महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेली अनेक वर्षे मन, मनाचे आजार, भुताने झपाटणे, देवी अंगात येणे याबाबत जनजागृती केली आहे. मनाच्या आजाराबद्दल कोकण विभागात असलेले अंधश्रद्धांचे प्राबल्य लक्षात घेऊन ‘शोध भुतांचा बोध मनाचा’ ही मोहीमही समितीने काढली व त्यावेळी ‘निरामय मानसिकतेचे मागणीपत्र’ ही हजारो सह्यांनी शासनाला दिले होते. हा विचार अधिक सखोल व व्यापकपणे करण्यासाठी महाराष्ट्र अंनिसने ‘मानसिक आरोग्य व अंधश्रद्धा’ याबाबतची राज्यव्यापी परिषद चाळीसगाव येथे ता. 27 नोव्हेंबर 2011 रोजी घेतली. या परिषदेत ‘मानसिक आरोग्य व अंधश्रद्धा प्रबोधन जाहीरनामा’ प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे. परिषदेतील विचारमंथनातून त्याला अंतिम रूप देण्यात आले.
1. मनाचा आजार हा गूढ वाटतो आणि कलंक मानला जातो. त्यामुळे त्याचे लवकर निदान होत नाही व उपचार मिळत नाही. अनेक व्यक्ती या आजारावर अंधश्रद्धेने उपाय करतात. खरेतर या आजारावर आता प्रभावी उपचार आहेत ही जाणीव जागृत करणे.
2. राष्ट्रीय मानसिक आरोग्यप्रकल्पाचा भाग म्हणून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जिल्हा मानसिक आरोग्यप्रकल्प चालू होत आहे. त्याद्वारे मानसिक आजारावरील उपचार सुविधा लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी मानसोपचार तज्ञ, समुपदेशक, मनोसामाजिक कार्यकर्ते, विशेष प्रशिक्षीत नर्स, आदि यंत्रणा उभी राहणार आहे. या यंत्रणेला समितीचे कार्यकर्ते सर्व मदत करतील. तसेच इतरांची मदत मिळवून देण्याचाही प्रयत्न करतील.
3. नजिकच्या काळात उदासिनता व व्यसनाधिनता हे मानसिक आजार मोठ्या प्रमाणात समाजात वाढतील असे जागतिक आरोग्य संघटना सांगते. यांचा प्रतिवाद करण्यासाठी सामाजिक पातळीवर संघर्षाचीही गरज आहे. कारण व्यसनाधिनता वाढावी असेच शासनाचे धोरण आहे. लोकांच्या दुर्बल मानसिकतेचा फायदा घेणार्या बुवा-बाबा, गंडेदोरे, मंत्र-तंत्र, अशा बाबी या समाजात आता व्यवसाय बनल्या आहेत. या दोन्हींच्या विरोधात समिती आजही संघर्ष करते. तो अधिक परिणामकारकपणे पुढील काळात केला जाईल. मात्र ही बाब समाजपरिवर्तनाशी संबंधित आहे याचे भान समितीला आहे.
4. मानसोपचार तज्ञांच्या मदतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी मानसिक आरोग्याबद्दल जनसंवाद, प्रश्नोत्तरे घडविली जातील. सौम्य व गंभीर मानसिक आजार, लहान मुले व वृद्ध माणसे यांचे मानसिक आजार, महिलांचे मानसिक आरोग्याचे प्रश्न, लैंगिक समस्या व व्यसनाधिनता याची मानसिकता आणि या सगळ्यातून अंधश्रद्धेकडे होणारी वाटचाल व त्याबाबत करावयाची उपाययोजना याबाबत प्रश्नोत्तर रूपाने माहिती दिली जाईल.
5. अजूनही महाराष्ट्रात काही उघडपणे तर काही ठिकाणी छुपेपणे मानसिक आजारावर चुकीचे व अघोरी उपचार केले जातात. अशी ठिकाणे व उपचार यांची माहिती महाराष्ट्र अंनिसला कळविल्यास संबंधितांवर समिती कार्यवाही करेल. माहीती देणार्याचे नांव गुप्त ठेवले जाईल.
6. संमोहन, ध्यानधारणा, सत्संग याचा उपाय सौम्य मानसिक आजारात मोठ्या प्रमाणात लोक करतात. या बाबतच्या उपायातून फार मोठे यश मिळते असा दावा संबधित करतात. हे पूरक उपचार आहेत, शास्त्रीय उपाय बाजूला ठेवून हे उपचार करू नयेत असे समितीचे आवाहन राहील.
चाळीसगाव (जि. जळगाव) येथील बामोशी बाबाच्या दर्ग्यात आजही मनोरूग्णांना उपचारासाठी साखळदंडाने बांधले जाते. तसेच डोळ्यांत लिंबे पिळली जातात. प्रसंगी मारहाणही होते. मानसिक आजारावर योग्य, प्रभावी उपचार असताना ह्या बाबी अघोरी व अशास्त्रीय आहेत. संबंधितांनी आजपासून ह्या बंद कराव्यात अशी आग्रहाची मागणी ही परिषद करते आहे. ह्या रुग्णांवरील योग्य उपचारांसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दर्ग्याच्या व्यवस्थापनाला मानसोपचार मदतीसह सर्व सहकार्य करेल. मात्र एका महिन्यात मानसिक रुग्णांना साखळदंडाने बांधण्याची ही अघोरी पद्धत बंद न झाल्यास ती बंद व्हावी यासाठी समिती शांततामय सत्याग्रह करेल. महाराष्ट्रातील कोणत्याही अन्य ठिकाणी असे प्रकार घडत असतील तर त्या स्थानांबद्दलची महाराष्ट्र अंनिसची हीच भूमिका राहील.
– महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती