Categories
युवा मानस

मनाची प्रयोगशाळा

जुलै - २०१९

प्रयोगशाळा म्हटले की, आपल्या नजरेसमोर एक विशिष्ट चित्र उभे राहते. पांढरे डगले घातलेले शास्त्रज्ञ, ‘आम्ल’, ‘अल्कली’, ‘लिटमस पेन’, ‘चंचुपात्र’ अशा अनेक गोष्टी नजरेसमोर येतात; पण आपण आज ज्या प्रयोगशाळेविषयी समजून घेणार आहोत ती एक आगळी-वेगळी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेची लक्षणे म्हणजे ज्या क्षणी आपण जन्म घेतो, त्या क्षणापासून ही प्रयोगशाळा चालू होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहते. या प्रयोगशाळेच्या खिडक्या आणि दरवाजे जितके सताड उघडे असतील, तितका प्रयोग अधिक खुलून येतो. ज्याच्यावर प्रयोग होतोय आणि जो प्रयोग करतोय, या दोन्ही गोष्टी इथे एकच आहेत. अर्थातच, या सर्व प्रयोगाची जागा आहे तुमचा-आमचा मेंदू आणि प्रयोगशाळेचं नाव आहे प्रत्येकाचे ‘मन’. आपल्या भावनांची नोंदवही या मनाच्या प्रयोगशाळेला कच्चा माल पुरवणार आहे.

कुठल्याही प्रयोगशाळेची महत्त्वाची काही लक्षणे असतात. प्रत्येक प्रयोगामध्ये काही गृहितकं मांडली जातात व ती तपासली जातात. त्या गृहितकांमधील जे सिद्ध होईल ते स्वीकारलं जातं; पण जे सिद्ध झालं नाही, ते पण काही वाया जात नाही. आपल्याला कुठल्या दिशेने जायचे नाही, याचे भान त्यामुळे आपल्याला येते. प्रत्येक प्रयोगामध्ये काही गोष्टी मोडल्या जातात, काही जोडल्या जातात आणि शेवटी एक उत्तर हाती लागते. त्या उत्तराच्या मदतीने आपल्याला पुढचा प्रवास करायचा असतो.

आपण जेव्हा आपल्या मनाला प्रयोगशाळा म्हणतो, तेव्हा प्रत्येक प्रयोगशाळेत घडणारा हा खटाटोप आपल्या मनात घडत असतो, हे तर नक्कीच! पण बर्‍याच वेळा आपल्या स्वत:च्या मनामध्ये असे काही चालले आहे, याचे पुरेसे भान देखील आपल्याला नसते. म्हणून या मनाच्या प्रयोगशाळेविषयी समजून घ्यायला पाहिजे.

आपण जर खरंच भावनिक रोजनिशी लिहायचा प्रयत्न केला असेल, तर निश्चितच मनाच्या प्रयोगातील काही अज्ञात नोंदी आपल्याला ज्ञात झाल्या असतील. यामध्ये आपल्याला अमान्य करणारे प्रसंग, त्यांना आपण दिलेला प्रतिसाद, त्या प्रसंगातील आपले विचार, आपल्या भावना व त्या प्रसंगातून आपण कसे बाहेर पडलो? या सगळ्याची नोंद आपल्याकडे झालेली असेल.

प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे ज्याची-त्याची एक विचार करायची पद्धत निर्माण झालेली असते. बहुतांश वेळा ही विचार करायची पद्धत विक्षिप्त क्रियेसारखी असते. एखादी घटना घडल्यावर प्रतीक्षिप्त क्रिया घडावतील तसे काही ठराविक विचार चटकन आपल्या मनात प्रक्षेपित होतात. हेच आपल्या मनाच्या प्रयोगातलं ‘मूलभूत गृहितक’ असतं. ज्या प्रकारचं गृहितक आपण धरतो, त्याच प्रकारच्या निष्कर्षाला आपले मन पोचते. या सगळ्याला धरूनच मनात भावना होतात. शरीरात वेगवेगळ्या संवेदना घडतात आणि आपण अस्वस्थ होतो.

मागच्या लेखातील आपल्या ऑफीसमधील भांडणाचे उदाहरण घेऊया. समजा, भांडणामध्ये सहभागी असणार्‍या श्रीयुत कामतांचं आयुष्याविषयी एक गृहितक आहे. ते असं की, ‘जगातील सर्व माणसं ही स्वार्थीच असतात. आपण कितीही चांगलं वागलं तरीही लोक आपल्याशी वाईटच वागतात. आता तेव्हा श्रीयुत कामतांच्या ऑफीसमध्ये भांडण होते, तेव्हा कामतांच्या मनातील गृहितक उफाळून पृष्ठभागावर येतं आणि प्रयोगातील पुढच्या पायर्‍या आपोआप घडून येतात. मनातील मूलभूत गृहितकाला धरून मनात आत्मियतेच्या भावना निर्माण व्हायला लागतात. छातीमध्ये धडधड, हातापायांत घाम येणे, कंप सुटणे असे शारीरिक बदल घडू लागतात. अस्वस्थ झाल्याने श्रीयुत कामत आणखीच चिडचिडे होतात. ऑफीसमधले भांडण चिघळत जाते. प्रश्न तर सुटत नाहीच; श्रीयुत कामतांचं मन:स्वास्थ्य मात्र बिघडत जाते. मग या अस्वस्थ स्थितीमध्ये ते घरी जातात आणि सगळा राग आपल्या हक्काच्या बायकोवर किंवा मुलांवर काढतात.

मनामध्ये असणार्‍या या गृहितकांविषयी आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा घर बांधण्याचे उदाहरण चपखल बसते. जसे घराचा पाया घालताना काही सेंटिमीटरमध्ये झालेली चूक ही पुढे बांधलेल्या घरामध्ये फूटपट्टीने मोजावी लागते. तसेच मनाच्या गृहितकांमध्ये असलेली छोटीशी चूक जेव्हा वर्तणुकीच्या पातळीवर येते, तेव्हा खूप मोठी झालेली असते. त्यामुळेच मनाच्या प्रयोगशाळेमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही आहे की, आपल्या मनात खोलवर दडून असलेल्या या गृहितकांचा आपल्याला शोध घेता आला पाहिजे. ही गृहितके जशी स्वत:विषयी असतात, तशीच कुटुंबाविषयी आणि समाजाविषयी देखील असतात. मनाच्या प्रयोगशाळेमध्ये ही गृहितके समजून घेणे, त्यांची उलटतपासणी करणे आणि दुरुस्ती देखील करणे अशा सर्व गोष्टी घडणे अपेक्षित असते.

आपल्या भावनिक रोजनिशीमधील विचारांच्या नोंदी या बहुतांशवेळा आपल्या मनामधील ही गृहितकेच असतात. आपली भावनिक रोजनिशी ही खोलवर दडलेली गृहितके पृष्ठभागावर आणण्याचे काम करते.

जेव्हा आपल्या मनाला हे उमजायला लागते की, आपल्या स्वभावाला धरून अशी काही गृहितकं आपल्या मनामध्ये असतात आणि ती आपली वर्तणुक ठरवतात, तेव्हा प्रयोगातील पहिला टप्पा पार पडलेला असतो. ही गोष्ट अजिबात सहज साध्य नाही. स्वत:च्या विचार पद्धतीविषयी जागरूक होणे, ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे; पण जेव्हा आपल्याला स्वत:च्या मनातील गृहितके आणि त्यांचा आपल्या वर्तणुकीशी असलेला संबंध ध्यानात यायला लागतो, तेव्हा होणारा आनंद हा एक वेगळ्या प्रकारचा असतो. कारण पहिल्या टप्प्याच्या यशाबरोबरच प्रयोगाच्या पुढच्या टप्प्यांचे मार्गपण आपल्याला खुणवायला लागतात. आपल्या मनातील गृहितकं जर आपण तपासू शकलो आणि बदलू शकलो, तर आपली वर्तणुक पण बदलेल. म्हणजेच आपली वागणूक आपल्या आजूबाजूला घडणार्‍या गोष्टींवर अवलंबून नसून आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे, हे एक खूप मोठे सत्य आपल्या हाती गवसते.

इथून पुढे सुरू होतो प्रयोगाचा दुसरा टप्पा. स्वत:ची गृहितकं तपासण्याचा आणि या तपासणीसाठी एक साधी सोपी पद्धत उपलब्ध आहे. आपण ज्या परिस्थितीमध्ये अस्वस्थ झालो, त्या परिस्थितीमध्ये इतर माणसे काय विचार करतात, यांची एक यादीच आपण बनवू शकतो.

श्रीयुत कामतांच्या ऑफीसमधल्या भांडणांच्या प्रसंगात वेगवेगळी माणसे काय-काय वेगवेगळा विचार करतील, असा जर आपण तपास घेतला, तर खूप वेगवेगळ्या विचार करण्याच्या पद्धती आपल्या लक्षात येतील. उदाहरणार्थ, काही जण विचार करतील, काय एवढं मनाला लावून घ्यायचं. एवढंस भांडण आणि वाद विसरून पुढे चालू लागतील, तर काही जण स्वत:ला दूषणं देतील. माझ्यातच कसा कमीपणा आहे; मात्र कायमच कसं चुकतं, असा विचार करून उदास होतील. अन्य काही जण सर्व भावना मनात दाबून टाकतील. आपण कधीही अस्वस्थ दिसता कामा नये. अशा विचाराने कुणाशीही झाला प्रसंग बोलणार नाहीत. यामधून वरून ते शांत दिसतील; पण आतमध्ये पडझड चालू राहील.

जर आपल्या मनातलं मूलभूत गृहितक आपल्याला तपासून बदलायचं असेल, तर अशी भरपूर पर्यायी गृहितकं आपल्याला माहीत हवीत.

इथून पुढे येईल तो प्रयोगातला शेवटचा तिसरा टप्पा. आपल्या मनातील गृहितक बदलून योग्य अशा गृहितकाच्या प्रतिष्ठापनेचा. त्याविषयी पुढच्या वेळी.