Categories
कथा

मिळून सार्‍याजणी

वार्षिकांक – २०१२

            ‘काय? हा फलक म्हणजे आपला अपमान आहे!’ उषा गरजली. ‘फक्त आपलाच नाही, तर सर्वच स्त्री जातीचा हा घोर अपमान आहे.’ इंदिराने संताप व्यक्त केला.

            9 मैत्रिणींचे हसरे व टवटवीत चेहरे, तो फलक वाचून गंभीर बनले. हसण्या, खिदळण्याची जागा संतापाने घेतली. प्रसंग बिकट बनत चालला होता. नऊपैकी आठ मैत्रिणी अंतर्मुख होऊन अपमानकारक फलकाबद्दल विचार करू लागल्या, पण सौदामिनीला मात्र त्यात विशेष काही वाटले नाही. कारण ती त्याच गावची असल्याने त्या फलकाची कल्पना तिला तिच्या लहानपणापासून होती. म्हणूनच सुरवातीला मंदिरात न येता घरी परतण्याची ती घाई करीत होती.

            ‘महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई आहे.’ स्त्री-पुरूष विषमतेला खतपाणी घालणारा हाच फलक वाचून, त्या मैत्रिणी बेचैन झाल्या होत्या. त्या बेचैनीतच इंदिरा गरजली, “सौदामिनी? तुला माहीत असून तू व तुझ्या आईने या विषयी आम्हाला का सांगितले नाही?”

            “तुम्हाला पटणार नाही, तुम्ही टिंगल कराल म्हणून, मीच आईला सांगू दिले नाही.” सौदामिनीचा खुलासा.

            मंदिर गावाबाहेर असल्याने व दुपारी तेथे कोणीच नसल्याने, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे कठीण होते. तरीसुद्धा त्या मंदिरप्रवेश करतात की नाही याचीच काळजी सौदामिनीला होती. कारण त्यांनी मंदिर प्रवेश केला तर, एक कठीण प्रसंग निर्माण होईल, शिवाय मंदिर प्रवेशाला मनाई असूनही, मैत्रिणीसह, सौदामिनी मंदिरात गेली, तर श्रद्धाळू गावकरी तिलाच दोषी धरणार होते.

            सुनिता, मीरा, मृदूला, उषा, मल्लेश्वरी, किरण, इंदिरा, फातिमा या सौदामिनीच्या कॉलेजमधील घनिष्ठ मैत्रिणी. उच्चपदावरील नोकरीमुळे, इतर व्यापामुळे त्या गेली कित्येक वर्षेएकमेकींना भेटल्या नव्हत्या. जुन्या मैत्रीला उजाळा देण्यासाठी, त्या 8/10 वर्षांनी रात्री सौदामिनीच्या गावी आल्या होत्या. गावालगतच्या सौदामिनीच्या वडिलांच्या वस्तीवर, त्या रात्रभर गप्पा, गोष्टी करीत होत्या. कॉलेजमधील आठवणी काढून हसत, खिदळत होत्या. व आज सकाळी नाष्टा करून दुपारच्या जेवणापर्यंत आपलं गाव, शाळा, बाजारपेठ इ. दाखविण्यासाठी सौदामिनीने आठ मैत्रिणींना गावात आणलं होतं.

            गाव, शाळा पाहिल्यावर गावातून फिरता फिरता उषाला उंच गर्द झाडीतील पुरातन मंदिर दिसले. व तिने ते पाहण्याची इच्छा व्यक्त केली. बाकीच्या मैत्रिणींनी तिला दुजोरा दिला होता.

            आता तो फलक वाचून सर्वजणींनी मंदिर प्रवेशाचा निर्णय घेतला होता. तमाम महिलांचा अपमान करणारा, सार्वजनिक ठिकाणचा फलक पाहून मुद्दाम त्या मंदिर प्रवेश करीत होत्या.

            ठरल्याप्रमाणे किरण, इंदिरा मंदिरात गेल्या, त्यांचेच अनुकरण बाकीच्या मैत्रिणींनी केले. तशा त्या फार धार्मिक वृत्तीच्या नाहीत, पण महिलांचा अपमान करणारा फलक, विज्ञानयुगात, सार्वजनिक ठिकाणी वाचायला मिळतो, म्हणून त्यांनी मंदिर प्रवेश केला.

            “समजा गावकर्‍यांना कळलं तर?” सौदामिनीने शंका विचारली. “घाबरता कशाला, आपण काही चोरी करीत नाही, आपणही स्वतंत्रभारत देशाचे नागरिक आहोत. मग मंदिरात जाण्याची आपणालाच मनाई का? कोण काय म्हणेल त्याला मी उत्तरं देईन. काय गं किरण तुला काय वाटतं? इंदिरा.

            फलक वाचल्यापासून किरणच्या डोक्यात, भारताची राज्यघटना व पोलीस कायदा थैमान घालीत होता. तिने इंदिराला आत्मविश्वासाने सांगितलं, “काळजी करू नकोस. आम्ही सर्वजणीच काय, आख्खी भारताची राज्यघटना तुझ्या पाठीशी आहे.” आता सौदामिनीसुद्धा त्यांच्यात सामील झाली होती.

            गायकर्‍यांना हे कळलंच, तर त्यांना कसं पटवून द्यायचं ते निश्चितपणे ठरवून, 9 मैत्रिणी दर्शन न घेताच बाहेर येताना सौदामिनीने 8 मैत्रिणींना विनंती केली, “गावकर्‍यांना कळलं तर संघर्ष होऊ शकतो. आजपर्यंत पवित्र म्हणून पाळलेला नियम मोडून आपण मंदिर प्रवेश केलाय. एका कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागणार आहे. कदाचित आजचा दिवस ऐतिहासिक सुद्धा ठरू शकेल, तेव्हा तुम्ही सबुरीने घ्या.”

            मंदिरातील चर्चा संपवून बाहेर येऊन पाहतात, तर शंभरेक पुरूष प्रक्षुब्धपणे उभे होते. अजूनही गावातून तरूणांचा, वृद्धांचा लोंढा मंदिराच्या दिशेने येतच होता. गावभर एकच चर्चा होती, ‘बायका देवळात शिरल्या. दिवुळ बाटीवलं!’ हे ऐकून गावच्या बायकांनाही आक्रीत वाटलं.

            ‘गावच्या आसून आम्ही, आख्या जन्मात देवळात गेलू न्हाय, आन् ह्या कोन सटव्या, द्यावळात शिरल्यात्या, त्यांना काय रितभात म्हायीत न्हाय व्हय.’ म्हणून गावच्या स्त्रियांनी 9 मैत्रिणींचा निषेध केला.

            “आपुन आपापल्या पायरीनं र्‍हाव, बुकं वाचायला शिकला म्हंजी शानं झालं आसं न्हाय.” दुसरी बाई.

            “आगं त्या शिकल्याल्यांना ‘पायरी’ म्हाईत आस्ती का?” पहिली स्त्री.

            मंदिराबाहेर येऊन, खाली माना घालून, हाताच्या घड्या घालून स्तब्ध उभ्या राहिलेल्या, सुशिक्षित नऊ स्त्रिया पाहून, जमाव जास्तच प्रक्षुब्ध झाला. इतकी वर्ष जिवापाड जपलेली परंपरा या स्त्रियांनी क्षणात मोडून टाकली याचं दु:ख, संताप गावकर्‍यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. डोळ्यात अंगार फुलले होते. त्वेष कुजबुजण्यातून व्यक्त होत होता.

            “शिकल्याल्या बायका, हुकल्याल्या असत्यात तेच खरंय बगा.” एका ग्रामस्थानी आग ओकली.

            “आरं, शिकून तरी ह्यांनी कुटं दिवं लावल्यात, घरात बसून पोरंच सांभाळत्यात ना?” दुसर्‍याने संताप व्यक्त केला.

            “पन मी म्हंतु, ह्यांना आपल्या जागृत आन् नौसाला पावनार्‍या द्यावाचा रिवाज म्हाईत न्हाय का?” तिसरा आवाज. 

            “आर्रर्रऽऽ थांबा. ह्या बायला ना वळखलं का?” एका गृहस्थानं सौदामिनीकडे बोट दाखवून गावकर्‍यांना विचारलं.

            सर्वजण सौदामिनीकडे कुतूहलाने पाहू लागले. अनेकांना तिचा चेहरा ओळखीचा वाटला, पण नेमका आठवेना.

            “आरं ही आपल्याच गावची बाय दिस्तीया.” तोच गृहस्थ. सौदामिनीने त्यांना ओळखलं, “माफ करा आबा, मी धोंडीराम देशमुखाची सौदामिनी….”

            “आगं. गावचा रिवाज मोडायला तुला काय वाटलं न्हाय?” तोच गृहस्थ सौदामिनीचं वाक्य मध्येच तोडत म्हणाला.

            “आरं कुनीतरी देशमुख आन्नाना बोलवा, आन् त्यांना सांगा, त्यांच्या दिवटीचा पराकरम्” दुसरा गृहस्थ.

            “पन म्या म्हंतू, हिला आपल्या गावचा रिवाज म्हायीत आसून, या साळकाया म्हाळकायांना जमवून, द्यावळात गीलीच कशी?” आणखी एक संतप्त आवाज.

            “ते काही असू दे, त्यांनी मंदीर प्रवेश करून, देवाचं पावित्र्य नष्ट केलं. आपला जागृत देव बाटविला. काय समजतात त्या स्वत:ला” पुजारी.

            आत्तापर्यंत शांतपणे उभी राहून ऐकणार्‍यांपैकी इंदिरा गंभीर व शांत आवाजात म्हणाली, “खरंच आम्ही चुकलो, क्षमा करा, पण आपला देव जागृत आहे ना?”

            “हो! हो!! हो!!! एकदम पावरबाज जागृत हाय” गावचे पाटील म्हणाले.

            “देव जागृत आहे, तर आमच्या चुकीबद्दल देवच आम्हाला योग्य ती शिक्षा देईल की, तुम्ही कशाला त्रास करून घेता?” इंदिरा.

            “….. ” गावकर्‍यांची गोची झाली.

            “…. आणि हो! देवाचं पावित्र्य नष्ट केलं, म्हणजे नेमकं काय केलं ते तरी कळू द्या.” इंदिरा.

            “साळसूदपणाचा आव आनून इच्यारतीय, ‘म्हंजे नेमकं काय केलं, ते तरी कळू द्या’ तुमी बायका अपवित्र अस्ताना द्यावळात का गेला, ह्याचा पयला जबाब द्या.” एक पोक्त गृहस्थ मूळ प्रश्न उपस्थित करतो.

            “गावकर्‍यांनो आम्ही अपवित्र आहोत हे कोणी ठरविलं?” किरण.

“ते धर्मशास्त्रानं ठरविलंय.” पुजारी.

“ते धर्मशास्त्र कोणी लिहिलंय?” सुनिताचा प्रश्न.

“पूर्वीच्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलंय.” पुजारी.

“म्हणजे पुरूषांनीच लिहून ठेवलंय ना? मृदुला.

“बरं आम्ही अपवित्र आहोत, तुमच्या म्हणण्याप्रमाणे थोडा वेळ मान्य करतो. पण तुम्ही?” मल्लेश्वरीने थेट गावकर्‍यांवर तोफ डागली.

            “…….” पवित्र म्हणून घ्यायला गावकरी लाजले.

            “आम्ही अपवित्र आहोत ना?” किरण.

            “हो! हो!! हो!!! तुम्ही अपवित्रच आहात” पुजारी निक्षून म्हणाला.

“बरं, तुमच्या घरातील तुमच्या आया, बहिणी, बायका?” उषाची शंका.

            “त्याच काय, जगातील सर्वच स्त्रिया अपवित्र आहेत.” पुजार्‍यांने अपवित्र स्त्रियांचा जागतिक खुलासा केला.

            “तुम्ही देवाला कधी नैवेद्य दाखविता का?” सुनिताची शंका.

            “दावतो की, दर आठवड्याला, आन् गावच्या यात्रेला, चांगला गोडाचा निवद आस्तो” एक वृद्ध.

            “तो गोडाचा नैवेद्य कोणी बनविलेला असतो?” मीरा.

            “कोणी काय विचारताय, आमच्या बायकाच बनवितात” पुजारी.

            “अपवित्र स्त्रियांनी बनविलेला नैवेद्य देवाला चालतो, मग स्त्रियांचा मंदिर प्रवेश, देवाला का चालत नाही?” इंदिराने गावकर्‍यांना अडचणीत पकडले.

            “……..” जमाव शांत, कारण त्यांच्याकडे त्याचे तार्कीक उत्तर नव्हते.

            “बोलाना, आता गप्प का?…. तुमचा जन्मसुद्धा तुमच्या धर्मशास्त्राने अपवित्र ठरविलेल्या मातेच्याच उदरातून झाला ना? जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी, अशी थोरवी असलेली आई- ती अपवित्र, आणि तिच्या उदरी जन्म घेतलेले तिचे मुलगेच पवित्र हे कसे काय?”

            “….. आणि हो! खरंच तुम्ही पवित्र असाल तर, पवित्र पुरूषांना जन्म देणारी, त्यांची आई किती पवित्र असेल! म्हणतात ना, ‘शुद्ध बिजापोटी, फळे रसाळ गोमटी’ याचा आपण शांत मनाने विचार करा. 9 महिने आईने पोटात वागविलेलं ओझं, सहन केलेल्या प्रसूतीच्या असहाय्य वेदना, बाळाला वाढविताना ‘तळहाताचा पाळणा व नेत्राचा केलेला दिवा.’ इ. तिचे अतुलनीय त्याग, सहन केलेला त्रास, शेवटी त्या त्यागाची परतफेड काय? तर ती आईच अपवित्र. धन्य तुमचा न्याय आणि तुमचं धर्मशास्त्र.” इंदिरा कळकळीने बोलली.

            हे ऐकताना प्रत्येकाला आपापल्या प्रेमळ, त्यागी आईची आठवण झाली त्यामुळे गावकरी शांत उभा राहून ऐकत होते. त्याचाच फायदा घेत किरण बोलू लागली, “बंधुनो, पराक्रमाचं मातृत्व, परंपरेने पुरूषांकडे असले तरी ‘मातृत्वाचा’ पराक्रम फक्त स्त्रियाच करतात. हे विसरून चालणार नाही. या जगात स्त्री नाही तर, पुरूष नाही, आणि पुरूष नाही तर स्त्रीसुद्धा नाही. अशी नैसर्गिक समान महत्व असलेली स्त्री व पुरूष दोन चाकं आहेत. आजपर्यंतची प्रगती झाली ती दोघांच्यामुळे.” किरणने समानतेचे तत्व मांडले.

            स्त्रियांचं महत्व जमाव शंतपणे ऐकत होता. त्यांना हे कळतही होतं, पण वळत नव्हतं.

            “तरीही तुम्ही अपवित्रच आहात.” पुजार्‍याचं पालुपद.

            “बरं, ठीक आहे… समजा आपल्या गावात फक्त पवित्र पुरूषच ठेवले. आणि तुम्ही अपवित्र समजता त्या तुमच्या घरातील, गावातील सर्व स्त्रिया येथून खूप दूर, दूर 8/10 वर्षेपरत येणारच नाहीत तेथे पाठविल्या, तर तुमची व जागृत देवाची काहीच ‘अडचण’ होणार नाही का?” सुनिताने कल्पना लढविली.

            “……” जमाव निरूत्तर झाल्याने शांत उभा होता.

            खरं तर मंदिर प्रवेश करून स्त्रियांनी गुन्हा केला आहे, की महिलांना मंदिर प्रवेशबंदी करून पुरूषांनी गुन्हा केलाय हे काहीच त्यांना समजेनासे झाले होते.

            “मंदिर प्रवेश करण्याचा गुन्हा करून, तुम्हीच आम्हाला ऐकवताय व शिरजोरपणा करताय?” पुजारी.

            “ वा रे वा! आम्हाला तुम्ही शिरजोर समजता… मग द्या ना आमच्या प्रश्नांची उत्तरे.” इंदिराने आश्चर्य व्यक्त करून पुढे सांगू लागली, “आपलं आयुष्य, आपल्या जन्मापूर्वी, नऊ महिन्यापासून सुरू होतं तेव्हापासून ते आजपर्यंतच्या जीवनक्रमातून तुम्ही प्रत्येकाने आपापल्या आईला वजा करा. अपवित्र ना ती….  पहा बरं तुमच्या वजाबाकीतून शिल्लक काय राहते ते?” मानवी जीवनाचं गणितच इंदिराने जमावाला सोडवायला दिलं.

            “…….” अवघड गणिताचे उत्तर जमावाकडे नव्हते.

            “बोला बंधूनो, आता का गप्प…. द्या ना उत्तरं.” इंदिरा.

            “आपली संस्कृती पुरूषप्रधान, त्यामुळे स्त्रियांची खूप गळचेपी केली…. तिच्या हातात बांगड्या, कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र अशा वेशातील स्त्रीकडे पाहिलं की, ती कुमारी, विवाहित, विधवा आहे की नाही हे पटकन ओळखता येते. पण पहा बरं तुम्ही पुरूष एकमेकांना आपापसात निरखून कुमार, विवाहित, विधूर असे ओळखण्याच्या काही खुणा तुमच्याकडे आहेत का?” मीराने थेट संस्कृतीलाच प्रश्न विचारला.

            “याचाच अर्थ स्त्रियांना धर्माच्या नावानं असंख्य बंधनात जखडून ठेवलं आहे. आणि पुरूष मात्र बंधनमुक्त जगत आहेत” उषा.

            “आज मुलींना मुक्तपणे शिकता येते. त्यांच्या शिक्षणाला, सर्वांगीण विकासाला उत्तेजन देणारं वातावरण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हालअपेष्टा, त्रास सहन करून निर्माण केलं आहे. म्हणूनच आम्ही शिकून उच्चपदाच्या नोकर्‍या समर्थपणे करू लागलो. असंच मुक्त वातावरण तुमच्या गावात, मंदिरात निर्माण करा” किरण.

            “…….” जमावाला काय बोलावं हे कळत नव्हतं. तर्कशुद्ध विचार ऐकून जमाव स्तब्ध झाला होता.

            इंदिरा, किरण, उषा, सुनिता, सौदामिनी यांना वाटलं आता गावकर्‍यांना आपली मतं पटली आहेत म्हणूनच ते गप्प बसलेत. आता त्यांची काही आपल्याविषयी तक्रार नाही, असे या मैत्रिणींना वाटत असतानाच एक वृद्ध भीतभीत, संकोचाने, चाचरत म्हणाला, “तू…. तू… तुमचे त्ये महिन्याचे च्यार दिस…. म्हंजे इटाळ.”

            “गावकर्‍यांनो…. तुम्हाला कसं समजून सांगायचं…. ते ‘चार दिवस’ असतात म्हणून तर तुमचा, आमचा जन्म होतो. आपल्या जन्माच्या सुरवातीचं ते एक नैसर्गिक व अटळ गुपित आहे. त्याला अपवित्र, इटाळ म्हणून खिजवू नका. ते चार दिवस थांबले तर मानवाची निर्मितीच थांबेल.” सुनिताने खुलासा केला.

            “तरी पण ते चार दिस अपवित्रच आसत्यात” तोच वृद्ध.

            “मानव निर्मितीच्या सुरवातीचे ते चार दिवस नैसर्गिक आहेत, त्यालाच जर आपण अपवित्र म्हणून स्त्रीची हेटाळणी करीत असाल तर धन्य तुमची व पुरूष प्रधान सं.स्कृतीची” मृदुलाने नाराजी व्यक्त केली.

            “झोपेत माणसाच्या तोंडात लाळ येते. ती दात घासून, तोंड धुऊन आपण स्वच्छ करतोच ना. तशीच ती सुद्धा स्वच्छ करता येते” उषाचे बिनतोड उत्तर.

            तरी सर्व गावकर्‍यांच्या माना नकारार्थीच हालतात.

            “तरीही स्त्रिया अपवित्रच असतात, असंच तुमंच मत आहे का?” मीरा.

            “होय, होय! त्या अपवित्रच असतात” पुजारी.

            “गावकरी बंधूनो, खरं आणि स्पष्ट म्हणून उद्धट समजू नका व रागावूही नका…. त्या महत्वपूर्ण, अटळ व नैसर्गिक चार दिवसांने तुमच्या दृष्टीने स्त्रिया जशा अपवित्र ठरतात, तर आमच्या दृष्टीने स्वप्नदोषामुळे व स्त्रीविषयी वाईट विचारामुळे पुरूषसुद्धा अपवित्रच ठरतात” मीराने प्रश्न उलटवला.

            “सुंदर तरूण स्त्री दिसल्यावर, पुरूषांच्या मनात वाईट विचार येताततच ना. तेव्हा ते सुद्धा अपवित्रच ठरतात.” उषानेही एक बाण सोडला.

            आता मात्र पुरूषांची बंभेरी उडाली. त्यांची तोंडच बंद केली.

            कधीही न ऐकलेली माहिती ऐकून, ग्रामस्थ अस्वस्थ झाले. ग्रामस्थांना ही तर्कसंगत उत्तरं पटतही होती. पण कबूल करवत नव्हती. अजूनही त्यांच्या माना नकारार्थीच हालत होत्या.

            “गावकर्‍यांनो हे मंदीर कोणी बांधलं? ही मूर्ती कोणी घडवून येथे बसविली?” मल्लेश्वरीचा प्रश्न.

            “कोणी काय विचारताय? आम्ही गावकर्‍यांनीच हे सर्व केलंय” पुजारी.

            “म्हणजे तुम्ही पुरूषांनी घडविलेल्या मूर्तीला स्पर्श करायला व तुम्ही बांधलेल्या मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशाला बंदी घालता, स्त्रियांना अपवित्र मानता… पण जिथं जाण्याचा अधिकार जन्मावर आधारित नसतो, स्त्री-पुरूष लिंगभेदावरही अवलंबून नसतो…. गावकर्‍यांनो विनंती करते कृपया लक्ष देऊन ऐका…. तर तेथे जाण्याचा अधिकार फक्त शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमतेवरच मिळतो. महिलांनाही शिक्षणाची, प्रगतीची योग्य संधी दिली तर साहस, कर्तृत्व व ज्ञान याच्या जोरावर महिला सुद्धा कुठवर जाऊ शकतात त्या क्षेत्राचं नाव अंतराळ क्षेत्र. अशा अंतराळातील, आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात तब्बल 195 दिवस म्हणजे साडे सहा महिने राहून, विविध प्रयोग केलेली भारतीय वंशाची मुलगी सुनिता विल्यम. या सुनिताने अंतराळात म्हणजे पृथ्वीपासून 4000 कि.मी.वर आकाशात एकूण 44 तास 2 मिनिटं यानाच्या बाहेर येऊन यानाची दुरूस्ती केली. त्याला इंग्लिशमध्ये ‘स्पेसवॉक’ म्हणतात. त्याबरोबरच 4 तास 24 मिनिटे अंतराळयानात धावून बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेत पळण्याचा विक्रम केला. सुनिता अंतराळात दुसर्‍यांदा गेली तेव्हा 79 दिवस राहिली म्हणजे एकूण 274 दिवस ती अंतराळात राहून आली आहे. यापूर्वी भारताची कल्पना चावला दोन वेळा अंतराळात जाऊन आली. तुमच्याच गावची ही सौदामिनी देशमुख विमान चालविते. आपल्या भारत देशातील पहिली स्त्री वैमानिक बनण्याचा तिने मान मिळविला आहे. याचा तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे. या किरण, मृदुला, मीरा पोलीस अधिकारी आहे. ही फातिमा बिबी एका गावची आदर्श सरपंच. खेळात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पी.टी.उषा व या देशाचे पंतप्रधानपद भूषवणार्‍या इंदिरा गांधी यांचे कर्तृत्व तुम्ही मान्य करणार की नाही? महिलांनी केलेल्या मंदिर प्रवेशाबाबत गावकरी काय भूमिका घ्यावी ह्याचा निर्णय घेण्यापूर्वीच अचानक तेथे पोलिसांची व्हॅन व जीप येऊन थांबली. कोणी तरी तक्रार केल्यामुळे पोलीस त्यांना अटक करून घेऊन जातील असे गावकर्‍यांना वाटत होते. पण वेगळंच घडलं. पोलीस, इन्स्पेक्टर गाडीतून उतरले व त्यांनी या 9 महिलांना सलाम केला. हे पाहून गावकर्‍यांचा व तक्रार करण्यार्‍याचा अपेक्षाभंग झाला. पोलीस निरीक्षक जमावाला उद्देशून म्हणाले, “गावकर्‍यांनो या कर्तबगार महिला आपल्या गावात आल्याची माहिती वरिष्ठाकडून तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती. सी.आय.डी.व आमचे सिव्हीलमधील पोलीस आपल्या गावातून चकरा मारीत आहेत, परंतु हा पूर्ण घरगुती कार्यक्रम व गावात असल्याने विशेष संरक्षणाची गरज जाणवली नाही. गावकर्‍यांना व या कर्तबगार महिलांच्या आनंदावर पोलीस शिस्तीचा बडगा नको. गावभेटीचा मनमुराद आनंद मिळावा तसे गावचे वातावरणही शिस्तप्रिय असल्याने विशेष संरक्षणाची गरज नाही असे लक्षात आले. त्यामुळे संरक्षण यंत्रणा शिथील केली होती.” पोलीस निरीक्षक पुढे सांगू लागले, “महिला मंदिरात घुसून गावाचा रिवाज मोडल्याबद्दल त्यांना अटक करा” असा आम्हाला निनावी फोन आल्यामुळे आम्ही आलो आहोत. त्यांना अटक करण्यासाठी नव्हे तर कायदा व सुव्यवस्था पाळण्यासाठी आलो आहोत. हे स्त्री-पुरूष समतेचे दिवस आहेत. निसर्ग नियमाप्रमाणे स्त्री-पुरूष समान असून भारतीय राज्यघटनेने त्याला कायद्याने आधार दिला आहे. पुरूषाला जेवढे हक्क व मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेने दिले तेवढे हक्क व कर्तव्य स्त्रीला दिली आहेत. म्हणूनच आता राजकारणात सुद्धा 33% जागा महिलांसाठी राखीव आहेत. भारताच्या राष्ट्रपतीपदी सुद्धा एक महिला विराजमान झाली होती. जागतिक नाणेनिधीच्या प्रमुखपदीसुद्धा फ्रेंचची अर्थमंत्री क्रिस्टीन लेगार्ड म्हणजे एक अर्थतज्ञ महिलाच आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शिका राजमाता जिजाऊ माँसाहेब या सुद्धा हुशार, कर्तबगार महिला होत्या. आपल्या देशात व जगातसुद्धा अशा कर्तबगार व हुशार महिला खूप आहेत. याची जाणीव आपणाला असेलच. लोकशाही देशात स्त्री-पुरूष लिंगभेदाला खतपाणी घालणारे फलक सार्वजनिक ठिकाणी लावणे व तशी कृती करणे आजच्या विज्ञानयुगात पूर्णपणे विसंगत आहे.

            आज आपल्या गावात कर्तबगार महिला न बोलविता आल्या आहेत, हा आपल्या गावाचा बहुमान समजून त्यांचा सत्कार करा.” इति पोलीस निरीक्षक.

            “गावकर्‍यांनो, माझ्या मुलीमुळे आपल्या गावची प्रथा मोडली त्याबद्दल मी माफी मागतो.” कोणीतरी सांगितल्यावरून सौदामिनीच्या वडिलांनी धावत पळत येऊन गावकर्‍यांची माफी मागितली.

            “न्हाय देशमुख आण्णा. माफी मागू नका, सौदामिनीची किंमत व कर्तृत्व आज आमाला कळलं. तिचा अन् तिच्या मैतरणीचा आता सत्कार करू” सरपंच.

            पुजारी व सरपंचांनी काहीतरी आपापसात चर्चा केली. आणि गावकर्‍यांच्या वतीने सरपंच बोलू लागले. “थोर कर्तृत्ववान भगिनींनो आम्माला माप करा, आमचं चुकलं, इनिस्पेक्टरसो या भगिनींनी मगाशी आमची चांगली कानउघडणी केली, ती वास्तवाला धरूनच व्हती. आमीच वास्तवाला सोडून बोलत आन् वागत व्हतो. याचा आमाला आता पच्चाताप व्हतोय. सर्व गावकर्‍यांच्या वतीनं आज जाहीर करतो की, ‘आतापासून हे देऊळ बायकांना खुलं राहिलं.’

            ‘देऊळ बायकांना खुलं राहिलं’ सरपंचाचे शब्द ऐकताच 9 मैत्रिणी, पोलीस निरीक्षक व गावकर्‍यांनी जोरदार टाळ्या वाजवून ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले आणि स्त्री-पुरूष विषमता निर्माण करणारा तो ‘पुरातन’ फलक काढून टाकला.

            गावकर्‍यांनी वाजतगाजत मंदिरापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत 9 हिरकण्यांची मिरवणूक काढली, त्यांच्यासह पोलीस निरीक्षकाचा सत्कार केला. काही जुन्या विचाराच्या लोकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली, पण सुशिक्षित तरूणांनी त्यांची समजूत घातली.

            “आपल्या गावची सौदामिनी किती कर्तृत्ववान मोठी आहे. तिच्या मैत्रीणी किती कर्तृत्ववान आहेत” याची चर्चा गावभर झाली.

            सौदामिनीची व सर्व मैत्रिणींची गावकर्‍यांना आज नव्यानेच ओळख झाली. जुनी, कालबाह्य प्रथा मोडायला सौदामिनीच कारणीभूत झाल्याने तीसुद्धा आज विशेष आनंदात होती.

            “चला भूका लागल्या असतील, आईसुद्धा वाटत पहात असेल” सौदामिनी हर्षभरित होऊन म्हणाली.

            “अगं तमाम स्त्रियांवरील जुलमी, अन्यायकारक व कालबाह्य नियम तोडला व गावकर्‍यांनेही मोठ्या मनाने मान्य केलं याचा आनंद झाला. त्या समाधानात भूक पळाली वेळेचेही भान राहिले नाही” इंदिरा हसत म्हणाली.

            “मी या गावचीच, पण मनात असूनही, एकटी ही प्रथा बदलू शकले नाही, परंतु आज आपण मिळून सार्‍याजणीने विशेष प्रयत्न न करता प्रथा मोडली, याचे श्रेय तुम्हा सर्वांचं” सौदामिनी मैत्रिणींबद्दल कृतज्ञतेने बोलली.

            “अगं, पण गावकर्‍यांनाही ते पटलं व त्यांनी तशी कृती केली त्यांचाही वाटा महत्वाचा आहे” किरण

            “अगं एकीचे बळ, मिळते फळ’ म्हणतात ते खरं आहे” सुनिता.

            हसत-खेळत 9 मैत्रिणी घराकडे, पोलीस तालुक्याला व गावकरी आपापल्या घरी गेले. अनेक वर्षांची स्त्री-पुरूष विषमतेची प्रथा मोडल्याची चर्चा गावभर रंगली. विज्ञान युगात, धार्मिक क्षेत्रात स्त्रियांनाही ‘समानता’ मिळाल्याची ऐतिहासिक बातमी पेपरमध्ये झळकली.

नवनाथ गिताबाई धोंडीराम लोंढे