Categories
कायदा महिला

महिलाविषयक कायदे…

जून – २०११

            मागील लेखात आपण दिवाणी कायद्यातील महिला विषयक तरतुदीचा आढावा घेतला. तेव्हा लक्षात आले की, धर्माप्रमाणे दिवाणी कायद्यामध्ये थोड्याबहुत तरतुदी वेगवेगळ्या आहेत. मात्र फौजदारी कायद्यामध्ये असे नाही. सर्व जाती-धर्मातील महिलांसाठी फौजदारी कायदे समान आहेत. ही आपण पुरोगामी चळवळीच्या सर्व कार्यकर्त्याने विशेष करून लक्षात ठेवण्याची गरज आहे. तरीही काही वेळा प्रतिगामी शक्ती व चळवळी बुद्धीभेद करून या देशात अल्पसंख्यांक समाजाचे लाड होतात असे सांगतात तसा वाद-प्रतिवाद घालतात. म्हणून हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यांच्याकडे या संदर्भात एक चपखल उदाहरण आहे. ते वारंवार वापरले जाते. शहाबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने तिला तिच्या पतीकडून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 125 प्रमाणे पोटगी देण्यावर शिक्का मोर्तब केले. तिच्या नवर्‍याची या जबाबदारीतून मुक्तता करण्यासाठी फौजदारी कायद्यात बदल करून फौजदारी कायदा कलम 125 प्रमाणे पतीची जबाबदारी वक्फ बोर्डसारख्या धार्मिक संघटनेवर टाकण्यात आली, ही गोष्ट आहे. पण या तरतुदीचा वापर देशभरात फारच अल्प, अगदी नगण्य प्रमाणात मुस्लीम पतीने केला आहे. अशी माहिती पुरोगामी संघटना मुस्लीम सत्यशोधक मंडळाकडे उपलब्ध आहे. हा अपवाद आहे. पण त्यावरून सरसकट विधान करून बुद्धीभेद केला जातो. हे ध्यानात घ्यावे. वाचकांना शहाबानो प्रकरणाची सविस्तर माहिती असल्यास त्यांनी स्वतंत्रपणे माझ्याशी संपर्क करावा.

            भारतीय दंडविधान या देशातल्या सर्वात मोठ्या फौजदारी कायद्याची माहिती आपण यापूर्वी घेतली आहे. त्यामधील महिला विषयक तरतुदी माहिती करून घेण्याचा प्रयत्न याठिकाणी आपण करणार आहोत.

            ज्याप्रमाणे फौजदारी कायदे सर्व धर्मासाठी समान आहेत. त्याचप्रमाणे त्यामधील सर्व तरतुदी स्त्री-पुरूषांसाठी समान आहेत. पण तरीही काही तरतुदी खास स्त्रियांसाठी आहेत. आपल्या देशातले सर्वच कायद्यामध्ये स्त्रियांचा वेगळा विचार केलेला दिसतो. त्याची कारणे आपण यापूर्वी पाहिली आहेत. या कायद्यात तसाच अनुभव येतो.

            स्त्रीचे शील हे वेगळे व मौल्यवान आहे. म्हणून तिच्या शिलाचा भंग झाला की, त्यासंदर्भातला गुन्हा होतो. स्त्रीला पळवून नेणे, तिच्यावर बलात्कार करणे, पती किंवा त्याचे नातेवाईकांकडून छळ, विनयभंग, स्त्रीला शब्दरूपाने अपमानीत करणे वगैरे गन्हे याबाबत आहेत. बलात्काराचा तपशील वेगवेगळ्या कलमांखाली अंकित केला आहे. ‘बुवा तेथे बाया’ या वाक्याचा नाटकाचा प्रयत्न आपणाला अनेक ठिकाणी येतो. अशा बुवाविरूद्ध पोलिसांत तक्रार देतांना त्याने बलात्कार केला आहे याचा विसर पडता कामा नये. निदान या बुवाने स्त्री भक्तांचा विनयभंग केला आहे.  तिला पळवून नेले आहे. वगैरे गुन्हे नक्कीच केलेले असतात. अर्थात अशा गुन्ह्याची फिर्याद ही जी बाई प्रत्यक्ष बळी पडली आहे तिनेच देणे अधिक योग्य आहे. पूर्वी नमूद केल्याप्रमाणे आरोपीला शिक्षा होण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

            सध्या समाजात स्त्रीचे असलेले स्थान, वैवाहिक स्थिती तिचे कुटुंबातील प्रतिष्ठा वगैरेचा विचार करता भारतीय दंड संहितेमधील तरतुदी पुरेशा नाहीत. म्हणून आणखी स्वतंत्र कायदा 2005 खाली केंद्र सरकारने केला आहे. याची सविस्तर माहिती आपण पुढच्या लेखात घेणार आहोत.

– अ‍ॅड. देवीदास वडगावकर

  मो. 9423073911