Categories
पुस्तक परिचय

मेंदूतील संप्रेरकांचा ‘केमिकल लोचा’

जून – २०१३

‘मानसशास्त्र’ हा तसा गुंतागुंतीचा विषय. मानवी मनाचे ‘विज्ञान’ समजावून देणारा हा विषय. मराठी साहित्यात हा विषय थोडा ‘उपरा’ ठरल्याने म्हणावे तेवढे लिखाण झाले नाही. जे काही लिखाण वाचायला मिळते ते बहुतांशी विषयानुरूप ‘गंभीर’ वळणाचेच असते. यामुळे विषयाला ‘न्याय’ मिळतो हे खरे असले तरीही सामान्य वाचकाला त्यात ‘गोडी’ वाटत नाही हेही तितकेच खरे. मानसशास्त्राचा ‘आशय’ न गमावता सामान्य वाचकाला त्या विषयात गोडी वाटेल. त्याला रूचेल. पचेल अशा प्रकारे हलका-फुलका वाङ्मयीन ‘टच’ देणारे पुस्तक आकार फाऊंडेशन, सांगली यांचेतर्फे नुकतेच प्रकाशित झाले. लेखक डॉ.प्रदीप पाटील यांचे ‘ती अशी का वागते?’ या शीर्षकाचे हे नवे पुस्तक वाचनात आले. मुख्यत: स्त्रीकेंद्रीत ठेवून मानसशास्त्राचा विचार करून लिहिलेले हे पुस्तक 8 मार्च महिला दिन या रोजीच प्रकाशित झाले हे विशेष.

            मानसशास्त्रासारखा क्लिष्ट. गुंतागुंतीचा विषय अत्यंत साध्या, सोप्या, ओघवत्या भाषाशैलीत आणणेचा लेखकाचा प्रयत्न कौतुकास्पद. हा प्रयत्नच पुस्तकाचे मोठे ‘बलस्थान’ आहे. याचा सर्वाधिक फायदा ज्यांनी मानसशास्त्राबद्दल ‘ओ की ठो’ वाचले नाही अथवा ज्यांचे या विषयाबद्दलचे ज्ञान प्राथमिक आहे त्यांना होतो. ह्या पुस्तक वाचनाने या विषयाबद्दलची वाचकाची गोडी निश्चितच वाढण्याची खात्री आहे. दुसरे असे की या लेखकाची पहिली प्रकाशित पुस्तके ज्यांनी वाचली असतील त्यांना हे पुस्तक वाचताना लेखकाच्या वाङ्मयीन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना पाहून एक ‘सुखद’ धक्का बसेल. एकूण 48 छोट्या-छोट्या प्रकरणातून ‘ती’च्या जन्मापासून उतारवयापर्यंत ‘ती अशी का वागते?’ याचे सुंदर वर्णन केले आहे.

            एखादी घटना घडून जाते तेव्हा त्या घटनेमागची पार्श्वभूमी आपण नेहमी तपासतो. ते योग्यही असते. परंतु मानवी शरीरातील ‘मेंदू’ नावाच्या सर्वात महत्वाच्या घटकाचे व त्याचे ‘उपघटक’ म्हणता येईल अशा ‘संप्रेरकांचे’ या घटनेतील नेमके स्थान काय असते याचा ‘उहापोह’ हे पुस्तक करते. मुलींच्यामधील ‘इस्ट्रोजन’ व मुलांच्यामधील ‘टेस्टोस्टेरॉन’ ही संप्रेरके इतर संप्रेरकांना हाताशी धरून कसा ‘खेळ’ मांडतात ते स्पष्ट होते. जन्मतानाच मुलाचे व मुलीचे मेंदू यांची जडणघडण वेगळी असते. त्यामुळे त्यांंची मते आणि प्रतिक्रिया वेगवेगळ्या येतात हे सत्य संपूर्ण पुस्तकभर लहान सहान उदाहरणाद्वारे लेखकाने ताकदीने दाखवले आहे. मानसशास्त्रावर लिहिताना त्याच्याशी संबंधित ‘कामशास्त्राचा’ विचार देखील लेखकाने केल्यामुळे एकूणच मुख्य विषयाशी लेखकाने ‘न्याय’ केला आहे असेच म्हणावे लागेल. मुख्यत: शीर्षकापासूनच ‘स्त्री’ केंद्रीत मांडणी असूनही घटनेची मांडणी करताना ‘तो’ कसा वागेल. त्याची प्रतिक्रिया काय असेल याचीही तर्कशुद्ध मांडणी केल्याने पुस्तक ‘एकांगी’ वाटत नाही हे या पुस्तकाचे मोठे यश आहे.

            मानसशास्त्रासारख्या गंभीर विषयावर सुबोध व सोप्या भाषेतील पुस्तकाची ‘वाणवा’ या पुस्तकाच्या निमित्ताने भरून निघत आहे ही समाधानाची गोष्ट. प्रत्येक युवक-युवतीने व सर्वांनीच वैयक्तिक अथवा सामुदायिकरित्या वाचन करावे व वाचून चिंतन करावे असे हे पुस्तक आहे. आपल्या वर्तनाची स्वत:च समीक्षा करून आपल्या ‘वर्तनसुधारणेसाठी’ अत्यंत महत्वाचा आशय या पुस्तकात निश्चितच आहे. आपल्या मेंदूतील संप्रेरकांचा हा ‘केमिकल लोचा’ समजावून घेणे अत्यंत महत्वाचा व वेगळा अनुभव आहे एवढे नक्की.

 -उमेश सूर्यवंशी

पुस्तकाचे नाव : ती अशी का वागते?
लेखक : डॉ. प्रदीप पाटील
प्रकाशक : आकार फाऊंडेशन, सांगली.
चार्वाक, जुना कुपवाड रोड, शिंदे मळा, सांगली.
देणगीमूल्य : 140 रूपये.