कला ही समाजाला संवेदनशील बनविते, हे सर्वज्ञात आहे. कलेमध्ये माणसाला मुक्ती मिळवून देण्याचे सामर्थ्य आहे, असे मानले जाते. ती त्याला या लौकिक जगापलिकडे घेऊन जाते. समाजात प्रेम, शांती आणि समतेचे वातावरण निर्माण करण्यात कलेचे योगदान आहे आणि पूर्वीही राहिले आहे. उदाहरणार्थ – भक्तिपंथीय अनेक महान संतकवींनी समाजात आपला प्रेमाचा संदेश पोचविण्यासाठी काव्य आणि संगीताचा उपयोग केला. त्यातून त्यांनी समाजातील विद्वेष, जातिभेद आणि विषमता दूर केली.
शुभा मुद्गल या भारतीय शास्त्रीय संगीताच्या ख्यातनाम गायिका आहेत. ‘ख्याल आणि ठुमरी गायन मला विशेष प्रिय असले तरी माझ्यातील कलाकाराला मी बंदिस्त करु इच्छित नाही,’ या भूमिकेतून त्यांनी लोकप्रिय संगीताच्या गायक म्हणून देखील आपला ठसा उमटवलेला आहे. संगीतकार; तसेच संगीत शिक्षक या भूमिकेतूनही त्यांनी काम केलेले आहे. संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी 2000 साली त्यांना पद्मश्री हा किताब मिळालेला आहे. 2005 सालचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करताना, शालेय शिक्षणामध्ये कलाशिक्षणाचा समावेश करण्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या त्या अध्यक्ष होत्या. जवळपास 50 सुप्रसिद्ध व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, झुंडशाहीचे वाढते बळी रोखण्याची विनंती केली होती. त्यामध्ये रामचंद्र गुहा, श्याम बेनेगल, मणीरत्नम यांच्यासह शुभा मुद्गल यांचाही समावेश होता. या सर्वांविरुद्ध उत्तर प्रदेशात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हा गुन्हा रद्द करण्यात आला. अशा या कलावंताची मुलाखत घेताना आम्ही त्यांना प्रश्न विचारला,
काही कलाकारांचा कलाविष्कार हा त्यांच्या–त्यांच्या कलाविश्वापुरता मर्यादित असतो. परंतु आपण कलाविष्काराबरोबरच आपल्या समाजातील बंधुभाव आणि स्वातंत्र्य याबद्दलही आस्था व्यक्त करीत असता. एक व्यक्ती म्हणून आपली ही जडण–घडण कशी झाली? उदारमतवादी, लोकशाही मूल्यांकडे आपली ही वाटचाल कशी झाली? लहानाचे मोठे होत असताना आपल्यावर काय संस्कार झाले, ते जाणून घेणे आम्हाला आवडेल.
मी उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये, म्हणजे सध्याच्या प्रयागराजमध्ये, जन्मले आणि वाढले. माझे आई-वडील जया आणि स्कंद गुप्त दोघेही अलाहाबाद विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात शिक्षक होते. दोघांनाही कलांबद्दल प्रचंड रुची आणि आदर होता. दोघांनीही संगीताचे शिक्षण घेतले होते. परंतु ते हौसेखातर गात असत; व्यावसायिक म्हणून नव्हे. मी सुद्धा माझ्या शास्त्रीय संगीताची तालीम अलाहाबादमध्येच सुरू केली.
मी आणि माझी एकुलती एक बहीण रागिणी; जी माझ्याहून तीन वर्षांनी लहान होती, आम्ही शिकत असताना आमच्यात, असा विश्वास निर्माण केला जात होता की, शिक्षणाचे काम माणसाला सक्षम बनविणे हे आहे, तुम्हाला एक चांगला माणूस घडविणे हे आहे. चांगली पदवी प्राप्त करून उत्तम नोकरी मिळविणे, हे शिक्षणाचे एकमेव उद्दिष्ट नव्हे. शिक्षण ही एक अशी प्राप्ती आहे, जी आपल्याला या जगातील आपले कर्तव्य आणि जबाबदार्यांची योग्य जाणीव करून देते. आम्हाला या गोष्टीची सतत आठवण करून दिली जात असे की, वेगवेगळ्या प्रकारे शिकण्याची ही प्रक्रिया पदवी प्राप्त झाल्यावर संपत नाही, तर ती आयुष्यभर चालूच असते.
एकदा का आपण शाळा, कॉलेजमधून बाहेर पडलो, उच्चशिक्षित झालो की संपले शिक्षण, असे नसते. आम्हाला हिंदीतून; जी आमची मातृभाषा होती आणि इंग्रजीतून भरपूर वाचन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असे. आम्ही भरभरून वाचावे म्हणून आमच्या मागे लागत असत. परिणामतः आई-वडील दोघेही कामावर आणि आजूबाजूला पुस्तकं,नाटकं, काव्य व इतर साहित्य विखुरलेले असे आणि त्याशिवाय संगीत, छायाचित्र-कला अशा विविध कलांच्या सान्निध्यातच आम्ही वाढलो.
आमच्या घरी देशभरातून आणि विदेशातूनही आलेल्या तर्हतर्हेच्या लोकांचे कायम स्वागत असे. हरतर्हेचे सण मी माझ्या आई-वडिलांबरोबर साजरे केलेले मला आठवतात; शिवाय आमची आजी- आईची आई – तीही आमच्याबरोबर असे. मी आणि माझी बहीण रागिणी आमच्या दोघींच्या संगोपनात माझ्या आजीची खूप मदत असे. घरी येणार्या पाहुण्यांबरोबर बोलण्या-चालण्यासाठी आम्हाला उत्तेजन दिले जात असे. आमच्याकडे येणारे प्रो. टॉमीओ मिझोकामी मला जपानी बालगीते म्हणायला शिकवीत. हे हिंदी भाषातज्ज्ञ हिंदी शिकण्यासाठी अलाहाबादेत आले होते. त्यांना भारतीय कुटुंबात राहण्याचा अनुभव घ्यायचा होता, म्हणून ते आमच्या घरी राहिले होते. तेव्हाचे वातावरण सर्वसमावेशक होते. चर्चा, वादविवाद आणि वेगवेगळ्या लोकांशी संवाद हा नित्यनेमक्रम असे. मला वाटतं, या सर्वांचा नक्कीच माझ्या विचारांवर आणि मी मानीत असलेल्या मूल्यांवर असर झाला. भिन्न विचारसरणीचा आदर करायला मी शिकले.
आणि कलाविश्वाच्या तर आम्ही सतत सान्निध्यात होतोच. मला आणि माझ्या बहिणीला विस्तृत कलानुभव सतत मिळत होताच. आम्हाला संगीत, नृत्य, नाट्य शिकण्यासाठी उत्तेजन मिळत होते. पण ते केवळ छंद म्हणून नव्हे, तर आमच्या आयुष्यातील कायमचे साथी म्हणून. ऐन परीक्षांच्या दिवसांतही, नेहमीच्या रिवाजाला न जुमानता आमचे संगीताचे वर्ग बंद केले जात नसत. आमच्या परीक्षेच्या तयारीच्या दिवसांतच नव्हे, तर प्रत्यक्ष परीक्षा चालू असतानाही आमचे संगीतपाठ चालूच असत. अलाहाबादमध्ये आम्हाला प्रसिद्ध साहित्यिकांना भेटण्याची संधी मिळे. सुमित्रा नंदन पंत, महादेवी वर्मा आणि फिराक गोरखपुरी हे त्यातील काही साहित्यिक.
उदार, मानवतावादी मूल्ये जपण्यामध्ये कलेचे काय योगदान असते? कलेतून ही मूल्ये जोपासण्याच्या या प्रक्रियेत कलावंतांना विरोधाचा सामना करावा लागतो का? व्यवसायबंधूंकडून, समाजाकडून वा सर्वसाधारणतः राजकीय वर्तुळातून ?
कला ही समाजाला संवेदनशील बनविते, हे सर्वज्ञात आहे. कलेमध्ये माणसाला मुक्ती मिळवून देण्याचे सामर्थ्य आहे, असे मानले जाते. ती त्याला या लौकिक जगापलिकडे घेऊन जाते. समाजात प्रेम, शांती आणि समतेचे वातावरण निर्माण करण्यात कलेचे योगदान आहे आणि पूर्वीही राहिले आहे. उदाहरणार्थ – भक्तिपंथीय अनेक महान संतकवींनी समाजात आपला प्रेमाचा संदेश पोचविण्यासाठी काव्य आणि संगीताचा उपयोग केला. त्यातून त्यांनी समाजातील विद्वेष, जातिभेद आणि विषमता दूर केली. कलेच्या माध्यमातून समाजाला संवेदनशील बनवून समाजात काही बदल घडवून आणण्यात ते यशस्वी झाले. आपले काव्य आणि भक्तिसंगीतातून त्यांनी दिलेला संदेश इतका प्रभावशाली होता की, शतकांच्या गडबड-गोंधळात तो आजही टिकून आहे. त्या काळच्या कबीर, एकनाथ, नामदेव आणि तुकाराम यांच्या रचना आम्ही आजही गात असतो.
तरीही कालातीत आणि अमर असा प्रेम आणि शांतीचा संदेश आपल्या कलेतून आणि संगीतातून देणारे हे कलाकारच कधी-कधी हिंसा, द्वेष आणि जोरजुलमाच्या राजकारणाला मदत करताना दिसतात. कबीर उत्सवात आनंदाने आणि उत्साहाने भाग घेणारे, राम आणि रहीम हे एकाच शाश्वत सत्याचे भिन्न आविष्कार आहेत, असे गीतातून सांगणारे कलाकारच दुसर्याच दिवशी आपल्याहून वेगळा विचार करणार्याला कसे काय ‘ट्रोल’ आणि ‘पोस्ट’ करू शकतात, हा तर उघड-उघड शुद्ध ढोंगीपणाच झाला. गाण्यांचे कार्यक्रम मिळविण्यासाठी कबिराचे दोहे गा, सूफी संगीत गा; आणि दुसरीकडे कबीर आणि सूफी संगीतातील मूल्ये वार्यावर सोडून द्या आणि भडकावू, रक्तपिपासू गर्दीत सामील व्हा.
कलाकाराचा मानवी मूल्यांवर ठाम विश्वासच कलाकाराची कलासंवेदना वाढवू शकतो, मुक्ती देतो आणि तुम्हाला लौकिकाच्या पल्याड नेऊ शकतो; अन्यथा कलेकडे एक तंत्र, एक व्यवसाय म्हणून पाहिले जाते आणि त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे हिंसा आणि द्वेष पसरविण्यासाठीच तिचा वापर केला जातो. अशा रीतीने कलेचा वापर; नव्हे गैरवापर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
खरं तर मला भारतातील कलाकारांमध्ये भ्रातृसंघटनेची अशी भावना आढळून येत नाही. भ्रातृभावाचा अर्थच मुळी एकमेकाला आधार देणे असा होतो. सुविधांपासून वंचित कलावंतांना मदत करणारा, त्यांच्यासाठी काही कल्याणकारी योजना आखणारा किंवा त्यांच्या भल्यासाठी काम करणारा असा भ्रातृसंघ आपल्याकडे आढळून येत नाही. व्यक्तिशः कुणी मदत करीत असतीलही; परंतु एक भ्रातृसंघभावना आपल्याकडे दिसून येत नाही. प्रांतीयवाद, संकुचितपणा एवढेच नव्हे; तर जातिभेद, लिंगभेद आणि धर्मावरून भेदभाव खासकरून भारतीय कलाकारांच्या मनांत खोलवर रुतून बसला आहे आणि हे नजीकच्या भविष्यकाळात पूर्णपणे काढून टाकणे शक्य होईल, असे मला वाटत नाही. कारण एकतर बंधुभाव, लोकशाही आणि मानवता याचे त्यांना महत्त्व वाटत नाही किंवा त्यांच्या याबाबतच्या विचारांचं सुधारण्या पलिकडे विकृतीकरण झाले आहे.
‘कलेसाठी कला’ हे तत्त्व तुम्ही मानता का? की मानवी भावनांना, लोकांच्या आकांक्षांना आविष्कार करण्याचे साधन म्हणून आणि उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाहीकडे वाटचाल करणारे माध्यम म्हणून तुम्ही कलेकडे पाहता ?
कलाकारासाठी त्याच्या कलेचा आविष्कार हा आपणहून झालेला स्वयंस्फूर्त आविष्कार असतो. तो हवा तसा वळविणे वा त्यावर सहजपणे ताबा ठेवणे त्याला शक्य नसते. त्यामुळे प्रथमदर्शनी कला ही कलेसाठीच असते आणि कला ही कलाकाराचे त्यावर नियंत्रण नसलेली एक अनाकलनीय आंतरिक ऊर्मी असेल, तर हे नैसर्गिकच आहे. त्याच वेळी कलाकाराच्या कृतीमधून समाज आणि जीवनाबद्दलची त्याची समज प्रतिबिंबित होत असते. कधी-कधी हे उघडपणे दिसते, तर कधी ते आडून डोकावते आणि लगेच दृग्गोचर होत नाही. त्यामुळे माझा असा समज झाला आहे की, जर त्या कलाकाराची लोकशाही तत्त्व आणि धर्मनिरपेक्षता यावर ठाम विश्वास असेल तरच त्याची कला समाजाला अधिक सचेत करून लोकशाहीच्या आणि अधिक धर्मनिरपेक्ष अशा जगाकडे नेऊ शकते; अन्यथा त्याचा असा विश्वास नाही हे त्याच्या कलाकृतीतून प्रतिबिंबित होईल.
आजच्या राजकीय आणि सामाजिक परिप्रेक्ष्यात आपल्या कलाविश्वातील व अन्य कलाक्षेत्रातील भ्रातृकलाकारांबद्दल आपण काय म्हणाल?
आपल्याकडे सिनेसृष्टीत काम करणारे बरेच जण राजकीय क्षेत्रात सक्रिय असण्याची जुनी परंपरा आहे आणि तो शिरस्ता आजही चालू आहे. परंतु गेल्या दशकात संगीत क्षेत्रातील अनेक कलावंतही राजकारणात सक्रिय आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी तिकीट देऊन निवडणुकीसाठी उभे केले आहे. त्यातील बर्याच जणांनी संधिसाधूपणे वा अन्य प्रलोभनांना बळी पडून पक्ष बदलले आहेत. त्यामुळे या राजकारणी बनलेल्या कलावंतांना राजकीय विचारसरणीशी काही देणे-घेणे नाही, तरीपण हे मानलं पाहिजे की राजकीय पक्ष त्यांच्याकडे संभाव्य विजयी उमेदवार म्हणून पाहत असतात.
बरेच संगीतकार गेल्या दहा-बारा वर्षांत प्रचलित शासनास उघडपणे पाठिंबा दर्शवीत आहेत. कलावंताच्या राजकीय प्रवेशातून स्वतंत्र विचारसरणी, विधायक टीका, चर्चा आणि असहमतीची वाट खुली होईल, असे वाटले होते. परंतु वास्तव वेगळेच आहे. नैतिकतेचा देखावा करीत, त्यांच्या दृष्टीने जे सत्य आहे, त्याच्याशी व देशाशी निष्ठा दाखवीत कलाकार असे भडकावू, गलिच्छ ‘पोस्ट’च्या माध्यमातून करीत असतात की भल्या-भल्या अशा तर्हेने ‘ट्रोल’ करणार्यांनाही लाज यावी. त्यांची भाषा, आवाज आणि त्यांचे ‘ट्रोल’ त्यांचे खरे स्वरूप उघड करतात.
भारतीय संगीत विश्वाला एक धार्मिक भेदभावापलिकडे जाणारी धर्मनिरपेक्षतेची परंपरा आहे. सध्याचे संगीत–जगात कुठल्या दिशेने वाटचाल करीत आहे?
बहुसंख्य लोक धर्मनिरपेक्षतेचे मूल्य आता मानत नाहीसे झाले आहेत. खरं तर त्याकडे तिरस्कार आणि वैतागाने पाहिले जाते. माझी खात्री झाली आहे की, बहुसंख्य भारतीय कलाकार पण धर्मनिरपेक्षतेकडे एक तमाशा म्हणून पाहतात आणि त्यावर विश्वास असलेल्यांना उपहासाने ‘सिक्यु’लर म्हणून हेटाळतात. कलाकार अगदी उघडपणे हा आपला दुस्वास दाखवीत नसतीलही; परंतु लवकरच भारतीय संगीताच्या इतिहासाचे एक नव्या राष्ट्रवादाच्या मानकांशी सुसंगत असे पुनर्लेखन केले जाईल, असे वाटते. (अशी भीती मला वाटते)