Categories
व्यक्तिविशेष

महात्मा गांधींचा वारसा

वार्षिकांक - २०१९

आपल्या देशातील स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींचे कर्तृत्व वादातीत आहे म्हणून त्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो; परंतु केवळ स्वातंत्र्य लढ्यातील नेतृत्व इतकेच त्यांचे कर्तृत्व नाही, तर त्यांनी नेतृत्व करताना मांडलेले मानवजातीच्या भल्याचे विचार आणि व्यक्तिगत जीवनातील साधेपणाचा आदर्श हे त्यांचे कर्तृत्व आहे. त्यांच्या विचाराने त्यांनी जगभरातील अल्बर्ट आइन्स्टाइन, नेल्सन मंडेला यांसारख्या महान व्यक्तींना; तसेच अनेक लेखकांना, विचारवंतांना प्रभावित केले आहे. आज आपण त्यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने विचारांबरोबरच एक माणूस, एक व्यक्ती म्हणून त्यांचे स्मरण करणार आहोत. आजच्या राजकीय परिस्थितीला त्यांचा कुठला वारसा घेऊन आपल्याला पुढे जाणे गरजेचे आहे, याचा ऊहापोह करणार आहोत.

विसाव्या शतकात जागतिक पातळीवर ज्या व्यक्तींनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आणि जगाच्या इतिहासातला मानवी मूल्याच्या प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, त्यात एक नाव महात्मा गांधींचे आहे. बुद्धानंतर जगभर आदराचे स्थान त्यांनी प्राप्त केले आहे.

आपल्या देशातील स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे कर्तृत्व वादातीत आहे म्हणून त्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो; परंतु केवळ स्वातंत्र्य लढ्यातील नेतृत्व इतकेच त्यांचे कर्तृत्व नाही, तर त्यांनी नेतृत्व करताना मांडलेले मानवजातीच्या भल्याचे विचार आणि व्यक्तिगत जीवनातील साधेपणाचा आदर्श हे त्यांचे कर्तृत्व आहे. त्यांच्या विचाराने त्यांनी जगभरातील अल्बर्ट आइन्स्टाइन, नेल्सन मंडेला यांसारख्या महान व्यक्तींना; तसेच अनेक लेखकांना विचारवंतांना प्रभावित केले आहे. आज आपण त्यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने विचारांबरोबरच एक माणूस, एक व्यक्ती म्हणून त्यांचे स्मरण करणार आहोत. आजच्या राजकीय परिस्थितीला त्यांचा कुठला वारसा घेऊन आपल्याला पुढे जाणे गरजेचे आहे, याचा ऊहापोह करणार आहोत.

महात्मा गांधींची 150 वी जयंती देशभर साजरी झाली. ज्या ब्राह्मण्यवादी शक्तींच्या कारस्थानामुळे त्यांंचा खून झाला, त्या आज सत्तेत आहेत. त्या निलाजर्‍या होऊन गांधी जणू आमचाच ‘वारसा’ आहे, अशा पद्धतीने या जयंतीचा वापर करून आपल्यावरील नष्ट न होणारा गांधी खुनाचा काळा डाग नष्ट करू पाहत आहेत; परंतु आजही त्यांच्या मनातील गांधीद्वेष कणभरही कमी झालेला नाही. खासदार प्रज्ञा सिंग ठाकूरने गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेचा केलेला गौरव, गांधी खुनाच्या दिवशी पुन्हा गांधींना प्रतीकात्मक गोळ्या घालण्याचे हिंदू महासभेचे कृत्य, भाजप आयटीसेल प्रमुखांना, नथुरामने ज्या पिस्तुलातून गांधींवर गोळ्या झाडल्या त्यांचा लिलाव केला, तर कोण देशभक्त होते हे कळेल असे केलेले ट्विट, भाजपाच्या अनेक प्रवक्त्यांनी टीव्ही चॅनलवर ‘गोडसे मुर्दाबाद’ म्हणण्यास दिलेला नकार यातून दिसून येते.

खरे तर यानिमित्ताने गांधींच्या विचारांची आजच्या राजकीय परिस्थितीत प्रासंगिकता काय, गांधीवादात कुठले असे टिकाऊ तत्त्व आहे, जे आजच्या साम्राज्यवादी आणि ब्राह्मण्यवादी राजनीतीला पराभूत करू शकेल, याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. त्याचे गौरवगान जरूर व्हावे; परंतु वरील शक्तीचा पराभव करण्यासाठी आजच्या परिस्थितीत उपयोगी ठरणार्‍या गांधीवादी तत्त्वांभोवती राजकारणाची आखणी गंभीरपणे होणं गरजेचं आहे. हे काम खरे तर काँग्रेसचे; पण गांधीविचारांना काँग्रेसने कधीच सोडचिठ्ठी दिली आहे आणि आज तिची जी अवस्था आहे, त्यात तिच्याकडून ही अपेक्षा करता येत नाही. आपण नेहमी म्हणतो, व्यक्तीला काळाच्या मर्यादा असतात आणि त्या काळाच्या मर्यादेत त्या व्यक्तीचा तिच्या विचारांचा विचार झाला पाहिजे. ते करताना त्या व्यक्तीने जे विचार मांडले, ते कुठल्या भौतिक परिस्थितीतून उगम पावले, ते त्या भौतिक परिस्थितीत कुठल्या हितसंबंधांना उचलून धरणारे होते, हे लक्षात घ्यावे. कारण विचार हे भौतिक परिस्थितीची उपज असतात. या दृष्टीने आपण गांधी युगातील स्वातंत्र्य चळवळीत काय राजकीय परिस्थिती होती, याचा थोडक्यात आढावा घेऊ.

स्वातंत्र्यानंतर देशाचा विकास कुठल्या दिशेने व्हावा, या संदर्भात मांडणी करणारे चार प्रवाह स्वातंत्र्य चळवळीत होते. त्यातील एक होता भांडवली विकासाच्या मार्गाने संसदीय लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता या मार्गाने देशाचा विकास व्हावा, ज्याचे नेतृत्व होते काँग्रेसकडे अर्थात गांधी-नेहरूंकडे; यातही गांधी-नेहरू यांच्या कल्पना भिन्न होत्या. दुसरा प्रवाह होता, समाजवादी आणि कम्युनिस्टांचा. त्यांना भांडवली शोषण नष्ट करून कामगार-शेतकर्‍यांचे राज्य आणावयाचे आहे. धर्मनिरपेक्षता, सामाजिक समता या संदर्भात हा प्रवाह आग्रही होता, तर तिसरा प्रवाह होता हिंदू महासभा आणि आर.एस.एस.चा. त्यांना धर्मावर आधारित जातिव्यवस्था समर्थक हिंदू राष्ट्र, जे भांडवलशाहीला पूर्ण समर्थन करणारे, अमेरिकन साम्राज्यवादाशी जवळीक साधणारे हवे होते आणि आज त्यांची पावले त्या दिशेने पडत आहेत; आणि चौथा प्रवाह होता फुले-आंबेडकरी चळवळीचा. या प्रवाहाचा स्वातंत्र्याला विरोध नव्हता; पण येणार्‍या स्वातंत्र्यात आमचे स्थान काय, आमची गुलामगिरी नष्ट होईल काय की स्वातंत्र्यानंतरही आम्ही तुमचे गुलाम राहणार आहोत, असा प्रश्न त्यांनी उभा केला. आर्थिक-सामाजिक समतेवर आधारलेले जाती-वर्गमुक्त भारतीय राष्ट्र त्यांना हवे आहे.

काँग्रेस आणि समाजवादी कम्युनिस्ट प्रवाहांनी मतभेद असूनही स्वातंत्र्यलढ्यात आंदोलने केली, तुरुंगवास भोगले, बलिदान दिले, त्या काळातील काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट चळवळीतील एकही नेता असा नाही की, ज्याने तुरुंगवास भोगला नाही. ज्या नेहरूंच्या नावाने भाजप गळा काढते, त्यांनी नऊ वर्षे तुरुंगात घालवली आहेत; उलट आर.एस.एस.ने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाहीच; उलट स्वातंत्र्यलढ्याला बाधा येईल, अशी भूमिका घेतली आणि हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवून ब्रिटिशांना मदतच केली. अखेर त्यांच्या गांधीद्वेषी भूमिकेने प्रेरित झालेल्या इसमाने ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावून स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या राष्ट्रपित्याचा खून केला आणि आज ते ‘राष्ट्रभक्त’ म्हणून स्वत:च मिरवित आहेत.

फुले-आंबेडकरी प्रवाहाने माणूसपणाचा अधिकार नाकारलेल्या जनतेला स्वातंत्र्याची जाणीव करून दिल्यामुळे स्वातंत्र्यलढ्याला व्यापक परिमाण लाभले. गांधीजींच्या विचारात या संदर्भातील गांभीर्य दिसून येते. त्यांनीच हा प्रश्न स्वातंत्र्यलढ्यात कायम उपस्थित ठेवला, याचा ऊहापोह पुढे आपण करणार आहोतच.

कम्युनिस्ट, आर.एस.एस. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गांधीविचारांशी मतभेद होते; परंतु कम्युनिस्ट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर गांधींचा द्वेष करत नव्हते; प्रसंगी ते आदर करीत असत. हे राजकीय मतभेद होते, जे आजही आहेत; परंतु संघाचे तसे नव्हते. गांधीजींची दलित-मुस्लिम समाजाबद्दलची सहानुभूतीची भूमिका, धर्मनिरपेक्षता लोकशाहीबद्दलची भूमिका आणि त्यांनी हिंदू धर्माचा लावलेला अर्थ उदा. अस्पृश्यता असलेला हिंदू धर्म मला मान्य नाही, आंतरजातीय विवाहालाच मी हजर राहीन, ही गांधींची भूमिका संघाच्या हिंदू राष्ट्राला अडथळा ठरणारी होती. यामुळे गांधीद्वेषाने ते पछाडले. या पार्श्वभूमीवर गांधीजींच्या विचारातील प्रमुख तत्त्वांची थोड्या विस्ताराने आपण मांडणी करू, त्यातून आजच्या परिस्थितीत आपण काय घेतले पाहिजे, हे लक्षात येईल.

आज मोदींकडून गांधीजींच्या नावावर स्वच्छतेचे ‘राजकारण’ सुरू आहे; पण मोदींची ही स्वच्छतेची मोहीम ब्राह्मणी वर्णवर्चस्ववादी स्वच्छतेची मोहीम आहे. याच मोदींनी सफाई कामगारांच्या मेळाव्यात, “सफाई कामगार, स्वेच्छेने समाजाची सेवा करतात. कारण या सेवेत त्यांना आत्मीक आनंद मिळतो,” असे म्हटले. जातिव्यवस्थेचे हे चलाख समर्थन आहे. या आत्मीक आनंदात दरवर्षी किती हजार सफाई कामगार कुत्र्याच्या मौतीने मरतात, याची कल्पना मोदींना नाही. त्यांच्यासाठी काही करावे, हे त्यांच्या मनात येत नाही; पण स्वत:ची प्रतिमा उजळावी म्हणून सफाई कामगारांचे पाय धुण्याची ‘नौटंकी’ करता येते. समाजातील विशिष्ट जातींकडून स्वच्छता मोफत करून घ्यायची आणि स्वच्छतेची मिरास मिरवायची, ही आजवर आणि आजही चालत असलेली पद्धत चालू ठेवायची आणि दुसरीकडे आपण कसे स्वच्छतेचे भक्त आहोत, हे मिरवायचे; आणि तेही गांधीजींच्या नावाने! गांधीजींच्यासाठी यापेक्षा अपमानास्पद दुसरी गोष्ट नाही.

गांधीजींची स्वच्छतेची कल्पना केवळ स्वच्छतेची नव्हती. तिला व्यापक सामाजिक संदर्भ आहे. जातिव्यवस्थेतील अन्यायकारक श्रमविभागणीला ते आव्हान होते आणि कुठल्याही श्रमाला तुच्छ न लेखता श्रमाला प्रतिष्ठा मिळावी, ही भूमिका होती. एका अर्थाने स्वच्छतेच्या ब्राह्मणी वर्णवर्चस्ववादाला नकार होता. गांधींनी आधीच स्वच्छ केलेला कचरा साफ करण्याची ‘नाटकं’ केली नाहीत, तर संडास साफ करण्याच्या कृतीतून त्यांनी उदाहरण घालून दिले. अर्थात, हा प्रश्न खूप व्यापक आणि जातिव्यवस्थेच्या नायनाटाशी जोडला आहे; पण या प्रश्नाला सर्वप्रथम हात घालण्याचे काम गांधीजींनी केले आणि त्यांचा हा वारसा आपण व्यापक संदर्भासहित पुढे घेऊन जाण्याची आज गरज आहे.

गांधीजींच्या आजच्या राजकीय परिस्थितीच्या संदर्भात प्राणांची बाजी लावून पुढे घेऊन जाण्याचा वारसा म्हणजे धर्मनिरपेक्षतेचा. गांधीजी धार्मिक होते; पण कट्टर धर्मनिरपेक्ष होते. सर्वच धर्मांबद्दल त्यांना आदर होता. ‘ईश्वर-अल्ला तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान’ ही त्यांची आवडती प्रार्थना होती. धर्मावर आधारित राष्ट्र या हिंदू महासभा, संघ, मुस्लिम लीगच्या धर्मांध राष्ट्र संकल्पनेला त्यांनी स्पष्टपणे विरोध केला. सावरकरांनी मांडलेला द्विराष्ट्राचा सिद्धांत जिनांनी उचलून धरला आणि संघाच्या मुुस्लिमद्वेषी भूमिकेने मुस्लिम समुदायात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन पाकिस्तान निर्मितीचे षड्यंत्र रचणे ब्रिटिशांना शक्य झाले. फाळणी माझे प्रेत ओलांडून होईल, असा निर्वाणीचा इशारा गांधीजींनी दिला होता; परंतु फाळणीच्या राजकारणातून गांधींना दूर ठेवले गेले. यावेळी काँग्रेससाठी गांधी कालबाह्य झाले होते. भारतीय आणि पाकिस्तानी भांडवलदार वर्गाला स्वातंत्र्याची घाई झाली होती. फाळणी झाली आणि नंतर उसळलेल्या हिंदू-मुस्लिम दंगली शमवण्याची जबाबदारी गांधींनी शिरावर घेतली. फाळणीनंतर पाकिस्तानला न्याय्यवाटा देण्याची भूमिका गांधींनी घेतली. या भूमिकेने हिंदुत्ववादी अर्थातच चिडले आणि पुढे गांधी खुनाची घटना घडली; परंतु यामुळे गांधींचा खून झाला हा हिंदुत्ववादी प्रचार तद्दन खोटा आहे. छत्तीस सालापासूनच गांधींच्या खुनाचे प्रयत्न सुरू होते. अखेरचा प्रयत्न हा सहावा प्रयत्न होता, त्यावेळी फाळणीचा प्रश्न नव्हता.

देशाची एकता, धार्मिक सद्भाव, धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा आग्रह, हिंदू धर्माचा मानवतावादी अर्थ लावण्याचा प्रयत्न, हीच गांधींच्या खुनामागची कारणे आहेत. आजच्या काळातही वरील मूल्यांचा आग्रह धरणारे डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे खून सनातन्यांनी केलेले आहेत. म्हणून वर म्हटल्याप्रमाणे प्राणांची बाजी लावून हा वारसा पुढे नेला पाहिजे.

समाजजीवनात सत्याचा आणि नैतिकतेचा आग्रह धरणे हा गांधीवादाचा विशेष पैलू आहे. आपल्याला जे सत्य सापडले आहे, त्याचा प्रत्यक्ष जीवनव्यवहारात अवलंब करणे हे गांधींचे वैशिष्ट्य होते. प्रचलित व्यवहारात अशा गोष्टी विक्षिप्त ठरल्या, तरी त्यावर ठाम राहणे त्यांनी सोडले नाही. त्यांचे ‘सत्याचे प्रयोग,’ आतल्या आवाजाची कल्पना या गोष्टी लोकांना आवडोत अथवा न आवडो; त्याची त्यांनी तमा बाळगली नाही, त्यामुळे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात कधी लोकलुभावन भूमिका घेतली नाही; उलट लोकांना आपल्या भूमिका पटवून देण्यासाठी उपोषणाचे, आत्मक्लेषाचे हत्यार वापरले. सत्य हेच ईश्वर आहे, हे म्हणणे आणि जीवनात नैतिकतेचा आग्रह धरणे हाही त्यांचा वारसा आपण जपला पाहिजे, पुढे नेला पाहिजे; किंबहुना आजच्या राजकीय परिस्थितीत जेव्हा उच्च पदावर कार्यरत असलेली व्यक्ती फेकू म्हणून ओळखली जाते, तेव्हा हा वारसा अधिक गरजेचा ठरतो.

गांधीवादातील दोन-तीन गोष्टींबद्दल आपल्याला मतभेद दर्शविता येतात. उदा. त्यांनी मांडलेली भांडवलशाहीच्या संदर्भातील ट्रस्टीशिपची कल्पना; यात भांडवलशाहीतील कामगारांच्या श्रमाचे शोषण होते, हे सत्य नाकारले जाते आणि शोषक वर्ग असलेल्या भांडवलदारांना एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली जाते आणि कष्टकरी जनतेच्या दु:खाला, गरिबीला कारण असणार्‍या भांडवली व्यवस्थेला मान्यता मिळते. शेतकरी आंदोलनाच्या संदर्भातही गांधींनी घेतलेल्या भूमिका जमीनदारांच्या बाजूने राहिल्या आहेत. यातून आपण एक निष्कर्ष काढू शकतो, तो म्हणजे व्यक्ती म्हणून गांधी साधू-संतांसारखे साधे जीवन जगणारे होते; पण गांधीवाद म्हणून जे काही आहे, ते शोषक व्यवस्थेचे समर्थन करणारे आहे.

या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्या हिंसा आणि अहिंसेच्या तत्त्वाचा विचार करू. अहिंसा हे चिरंतन आणि उदात्त असे मानवी मूल्य आहे; पण प्रत्येक गोष्टीचा सापेक्षतेने विचार करावा लागतो, तसा तो अहिंसेच्या बाबत करावा लागतो. कुठल्याही तत्त्वांची कसोटी शेवटी मानवी जीवन आहे. त्या मानवी जीवनाची भौतिक परिस्थिती काय आहे, यावर बरेच काही अवलंबून असते. यासाठी आपण नेल्सन मंडेला यांचे उदाहरण घेऊ. मंडेलांवर गांधींचा प्रभाव होता आणि दक्षिण आफ्रिकेतील रंगभेदविरोधी लढ्यात त्यांनी अहिंसेचीच भूमिका घेतली होती; पण दक्षिण आफ्रिकेतील रंगभेदाने पछाडलेले गोरे राज्यकर्ते अगदी रानटी होते. त्यांनी शांततेच्या मार्गाने होणार्‍या आंदोलनाला काही वावच ठेवला नाही. जनतेला ठेचून काढणे हा एकच मार्ग वापरला. अशा वेळी काय करायचे असा प्रश्न मंडेला यांना पडला. त्यांच्या ‘स्वातंत्र्यासाठी दीर्घ वाटचाल’ या आत्मचरित्रात त्यांनी या प्रश्नाचा ऊहापोह केला आहे. अशा वेळी हत्यार हाती घेण्यापलिकडे पर्याय राहत नाही. त्यामुळे हिंसा हे कायमचे तत्त्व बनत नाही, तर ते विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून असते. शोषणाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी लोकशाही मार्ग उपलब्ध असतील, तर मग प्रश्न उरत नाही. हिंसेसाठी हिंसा हे तत्त्व होऊ शकत नाही, तर ती वर नमूद केल्याप्रमाणे विशिष्ट परिस्थितीमध्ये नाईलाजाने घेतली गेलेली भूमिका असते. त्यामुळे अहिंसेला बाधा येत नाही; उलट हिंसक प्रवृत्तीला विरोध असतो, जो अहिंसेच्या प्रस्थापनेसाठी गरजेचा ठरतो. इथे एक गोष्ट नमूद करायला हवी, ती म्हणजे जोवर समाजातील परस्परविरोधी हितसंबंधांचे झगडे मिटत नाहीत, तोपर्यंत हिंसेचा नायनाट करणे शक्य होणार नाही.

आता आपण सर्वांत महत्त्वाच्या वादग्रस्त विषयाकडे वळू. तो म्हणजे महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील राजकीय मतभेदांचा विषय. या मतभेदांचा केंद्रबिंदू आहे ‘पुणे करार.’ दलित जनतेसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावेत, या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला गांधीजींचा विरोध होता. त्यांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघ असावेत, असे वाटत होते; जेणेकरून सवर्ण आणि दलित जनतेत फूट पडणार नाही. निवडणुकीत त्यांना एकमेकांची गरज लागेल: जेणेकरून दलित प्रश्नाकडे लक्ष देतील आणि दलित-सवर्ण एकजूट वाढेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांंचे म्हणणे होते की, स्वतंत्र मतदारसंघामुळे दलित जनता सवर्ण मतदारांवर अवलंबून न राहता आपले खरेखुरे प्रतिनिधी निवडून देतील; परंतु संयुक्त मतदारसंघातून असेच प्रतिनिधी निवडून येतील, जे सवर्ण जनतेच्या मर्जीतील असतील. गांधीजींनी आपल्या भूमिकेसाठी नेहमीप्रमाणे उपोषणाचे हत्यार वापरले आणि दबाव निर्माण केला, त्यातून ‘पुणे करार’ अस्तित्वात आला. या करारानुसार दलित जनतेला स्वतंत्र मतदारसंघात मिळालेल्या जागांपेक्षा जास्त जागा मिळाल्या हे जरी खरे असले, तरी आज मागे वळून विचार करता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भीती खरी ठरली आहे. दलितांचे खरेखुरे प्रतिनिधी निवडून जाण्याऐवजी सवर्ण जनतेच्या मर्जीवर अवलंबून असणारे प्रतिनिधी निवडून जात आहेत. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही निवडून येता आले नाही, तर याऐवजी सवर्ण जनतेच्या मर्जीवर त्यांच्याविरोधात टुकार उमेदवार निवडून आले. असे असले तरी हा प्रश्न जातिव्यवस्थेच्या जटिलतेशी निगडित असल्यामुळे एकास एक निष्कर्ष काढणे अवघड बनते; परंतु केवळ प्रतिनिधित्वापुरता विचार करता आणि आजची वस्तुस्थिती पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत तथ्य होते, हे दिसून येते.

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील राजकीय मतभेदांचे मूळ जातिव्यवस्थेने निर्माण केलेल्या प्रश्नांकडे पाहण्याच्या दृष्टीत दिसून येते. बाबासाहेबांचा दृष्टिकोन विद्रोही मूलगामी, तर गांधींचा दयावादी स्वरुपाचा होता. या संदर्भात अनेक उदाहरणे देता येतील, ग्रामस्वराज्याची गांधींची कल्पना; यात जातिभेदभावाच्या वस्तुस्थितीकडे त्यांचे दुर्लक्ष होते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खेडी ही जातिरक्षणाचे किल्ले वाटतात आणि ते दलितांना शहरात येण्याचे आवाहन करतात. असे असले तरी इतर कुठल्याही सवर्ण भारतीय नेत्यापेक्षा गांधींनी जातिप्रश्नाकडे अधिक सहानुभूतीने, संवेदनशीलपणे पाहिले आहे, याची प्रचिती त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीत समाविष्ट करण्यासाठी धरलेल्या आग्रहात आपल्याला दिसून येते. यात केवळ बाबासाहेबांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेण्याची दृष्टी नाही, तर संपूर्ण दलित समाजाला राष्ट्रजीवनाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची राजकीय दृष्टी दिसून येते. ती किती यशस्वी झाली, याचा प्रत्यय आपल्याला दलित समाज भावनिक, वैचारिक, राजकीय पातळीवर किती घट्ट रीतीने राज्यघटनेशी जोडला गेला आहे, यावरून येतो.

महात्मा गांधींच्या संपूर्ण आयुष्याकडे बारकाईने पाहिल्यास नजरेत भरतो, त्यांचा साधेपणा. व्यक्तिगत स्वार्थाचा लवलेशही त्यांच्या कुठल्याही कृतीतून दिसून येत नाही. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते स्वत: एक आदर्श बनत, तशी कृती करत. प्रश्न व्यवस्थेतून निर्माण होतात, त्यांची सोडवणूक करण्यासाठी व्यवस्था बदलण्याची गरज असते; पण त्याऐवजी ते व्यक्तिगत आदर्श समोर ठेवतात. उदा. भारतीय जनतेला पुरेसे कपडे मिळत नाहीत, ती अर्धनग्न राहते; मग मीही तसा राहणार किंवा साफसफाईबद्दल स्वत:च्या कृतीतून आदर्श निर्माण करणारी भूमिका घेत; परंतु सर्व जनतेला कपडे कसे मिळतील आणि साफसफाईची जातीआधारित व्यवस्था कशी नष्ट होईल, या संदर्भात मूलभूत चिंतन त्यांच्या विचारांत दिसून येत नाही. असे असले तरी त्यांच्या व्यक्तिगत आदर्शाच्या भूमिकेला प्रश्न सोडवण्याच्या प्राथमिक पातळीवर खूप महत्त्व आहे. हा व्यक्तिगत आदर्शाचा वारसा अंगीकारत आपल्याला व्यवस्था बदलण्याचे राजकारण करता येईल. आज आपण अनेक असे पुरोगामी लोक पाहतो जे वेळ येते, तेव्हा व्यक्तिगत जीवनात असे आदर्श निर्माण करण्यात कच खातात. आंतरजातीय-आंतरधर्मीय लग्नांसंदर्भात आणि पिंडदान वगैरे धार्मिक विधींच्या संदर्भात हे प्रकर्षाने दिसून येते.

महात्मा गांधींचा माणूस म्हणून शोध घ्यायचा असेल, तर त्यांची आत्मकथा वाचावयास हवी, ज्यामध्ये त्यांनी सत्याला सामोरे जाण्याचा वस्तुपाठ सांगितला आहे. तोच वस्तुपाठ त्यांनी एका दीडदमडीच्या ब्राह्मणवाद्याच्या गोळ्या छातीवर झेलीत आयुष्याच्या अखेरपर्यंत पाळला आहे. त्यांना ‘आधुनिक संत’ म्हटले जाते आणि ते सर्वार्थाने खरे आहे. त्यांचे नेतृत्व निर्विवादपणे मान्य केले होते. सत्तेच्या कुठल्याही पदावर ते राहू शकत होते; परंतु स्वातंत्र्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर ते सत्तेच्या साठमारीत अडकले नाहीत; उलट फाळणीमुळे हिंसेची जी परिस्थिती उद्भवली ती सावरण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले. जातीप्रश्नाबद्दल, हिंदू-मुस्लिम प्रश्नांबद्दल त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल मतभेद होऊ शकतात; पण याबाबतीत त्यांच्या हेतूंबद्दल आपल्याला शंका घेता येणार नाही.

सत्य, अहिंसा, न्याय, नैतिकता, लोकशाही, शुद्ध आचरण, समता, स्वातंत्र्य यांचा आधुनिक काळात विचार करणारे, ही मूल्यं समाजजीवनात टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणारे गांधीजी आधुनिक काळातील संत आहेत. त्यांचे जीवन म्हणजे माणूस महात्मा कसा होतो, याचा आदर्श आहे. त्यांनी जी मानवी मूल्यं जपली, ती कालातीत स्वरुपाची मानवजातीच्या हिताची आहेत, तोच त्यांचा वारसा आहे, जो आजच्या जागतिक आणि भारतीय परिस्थितीत जपणे गरजेचे बनले आहे.