगाने मान्य केले की, गोळीबार समर्थनीय होता पण तो प्रमाणाबाहेर आणि अतिरेकी होता कारण बहुतेकांना गोळ्या पाठीला लागून छातीतून बाहेर पडल्या होत्या. सर्व गोळ्या कमरेच्या वर झाडल्या होत्या. गोळीबार करणारी पोलिसांची तुकडी मूळ जागा सोडून बरीच लांबपर्यंत आली होती.

एकमेव मोर्चा

महाराष्ट्राच्या आजपर्यंत झालेल्या मोर्चावरील गोळीबारांच्या संदर्भात आणि मागण्यांच्या संदर्भात कोणत्याही आयोगाने आजपर्यंत मोर्चाच्या मागण्या योग्य आणि गोळीबार प्रमाणाबाहेर आणि अतिरेकी असे म्हटलेले नव्हते.

या मोर्चानंतर 30 नोव्हेंबर 1972 रोजी यापेक्षाही टोलेजंग मोर्चा एन.डीं.नी याच मामलेदार कचेरीवर काढला या आव्हान मोर्चाच्या वेळी ना पोलीस, ना एस.आर.पी., ना गोळीबार पथक बाहेर होते. कचेरीचे गेट बंद होते आणि कचेरीचा कारभार निमूटपणे चालला होता. या मोर्चाच्या निमित्ताने हलवून खुंटा बळकट करावा या न्यायाने प्रतिस्पर्ध्यांच्या छातीत आपल्या निर्भयपणाने, निधडेपणाने, अभ्यासू वृत्तीने, सत्यप्रियतेने आणि विशेषत: त्यांच्या क्षमावृत्तीने एक शेतकर्‍यांचा खंदा पाठीराखा ही त्यांची प्रतिमा महाराष्ट्रभर निर्माण झाली. त्यांचा लौकीक शोषण करणार्‍यांचा कर्दनकाळ आणि शोषितांचा तारणहार या अर्थाने सर्वदूर पसरला.

शोषितांचा कैवार घेऊन प्रा.एन.डी.पाटील यांनी जे विविध राजकीय व सामाजिक लढे लढले त्याचा इतिहास हा एका छोट्या लेखात देता येणार नाही. त्यांच्या या कार्याचा धावता आढावा घेऊ या.

कापूस एकाधिकार खरेदी पुलोद सरकारमध्ये मंत्री असताना शेतकर्‍यांच्या हिताची ही योजना सरांनी यशस्वीपणे राबविली. बदनाम झालेली ही योजना एन.डी.पाटील यांच्यामुळे महाराष्ट्राची भूषण ठरली. कापसाचे वजन माप पूर्ण झाल्यावर 24 तासाच्या आज शेतकर्‍यांना बिल मिळण्याची त्यांनी व्यवस्था केली.

शेगाव ते नागपूर शेतकरी दिंडी या दिंडीचा उद्देश होता शेतमजूर, शेतकरी, बेकार, बारा बलुती यांच्या समस्यांना वाचा फोडणे. सुरवातीला हजारच्या आत संख्या असलेल्या या दिंडीत नागपूरला विधान भवनात पोचल्यावर 70-75 हजाराचा जनसमुदाय लोटला होता. महाराष्ट्रातील ही अभूतपूर्व अशी दिंडी ठरेल.

एन्रॉन आणि जागतिकीकरण अटल बिहारी वाजपेयींनी गॅट करारावर सही केली आणि सर्वत्र जागतिकीकरणाच्या फायद्याचे नगारे वाजू लागले. एन.डीं.च्या मते या कराराच्या विळख्यात अडकवून पाश्चात्य युद्धखोर लुटारूंनी अविकसित देशांना जखडून त्यांचे शोषण चालू केले. एन.डीं.च्या मोहिमेमुळे जनजागरण झाले आणि जागोजागी जागतिकीकरणाला विरोध सुरू झाला. एनरॉनमुळे येऊ घातलेल्या प्रचंड वीज दर वाढीविरोधात डाव्या विचारवंतांनी प्रभावी प्रचार सुरू केला. या चळवळीचे समन्वयक म्हणून त्यांनी एनरॉनच्या धोक्याविरोधात तुफानी प्रचार केला. परिणामी एनरॉनला गाशा गुंडाळावा लागला.

जिल्हा भूविकास बँक आंदोलन 5 एकराखालील शेतकर्‍यांना कर्जमाफी योजना नाकारण्याची चूक जिल्हा भूविकास बँकेने केली. 6000 शेतकर्‍यांच्या धडक मोर्चाचे नियोजन एन.डीं.नी.केले व बँकेला ताळ्यावर आणले.

सहकारी साखर कारखान्यांच्या कपाती

सहकारी साखर कारखानदारी ही अल्पकाळात साखर सम्राटांची मिरासदारी ठरली. पैसा शेतकर्‍यांचा आणि संस्था सहकार सम्राटांच्या घशात ही नवी प्रथा आली. त्यांच्या घराण्यातल्या राजपुत्र, राजकन्या, जावई, मातोश्री, भ्राताश्री यांच्यासाठी संस्था काढण्याचा सपाटा त्यांनी चालू केला. त्यांनी शेतकर्‍यांच्या ऊस बिलातून केलेल्या कपातीतून कोट्यवधी रूपयांची खाजगी मालमत्ता निर्माण झाली.

एन.डीं.नी आमदार म्हणून विधानसभेत केलेल्या भडीमारामुळे आणि त्यांच्या चळवळींच्या रेट्यामुळे शासनाने ऐंशी साखर कारखान्यांची बँक खाती गोठविली. नाक दाबल्यावर तोंड उघडते. या मानगुट धरण्याचा परिणाम म्हणून साखर सम्राटांना सर्व कपाती शेतकरी सभासदांना परत द्याव्या लागल्या.

सीमावासी मराठी भाषिकांचा लढा

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आणि एस.एम.जोशींनी संयुक्त महाराष्ट्र समिती बरखास्त केली. पण हे करताना त्यांनी सीमावर्ती मराठी भाषिकांना वार्‍यावर सोडले. 1959 साली सुरू झालेल्या मराठी भाषिकांच्या लढ्यात प्रारंभापासून आजपर्यंत प्रा.एन.डी.पाटील आघाडीचे नेते आहेत. खरे तर या लढ्याच्या सुरवातीपासून ते आजपर्यंत हयात असणारे आणि लढणारे ते एकमेव विश्वसनीय नेते आहेत.

सेझविशेष आर्थिक क्षेत्र

पेण तालुक्यातील 24 गावांतील 34000 एकर जमीन बृहन्मुंबई सेझसाठी रिलायन्स कंपनी म्हणजेच अंबानीला पाहिजे होती. प्रत्यक्ष मंत्र्याचा भाऊच एजंट म्हणून काम करत होता. एक लाख रूपये एकर या दराने खरेदी केलेली ही जमीन नंतर विदेशी कंपनीला 3 ते 4 कोटी रूपये दराने विकायची होती. या जमिनीवर भर घातली असती तर इतर जमिनी पाण्याखाली गेल्या असत्या. प्रत्यक्षात ही ‘जमीन बळकाव’ मोहीम होती. पेणच्या शेतकर्‍यांनी या विरोधात सामुदायिक उपोषण केले. एक 84 वर्षांची वृद्धा उपोषण करत होती. तिची प्रकृती खालावली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की, सेझमधून 24 गावे वगळली जातील. पण सरकारने शब्द पाळला नाही त्यामुळे प्रा.एन.डी.पाटलांनी 26 जुलैला आपले उपोषण सुरू केले. एन.डी.पाटलांना फक्त एकच किडनी होती त्यांचे वय 82 वर्षांचे होते. डॉक्टरांनीही त्यांना उपोषण करू नये असा सल्ला दिला पण त्यांचे उपोषण चालूच राहिले.

सरकार खडबडून जागे झाले. शेवटी निर्णय झाला की, सर्व गावात संमतीपत्रे घ्यायची. या मोजणीत 97% शेतकर्‍यांनी सरकारला जमिनी द्यायला संमती नाकारली होती. शून्यापासून सुरवात करून 100% यशाचे टोक गाठलेला हा अभूतपूर्व लढा होता. यामुळे शेतकर्‍यांच्या सात बारावर पोटकूळ म्हणून चढलेले अंबानीचे नाव रद्द झाले आणि सात बारावर 24 गावातील 34000 एकरावर शेतकर्‍यांचे नाव लागले.

हा कष्टकर्‍यांचा विजय होता आणि भांडवलदार धार्जिण्या सरकारची ही हार होती.

सर्वात महत्वाची गोष्ट ही की, दीर्घकाळ चाललेल्या या लढ्यात 27 वेळा झालेल्या धरणे, मोर्चे, घेराव, उपोषणे यावेळी एकही दगड मारला गेला नाही, एकही काच फुटली नाही, कोणाला गाढवावर बसविले नाही, कोणाचे कपडे फाडले नाहीत कोणाच्याही तोंडाला काळे फासले नाही, कुठल्याही अर्वाच्य घोेषणा दिल्या नाहीत, एकाही सरकारी कार्यालयाची नासधूस झाली नाही. शांततेच्या मार्गाने चाललेल्या या लढ्याला मिळालेले हे यश अभूतपूर्व म्हणावे लागेल.

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमनपद

कर्मवीरांच्या अंतिम इच्छेनुसार एन.डी.पाटील 1959 मध्ये रयत शिक्षण संस्थेत परतले. त्यानंतर 1990 ते 2008 पर्यंत सलग 18 वर्षेते रयतचे चेअरमन होते. 2008 नंतर कोणत्याही आग्रहाला न जुमानता ते पदमुक्त झाले. त्यांच्या काळात संस्थेची सर्वांगीण प्रगती झाली. त्यांच्या कामाचा परीघ गावकुसाबाहेर ढकललेल्या शोषित-वंचितांचे शिक्षण करणे हा होता.

याची प्रचिती देणार्‍या 10 आश्रमशाळा, 8 महिने चालणार्‍या चार साखर शाळा, ग्रामीण अल्पभूधारक शेतमजूर, असंघटित कामगार शोषित मागासवर्ग आणि स्त्रियांच्या साक्षरतेसाठी निर्माण झालेला ‘श्रमिक विद्यापीठाचा’ प्रस्ताव त्यांच्या बांधिलकीचा उत्तम नमुना आहे. व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी शेतीला पूरक सेवा, उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, तांत्रिक, अभियांत्रिकी, बिगर अभियांत्रिकी असे 55 कोर्सेस चालविण्याची योजना असणार्‍या कर्मवीरांच्या स्वप्नातला ग्रामीण विद्यापीठाचा प्रस्ताव त्यांनी सादर केला.

त्यांनी संस्था आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी केली. त्यांच्या दुर्बल घटक विकास निधीत दीड कोटी रूपये, कृतज्ञता निधीत दोन कोटी रूपये, अमृत महोत्सव निधीत एक कोटी चौर्‍याहत्तर लाख तर श्री.छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस महोत्सव निधीत एक कोटी सत्तर लाख याप्रमाणे संस्थेवर पैशांचा वर्षाव झाला. एन.डी.पाटील नावाच्या संन्याशाच्या झोळीत हजारो हातांनी भरभरून निधी ओतला.

गुणवत्ता, नेमणुका, बदली बढतीचे निश्चित निकष आणि पारदर्शीपणा ही सूत्रे त्यांनी संस्थेत रूजवली. त्यांच्या कारकिर्दीत सर्व नेमणुका, बदल्या, बढत्या, वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीने झाल्या. त्यांनी इंजिनिअरिंग आणि बी.एड.चा ‘मॅनेजमेंट’ कोटा रद्द केला. डी.एड.शिक्षण सेवकांच्या 700 जागा गुणवत्तेच्या क्रमानुसार संगणकावर निश्चित केल्या आणि मुलाखती न घेता उमेदवारांना नेमणूक पत्रे पाठविली. कोणत्याही पदासाठी कुठलीही देणगी न घेता नेमणारी आशियात पहिल्या क्रमांकावर असणारी ही रयत शिक्षण संस्था भारतातील एकमेव संस्था असावी.

त्यांचे चेअरमनपद हे शिक्षणातील क्रांतिकारी परिवर्तनाचे साधन ठरले.

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ

प्रा.एन.डी.पाटील आणि अंधश्रद्धा, देवपूजा, अंध-रूढी परंपरा यांच्यामधील अंतर दोन धु्रवांचे आहे. त्यांच्या दौर्‍यात आणखी आमदार असतील आणि त्यांना देवदर्शन करायचे असेल तर ते सांगतात, ‘तुम्ही खुशाल देवदर्शन करून या मी इथे तुमच्या चपलांचे रक्षण करत बसेन. कारण तुमचा देव त्यांचे रक्षण करेल याची तुम्हाला खात्री नाही.’ सहकार मंत्री झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या खात्यातील सर्व अधिकार्‍यांना आदेश काढला की, त्यांनी उद्घाटनाचे नारळ, समारंभ, हार गुच्छ हे सर्व अवडंबर थांबवावे. आज एखाद्या संस्थेत इमारतीचा पाया काढताना पहिली कुदळ मारताना ते गुलाल टाकणे व नारळ फोडणे या गोेष्टींना फाटा देतात. ते सांगतात की, ‘तुमच्या नारळ फोडण्यामुळे आणि पूजेमुळे गडी, गवंडी, आर्किटेक्ट, मजूर यांच्या श्रमाशिवाय तुमची इमारत उभी राहणार का याची शाश्वती तुम्ही मला दिली तर मी नारळ फोडेन.’

एकदा एक कसोटी घेणारा ‘पत्र प्रसंग’ त्यांच्या आयुष्यात निर्माण झाला. ते त्याच दिवशी कोल्हापूर विधानसभा मतदार संघातून विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या विजयाची मिरवणूक त्यांच्या मतदार संघातून नेहमीच्या जल्लोषात सुरू होती. एका रस्त्यावर ते आले त्यावेळी ज्यांनी त्यांच्यासाठी प्रचार केला, त्यांना मतदान केले अशा त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात होळी रचली होती. आमदार पाहुणे म्हणून आले म्हणून त्यांच्या उत्साहाला उधाण आले. त्यातल्या कार्यकर्त्यांनी एन.डी.पाटलांना विनंती केली की, त्यांनी होळी पेटवावी. एन.डी.पाटलांनी या गोष्टीला कार्यकर्त्यांच्या रागा लोभाची फिकीर न करता स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी सांगून टाकले की, अशा अंध, अर्थशून्य रूढी परंपरा यांना त्यांचा सक्त विरोध आहे. ज्या गोष्टी त्यांना पटत नाहीत त्या ते कधीही करत नाहीत. यावर कार्यकर्ते मंडळी संतापली, त्यावेळी एन.डी.पाटलांनी त्यांना निर्वाणीचे उत्तर दिले, ‘तुम्हाला माझा राग आलेला असेल आणि माझा निषेध करायचा असेल तर मी मोटारीतून खाली उतरतो आणि पहिली घोषणा मी देतो, ‘एन.डी.पाटील मुर्दाबाद’ आणि त्यानंतर तुम्ही निषेधाच्या घोषणा देऊ शकता. सगळी गर्दी स्तब्ध झाली.

व्यक्तिगत रित्या अंधश्रद्धा धुडकावणे शक्य असते पण सार्वजनिक जीवनात असणार्‍या, सामुहिक पाठिंब्यांची आवश्यकता असताना सवंग लोकप्रियता मिळविण्याऐवजी विशाल जनसमुहासमोर आपले म्हणणे खणखणीतपणे मांडणे बुद्धिवाद, वैज्ञानिक दृष्टी, प्रज्ञावाद आणि विवेकवाद यांची पाठराखण करताना उघड-उघड लोकमताला ठोकरणारा निर्णय जाहीर करणे आणि परिणामासाठी मनाने खंबीर राहणे ही दुर्मिळ सत्यनिष्ठा आहे. अशा कसोटीच्या प्रसंगातून त्यांचे नेतृत्व तावून-सुलाखून निघालेले आहे.

महात्मा फुलेंचा सत्यशोधकी बाणा, राजर्षि शाहूंची बंडखोरी आणि विश्वस्त वृत्ती, कर्मवीरांचा निरिच्छपणा, परखडपणा आणि सेवावृत्ती त्यांच्या अंगात भिनलेली आहे. गांधीजींच्या अहिंसावादाचा प्रभावही त्यांच्यावर आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून दिलेली लोकशाहीची संरचना त्यांच्या चळवळीचा आधार आहे. विषमता, स्त्री-पुरूष भेद, दलितांच्यावरचे अन्याय, मानवी मेंदू बधीर आणि गुलाम करणारी पुरोहितशाही या सर्वांना त्यांचा कट्टर विरोध आहे. निकोप लोकशाहीसाठी विज्ञानवाद, विवेकवाद यांची पाठराखण आणि आधारहीन अंधश्रद्धा भिरकावून देण्याची मानसिकता त्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. त्यांच्या व्याख्यानात कधी-कधी ते अंधश्रद्धांची जाहीर खिल्ली उडवितात.

विज्ञानामध्ये पी.एच.डी. मिळविल्यानंतर सत्यनारायण घालणार्‍या प्राध्यापकांची त्यांना कीव कराविशी वाटते. पाळण्यात मूल नसताना पाळणा हलवला तर बाळाच्या पोटात दुखेल म्हणणारी सुशिक्षित स्त्री त्यांना शिक्षणाचा अपमान वाटतो. त्यांनी सांगितलेले एका कामेरी गावच्या शेतकर्‍याचे उदाहरण. सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरेल. या शेतकर्‍याने गावात जाहीरपणे सांगून टाकले की, त्याच्या शेतात दुसर्‍या दिवशी 330 कोटी देवांचे दर्शन घडणार आहे. आता एवढ्या देवांचे दर्शन घडण्याचा चमत्कार बघण्यासाठी गाव त्याच्या शेतावर गोळा झाले. या बहाद्दराने नांगराला बैल जुंपण्याऐवजी 10 गाई जुंपल्या होत्या. प्रत्येक गायीच्या पोटात 33 कोटी देव गृहीत धरले तर 10 गायींच्या पोटातील 330 कोटी देवांचे दर्शन त्याने घडविलेले होते. बहुधा माणसे स्वत:लाच शिव्या देत फिरली असावीत.

दुसरे उदाहरण सत्यशोधक जलशाचे. अशा जलशात कधीकाळी सत्यशोधक कर्मवीर भाऊराव पाटील काम करत असत. या जलशात असा प्रसंग आहे की, एक सासू आपल्या सुनेला देवदर्शनासाठी मंदिरात आणते. मंदिराच्या पायर्‍या चढत असताना कठोर दिसणारे, भाले तळपत असणारे दोन द्वारपाल दोन्ही बाजूला दिसतात. ती घाबरते पण सासू तिला सांगते त्यात काय घाबरायचे. ते तर दगडाचे आहेत. थोडे पुढे गेल्यावर सोंड उभारलेले दात पुढे असणारे दोन अवाढव्य हत्ती दिसताच सून पुन्हा भांबावते. सासू तिला धीर देते की, त्या दगडी मूर्ती आहेत. यानंतर काही पावलावर जबडा विस्तारलेले सुळे चमकणारे आयाळ पिंजारलेले दोन अक्राळविक्राळ सिंह ती सून पहाते. पुन्हा ती घाबरते. पुन्हा सासू समजावून सांगते की, हे त्या फक्त दगडांच्या मूर्ती आहेत त्यांना काय घाबरायचे? एव्हाना सून निर्भय, चिकित्सक आणि मनाने ठाम झालेली असते. देवाच्या मूर्तीसमोर आल्यावर ती सुनेला सांगते देवाला नमस्कार कर. आता तयार झालेली सून सांगते “त्याला काय नमस्कार करायचा तो तर दगडाचा आहे.” प्रेक्षकांमधून सासूची फिरकी घेणारा आवाज येतो. ‘अगं सासू आता बोल की, आता का दातखिळी बसली?’ असे दिलेले एखादे उदाहरण जसे खळखळून हसविते तसे अंतर्मुख होऊन विचार करायला लावते. त्यांचा नातू सागर. ऐन तरूणाईत त्याचे निधन झाले. प्राध्यापक अनिल पाटील समाचाराला गेल्यानंतर ते त्यांच्याशी दीड तास बोलत होते पण त्या दीड तासात एन.डी.पाटलांच्या ओठवर दैव हा शब्द कधीही आला नाही. सत्याच्या सूर्याला सामोरे जाण्याचा निर्धार आणि हिंमत त्यांच्यामध्ये आहे. ‘जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी’ हे त्यांच्या बाबतीत तंतोतंत खरे आहे. प्रज्ञावाद आणि विवेकवाद ही सहजवृत्ती असल्यामुळे डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या अंनिस चळवळीत ते सहजपणे समरस झाले.

साथ साथ : एन.डी. व दाभोलकर

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील सत्यशोधक होते. समाजाच्या अनिष्ट रूढी, प्रथा व परंपरा यांच्या विरोधात कर्मवीरांनी ‘क्रूसेड’च पुकारले होते. या वारशाचा प्रभाव एन.डी.सरांवर होता. हे हेरून डॉ.दाभोलकरांनी एन.डी.सरांशी संपर्क साधला. याबाबत एन.डीं.नी स्वत: लिहिलंय – “कर्मवीर व प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी चालवित होतो. डॉ.दाभोलकरांनी ‘अंधश्रद्धा’ हा त्यांच्या चळवळीचा केंद्रबिंदू मानला व दीर्घ पल्ल्याच्या पण जोखमीच्या समाज हिताची लढाई ते लढत होते. एक दिवस ते माझ्याकडे आले व रयतच्या माध्यमातून ही लढाई पुढे चालू ठेवू या! अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांची अपेक्षा रास्त होती. कर्तव्य भावनेनं मी त्यानां सहजस्फूर्त पाठींबा दिला. पुढे महाराष्ट्र अंनिसचे अध्यक्षपद स्वीकारण्याची त्यांनी मला सूचना केली. माझी नाही म्हणायची हिंमत झाली नाही आणि मी त्यांना साथ देऊ लागलो.”

गेली दोन तपे एन.डी.सर दाभोलकरांना खंबीरपणे साथ देत राहिले. महाराष्ट्रात विस्तारलेल्या रयतच्या माध्यमातून अंनिसचे बळ वाढविता आले. साथ-साथ चाललेल्या या दीर्घ संघर्षाचा आढावा व मूल्यमापन वाचकांना प्रेरक ठरेल.

कायद्याची लढाई

बुवाबाजीतून समाजाचे जे शोषण होते त्यावर अंकुश ठेवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आवश्यक होता. महाराष्ट्र अंनिस दाभोलकरांच्या मार्गदर्शनाखाली 18 वर्षेया कायद्यासाठी या संघर्षात, जेव्हा जेव्हा आंदोलने झाली तेव्हा तेव्हा एन.डी.सर अग्रभागी राहिले. विधानभवनात मंत्र्यांना भेटून चर्चा करणे असो किंवा आझाद मैदानावरील धरणे असो कायद्याचा मसुदा सुधारणे असो वा विरोधकाशी चर्चा असो त्यांनी या लढाईत अंनिसला खंबीरपणे पाठींबा दिला. मंत्री असो वा मुख्यमंत्री त्यांना ठणकावण्याचा निर्भीडपणा एन.डी.सरांनी दाखविला. कायदा मागणीबाबत चालढकल करणार्‍या राज्यकर्त्याबाबत ते एकदा संतापाने म्हणाले, ‘थू: तुमच्या जिंदगानीवर व खुर्च्यांवर’ हा कायदा पास झाला तर एकट्या दाभोलकरांना लाभ होणार होता काय? ते या कायद्याच्या उपयोगाने एका नव्या समाज व्यवस्थेसाठी आग्रही मागणी करीत होते, पण सत्तेचे व व्होट बँकेचे राजकारणामुळे राजकर्त्यांनी निर्णय घेणेबाबत चाल ढकल सुरू ठेवली. याचा एन.डीं.ना प्रचंड राग होता. अखेर जादूटोणा विरोधी कायदा झाला तो दाभोलकरांचा बळी घेऊन. हे शल्य एन.डी.सरांच्या मनात कायम राहील.

धर्मनिरपेक्ष मूल्यांची पेरणी

सातारा येथील कल्याणी हायस्कूलमध्ये काम करणारे कुमार मंडपे हे माध्यमिक शिक्षक अंनिसचे कार्यकर्तेहोते. त्यांच्या कार्याचा परिचय एन.डी.सरांना होताच. मंडपे निवृत्त होताच रयत शिक्षण संस्थेच्या मध्यविभागाच्या इन्स्पेक्टरपदाची जबाबदारी एन.डीं.नी मंडपे सरांवर सोपविली व शाळांमधून धर्म निरपेक्षतेची मूल्ये रूजवून अंधविश्वासाला हद्दपार करण्याचे आदेशच दिले. या अधिकाराचा मंडपे सरांनी पुरेपूर वापर केला. प्रथम त्यांनी शाळेतील देवाच्या प्रार्थना बंद केल्या. त्याजागी ‘आभाळाची आम्ही लेकरे’ व ‘चला आज मिळूनी सारे’ हे अंधश्रद्धाविरोधी गीत मुलांनी म्हणावे म्हणून आदेश दिला. हा बदल होतोय की नाही यासाठी पाठपुरावाही केला.

एका शाळेत दलित समाजातील बी.एस्सी.बी.एड. मुख्याध्यापक मूल्य शिक्षणाच्या तासाला काय करीत होते? तर गायत्री मंत्राची कॅसेट ते विद्यार्थ्यांना ऐकवत होते. बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा त्यांना गंधही नव्हता. मंडपे सरांनी ती कॅसेट बंद करायला सांगितली. विविध शाळातील विविध देवदेवतांचे फोटो काढायला सांगितले. कारण भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. धर्म घरात, शाळेत नाही.

कर्मवीरांचा सत्यशोधकी वारसा रयतच्या युवकात जपणे व वाढविणे यासाठी एन.डी.सरांनी जे योगदान दिले त्याचे मोल अपूर्व असं आहे.

अहिंसात्मक पद्धतीने बहुजनांमध्ये विवेकाची पणती पेटविण्यासाठी महाराष्ट्र अंनिसने दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली विविध प्रकारची आंदोलने केली. पशुबळीची प्रथा, स्त्रियांना मंदिरात प्रवेश नाकारणे, स्त्री-पुरूष समतेसाठीचा आग्रह, विद्यापीठात ज्योतिष शिकवू नये यासाठीचे आंदोलन, अशी विविध आंदोलने व सत्याग्रह यशस्वीरित्या पार पडले. या आंदोलनात एन.डी.सर जमेल तेव्हा आघाडीवर राहिले.

शनीशिंगणापूरचा सत्याग्रह

शनी-शिंगणापूर येथील शनीच्या दर्शनासाठी स्त्रियांना बंदी आहे. भारतीय घटनेनसुार हा स्त्रियावरील अन्याय ठरतो. या अन्यायाविरोधात जून 2000 मध्ये अंनिसने सत्याग्रह केला. पंढरपूरहून पुणेमार्गेसमता यात्रा नगरला आली. पुढे ही यात्रा शिंगणापूरकडे कूच करणार होती. या समता यात्रेत दाभोलकर, अंनिसचे कार्यकर्ते, पुष्पा भावे, बाबा आढाव, व्यंकटराव रणधीर आदी मंडळी सामील झाली होती. श्रीराम लागू, एन.डी.सर या सत्याग्रहात सामील झाले होते. नगरमधील सभा संपल्यावर या मंडळींना पोलिसांनी अटक केली.

समतेचा हा लढा त्यावेळी महाराष्ट्रात गाजला. धर्मवाद्यांचा विरोध, धमक्या यांना न घाबरता हा सत्याग्रह एन.डी.सरांसारख्या दिग्गजांच्या सहभागामुळे यशस्वी झाला.

लातूरची वैज्ञानिक जाणिवा परिषद

सन 2009 मध्ये लातूर येथे वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद झाली, या परिषदेला महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाला. या परिषदेच्या समारोप समारंभाला एन.डी.सर प्रमुख पाहुणे होते. सत्यशोधकी विचार समाजात का रूजला नाही याचे विश्लेषण करताना एन.डी.म्हणाले की, बहुजन समाजाच्या वतीने चालविलेल्या शिक्षणसंस्था सत्यशोधकी विचाराचा वारसा जतन करण्यास अपयशी ठरल्या आहेत. विद्यालये व विद्यापीठे यांच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल झाला पाहिजे. अभ्यासक्रमाचा व विकासकामाचा संबंध राहिला पाहिजे.

1) एन.डी.पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा बहुमान महाराष्ट्रातील अनेक नामवंत संस्थांनी केला.
समाजातील शेतकरी, कष्टकरी व वंचित वर्गाच्या समस्या कवेत घेऊन त्या वरचे उपाय शोधून कृतीशीलता दाखविणार्‍या सामर्थ्याचा गौरव
(अ) स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड यांनी मानद डी.लिट् दिली.-1999
(ब) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मानद डी.लिट्-1999
(क) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची मानद डी.लिट्. - 2007

2) एन.डी.सरांच्या वैचारिक समृद्धतेचा सन्मान
(अ) परभणी येथे भरलेल्या विचारवेध संमेलनाचे अध्यक्ष - 2005
(ब) निपाणी येथे भरलेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

3) इतर पुरस्कार
(अ) भाई माधवराव बागल पुरस्कार - 1954
(ब) राजर्षी शाहू पुरस्कार - 2000
(क) महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार
(ड) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार - 2007

* शैक्षणिक कार्याचा बहुमान म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या मलकापूर (जि.कोल्हापूर) येथील महाविद्यालयाला एन. डी. पाटील सरांचे नाव देण्यात आले आहे.

बुवाबाजी संघर्ष परिषद, इचलकरंजी

फेबु्रवारी 2003 मध्ये इचलकरंजी येथे बुवाबाजी संघर्ष परिषद झाली. धर्मांधतेचे काळे ढग चोहीकडे पसरत असताना महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यातून एक हजार हात विवेकाचा गजर करत संतांच्या नैतिकतेला पुन्हा उजाळा देण्यासाठी इचलकरंजीत जमा झाले होते. पुष्पा भावे, किशनराव देशमुख, पंजाबचे भुरासिंग, अमेरिकेतील सुनिल देशमुख, कल्लाप्पाण्णा आवाडे, मृणाल गोरे आदि विचारवंतांनी या अधिवेशनात परखड मते मांडली. या परिषदेत जे ठराव मांडले त्यावर एकत्रित भूमिका मांडणारे भाषण एन.डी.सरांनी केले. ते म्हणाले, “शिक्षणात इहवादी विचार आले पाहिजेत. पदवीधर सत्यनारायण घालतात, राज्यपाल पावसासाठी प्रार्थना करण्याचा आदेश देतात, मंत्रीमंडळे मुहुर्तावर बनवतात कारण शिक्षण इहवादी नाही. ज्योतिषी साळगावकर यांचे दैनिक बंद पडले. हे त्यांना कसं कळलं नाही? बलराम जाखरने देवराबाबाचे दर्शन घेतले. आणि त्याचे मंत्रीपद गेले.” हजारो कार्यकर्त्यांना, आपल्या अमोघ वक्तृत्वाने प्रभावित करताना एन.डी.सरांची वाणी उपरोध व विचार यांनी तळपत असे.

मोहोळ येथे पार पडलेल्या फेबु्रवारी 2004 मधील ‘विवेक जागर कृती परिषदे’च्या उद्घाटन सत्राचे अध्यक्षपद एन.डीं.नी भूषविले. सामान्य माणसाच्या दूरवस्थेचे भयाण चित्र त्यांनी आपल्या भाषणात उभे केले. या सत्रात मोठ्या संख्येने हजर असणार्‍या तरूणाईला भावपूर्ण साद घालत विवेकाचा आवाज बुलंद करण्याचा संदेश दिला.

शिक्षणव्यवस्था, स्त्रीपुरूष समता, बुवाबाजी अशा विविध प्रश्नांवर दाभोलकरांनी जे रान उठविले, त्या प्रश्नाबाबत एन.डी.सरांनी अशा विविध परिषदा व जनचळवळीमध्ये योगदान दिले. त्याच्या आणखी काही ठळक नोंदी घेऊ या.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा शैक्षणिक जाहीरनामा या विषयावरील चर्चासत्रात उद्घाटन सत्राच्या समारोपाच्या भाषणात एन.डीं.नी. मार्गदर्शन केले.(मार्च 2008)

महिला जाहिरनामा परिषद लातूर(डिसेंबर 2005) या परिषदेत एन.डीं.नी. अध्यक्षीय भाषण केले. सात-बाराच्या उतार्‍यावर आपल्या जोडीला पत्नीचेही नाव लावा असा सल्ला त्यांनी यावेळी श्रोत्यांना दिला.

महाराष्ट्राप्रमाणे भारतात विविध राज्यांत विवेकवादी चळवळी सुरू आहेत. या चळवळींचे फिरा हे संघटन आहे. या संघटनेचे अधिवेशन मे 2007 मध्ये पुण्यात भरले होते. त्याचे उद्घाटन सोहळ्याला एन.डी.अध्यक्ष होते. धर्म व राज्यसत्ता यांच्यात अलिप्तपणा हवा. धर्माच्या आधारावर राष्ट्र टिकत नाही असा विचार त्यांनी मांडला.

2011 मध्ये अंनिसच्या कार्याला 20 वर्षेपूर्ण झाली. या निमित्ताने अंनिसची मागील कामगिरी व भविष्य काळातील आव्हाने याविषयी झालेल्या विचार मंथनात एन.डी.सरांनी मार्गदर्शन केले.

विचार, कृती व संघर्ष या तीनही पातळीवर सतत 20 वर्षेअंनिसने केलेल्या वाटचालीत एन.डी.सरांचे योगदान किती प्रभावी होते याची जाण वाचकांना वरील माहितीतून येईल.

एन.डी.सर व नरेंद्र यांच्या जोडीतील एक शिलेदार धर्मांधांनी संपविला. दाभोलकरांच्या जाण्याने व्यथित झालेले एन.डी.म्हणाले, ‘जेव्हा निसर्ग एका महान व्यक्तीला जन्म देतो तेव्हा त्यांच्यासाठी जो ढाचा तयार करतो तो नंतर मोडून टाकतो.’ डॉ.दाभोलकरांसारखा अचाट कर्तृत्व असणारा माणूस पुढील शंभर वर्षांत जन्माला येईल काय? कदाचित नाही. म्हणून त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी सदैव कार्यरत राहिले पाहिजे. येत्या नोव्हेंबरमध्ये ‘जादूटोणाविरोधी कायदा विधान सभेत मंजूर होण्यासाठी वयाची 80 वर्षे उलटली तरी तरूणाईला लाजवील अशा तडफेने एन.डी.सर उभे राहतील. त्यांच्या अफाट कर्तृत्वाला महाराष्ट्र अंनिसचा सलाम!

विश्वास सायनाकर