आपले मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी स्वत:कडे अंतर्मुख होऊन पाहण्याची गरज याविषयी आपण मागच्या लेखात पाहिला; पण खरी पंचाईत ही असते की, स्वत:ला अंतर्मुख होऊन तपासायचं म्हणजे काय करायचं, हेच अनेकांच्या लक्षात येत नाही. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करताना अशा अनेक व्यक्ती भेटतात की, ज्यांना या क्षणी आपल्याला नक्की काय वाटतं आहे, हे नीट सांगताच येत नाही. ‘काहीतरी विचित्र वाटतंय,’ ‘नुसतीच उलघाल होतेय’, ‘माझा स्वत:वरचा ताबा सुटतोय की काय असं वाटतंय’ अशा संदिग्ध भाषेमध्ये भावनिक अस्वस्थता सांगितली जाते. मात्र एवढं शब्दात मांडता आलं तरी बरं, असं म्हणावं अशी अवस्था आपल्या समाजात खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर अनेक शोधनिबंधांमध्ये असं दिसून आलंय की, आशियाई उपखंडातील लोक, हे स्वत:ची भावना ओळखणं व शब्दात मांडणं याबाबतीत बरेच कमी पडतात. त्या मानाने पाश्चिमात्य देशातील लोकांना हे कौशल्य अधिक आहे.
‘आपल्या लक्षात आलं नाही’ आणि ‘आपण बोलून दाखवलं नाही’ म्हणून मनामध्ये भावनांची स्पंदनं व्हायची थांबत नाहीत. शाळेत अभ्यास केला नाही म्हणून सर ओरडतात आणि मुलाला ‘राग’ येतो. पती घरात काहीच लक्ष देत नाहीत म्हणून पत्नीला खूप ‘एकटं-एकटं व हताश’ वाटतं. आर्थिक मंदीमुळे आपली नोकरी जाणार तर नाहीना, अशा विचाराने ‘भीती’ वाटते. राग, हताशपणा, भीती अशा नकारार्थी भावना आणि प्रेम, आपुलकी, जिव्हाळा यासारख्या होकारार्थी भावना आपल्या मनात येत असतात; पण आपण जेव्हा त्यांच्या अस्तित्वाविषयी पुरेसे जागरूक नसतो आणि त्या व्यक्त करण्याविषयी पुरेसे सतर्क नसतो, तेव्हा त्या मनात तशाच साठून राहतात आणि वेगवेगळ्या शारीरिक तक्रारींच्या माध्यमातून व्यक्त होतात. ज्याला कुठलेही शारीरिक कारण सापडत नाही, अशा स्वरुपाची डोकेदुखी, कंबरदुखी, अंगदुखी अशी अनेक दुखणी आपल्या समाजातील व्यक्ती मोठ्या प्रमाणात वागवत असतात.
आपल्याला होणारा त्रास हे मानसिक अस्वस्थतेचं लक्षण आहे, हेच मुळात जाणवत नसल्याने भावनिक स्वमदत ही तर खूपच लांबची गोष्ट होते. ज्याप्रमाणे काही लोकांना दृष्टीमध्ये रंगांधळेपणा असतो व लाल, निळा अशा प्रकारचे रंगच व्यवस्थित समजू शकत नाहीत, त्याप्रमाणे या लोकांना भावनिक रंगांधळेपण असतं. एक आनंदाची गोष्ट अशी की, भावनिक आंधळेपण ही कधीही न बदलता येणारी गोष्ट नाही. जाणीवपूर्वक प्रयत्न केले, तर स्वत:विषयी अधिक सजग होता येतं.
भावनिक सजगता वाढवण्याचं सर्वांत प्रभावी साधन म्हणजे ‘भावनिक रोजनिशी!’ दिवसात घडलेल्या घटनांची नोंद ठेवणार्या रोजनिशीपेक्षा ही भावनांची रोजनिशी जरा वेगळी आहे.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला भावनांची अनेक आंदोलने जाणवत असतात; काही छोटी, तर काही मोठी. आपल्या भावनेच्या नोंदवहीमध्ये प्रत्येक दिवसाकाठी घडणार्या अशा दोन/तीन महत्त्वाच्या घटनांची नोंद करणे आवश्यक आहे. एक उदाहरण घेऊ, ‘माझं व माझ्या ऑफिसमधील सहकार्याचं आज कडाक्याचं भांडण झालं.’
भावनिक रोजनिशी
दिनांक : 15-3-09
घटना : ऑफिसमध्ये सहकार्याशी भांडण
तीव्रता : 7/8
परिणाम वर्तणूक :
1) सर्वांसमोर वाद 2) एकमेकांशी न बोलण्याची शपथ
भावना : 1) राग 2) हताशपणा
शारीरिक प्रतिक्रिया : 1) छातीत धडधड 2) हातपाय गार पडणे
विचार : 1) माझंच का कायम भांडण होतं?
2) जगात सर्व माणसं वाईटच आहेत.
नैसर्गिक स्वमदत : अजूनही अस्वस्थता कमी झालेली नाही.
या घटनेची नोंद केल्यावर, दुसर्या टप्प्यावर आपण या घटनेची तीव्रता नोंदविण्याचं काम करणं अपेक्षित आहे. समजा, शून्य ते दहाच्या फूटपट्टीवर शून्य हा अतिशय कमी भावनिकता व दहा हा एकदम तीव्र भावनिकतेचा निदर्शक ठरविला. सहकार्याशी झालेल्या भांडणाने आलेली अस्वस्थता जर 7 इतक्या तीव्रतेची असेल, तर दुसर्याने पेट्रोल पंपावरची रांग मोडल्याने आलेली अस्वस्थता दोन किंवा तीन तीव्रतेची असेल.
आता भावनेच्या रोजनिशीमधील तिसरा कॉलम खूप महत्त्वाचा आहे. या प्रसंगामुळे आपल्या मनामध्ये व शरीरामध्ये निर्माण झालेली आंदोलनं आपल्याला या कॉलममध्ये नोंदवायची आहेत. या प्रतिक्रियांमधील पहिला भाग हा परिस्थितीतील आपल्या वर्तणुकीचा असेल. म्हणजे सहकार्याशी भांडण्याच्या प्रसंगामध्ये ‘मी त्याला अपमानास्पद बोललो, चारचौघांसमोर आमची चांगलीच जुंपली. त्यानंतर आम्ही एकमेकांचं तोंड न बघण्याची प्रतिज्ञा केली.’ अशा वर्तणुकीची नोंद या कॉलममध्ये येऊ शकेल. अनेक भावनिक अस्वस्थतेच्या वेळी आपण इतके उत्तेजित असतो की, आपण काय बोललो, कसं वागलो यातील काहीच आपल्याला नंतर आठवत नाही. त्यामुळे ही वर्तणुकीची नोंद आपल्याला स्वत:च्या वर्तणुकीकडे तटस्थपणे पाहण्याची संधी देते. वर्तणुकीची नोंद झाल्यावर दुसरी नोंद आहे, भावनिक अस्वस्थतेच्या वेळी शरीरात घडणार्या प्रतिक्रियांची. जसजसं भांडण वाढू लागतं तसं काही जणांचं डोकं गरम होतं, काही जणांना छातीत धडधड होते, तर काही वेळेला हातपाय गळाल्यासारखं वाटतं. सर्वांगाला घाम येतो. आपल्या मनातील भावना या आपल्या शरीरावर कसा परिणाम करतात या नोंदीचा आपली समज वाढविण्यासाठी फायदा होतो. भावनिक रोजनिशीमध्ये याच कॉलममध्ये आणखी दोन गोेष्टींची नोंद खूप महत्त्वाची आहे. पहिली गोष्ट म्हणजे, त्या प्रसंगात माझी भावना कशी होती, हे शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणं व हळूहळू कमीत कमी शब्दांमध्ये योग्य भावना पकडण्याचा प्रयत्न करणं. या भांडणाच्या प्रसंगामध्ये मला ‘राग आला’ किंवा ‘अपमानित वाटलं’ अथवा ‘हताश वाटलं’ अशा वेगवेगळ्या भावना येऊ शकतात. आपल्या भावनेचं नेमकं शब्दांकन खूप महत्त्वाचं आहे. कदाचित पहिल्या वेळी हे जमलं नाही, तरी हळूहळू प्रयत्नांमधून जमू शकतं.
भावना ओळखण्याइतकीच महत्त्वाची आहे, त्या प्रसंगातील विचारांची नोंद. त्या प्रसंगी मनात आलेले विचार असे असू शकतात की, ‘माझीच कायम भांडणं का होतात?’, ‘माझ्यात काही तरी कमी आहे’, ‘जगात चांगल्या माणसाची कदर नाही’, ‘आपण कितीही चांगलं वागलो, तरी लोक भांडण काढतातच.’ बरेच वेळा हे विचारच आपली भावना ठरवत असतात. स्वत:मध्ये कमीपणा असल्याचा विचार मनात आल्यास ‘हताशपणा’ वाटतो आणि अन्याय होत असल्याचा विचार मनात आल्यास ‘रागाची’ भावना होते. अस्वस्थतेच्या प्रसंगी मनात कोणते विचार आले, याची नोेंद महत्त्वाची आहे. कारण त्या विचारांचंच बोट धरून आपण या भावनेच्या वादळातून बाहेर पडणार आहोत.
चौथ्या आणि शेवटच्या कॉलममध्ये नोंद असते ती या भावनिक प्रसंगातून आपण स्वत: कसं बाहेर पडलो त्याची. ही प्रत्येक व्यक्तीची भावनिक स्वमदत करण्याची नैसर्गिक पद्धत होय. काही जण तेथून निघून जातात, काही जवळच्या व्यक्तीशी त्या प्रसंगाबाबत बोलतात; तर काही जण या प्रसंगाच्या परिणामातून बाहेरच पडू शकत नाहीत.
एवढ्या चार गोष्टींची ‘भावनिक रोजनिशी’ आपण पंधरा दिवस लिहिली की, आपल्या स्वत:चीच एक नवी ओळख व्हायला लागल्याची जाणीव आपल्याला होऊ लागते, असं का होते? आणि पुढे मनाच्या प्रयोगशाळेत या नोंदीची तपासणी व त्याच बदल कसे करायचे, याविषयी पुढच्या भेटीत..