Categories
अभियान महिला

महिला सक्षमीकरणासाठी अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन अभियान

फेब्रुवारी – २०१५

अकोला येथे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या राज्य कार्यकारिणीत ठरल्याप्रमाणे ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने’ संपूर्ण महाराष्ट्रभर महिला सक्षमीकरणासाठी अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन अभियान राबविले. 3 जानेवारी या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मादिवसापासून ते 12 जानेवारी या जिजाऊ यांच्या जन्मदिनापर्यंत हे अभियान राबवण्यात आले. सदर लेखातून या अभियानाचा वृत्तांत देण्यात येत आहे.

अभियानाचे उद्घाटन व समारोप या कार्यक्रमासह राज्याच्या सहा महसूल विभागात सहा विभागीय मेळावे घेण्यात आले. इचलकरंजी (पश्चिम दक्षिण महाराष्ट्र), नाशिक (खानदेश), पालघर( कोकण), बीड (मराठवाडा), बुलडाणा (पश्चिम विदर्भ) व नागपूर (पूर्व विदर्भ) येथे हे मेळावे संपन्न झाले. अभियानाचे उद्घाटन इचलकरंजी येथे तसेच समारोप नागपूर येथे करण्यात आला. या निमित्ताने महाराष्ट्रभरातील अ.नि.स.च्या शाखांकडून स्त्रिया व अंधश्रद्धा या विषयी प्रबोधनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले, जेणेकरून पूर्ण राज्यात हे अभियान पोहचून महिलांच्या सक्षमीकरणासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कृतीशील संदेश देता येईल.

गृहिणी,शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनीअर, अंगणवाडी सेविका, परिचारिका, महिला पोलीस, होमगार्डस् अशा वेगवेगळ्या व्यवसायातील महिला, बचतगट, महिला मंडळे, युवती मंडळे, महाविद्यालयीन विद्यार्थिनी/युवती असे वेगवेगळे महिला गट, स्वच्छता कामगार, कचरा वेचक अशा असंघटीत क्षेत्रातील महिला, शरीरविक्रय करणार्‍या महिला, कारागृहातील महिला कैदी अशा विविध सामाजिक स्तरातील महिलांपर्यंत या निमित्ताने पोहोचता आले. फक्त कार्यक्रम न होता जास्तीत ज्यास्त महिलांना कामाशी जोडून घेण्याच्या उद्देशाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महिलांच्या सहभागाबरोबरच युवक व पुरुषांचाही सहभाग घेण्यात आला

कृती कार्यक्रम या अभियानाअंतर्गत विविध कृती कार्यक्रम राबवण्यात आले.

बाईच्या अंगात येणे,भूतबाधा होणे,बुवाबाजी, करणी, भानामती,देवदासी, डाकिण प्रथा, व्रतवैकल्य, स्त्रियांचे आरोग्य,श्रद्धा की कर्मकांड,स्त्रिया व मुलींवरील लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसा, मुलींचे घटते प्रमाण, इ. विविध विषयांवर वैज्ञानिक दृष्टीकोनासह मांडणी करणारी भाषणे. जोडीदार कसा निवडावा, जातपंचायत व स्त्रियांचे शोषण, अंधश्रद्धेमुळे होणारे महिलांचे शोषण यावर वैचारिक मांडणी करणारे व्याख्यान, जादूटोणा विरोधी कायदा स्त्रियांच्या शोषणमुक्ती व विकासासाठी कसा उपयुक्त आहे यावर काही प्रकरणासह केलेली मांडणी.सी.डी.दाखवणे व त्यावर चर्चा करणे (का?, प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे आणि इतर )

अंधश्रद्धा निर्मूलनात, व्यवस्था परिवर्तनात कृतीशील राहिलेल्या महिलांचे अनुभव कथन, त्यांची प्रकट मुलाखत. प्रश्नोत्तरे, मुक्तसंवाद, गटचर्चा, परिसंवाद, पथनाट्ये, स्फूर्तीगीते, समूहगीते,पोस्टर प्रदर्शन, रिंगणनाट्य. महिलांच्या कर्तृत्वाची माहिती देणारे, त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे पोस्टर प्रदर्शन, चित्रफिती, माहिती दाखवून त्यावरील चर्चा.

यापैकी जे कार्यक्रम घडवून आणणे संबंधित शाखांना शक्य झाले ते ते कार्यक्रम सदर शाखांनी आयोजित केले होते. प्रत्येक कार्यक्रमामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाच्या महिला जाहीरनाम्याचे वाचन करण्यात आले. या अभियानाच्या निमित्ताने महिलांनी स्वतःला अंधश्रद्धा निर्मूलनाचे अभिवचन द्यावे यासाठी संकल्पपत्र तयार करण्यात आलेले होते. कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या महिलांना संकल्पपत्रे भरण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये नमूद करण्यात आलेल्या संकल्पांपैकी जे संकल्प स्वीकारून आपण जन्मभर पार पडू शकू असे वाटत असेल त्या संकल्पांसमोर महिलांनी खूण केली.

अभियानाची दमदार सुरुवात इचलकरंजीच्या महिला परिषदेतून

या अभियानाची सुरवात 3 जानेवारी रोजी इचलकरंजी येथील सत्यनारायण मंगल कार्यालयामध्ये संवाद मेळावा घेऊन झाली. महिला व युवतींनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, दिवसभराच्या कार्यक्रमांतील वैविध्य, नेटके नियोजन, नियोजनात महिलांचा जाणीवपूर्वक सहभाग, अंनिसच्या तीन पिढ्यांतील कार्यकर्त्यांचा उत्कृष्ट समन्वय तसेच विविध समविचारी संस्था, संघटना यांचा सहभाग हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

जादूटोणा विरोधी कायदा, अंधश्रद्धा, वैज्ञानिक दृष्टिकोन इ. विषयांच्या पोस्टर्सची रमेश माणगावे, रेखा पाटील व फिनिक्स इन्फोटेकच्या युवक युवतींनी सुंदर मांडणी केली. नियोजित वेळेनुसार 1 वाजता परिषदेस सुरवात झाली. जिल्हा कार्याध्यक्ष सुनील स्वामी यांनी स्वागत केले. प्राचार्या सविता शेटे यांनी प्रास्ताविकपर बीजभाषण केले. या अभियानाच्या आयोजनाची भूमिका, महिलेस स्वतंत्र माणूस म्हणून दर्जाच्या संधीची समानता मिळण्याची आवश्यकता त्यातील अडथळे आणि त्यासाठीचा संघर्ष, परिवर्तनाचे आवाहन करणारे त्यांचे जोशपूर्ण भाषण सर्वांची दाद मिळवून गेले. ज्येष्ठ कार्यकर्त्या व माजी नगरसेविका बानुबी पठाण, टी.आर.शिंदे, शामराव नकाते यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. नारळ फोडण्याऐवजी नारळावर तूप ओतून नारळ पेटवणे आणि जळता कापूर खाणे या प्रयोगांचे सादरीकरण सुजाता म्हेत्रे यांनी केले आणि प्रांताधिकारी अश्विनी बिरंजे यांनी उद्घाटनाची औपचारिक घोषणा केली. अभियानास शुभेच्छा दिल्या आणि अंधश्रद्धेपासून मुक्त राहण्याचे महिलांना आवाहन केले. सरस्वती हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ‘डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका’ हे गीत अत्यंत सुंदरपणे सादर केले. यासाठी जितेंद्र कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. सावर्डेयेथील आंतरभारती विद्यालयाच्या शामबाला नलवडे या विद्यार्धिनीने ‘मी सावित्री बोलतेय’ हे स्वगत सादर केले. अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची गरज असून महिलांनी या चळवळीत सहभागी व्हावे आणि स्वत:स व कुटुंबास अंधश्रद्धेतून मुक्त ठेवावे’ असे आवाहन केले.

यानंतर भास्कर सदाकळे यांचा चमत्कार सादरीकरणाचा सदाबहार कार्यक्रम झाला. विविध प्रयोगातून त्यांचा ग्रामीण ढंग, उत्कृष्ट अभिनय, आवाज व संवाद फेकीवरील मांडणी याला उपस्थित महिलांनी प्रचंड दाद दिली. दुसर्‍या सत्राला रत्नदीप हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या सहगायनाने ‘आम्ही प्रकाश बीजे’ हे गीत सादर करून सुरवात झाली. मालती माने विद्यालयाच्या पालक शाखेच्या महिलांनी ‘खरा तो एकचि धर्म’ या गीतावर नृत्य सादर केले. यानंतर कोल्हापूर येथील वि.स.खांडेकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सत्यमेव जयते मधील महिला सक्षमीकरण गीतावर नृत्य सादर केले.

त्यानंतर उषा शहा(सोलापूर) यांनी ‘अंनिस संघटन व महिला सहभाग’ या विषयावर मांडणी केली. अंनिसची वैचारिक भूमिका, कार्यपद्धती, कृतिकार्यक्रम, महिलांचे कार्यक्रम, सहभागाची आवश्यकता याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महिलांकडून संकल्पपत्रे भरून घेण्यात आली. संकल्पपत्रे भरून महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला.

यानंतर इस्लामपूर शाखेने ‘सॉक्रेटिस ते डॉ.दाभोलकर व्हाया तुकाराम’ हे रिंगण नाट्य सादर करून संवाद मेळाव्यास एका उंचीवर नेऊन ठेवले. काळजाला भिडणारे संवाद आणि ‘माणूस मारला तरी विचार मरत नाही’ असा दिलेला संदेश हे या रिंगणनाट्याने जिवंत उभे केले. डोक्यात विचार पोहोचवणारा आणि डॉक्टरांच्या आठवणीने डोळ्यात पाणी आणणारा हा कार्यक्रम महिलांना प्रभावित करणारा ठरला.

ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या उपस्थितीत समारोपाचे सत्र झाले. ‘जग बदलाची ही चळवळ विस्तारातच जाणार आहे’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्र सेवा दलाच्या सैनिकांनी पडेल ते काम केले. आंतरभारती शिक्षण मंडळ, फिनिक्स इन्फोटेक, सोनाबाई चव्हाण ट्रस्ट, लक्ष्मीदत्त स्क्रीन प्रिंटर्स यांनी स्वत:चा कार्यक्रम समजून सर्वतोपरी सहकार्य केले. आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, ए.एस.सी.कॉलेज, जयवंत महाविद्यालय, जयवंत बी.एड.कॉलेज, ताराबाई गर्ल्स ज्युनि.कॉलेज, आंतरभारती हायस्कूल, सरस्वती हायस्कूल, रत्नदीप हायस्कूल, गंगामाई ज्युनि.कॉलेज, डी.के.टी.ई.इंजिनिअरिंग कॉलेज, शरद इन्स्टिट्युट, गोविंदराव हायस्कूल, के.एल.ई.डी.एड.कॉलेज, बाळासाहेब माने डी.एड.कॉलेज, रूकडी या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा व अध्यापकांचा मोठा सहभाग मिळाला. त्याचबरोबर इचलकरंजी, कोरोची, कबनूर परिसरातील महिला बचतगट, महिला मंडळे, महिला महासंघ, आझादहिंद मंडळ यांचे सहकार्य लाभले.

शोभा स्वामी, इचलकरंजी

मुंबई: अंधेरी एम.आय.डी.सी. मधील एका कारखान्यातील 30 ते 35 कामगार महिलांसाठी अलका चाफेकर व सुनीता ओक यांनी ‘स्त्रिया व अंधश्रद्धा’ या विषयावर कार्यक्रम सादर केला. गोरेगाव येथील अ. भि. गोरेगावकर शाळेतील सुमारे 30 ते 40 शिक्षकांबरोबर जादूटोणाविरोधी कायदा: आक्षेप व वस्तुस्थिती या विषयावर अलका चाफेकर व प्रभा पुरोहित यांनी संवाद साधला. बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यावरील महिलांसोबत या अभियानाच्या अंतर्गत संवाद साधण्यात आला.

पुणे: वाडिया कॉलेज पुणे येथे 200 विद्यार्थी- विद्यार्थिनीबरोबर मिलिंद देशमुख यांनी स्त्रिया व अंधश्रद्धा याविषयावर संवाद साधला तसेच दौंड येथे 250 अंगणवाडी सेविकांबरोबर मिलिंद देशमुख व नंदिनी जाधव यांनी स्त्रिया, अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायदा या विषयावर संवाद साधला.

कोल्हापूर: इचलकरंजी येथील विभागीय मेळाव्याव्यतिरिक्त वरंगे येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शाळेत सुजाता म्हेत्रे यांनी व कळे(पन्हाळा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सीमा पाटील यांनी माता पालक मेळाव्यात स्त्रिया व अंधश्रद्धा या विषयावर उपस्थित महिलांशी संवाद साधला.

जळगाव: अमळनेर येथे एस.एन.डी.टी.च्या महिला महाविद्यालयात 200 विद्यार्थिनींना कट्यारे सर व डबरे मॅडम (शिक्षणाधिकारी, प्रौढ शिक्षण) यांनी मार्गदर्शन केले. जळगाव येथील धनाजी नांना समाजकार्य महाविद्यालयात 300 विद्यार्थी- विद्यार्थिनींसमोर व लायन्स क्लबमधील 100 नागरिकांसमोर शहाजी भोसले यांनी चमत्काराची प्रात्यक्षिके सादर केली, कट्यारे सर व स्मिता शिरसाळे यांनी बचतगटाच्या 100 महिलांसमोर सप्रयोग व्याख्यानाचा कार्यक्रम सादर केला. पाचोरा येथील नवजीवन विद्यालयात रवींद्र चौधरी व ज्ञानेश्वर कोतकर यांनी मुलींसमोर सप्रयोग व्याख्यानाचा कार्यक्रम सादर केला. चाळीसगाव येथील मानसिक आरोग्य केंद्रात दर्शना सरला पाटील यांनी रुग्ण महिला, नातेवाईक व बचत गटातील 50 महिलांशी स्त्रिया व अंधश्रद्धा या विषयावर संवाद साधला, सचिन पाखले यांनी शाळेतील विद्यार्थिनींसमोर सप्रयोग व्याख्यानाचा कार्यक्रम सादर केला. डॉ. अयुब पिंजारी यांनी चोपडा येथे मुलींच्या उर्दू शाळेत 300 मुलीसमोर व हातेड येथे मराठी शाळेत 200 मुलींसमोर सप्रयोग व्याख्यानाचा कार्यक्रम सादर केला. असे एकूण नऊ ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.

नगर: साकूर येथे 1500 महिला व संगमनेर येथे 800 महिलांसमोर रव रंजना गवांदे यांचे स्त्रिया व अंधश्रद्धा या विषयावर व्याख्यान झाले. श्रीगोंदा येथील छत्रपती महाविद्यालयातील 200 विद्यार्थी विद्यार्थिनींसमोर मिलिंद देशमुख यांनी चमत्कार प्रात्यक्षिके सादर करून जादूटोणाविरोधी कायदा या विषयावर संवाद साधला तसेच तेथील व्याख्यानमालेत 250 श्रोत्यांसमोर स्त्रिया व अंधश्रद्धा या विषयावर व्याख्यान दिले. असे एकूण तीन कार्यक्रम घेण्यात आले.

रत्नागिरी: दापोली येथे सुमारे 800 महिलांसमोर वंदनाताई शिंदे यांचा सप्रयोग व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरी येथे विनोद वायंगणकर यांनी सुमारे 45 अंगणवाडी सेविकांबरोबर स्त्रिया आणि अंधश्रद्धा या विषयावर संवाद साधला.

रायगड: म्हसळा शाखेतील विनयकुमार सोनावणे आणि संतोष जाधव यांनी भांदाटणे,म्हसळा,पाष्टी आणि काळसुरी येथील महिला मंडळांतील महिलांसमोर सप्रयोग व्याख्यानाचे कार्यक्रम सादर केले.

नवीन पनवेलमध्ये पी.बी.हांडे, डॉ.टी.आर. भंडारी व प्रियांका हांडे यांनी 2 कार्यक्रम सादर केले, माणगाव येथील मुद्रे गावच्या महिला मंडळामध्ये नूरखान पठाण यांनी कार्यक्रम सादर केला. पेण तालुक्यातील वरसई गावातील सी. एफ. आय. या संस्थेमध्ये आरती नाईक व मनोहर तांडेल यांनी कार्यक्रम सादर केला.

पनवेल तालुक्यात आरती नाईक, महेंद्र नाईक व मनोहर तांडेल यांनी खांदा कॉलनी, ग्रामस्थ मंडळ साई, ग्रामस्थ मंडळ केळवणे, माध्यमिक विद्यालय व ग्रामस्थ मंडळ भाताण, नवशक्ती सोसायटी खोपोली, ग्रामस्थ मंडळ लोणीवली, मोहोदर व आदिवासीवाडी, लायन्स क्लब नागोठणे, असे एकूण आठ ठिकाणी स्त्रिया व अंधश्रद्धा या विषयावर कार्यक्रम सादर केले. कळंबोली येथे आल्हाट मॅडम, संध्या गजभिये यांचे व्याख्यान व पिंपरी चिंचवडचा रिंगणनट्याचा प्रयोग सादर झाला. तटकरे कॉलेज, तळा येथे सावित्रीबाई फुले यांच्या चरित्राचे सामुहिक वाचन करण्यात आले. अलिबाग शाखेच्या फुलगावकर मॅडम, जेधे मॅडम व नितीन राऊत यांनी जिल्हा तुरुंगातील महिला कैदी, खंडाळा हायस्कूल, जा.र.ह.कन्याशाळा अलिबाग, पी.एन.पी.हायस्कूल वायशेत, जिल्हा रुग्णालय अलिबाग, परिचारिका प्रशिक्षण शिबीर अलिबाग अशा एकूण सहा ठिकाणी कार्यक्रम सादर केले. रायगड जिल्ह्यातील सर्व शाखांनी मिळून एकूण सर्वात जास्त म्हणजे 18 कार्यक्रम घेतले, या कार्यक्रमातून सुमारे 2300 महिलांपर्यंत पोहोचता आले. सुमारे 750 संकाल्पपत्रे भरून घेण्यात आली.

सोलापूर: सोलापूर शहरामध्ये 30 ते 35 सफाईकामगार महिला व देहविक्रय करणार्‍या महिलांशी उषा शहा, निशा भोसले, अंजली नानल, नभा काकडे व डॉ. सुरेश व्यवहारे यांनी संवाद साधला. महिलांनी स्वतःचे अनुभव सांगितले व त्यावर चर्चा झाली. समाजकल्याण आयुक्त मनीषा फुले या कार्यक्रमाच्या उद्घाटक होत्या, त्यांनी या कामाला जोडून घेण्याचे आश्वासन दिले.

ठाणे: सफाळे येथे 100 शिक्षकांचा संवाद -मेळावा अंतर्गत कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे नियोजन. दीपक भाते यांनी केले होते. आगरवाडी, सफाळे येथे एकूण 400 युवक व युवतींच्याबरोबर स्त्रिया आणि अंधश्रद्धा या विषयावर संवाद साधला. अंबरनाथ येथे 2 कार्यक्रम झाले. अंबरनाथ येथील महिला मेळाव्यास राज्य प्रधान सचिव माधव बावगे व जात- पंचायत विरोधी लढा देणार्‍या दुर्गा गुडिल उपस्थित होत्या, तर दुसर्‍या कार्यक्रमास स्थानिक महिला नगरसेवक व ठाणे जिल्हा डी. सी.पी.जाधव हजर होते. भिवंडी, डोंबिवली व वाशी येथे प्रत्येकी एक असे एकूण नऊ कार्यक्रम झाले. सर्वच ठिकाणी संकल्प पत्रे भरून घेण्यात आली. सहा हजार रुपयांची पुस्तक विक्री झाली.

सातारा सातारा शहरात दोन, पाचवड, औंध, शेंद्रे, पिंपरी(रहिमतपूर) असे मिळून एकूण सहा कार्यक्रम घेण्यात आले. प्रशांत पोतदार, प्रा. प्रमोदिनी मंडपे, कुमार मंडपे, डॉ. शैला दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, भगवान रणदिवे, श्रीनिवास जांभळे यांनी सदर कार्यक्रमात मार्गदर्शन केले.

लातूर : करणी, भानामती व जादूटोणारूपी बेड्या तोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमासाठी सुनिता आरळीकर, अ‍ॅड.रंजना गवांदे, माया सोरटे, वैजनाथ कोरे, शिवाजी खादीवाले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आंतरजातीय विवाह करणार्‍या लोहारा येथील तहसीलदार ज्योती चव्हाण व माणगाव येथील शिक्षिका तृप्ती अंधोरे यांची या निमित्ताने मुलाखत घेण्यात आली. बाबा हलकुडे व रूक्साना यांनी चमत्कार सादरीकरण केले. उपस्थितांचे सहा गट करून गटचर्चा घेण्यात आली. राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथील विवेकवाहिनीच्या विद्यार्थ्यांनी ‘शहाणपण संविधानाचे’ हे पथनाट्य सादर केले. अंनिसच्या महिला जाहिरनाम्याचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

जालना : बारवाले महाविद्यालय, दानकुंवर महिला महाविद्यालय, मत्स्योदरी महिला महाविद्यालय, जिजामाता विद्यालय व भाग्योदयनगर येथील एकूण 1050 विद्यार्थी-विद्यार्थिनींशी पाच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. मा.अविनाश पाटील, शहाजी भोसले, कमल इंगळे, महिला बालविकास अधिकारी, नगराध्यक्ष रत्नपारखी इ.मान्यवर उपस्थित होते.

नांदेड : विज्ञान महाविद्यालय, बुद्ध विहार-श्रावस्तीनगर, धरती नर्सिंग स्कूल, कोतेश्वर राजी, ता.अर्धापूर, जांभरूण, ता.लोहारा या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमांतून सुमारे 800 महिलांशी संवाद साधण्यात आला.

हिंगोली : मस्तानशाहनगर येथील झोपडपट्टीतील 100 महिलांबरोबर स्त्रिया व अंधश्रद्धा या विषयावर स्थानिक कार्यकर्त्यांनी संवाद साधला.

बुलढाणा : संवाद मेळावा रविवार दि.11 जानेवारीला बुलढाणा येथे घेण्यात आला. ‘स्त्री-पुरूष तुलनाकार ताराबाई शिंदे’ यांच्या बुलढाणा येथील वाड्यावर अभिवादन करून लेझीम पथकासह बुलढाणा जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांच्या महिला पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत प्रबोधन दिंडी काढण्यात आली. या प्रबोधन दिंडीमध्ये ताराबाई शिंदे, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहब, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी इ. च्या सुंदर वेशभूषा काही बालिकांच्या होत्या. कार्यक्रमस्थळी भारताच्या संविधानाला अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष म.अं.नि.स.होते. मेळाव्याच्या उद्घाटक म्हणून अ‍ॅड.मुक्ता दाभोलकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. तसेच याप्रसंगी राज्य कार्यवाह महिला विभाग डॉ.प्राचार्या सविता शेटे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभल्या होत्या. मेळाव्याचे प्रास्ताविक नरेन्द्र लांजेवार यांनी केल्यानंतर मेळाव्याच्या आयोजनामागील सविस्तर भूमिका प्राचार्या सविता शेटे यांनी विषद केल्यावर स्थानिक आमदार हर्षवर्धन सपकाळ(बुलढाणा) आणि चिखलीचे आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी महाराष्ट्र अंनिसच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची ग्वाही त्यांच्या मनोगतातून दिली. मअंनिसच्या वतीने चिखलीचे आमदार राहुलभाऊ बोंद्र यांनी विधानसभेमध्ये अंनिसचे विधेयक पास होण्यासाठी जी कणखर भूमिका घेतली होती, त्याप्रित्यर्थ त्यांचा अविनाश पाटील यांच्या हस्ते या मेळाव्यात सत्कार करण्यात आला. अ‍ॅड.मुक्ता दाभोलकर यांनी उपस्थित महिलांना अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत मार्गदर्शन केले. मुक्ता दाभोलकरांच्या मार्गदर्शनानंतर शहाजी भोसले यांनी चमत्कारांचे प्रात्यक्षिक सादर करून जनजागृती केली. अविनाश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात अनेक वर्षांपासून बुलढाणा शहरात अंनिसचं काम उभं राहण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला भविष्यात चांगलं यश प्राप्त होईल हा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचालन प्रा.मृणालिनी सपकाळ यांनी तर आभार प्रदर्शन शाहिना पठाण यांनी केले. या परिषदेस शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार प्रामुख्याने उपस्थित होते. तीन तास चाललेल्या या महिला परिषदेत दीडशेपेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या.

नागपूर : 1. दि. 3 जानेवारी 2015 ला मौदा येथे अभियानाचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित केला गेला. या कार्यक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त महिला सक्षमीकरण बाबत प्रा.जोगेन्द्र कवाडे यांचे अध्यक्षतेखाली सामाजिक कार्यकर्त्या शैल जैमिनी यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी आंतरजातीय विवाह करणार्‍या 20 जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राजकमल तिडके विद्यालय, मौदा येथील विद्यार्थ्यांच्या चमूतर्फे बुवाबाजीसंदर्भात प्रबोधन करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात आले.

2. दि.5 जानेवारी 2015 ला सायंकाळी 6 वाजता नागपूर जवळील बोखारा(कोराडी रोड) या गावी राजू मोटघरे यांचे गृहप्रवेश प्रसंगी कोणतीही पूजापाठ न करता ‘चमत्कार सत्यशोधन आणि प्रबोधन’ या विषयावर कार्याध्यक्ष मधुकर धंदरे यांनी प्रात्यक्षिकासह कार्यक्रम सादर केला. तसेच अ‍ॅड.गंगाधर इंगळे यांनी जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती सांगितली. प्रास्ताविक चंद्रकांत श्रीखंडे यांनी केले. राज्य सरचिटणीस डॉ.सुनील भगत, उत्तर नागपूर शाखा अध्यक्ष रामभाऊ डोंगरे, कार्याध्यक्ष गौतम हेंदरे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी आगळावेळा कार्यक्रम सादर केल्याबद्दल उपस्थित मित्रमंडळींनी राजू मोटघरे यांचे कौतुक केले.

3. दि.8 जानेवारी 2015 ला वुमेन्स कला, वाणिज्य महाविद्यालय, नंदनवन येथे म.अं.नि.स. नागपूर जिल्हा शाखेतर्फे प्रबोधन अभियान कार्यक्रम झाला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय शेंडे यांनी प्रास्ताविक केले आणि राज्य सरचिटणीस गजेन्द्र सुरकार यांनी महिला आणि अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायद्याबद्दल मार्गदर्शन केले. संचालन डॉ.दीपक पवार विभागप्रमुख समाजशास्त्र यांनी तसेच प्राचार्य डॉ.दिक्षीत यांनी अध्यक्षीय भाषण केले. म.अं.नि.स.चे प्रा.सुशील मेश्राम आणि प्रा.जयेन्द्र पेंडसे यांच्यासह कार्यक्रमास 90 विद्यार्थिनींचा सक्रिय सहभाग होता.

4. दि. 8 जानेवारी 2015 रोजी महिला महाविद्यालय न्यु.नंदनवन येथे महिला आणि अंधश्रद्धा तसेच जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर राज्य सरचिटणीस गजेन्द्र सुरकार यांनी 100 विद्यार्थिनींसमोर प्रबोधन केले. अ‍ॅड.इंगळे यांनी जादूटोणा कायद्याची माहिती दिली. प्रा.केशव मेंढे-मराठी विभागप्रमुख यांनी केले.

5. दि.9 जानेवारी 2015 रोजी श्रीनिकेतन कला, वाणिज्य महाविद्यालय, रेशीमबाग, नागपूर येथे महिला सक्षमीकरणासाठी अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन कार्यक्रमांतर्गत गजेन्द्रजी सुरकार तर्फे 120 मुलांमुलींसमोर व्याख्यान केले. याप्रसंगी जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती व प्रबोधन करण्यात आले. संचालन प्रा.मुरलीधर गवळी-मराठी विभागप्रमुख यांनी तसेच अध्यक्षीय भाषण प्राचार्य जॉर्ज ऑगस्टीन यांनी केले.

6. दि.9 जानेवारी 2015 रोजी शुक्रवारी विदर्भ इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज(व्ही.आय.टी.कॉलेज) उमरेड रोड येथे मधुकर धंदरे यांनी विविध चमत्काराचे सादरीकरण करून त्यामागील वैज्ञानिक सत्य समजावून सांगितले अ‍ॅड.गंगाधर इंगळे यांनी जादूटोणा विरोधी कायद्याबाबत तसेच म.अं.नि.स.च्या कार्याबाबत उपस्थित 150 विद्यार्थ्यांना माहिती दिली.

मराठवाडा : मराठवाडास्तरीय संवाद मेळावा बीड येथे दि.10 जानेवारी 2015 शनिवार रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे झाला.

राज्य महिला सहभाग विभाग कार्यवाह सविता शेटे यांनी प्रास्ताविकातून संवाद मेळावा आयोजनाबाबत माहिती दिली. प्रमुख पाहुणे आशा मडके यांनी आपल्या मनोगतातून शोषित, पीडित महिलांसाठी कार्य करताना आलेल्या अडचणी, अनुभव कथन केले. कॉ.नामदेव चव्हाण यांनी नवीन पिढीने विज्ञानाच्या दृष्टिकोनातून भोंदूगिरीकडे पाहणे आणि तरूणांनी चळवळीत सहभागी होऊन कार्य करण्याची गरज व्यक्त केली. अ‍ॅड.मुक्ता दाभोलकर यांनी आपल्या मांडणीतून महिला आणि अंधश्रद्धा या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांमध्ये आढळणार्‍या अनेक अंधश्रद्धांवर प्रकाश याप्रसंगी टाकला. विवेकवादी समाज निर्माण झाला, तरच देशाची वाटचाल विकासाकडे होईल, प्रत्येक गोष्टीमागचे विज्ञान, कार्यकारणभाव समजून घेण्याची गरज या मार्गदर्शनातून व्यक्त केली. मअंनिस कार्यकर्ते हेमंत धानोरकर यांनी चमत्काराचे प्रयोग सादर केले. मअंनिस बीड शाखेचे कार्याध्यक्ष विजय घेवारे यांनी याप्रसंगी उपस्थितांना संघटन व महिला सहभागासाठी आवाहन केले. यात सभासद नोंदणी, वार्तापत्र वर्गणीदार होणे, अंनिस प्रकाशन ग्रंथ व डॉ.दाभोलकर लिखीत ग्रंथ खरेदी करणे आणि महिलांकडून भरून घेण्यात येणार्‍या संकल्प पत्राबाबत माहिती दिली.

या संवाद मेळाव्यात उपस्थितांना डॉ.नरेंद्र दाभोलकरांची “प्रश्न तुमचे-उत्तर डॉ.दाभोलकरांचे” ही सी.डी.दाखविण्यात आली. यावेळी सभागृहात डॉ.दाभोलकरांनी दिलेल्या प्रत्येक प्रश्नांच्या उत्तराचा सर्वांनी त्यांची आठवण करीत हृदयस्पर्शी वातावणात लाभ घेतला यासाठी महादेव निर्धार यांनी तांत्रिक सहाय्य केले. संवाद मेळाव्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महिला जाहिरनाम्याचे वाचन शाखेच्या कार्यकर्त्या अर्चना वाघमारे यांनी केले.

“सॉक्रेटिस ते डॉ.दाभोलकर व्हाया संत तुकाराम’ हे रिंगणनाट्य अंनिस लोकरंगमंच, शाखा इस्लामपूर यांनी सादर केले. उपस्थितांनी, अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या रिंगणनाट्यास दिला.

संकल्पपत्र संकलन

या संवाद मेळाव्यात 400 महिलांनी संकल्पपत्र भरून दिले. या अंतर्गत महिलांनी पुढील संकल्प स्वीकारले.

1) मी दैववाद नाकारेन, प्रयत्नवाद स्वीकारेन, वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरीन – 76 महिला

2) मी कोणत्याही कारणासाठी मांत्रिक, बाबाबुवाकडे जाणार नाहीह – 118 महिला

3) मी कर्मकांडे, व्रतवैकल्याचा अवलंब नाकारून माझा वेळ, श्रम, पैसा, बुद्धी कुटुंबाच्या, स्वत:च्या व समाजाच्या विकासासाठी उपयोगात आणीन. – 119 महिला

4) मी माझ्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेईन. -137

5) मी साध्या, कमी खर्चाच्या विवाहाचा पुरस्कार करीन.-65

याप्रसंगी बेटी बचाव, स्त्री भ्रुणहत्या, महिलांवरील अत्याचार याबाबत माहिती देणारे पोस्टर प्रदर्शन मांडण्यात आले. महिला सक्षमीकरणाचा संदेशही पोस्टर्स मधून देण्यात आला. कार्यक्रमास आलेल्या सर्व महिला, तरूण वर्ग व विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहिले.

कला, विज्ञान, वाणिज्य, डी.एड., बी.एड., विधी, संगणक, नर्सिंग, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी, युवक, युवती, शाळा-गुरूकुल-वसतिगृहातील विद्यार्थी, माविमच्या सहयोगीनी, बचत गटाच्या महिला, ग्रामीण व शहरी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी सेविका व मदतनीस, महिला होमगार्डस, पोलीस, घरकाम करणार्‍या महिला, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इतर स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, म.अं.नि.स.चे कार्यकर्तेआणि गृहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

“हम होंगे कामयाब” या गीताने या संवाद मेळाव्याची सांगता करण्यात आली.

कोकण : महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत कोकण विभागाचा विभागीय मेळावा पालघर, तालुका,जिल्हा पालघर येथे 10 जाने रोजी संपन्न झाला. सोनोपंत दांडेकर कला महाविद्यालय पालघर येथील सुमारे 250 विद्यार्थिनी व प्राध्यापक या मेळाव्याला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हेमंत पेडणेकर होते; तसेच ठाणे जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष सुरेखा भापकर, जिल्हा सचिव अण्णा कडलास्कर, जात-पंचा यत मूठमाती अभियान प्रमुख कृष्णा चांदगुडे, मअंनिसच्या राज्यप्रधान सचिव सुशीला मुंडे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. ठाणे जिल्हा पदाधिकारी प्रा.रंगनाथ गडरी यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .सुशीला मुंडे यांनी ‘स्त्रिया व अंधश्रद्धा’ ह्या विषयावर मांडणी करताना सक्षमीकरणाची गरज, स्त्रीच्या शरीरावर तिचा प्रथम अधिकार, निर्णयक्षम बनणे, व्रत- वैकल्ये, निराधार रूढी, मानसिक गुलामगिरी इ. मुद्दे मांडले; तर सुरेखा भापकर यांनी ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हा तरुणींचा आवडता विषय सहज सोप्या भाषेत मांडून या विषयाची नितांत गरज असल्याचे जाणवून दिले. कृष्णा चांदगुडे यांचे अनुभव कथन मुलींना विचार करायला लावणारे होते. अंधश्रद्धा निर्मूलनाचे स्वतंत्र शिबीर घेण्याचे प्राचार्यांनी मान्य केले. सर्व सहभागींनी संकल्प पत्रे भरून दिली. श्रीप्रसाद खुळे यांनी आभार मानले.

नाशिक : नाशिकचा विभागीय मेळावा शासकीय अध्यापिका विद्यालयात पार पडला. यानिमित्ताने प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. अंधश्रद्धा हा विकास प्रक्रियेतील मोठा अडथळा असतो. स्त्रियांच्या विकासात त्यांचा मोठा अडसर असतो. अंधश्रद्धेच्या सर्वाधिक बळी तसेच वाहक महिलाच असतात. स्त्रीचे गौणत्व व पुरूष प्रधान व्यवस्थेचे प्राबल्य अजूनही अस्तित्वात आहे. महिला सक्षम होणे ही काळाची गरज आहे. अंधश्रद्धेचा अडसर डोळसपणे व कृतीशिलतेतून दूर करून वेळ, श्रम, पैसा, कौशल्य मानवी साधन यांचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. संत आणि समाजसुधारकांच्या कृतीशील विचारांचा वारसा पुढे नेऊ या स्त्रिच्या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे” असे आवाहन अंनिसचे सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे व जिल्हा सचिव सुधीर धुमाळ यांनी केले. ‘महिला संबंधीचे प्रचलित कायदे व वास्तव’ यावर अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड.रंजना गवांदे यांनी संवाद साधला. प्रा.सरोज जगताप यांनी प्रास्ताविक केले व हर्षला यांनी आभार मानले.

महिला सक्षमीकरणासाठी अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन अभियानाचा नागपूरात समारोप

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर जिल्हा शाखा आणि सेवादल महिला महाविद्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.12 जानेवारी 2015 रोजी सेवादल सभागृह, नागपूर येथे महिला सक्षमीकरणासाठी राज्यव्यापी अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन अभियान समारोप कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाला अध्यक्ष मा.शैल जैमिनी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, उद्घाटक मा.डॉ.रूपाताई कुलकर्णी- प्रसिद्ध परिवर्तनवादी कार्यकर्त्या, प्रमुख पाहुणे मा.अविनाश पाटील(धुळे) राज्य कार्याध्यक्ष म.अं.नि.स., मा.प्राचार्या सविता शेटे(बीड), राज्य कार्यवाह महिला सहभाग विभाग म.अं.नि.स., मा.केशवरावजी शेंडे-ज्येष्ठ संस्थापक सेवादल शिक्षण संस्था, नागपूर, मा.डॉ.प्रविण चरडे-प्राचार्य सेवादल महिला महाविद्यालय, नागपूर, मा.शहाजी भोसले-राज्य सरचिटणीस, म.अं.नि.स., मा.गजेंद्र सुरकार-राज्य सरचिटणीस म.अं.नि.स., मा.संजय शेंडे-जिल्हाध्यक्ष नागपूर म.अं.नि.स., मा.रूबिना पटेल – अध्यक्ष, मुस्लीम महिला मंच प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.संजय शेंडे यांनी तर पाहुण्यांचा परिचय आणि प्रबोधनात्मक गीत गजेंद्र सुरकार यांनी सादर केले.

मा.डॉ.रूपाताई कुलकर्णी यांनी स्त्रींची पूर्वापार चालच आलेली पराधिनता आणि वास्तव परिस्थिती सांगून सेवादल शिक्षण संस्था सामाजिक सेवेच्या पुढे जाऊन वैचारिक सेवेचे व्रत जोपासत परिवर्तनशील विचार प्रसारीत करण्याचा उपक्रम प्रशंसनीय आहे. मा.रूबिना पटेल यांनी हुंडाबळी आणि पुरूषप्रधान संस्कृती यावर भाष्य करून भेदाभेद, विधवा स्त्रियांकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन यासंबंधीची मानसिकता बदलविण्याची गरज आहे असे सांगितले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात मा.शैल जैमिनी यांनी महिला आणि समाजवास्तव, सक्षमीकरण आणि जबाबदारी यावर सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक क्षेत्रातील प्रसंग सोदाहरण पटवून दिले व स्त्रियांनी आत्मविश्वास जोपासावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाला विविध महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक व महाराष्ट्र अंनिसची शहर कार्यकारिणी तसेच विविध परिवर्तनवादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संजय शेंडे

संकलन : मुक्ता दाभोलकर