Categories
चिकित्सा

मोक्षाचा घाऊक बाजार : नृसिंहवाडी

वार्षिकांक – २०१४

हल्ली लाखोंच्या संख्येत लोक सर्वच क्षेत्रातील तीर्थक्षेत्रांकडे जात असतात. वाहतुकीतील सुलभता हे तसे दुय्यम कारण. पण त्या तीर्थक्षेत्रासंदर्भातील दंतकथा, चमत्कारांचे दावे, मनोविकार आणि इतरही आजार बरे करण्याचे तथाकथित उपचार, परंपरागत रूढी, नवस फेडण्याचे प्रकार याचाच पगडा असल्याचे दिसून येते. त्यात या सर्व गोष्टींचे ‘मार्केटिंग’ हल्ली अतिशय आक्रमकपणे केले जात आहे. त्यामुळे हा पगडा आणखीनच घट्ट होत चालला आहे. वार्षिक अंकात आपण दरवर्षी अशाच एखाद्या तीर्थक्षेत्राचा विविध अंगाने वेध घेत असतो. या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील ‘नृसिंहवाडी’ या तीर्थक्षेत्राबद्दल लिहीत आहेत अनिल चव्हाण….

हॉल खचाखच भरला होता. डोक्याचा गोटा केलेली, पंचा नेसलेली, हात जोडून नमस्कार करत उभी असलेली, आणि भक्तीभावाने बसलेली ही माणसे. माणसांची गर्दी असली तरी त्यांना एक शिस्त होती. प्रत्येकासमोर नारळ, पानसुपारी, मूठभर तांदूळ अशा समान गोष्टींचा एकेक ढीग होता. माणसांच्या विविध लांबींच्या ओळी होत्या. ओळीतील प्रत्येक व्यक्ती एकच कृती करत होती. त्या ओळीतल्या सर्वांचे लक्ष समोर उभा असणार्‍या एकाच व्यक्तीकडे होते.

हॉल माणसाप्रमाणेच वस्तूनीही खचाखच भरला होता. काही ओळी समोरचे एक फूट लांबी रूंदीचे यज्ञकुंड धूर ओकत होते; तर काही ओळीसमोरचे यज्ञकुंड धूर ओकण्यासाठी सज्ज झाले होते. त्या धुरानेही हॉल भरला होता.

त्या शिवाय मंत्रानेही भरला होता. विविध सुरातले, विविध उच्चारातले, विविध गतीतले पण संस्कृतमधले मंत्र. मध्येच ‘समर्पयामी’ म्हणत ‘आचमन करा’, ‘हात जोडा’ अशा मराठी मधल्या सूचना! या सूचनानीही हॉल भरला होता.

शंभर फूटापेक्षा जास्त लांबीच्या हॉलमध्ये एकाचवेळी सुरू असलेले हे धार्मिक विधी, दरवाजातून आम्हाला पहाता आले. दरवाजावर उभा असणारा शिस्तप्रिय स्वयंसेवक मधूनच सूचना देत होता- “श्राद्ध घालणार्‍या यजमानालाच फक्त आत जाता येईल, नातेवाईकांनी बाहेरा थांबा.”

म्हणजे बाहेर थांबलेले नातेवाईक होते. पितराच्या डायरेक्ट वारसालाच फक्त आत प्रवेश होता. पितरांना आत सोडायला असा कोणी स्वयंसेवक असेल काय? त्यांची गर्दी आवरणार कोण?

आपण कुणाकडे चौकशी करावी असा विचार करत असतानाच दहा बाराजण बाहेर येताना दिसले. हाताच्या ओंजळीत एका पत्रावळीच्या तुकड्यावर एक घास भात घेऊन ते बाहेर येत होते. डोक्याचा गोटा, आणि धोतरलातली माणसे,

गोर्‍यागोमट्या आणि वजनदार व्यक्तीमत्व असणार्‍या एकाच्या कानाला नामदेव लागला. “आम्हाला पण श्राद्ध घालायचं हाय.” पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. पुन्हा विचारले तरी तेच! त्याने मौन सोडले नाही. पण ओंजळ हालवून खूण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्या मदतीला दरवाजातला स्वयंसेवक आला. “काय पायजे तुम्हाला? त्यांना काही विचारू नका. ते पितरांना नैवेद्य ठेवायला चाललेत. ते मौनात हायेत.”

आमचे वडील कावळे

ही रांग समोरच्या पिंपळाकडे चालली होती. हातातला चिमूटभर नैवेद्य त्यांनी इमारतीवर ठेवला.

गावातल्या स्मशानात भरभरून किमान 15-20 पदार्थ पत्रावळ्यात ठेवले जातात. प्रत्येक पत्रावळीत भात, भाजी, चपाती, भाकरी, अंडे, मटण, बाटली, चहा, भजी, चिवडा, फळे, जिलेबी. किती पदार्थ असतात. इथे चिमूटभर भातावर पितरांची बोळवण केली जाते. नवीनच डायबेटीस झालेल्या माणसाने पोटात भीती ठेवून पथ्य पाळायला सुरवात करावी, तशी पितरांच्या तब्येतीची इथे काळजी घेतली जात असावी; आणि नॉनव्हेज तर नाहीच.

स्वयंसेवक सांगत होता – “यजमानाला कशाला विचारताय? भटजीला विचारा.” आणि त्याने त्या आठ दहा जणांच्या मागून तोंडातल्या तोंडात मंत्र पुटपुटत येणार्‍या व्यक्तीकडे बोट केले.

आम्ही गोर्‍या गोमट्या, जाडजूड आणि गोटा केलेल्या व्यक्तीला भटजी समजत होतो, तो होता यजमान! स्वर्गात पोहोचलेल्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून श्राद्ध घालायला आलेला.

मागे केसांचा व्यवस्थित भांग पाडलेला, आमच्यासारखाच हाडकुळा, आमच्यासारखाच सावळा, भटजी होता. अशी फसगत बर्‍याचदा झाली. इथला भटजी ओळखायला धोतर एवढी एक खूण लक्षात ठेवायची.

त्या मंत्रमग्न भटजीला विचारण्यापूर्वीच तो लगबगीने हॉलकडे वळला. आजपर्यंत ‘सामुदायिक लग्ने’ हा प्रकार आम्ही पाहिला होता. उपरण्याला गाठ मारल्यामुळे, नवरानवरी बदलले जात नाहीत. इथे ‘सामुदायिक श्राद्ध’ चालले होते. ज्याचा त्याचा पितर वारसाला आणि त्याने ठेवलेल्या भाताच्या नैवेद्याला कसा ओळखत असेल?

एका गटातल्या आठदहा जणांचे पितर एकदमच तृप्त करायचे आणि तशा पंधरावीस गटांचे श्राद्ध एकाच हॉलमध्ये, एकाच वेळी सुरू ठेवायचे. लोकसंख्यावाढीचे परिणाम माणसे भोगताहेत, पण ते पितरांनाही भोगावे लागावेत?

आम्ही भटजींच्या गर्दीतच भटजी शोधत फिरू लागलो. हॉलच्या पलिकडे गोटा करण्यासाठीही अशीच गर्दी होती. कलाकार आपला हात सफाईदारपणे फिरवत. दोन पाच मिनिटात दाढी-मिशा, वाढलेल्या झुलुपासह नष्ट होत. मग ही पैलवान फॅशनची गर्दी नदीत उतरे. मागोमाग कपडे आणि टॉवेल सांभाळत एक गर्दी पायर्‍यांवर उभी राही. पाण्यातून बाहेर येणारा ‘नग’ आपलाच आहे, याची खात्री करून घेई. मग सोवळे धोतर पुरवले जाई.

चारपाचशे फुटांच्या विस्तीर्ण घाटावर या शिवाय पुण्यप्राप्तीच्या आशेने महिलांचेही स्नान सुरू होते. अंगावरचे कपडे तसेच ठेवून अवघडून बसूनच त्यांची आंघोळ होते. आपणही मनसोक्त आंघोळ करावी, असे त्यांना वाटत नसेल काय? कोणत्याच नदीवर त्यांच्यासाठी एखादा राखीव कोपरा आणि आडोसा का असू नये?

काही जण सहकुटुंब अस्थी विसर्जनासाठी आलेले. पाण्यात उतरून अस्थी सोडताना काठावरून भटजी मंत्र पुटपुटत होता. मला मात्र संत तुकारामांचा अभंग आठवला

“भुके नाही अन्न। मेल्यावरी पिंडदान॥

तुका म्हणे स्नान केले मलमुत्रे॥

जेवविली पितरे, अमंगल॥

ही सर्व गडबड सुरू होती नरसोबा वाडीला. कोल्हापूरपासून 50 कि.मी.वर तर जयसिंगपूरच्या रेल्वेस्टेशन पासून 15 कि.मी.वर असणारे हे धार्मिक स्थळ. कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांच्या संगमावर एक चौरस मैल क्षेत्रामध्ये वसलेले. कृष्णेच्या एकावन्न पायर्‍यांच्या भव्य घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षातळी सुंदर शिलामय मंदिर आहे. श्री.दत्तात्रेयांचे पादुकांच्या रूपाने इथे वास्तव्य आहे असे भाविक मानतात. त्यांची त्रिकाल पूजा, आरती, महाभिषेक, पालखी, मिरवणूक इ. महोत्सव रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू असतात.

इथे दत्तांच्या पादुका आहेत. पण त्याला दत्तवाडी किंवा दत्तनगर नाव मिळालेले नाही. नाव आहे नृसिंहवाडी. बोलीभाषेत नरसोबावाडी झालेले.

नरसोबा हे नाव जोतिबा, बहिरोबा, बिरोबा, म्हसोबा अशा कुळीतले. नरसोबाची देवळे खेड्यात आढळतात. त्यात ओबडधोबड मूर्ती असते.

नरसोबा आणि नृसिंह एकच असावेत काय? की नामसदृश्यामुळे एक होत आहेत? नरसोबाची बहीण यमाई. पण नृसिंहाला बहीण नाही.

नृसिंह बळीच्या कथेत येतो. “इडा पिडो टळो, आणि बळीचे राज्य येवो” अशी प्रार्थना ग्रामीण महिला दरवर्षी दिवाळीला करतात. बळी आणि त्याच्या वंशातल्या राजांनी विरोध केला. यज्ञात शेतकर्‍यांची गुरे-ढोरे बळी द्यायला विरोध केला. शेतकर्‍यांच्या उठावामुळे यज्ञ बंद पडले. ही यज्ञरूपी रोजगार हमी योजना बंद पाडली म्हणून विष्णूने अवतार घेऊन हिरण्यकश्यपूला फसवून ठार मारले. तो अवतार नृसिंहाचा.

पण नरसोबा आणि नृसिंह या दोघांचाही संबंध नृसिंहवाडीशी नाही. हे नाव मिळालेय ‘नृसिंह सरस्वती’ यांच्यामुळे. ते दत्तावतारी!

दत्त संप्रदाय

दत्त हे लोकप्रिय दैवत आहे. श्री.दत्तात्रेयांच्या अवतारात ब्रम्ह, विष्णू, महेश या तीन देवांचे ऐक्य आहे. श्री.दत्तात्रेयांनी फकीर, मलंग, वाघ इ. रूपात भक्तांना दर्शन दिल्याच्या आख्यायिका आहेत. त्रिमुखी आणि एकमुखी दत्तमूर्ती प्रमाणेच दत्त पादुकांचीही पूजा अर्चा भक्तमंडळी करतात. गुरूवार हा दत्ताचा वार. मार्गशीर्ष पौर्णिमा ही दत्तजयंती म्हणून साजरी केली जाते. अद्वैत दृष्टिकोन हे दत्तसंप्रदायाचे वैशिष्ट्य मानले जाते.

भूत-पिशाच्च, दत्तात्रेयाजवळ उभे राहू शकत नाहीत, असा लोकांमध्ये समज आहे. त्याचा फायदा दत्तावतारी धार्मिक स्थळांना बर्‍यापैकी होतो. बुद्धीची देणगी अत्यल्प असणार्‍या मुलांना दत्ताचा अवतार म्हणून बर्‍याच भागात मान्यता मिळताना दिसते.

दत्तात्रेयांची जन्मकथा

दिंडोरी, जि.नाशिक येथील समर्थ प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या गुरूचरित्राच्या चौथ्या अध्यायात दत्तात्रेयांची जन्मकथा दिली आहे.

ब्रम्हदेवाने आपल्या मनापासून सात मानसपुत्र निर्माण केले. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्थ, पुलक, क्रतु आणि वसिष्ठ. या सात पैकी अत्री हा प्रमुख. त्याची भार्या अनुसया, ही सर्व पतिव्रतात, श्रेष्ठ व जगदम्बा होती. तिची पतीसेवा व पातिव्रत्य पाहून ती स्वर्गाचे ऐश्वर्य लवकरच घेईल, म्हणून सर्व देव भयभीत झाले. इंद्र आदि देव ब्रम्ह, विष्णू व महेशाकडे गेले. तेव्हा ब्रम्ह, विष्णू व महेश हे पतिव्रता अनुसयेचा व्रतभंग करून तिला भूलोकी किंवा यमलोकी पाठवण्याच्या इराद्याने निघाले. ते भिक्षुकाचे रूप घेऊन आश्रमात आले. त्यांनी भोजन मागितले.

अतिथी म्हणून भोजनास बसल्यानंतर ते अनुसुयेला म्हणाले, “तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे, अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही.” “नग्न होऊन आम्हांसी। अन्न वाढावे परियेसी। अथवा काय निरोप देसी। आम्ही जाऊ नाहीतरी॥37॥ (अध्याय-4 गुरूचरित्र)

तेव्हा अनुसुयेने तसे केले.

“पाकस्थाबा जाऊनी आपण। चिंतन करी पतीचे चरण।

वस्त्रे फेडुनी झाली नग्न। म्हणे अतिथी बाळे माझी॥42॥

त्यावेळी हे अतिथी खरेच बाळे झाले. त्यांच्या एक रूपातून त्रिमुर्ती दत्ताचा जन्म झाला.

“नग्न होऊनि सती देखा। घेऊनि आली अन्नोदका।

तव तेची झाली बाळका। ठायांपुढे लोळती॥43॥

या कथा अतिरंजित किंवा चमत्कारिक वाटत असल्या तरी त्यांच्या सहाय्याने इतिहासाचा मागोवा घेता येतो.

थोर इतिहास संशोधक कोसंबी यांनी त्यांच्या ‘पुराणकथा’ व ‘वास्तवता’ या ग्रंथामध्ये दैवतांच्या कथांमागील इतिहास उलगडून दाखवला आहे. दैवते स्वत: विवाह करत नाहीत किंवा संघर्षही करत नाहीत. एकी किंवा संघर्ष त्यांना मानणार्‍या संप्रदायामध्ये होत असतो. दोन संप्रदायांचे ऐक्य दैवतांच्या विवाहामधून प्रतित होते.

ब्रम्हा, विष्णू आणि महेश अशा तीन दैवतांना मानणार्‍या संप्रदायांचे ऐक्य झाल्यावर पुरोहितांनी दत्तात्रयांना जन्माला घातले असावे. तिघांमध्ये असलेल्या वासनेचे रूपांतर अनुसुयेमुळे मातृप्रेमात होते. यातून तिघांपेक्षाही दत्ताचे श्रेष्ठत्व सांगायचे आहे. असे मत डॉ.राजेंद्र कुंभार यांनीही व्यक्त केले आहे.

दत्ताच्या पायांशी चार कुत्री दाखवली जातात, ती वेदांची प्रतिके मानली जातात. “वेद अपौरूषेय आहेत. तेच आदि व अनंत आहेत. त्यातूनच विश्वाची निर्मिती झाली” असे सांगणार्‍या वैदिकांना “ते वेदही दत्ताच्या पायाशी लोळण घेत आहेत” हे प्रतिक पचवणे अवघड गेले असले पाहिजे.

दत्तात्रेयांचे योगीराज, विश्वंभर, मायामुक्तावधूत, आदिगुरू, दिगंबर इत्यादी सोळा अवतार मानले जातात. हे झाले पुराणातले. अलिकडच्या काळातले अवतार वेगळे. त्यातला पहिला अवतार “श्रीपाद वल्लभ” इ.स.1320 ते 1350 हा त्यांचा काळ. आंध्र प्रदेशातल्या पीठापूर नावाच्या गावी त्यांचा जन्म झाला. आपलराज आणि सुमती हे ब्राम्हण दांपत्य त्यांचे आईवडील. त्यांची काही मुले अल्पायुषी ठरली. तर काही अधू व दृष्टिहीन.

एकेदिवशी घरात श्राद्ध असताना अतिथी वेशात श्री.दत्त भिक्षेसाठी आले. श्राद्धाचे भोजन झाल्याशिवाय अतिथीला भिक्षा घालणे शास्त्राच्या विरूद्ध. पण तरीही सुमतीने त्यांना भिक्षा घातली. तेव्हा प्रसन्न होऊन दत्त म्हणाले, “माते तुला हवा तो वर माग!” “आपण मला माता म्हणालाच, तेच खरे करून दाखवा!” असे सुमती म्हणाली. त्यानुसार श्रीपाद वल्लभांचा जन्म झाला. तीर्थक्षेत्रे करून ते शेवटी कृष्णेच्या काठावर कुखपूर येथे आले. आणि गंगेत अदृश्य झाले.

टेंबेस्वामी 1830 साली पीठापूर येथे आले. पण तिथे संस्थान उभे केले ते प.पू.रामस्वामी यांनी. सद्गुरू प्राप्ती व्हावी म्हणून ते सज्जनगडावर आले. तिथे श्रीधरस्वामींनी त्यांना ‘दत्तमंत्राची’ गुरूदीक्षा दिली व श्री.क्षेत्र पीठापुरम येथे जाऊन श्रीपाद वल्लभांचे मंदीर उभारण्याची आज्ञा दिली.

चातुर्वर्ण्य समर्थनाचे विचार समानच असल्यामुळे सज्जनगड काय आणि पीठापूर काय? किंवा राम काय आणि दत्त काय? दोन्ही सारखेच अशा विचारांने रामस्वामी 1966 साली पीठापुराला आले असावेत. 1983 साली छोटेखानी जागा खरेदी केली. 1987 साली दहा बाय आठ चे छोटे मंदिर बांधले. आज दोन मोठे हॉल, मोठा सभा मंडप आणि ‘श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान’ चातुर्वर्ण्याचे समर्थन करत उभे आहे.

दत्तात्रेयांचा दुसरा अवतार नृसिंह सरस्वती.

श्री.नृसिंह सरस्वती

श्री.नृसिंह सरस्वतींचा जन्म वर्‍हाड प्रांतातल्या कारंज या गावी झाला. श्रीपादांची पूजा करणार्‍या ब्राम्हण स्त्रीचा कालांतराने मृत्यू झाला. पुढे की कारंज गावाला वाजसनेय शाखेच्या ब्राम्हण कुळात जन्माला आली. तिचे नाव अंबाभवानी. तिचा विवाह, माधव या शिवभक्त ब्राम्हणाशी झाला. तिला मुलगा झाला; त्याचे नरहरी; हेच संन्यास घेऊन पुढे नृसिंह सरस्वती बनले.

लहानपणापासूनच, त्यांच्या नावावर चमत्कार नोंदवले आहेत. जन्मल्याबरोबर ॐ काराचा उच्चार, मुंजीच्यावेळी वेदांच्या ऋचा म्हणणे, आईच्या स्तनाला स्पर्श करताच दुधाच्या धारा लागणे इत्यादी.

संन्यास घेतल्यानंतर नृसिंह सरस्वती तपश्चर्येसाठी नृसिंहवाडीला आले. हा काळ 1456 चा. ही विभुती तपश्चर्येसाठी येणार म्हणून थोर योगीराज श्री.रामचंद्र योगी त्यांच्या दर्शनासाठी या भूमीत शंभर वर्षे अगोदर येऊन राहिले. आजही त्यांची जिवंत समाधी येथे विद्यमान आहे.

दर्शनासाठी शंभर वर्षे वेटींग करणे, हे म्हणजे अतीच झाले. पण अध्यात्मात अशा अनेक गोष्टी शक्य होतात. नृसिंह सरस्वतींच्या चरित्रात याचे पुरावे मिळतील. हे चरित्र म्हणजे ‘गुरूचरित्र’ गुरूचरित्र हा ग्रंथ दत्तसंप्रदायाचा वेद मानला जातो. यामध्ये आचार धर्माचे वर्णन आहे. सरस्वती गंगाधर यांनी हा ग्रंथ लिहिला.

अधिकार ब्राम्हणांचेच

श्री.टेंबे स्वामींनी गुरूचरित्राच्या पारायणाचे काही नियम सांगितले आहेत. वाचन सोवळ्यात करावे. पारायणापूर्वी अंगाला भस्म लावावे. 108 वेळा गायत्री मंत्र म्हणावे. संध्या करावी.

गायत्रीमंत्र आणि संध्या करावी याचा अर्थ वाचनाचा अधिकार केवळ ब्राम्हणानाच आहे. त्यातही स्त्रियांना नाही. ह.भ.प. रामचंद्रकृष्ण कामत, चंदगडकर, संशोधित श्रीगुरूचरित्र प्रारंभ यामध्ये श्री.परमहंस वासुदेवानंद सरस्वती यांच्या तोंडी हे मत घातले आहे. ते म्हणतात, “वाचता आले तरी स्वत: स्त्रियांनी गुरूचरित्र वाचू नये. विवाहानंतर भर्त्याबरोबर वैदिक कर्म व स्वकीय मंत्र म्हणण्यास स्त्रियांना अधिकार येतो. त्याशिवाय वेदमंत्र ऐकण्याचाही अधिकार नाही. वेदमंत्र पुरूषाचे ऐकून म्हटले तर द्रव्य चोरीचा दोष येतो.”

पारायण स्वत: (ब्राम्हणांना) करता येते किंवा दुसर्‍याकडूनही (ब्राम्हणेतरांसाठी सवलत) करून घेता येते. सात पारायणे वगैरे सेवा समक्ष किंवा ब्राम्हणद्वारा होऊ शकतात. अर्थात त्यासाठी घसघशीत दक्षिणा देण्याची तयारी हवी. अनेक प्रकाशकांनी गुरूचरित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यांच्या किंमती 100 रू.पासून 550 रूपयांपर्यंत विविध आहेत.

दत्तांची स्थाने

गाणगापूर, नृसिंहवाडी, औदुंबर इत्यादी प्रसिद्ध दत्त स्थानाशिवाय गाव आणि शहर पातळीवर प्रसिद्धी मिळवलेली स्थानेही आहेत. स्वत:ला दत्ताचे अवतार म्हणणारे नवे महाराजही जन्म घेताहेत. मूळच्या संस्थानांच्या शाखा-उपशाखा निघत आहेत. नाशिकचे दिंडोरे प्रणीत स्वामी समर्थ सेवा मंडळ, कोल्हापुरात दर शनिवारी 400-500 ची गर्दी जमवते.

या सर्व दत्त संस्थानांचे वैशिष्ट्य म्हणजे भूतबाधा, बाहेरची बाधा, पूर्वजन्मीचे दोष, काळी करणी इ.मुळे होणारा भक्तांचा त्रास बंद करणे. या सर्वांमध्ये नृसिंहवाडीचे वेगळेपण म्हणजे पूजाअर्चा आणि होमहवन यांच्या सहाय्याने वरील दोष नाहीसे करणे.

नोकरी मिळत नाही, लग्न जुळत नाही, आजार बरा होत नाही, संतती होत नाही; काम होत नाहीत, अशा कारणांनी गांजलेल्यांना कोणीतरी पत्रिका दाखवण्याचा मार्ग सुचवतात. पत्रिका पाहून ज्योतिषी दोष सांगतो.

“तुम्ही जी जमीन कसता आहात ती शापीत आहे.”

“तुम्ही राहाता आहात त्या वास्तूत दोष आहे.”

“तुमच्या जागेत सर्पाची हत्या झाली आहे.”

“तुमच्या हातून नाग मारला गेला आहे.”

“नाग तुम्ही मारला नसेल पण वाडवडीलांनी त्याची हत्या केली आहे.”

“तुमच्या वास्तुत अतृप्त आत्मा आहे.”

“तुमच्या पत्रिकेत कालसर्प योग आहे” म्हणजे पत्रिकेत राहू आणि केतू यांच्यामध्ये सर्व ग्रह एकाच बाजूस आहेत.”

“तुमच्या मुलाचा जन्म अमुक नक्षत्रावर झाला आहे, त्याची नक्षत्रशांती केली पाहिजे.”

“मंगळ शांती केली पाहिजे” इत्यादी.

मोठा डॉक्टर

असा दोष सापडला की, नारायण नागबळीविधी, त्रिपिंडी श्राद्ध, नक्षत्रशांती, कालसर्पशांती, नारायणबळी असे तोडगे करावे लागतात. गावातला डॉक्टर जसे रूग्णाला तपासून गरजेनुसार त्याला शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलकडे रेफर करतात, तसे ज्योतिषी पीडित व्यक्तीला, नृसिंहवाडीच्या भटजीकडे पाठवतात. 35% पर्यंत कमिशन मिळत असेल तर पाठवायला काय हरकत आहे?

संतोष काकिर्डे म्हणतात, “नारायण नागबळी विधी तीन दिवस चालतो. पहिल्या दिवशी चांदीचे 13 व सोन्याचा एक असे 14 नाग पुजले जातात. अमुक व्यक्तीने नागाची हत्या केली आहे, त्या पापापासून सोडवण्यासाठी आपण हा विधी करत आहोत.” असा संकल्प केला जातो.

तांदळांच्या पीठाचा किंवा कणकेचा नाग करून मंत्रोच्चारात दहन केले जाते. दहनासाठी सोन्या-चांदीचे नाग वापरले जात नाहीत.

दुसर्‍या दिवशी नागाचे(जाळलेल्या कणकेच्या नागाचे) श्राद्ध घातले जाते. माणसाच्या श्राद्ध सारखेच मंत्रोच्चार करत, कावळ्याला नैवेद्य ठेवला जातो.”

नागाचा आत्मा

कणकेच्या नागाचा आत्मा नैवेद्य खाऊन तृप्त होतो. सोन्याच्या नागाचे काय हाते? याबद्दल मला कुतुहल होते! तेव्हा समजले की, सोन्याचा नाग सदेह झोळीत जातो. तिथे त्याला त्याचे सोन्या चांदीचे बांधव भेटतात. बर्‍यापैकी गळाभेट झाल्यावर दुपारनंतर त्यांचा प्रवास घराच्या दिशेने होतो. जाडजूड तिजोरी उघडली जाते. तिथे अजून नाग एकत्र येतात. पुन:पुन्हा मोजून त्यांची पाठवणी सोनाराकडे होते. सोनार साच्यात घालून एखाद्याची शेपूट ठाकठीक करतो. मग एकेकाची रवानगी पुन्हा नरसोबावाडीला होते. जन्ममरणाच्या किंवा सोनार आणि श्राद्धाच्या फेर्‍यातून त्यांची सुटका होत नाही. तिसर्‍या दिवशी त्रिपींडी श्राद्ध घातले जाते. यावेळी पुन्हा पूजा करून भात, तीळ, आणि सातूचे 3 पिंड ठेवले जातात. सोन्याचांदीचे नाग आणि किमान 5001 रूपये एवढ्या खर्चामध्ये नारायण नागबळी विधी होतो.

अपघातात मेलेले, पाण्यात बुडालेले, शॉक लागून वर गेलेले इत्यादी अनैसर्गिक मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून नारायण नागबळी विधी केला जातो. अतृप्त आत्म्यांना सद्गती मिळावी, खरं म्हणजे, अतृप्त आत्म्याच्या काल्पनिक भीतीपासून जिवंत आत्म्याला मुक्ती मिळावी, म्हणून 2100 रूपयांमध्ये त्रिपींडी श्राद्ध केले जाते.

योग-करण-तिथी, वार-नक्षत्र ही पाच अंगे म्हणजे पंचांग! जन्मावेळच्या पंचांगात दोष आढळतो. तेव्हा नक्षत्र शांती करायला सांगतात. त्याचा दर 1500 रूपये असतो.

आत्मा घरात नको

श्राद्ध किंवा आत्म्याची शांंती या गोष्टी स्मशानाशी संबंधित आहेत. त्या घरी करणे बरोबर नाही. एखादा आत्मा, मुक्त होण्याऐवजी घरीच राहतो, म्हणाला तर काय घ्या?’ म्हणून हे विधी नरसोबावाडीस नदीकाठी केले जातात. पूर्वी ते घाटांवर बांधलेल्या पायर्‍यांवर केले जात. आता ऊन-पाऊस व वार्‍यापासून आत्म्यांना संरक्षण मिळावे म्हणून बांधलेल्या मोठ्या हॉलमध्ये केले जातात.

सलग रांगेत दहा बाराजणांना उभे करून श्राद्धविधी केला जातो. सुरवातीस संकल्प प्रत्येकाला वेगळा सांगतात. तासाभराच्या या पूजेत भटजी प्रत्येकी रूपये 2100 ला दहाने गुणतो. पितृपक्षात हा गुणाकार दिवसभर सुरू असतो.

आत्मे चालले दक्षिणेला

या विधींना मुहूर्ताची गरज नसते. इथे नदी काही अंतर, दक्षिणवाहिनी बनली आहे, दक्षिण दिशा ही यमाची समजली जाते. आत्म्यांना दक्षिणेकडे जाणार्‍या गाड्या इथे लगेच मिळतात.

मुहूर्तावर केली जाणारी लग्ने व मुंजी घरी किंवा मंगलकार्यालयात केली जातात. निकड असेल तर मुहूर्तही काढून मिळतो. पाचपासून पंधरा हजारांपर्यंत त्याला दक्षिणा द्यावी लागते.

निवडणुकीत यश मिळावे म्हणून इथे पाच दहा हजारात सप्तशिती मंत्र म्हणून नवचंडी याग करतात आणि पुष्पांड बळी देतात. (पुष्पांड म्हणजे कोहळा) या मंत्राचे 750 श्लोक असून 13 अध्याय आहेत.

दत्त मंदिरात(म्हणजे दत्तात्रेयांच्या पादुका ठेवलेल्या ठिकाणी) दैनंदिन पूजेशिवाय सतत काहीना काही स्पेशल कार्यक्रम सुरूच असतात. त्याचा लाभ भाविकांना सेवेच्या रूपाने(आणि मरणोत्तर पुण्याच्या रूपाने) मिळतो. तर भटजींना दक्षिणेच्या रूपाने मिळतो. जास्तीत जास्त लाभ मिळावा म्हणून विविध नावाने पूजा सुरू असतात. पंचामृतपूजा, पाद्य पूजा, एकादशिनी, लघुरूद्ध, महारूद्र, अतिरूद्र, लघुविष्णू, महाविष्णू, अतिविष्णू, महापूजा इत्यादी नावे भिन्न असली तरी, विधी समान, मंत्र समान, भटजी समान! भाविक आणि दक्षिणाच काय ती वेगळी.

पूजाअभिषेक

दत्त पादुकांचे देवालय आठ दहा फूट लांबी रूंदीचे आहे. ते पूर्वाभिमुख आहे. त्याला उत्तरेकडेही छोटा दरवाजा आहे. त्याच्यासमोर एक बाकडे ठेवलेले असते. त्या दिवशी उत्तरेकडील बाकड्यांवर बसलेल्या तीन जोडप्यांना तीन भटजी एकाच वेळी संकल्प सांगत होते. परीक्षा जवळ आल्यावर पोरं एकाचवेळी, कोणी धडा वाचतो, कोण कविता पाठ करतो, तर कोण पाढे म्हणतो; तसे भटजींचे मंत्रोच्चार आणि जोडप्यांना सूचना देण्याचे काम एकाच वेळी सुरू होते. मध्येच एका भटजीने “हं आता, दिगंबरा, दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा” हा मंत्र 21 वेळा म्हणा अशी एका जोडप्याला सूचना केली, आणि तो पूर्वेकडील दरवाजाजवळ आला. या ठिकाणचा भटजी पळीपंचपात्र घेऊन सतत अभिषेकाचे काम करत होता.

पादुका दर्शनच्या रांगेत उभा असणार्‍या एका बाईंना त्यांनी सूचना केली, “ताई जरा खाली वाका, मागच्या वहिनींना दिसू देत! वहिनी आता तुमचा अभिषेक सुरू आहे. नमस्कार करा.” हे त्यांचे आधीचे गिर्‍हाईक होते. भटजींची सूचना मिळाल्याबरोबर वहिनी-दादांनी भक्तीभावाने हात जोडले. एका मिनिटात अभिषेक झाला. त्यांना प्रसाद घेऊन जाण्याची सूचना मिळाली.

अभिषेकासाठी पूर्वेच्या दरवाजात ताम्हणात छोटी चांदीची मूर्ती ठेवलेली असते. त्यावर पंचपात्रातल्या पळीने, दोन थेंब दूध, दही, तूप, साखर व मध घातले की, अभिषेक झाला. आता “दिगंबरा दिगंबरा” 21 वेळा म्हणणारे जोडपे रांगेत येऊन आपला नंबर येण्याची वाट पाहू लागले.

वरील पंचामृत अभिषेकास षोडशोपचार पूजाही म्हणतात. दूध-दही-तूप-साखर-मध याच क्रमाने अभिषेक घालतात, मध्ये प्रत्येकवेळी पाणी घातले जाते. मूर्तीवर दही व मधाची रासायनिक क्रिया होऊन झीज होत असल्याने मूळ मूर्तीवर अभिषेक केला जात नाही.

वरील अभिषेक करत असतानाच, मंत्र, 11 ब्राम्हणांनी 11 वेळा म्हटला की, एकादशिनी झाली. आवर्तने वाढवली की, लघुरूद्र, महारूद्र होतात. महारूद्र म्हणजे त्या मंत्राची 108 आवर्तने करतात. त्यासाठी ब्राम्हण बसवले जातात. रूद्र म्हणजे शिव! शिवाच्या ऐवजी विष्णूची स्तुती करणारा मंत्र – पुरूषसुक्त म्हटले की, लघु विष्णू, अतिविष्णू वगैरे पूजा होतात. महापूजेचा दर हजार रूपये आणि ताटाला 150 रूपये प्रमाणे ब्राम्हण भोजने घालता येतात. पुण्य घरपोच मिळते.

एकच मंत्र इतक्या वेळा न कंटाळता म्हणण्याची क्षमताही वाखाणण्यासारखी आहे.

देवाची काळजी

देवासमोर पूजा पहाटेपासून सुरू असतात. त्यामुळे देवाला त्रास हेाऊ नये, याची पूर्ण दक्षता घेतली जाते.

पावसाळ्यात सर्दीची बाधा होऊ नये म्हणून देवाचे स्नान झाल्यानंतर वनस्पतींचा काढा करून देवावर घातला जातो.

उन्हाळ्यामध्ये उष्णता बाधू नये म्हणून चंदनाचा लेप देऊन थंड केले जाते.

आधुनिक वैद्यकशास्त्राचा मात्र वापर केला जात नाही. त्यामुळे देवाचे लसीकरण, इंजेक्शन किंवा सलायन लावणे असे इलाज दिसून येत नाहीत.

देवाची पूजा इमाने इतबारे भटजी करतात. गावात फिरताना त्यांच्या इमारतीवर “येथे… धार्मिक विधी केले जातील” अशा पाट्या आहेत. त्याखाली नावे आहेत. नावे भिन्न असली तरी आडनाव मात्र एकच ‘पुजारी’ आढळले.

एकाच आडनावाचे भटजी कसे काय? अशी शंका आली म्हणून विचारले तर थक्क करणारी माहिती मिळाली.

370 कलम!

देशात सर्वत्र देवळात पूजेचे हक्क तिथल्या भटजीला वंशपरंपरेने मिळालेले दिसतात. इथेही तसेच आहे. देवाची पूजा करणारी आता 150 घरे झाली आहेत. त्यांची सुरवात श्रीपाद भट जेरे यांच्यापासून झाली. ते देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण! नृसिंहसरस्वतींच्या कृपेने त्यांना मूल झाले तेव्हा श्रीपाद भटांचे वय ऐंशी तर बायकोचे वय साठ वर्षेहाते. मुलाचे नाव भैरंभट! त्यांना चार मुले झाली. चार मुलांचे चार विभाग होऊन प्रत्येक विभागाला तीन वर्षांनंतर एक वर्ष, सेवेची(व मेव्याची) संधी मिळते. कन्या राशीला गुरू बारा वर्षांनी येतो. त्यावेळी हे चारही विभाग एकत्र येऊन पूजा अर्चा करतात व देवापुढील मिळकत समान वाटून घेतात. रोजचे भाविक हजारात; प्रत्येक रू.10 तबकात टाकतोच. जयंतीला लाखो भाविक जमतात.

इतरत्र असलेल्या पद्धती प्रमाणेच हे आहे. केवळ ब्राम्हणांसाठी अशा राखीव जागा सर्वत्र आढळतात.

पण नृसिंहवाडीचे अजून एक वेगळेपण आहे, ते म्हणजे मंदिराबाहेरील विधीमध्येही बाहेरच्या व्यक्तीला, म्हणजे ब्राम्हणेतर व्यक्तीला नव्हे, तर बाहेरच्या ब्राम्हणालाही अधिकार नाही. एखाद्या भाविकाने स्वत:चा भटजी आणला तरी त्याला नारायण नागबळी, त्रिपीठीही श्राद्ध इ.विधी करण्याचा अधिकार नाही.

काश्मीर भारतात विलीन होताना, त्या ठिकाणच्या हिंदू-मुस्लीम जनतेच्या, पंडितांच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे, ती इतर भारतीयांनी येऊन हडपू नये म्हणून खास तरतूद आहे. ती तरतूद भारतीय घटनेच्या 370 व्या कलमामध्ये आहे.

बहुतेक देेवालयात, पुरोहितांच्या हक्कांचे रक्षण करणारे नियम असतात. त्यांच्या जागा राखीव असतात. शंकराचार्यांची पदेही गेली 1200 वर्षे केवळ ब्राम्हणांच्यासाठी राखीव आहेत. पण नृसिंहवाडीचे भटजी त्याच्याही पुढे गेले आहेत. त्यांनी नृसिंहवाडीतले सर्व धार्मिक विधी, नदीचा घाट, पायर्‍या या पुजारी आडनावाच्या 150 भटजींसाठी राखीव ठेवले आहेत. म्हणजे या परिसरात काश्मिरचे 370 वे कलम लागू आहे. बाहेरचा कोणताही भटजी इथे भटजीचा व्यवसाय करू शकत नाही.

काश्मिरसाठी अस्तित्वात असलेले 370 वे कलम रद्द करा म्हणून आरडाओरडा करत सत्ता मिळविणारे हिंदुत्ववादी, ब्राम्हणांसाठी राखीव असलेल्या पदांकडे मात्र दुर्लक्ष करतात. नृसिंहवाडीत एकाच घराण्याकडे असलेल्या हक्काविरोधात त्यांनी कधी आवाज उठवलेला नाही. विशेष म्हणजे या पुजार्‍यांकडे हेडगेवार आणि गोळवलकरांचे भक्त असलेले भटजीही इथल्या 370 कलमाबद्दल ब्र काढत नाहीत.

त्यांच्या व्यवसायात इतरांना प्रवेश नाही. पण ते मात्र इतरांचे व्यवसाय करू शकतात. या कुटुंबातील सुमारे 25% लोक नोकरीनिमित्त बाहेरगावी असून त्यांच्या पूजेच्या पाळीच्या वेळी पुणे-मुंबईसारख्या दूरच्या गावाहून सुद्धा नृसिंहवाडीस येतात असे ‘श्री.क्षेत्र नृसिंहवाडी दर्शन’ या माहितीपूर्ण पुस्तिकेत नमूद केले आहे.

सोवळे ओवळे

मंदिरातील सोवळ्या ओवळ्याचे पालन लहानापासून वृद्धापर्यंत काटेकोर पाळले जाते. मंदिरामध्ये पुजार्‍याशिवाय कोणालाही प्रवेश नाही. सत्ता टिकवायला सोवळ्याचा उपयोग मोठा आहे.

भटजींच्या उदरनिर्वाहासाठी पारंपरिक शेतीही आहे. अर्थात आहे, याचा अर्थ कर्त्याकडून शेती कसून घेऊन उत्पन्न मिळवले जाते. भौतिक शेती करण्यापेक्षा आध्यात्मिक शेतीची मशागत हजार पटींनी फायद्याची आहे. शंभर वर्षांपूर्वीही असे फायदे कसे घेतले जात ते पहाणे मोठे मनोरंजक आहे.

100 वर्षांपूर्वी

कोल्हापूरचे थोर सत्यशोधक व विचारवंत माधवराव बागल यांनी त्यांचे पिताजी खंडेराव बागल यांच्या आठवणी लिहिल्या आहेत. पान नं.9-10 व 11 वरील या आठवणी पाहा.

“एल.एल.बी.झाले, तेव्हा खंडेराव बागल यांना शाहू महाराजांनी बोलावून घेतले व मामलेदाराची जागा दिली. 1907 साली ते कामावर रूजू झाले. यावेळी ते शिरोळचे मामलेदार होते.

शिरोळ पेठ्यातील वाडी नृसिंह क्षेत्री, गुरूद्वादशी दिवशी प्रसाद वाटप फार मोठ्या प्रमाणावर होत असे. तो सर्व खर्च दरबारातून होई. त्यावर मामलेदारच देखरेख करीत. पण आतापर्यंत अंमलदार हे ब्राम्हणच असल्यामुळे तो प्रसाद फक्त ब्राम्हणातच वाटला गेला. सरकारचा मूळ हुकूम तसा नव्हता. हिंदूंना वाटप करावे असा होता. तथापि ब्राह्मण मामलेदारांनी आपल्या अधिकारात आपल्या इच्छेप्रमाणे प्रथा पाडली. त्याला कोणी विरोध केला नाही. हाताखालचे सर्व कारकून ब्राह्मणच. मग विरोध कोण करणार? खंडेरावनी त्यात लक्ष घातले व मूळ हुकमाला धरून सर्व हिंदूंना आपल्या देखरेखीखाली प्रसाद वाटण्यास सुरवात केली. वाडीचे पुजारी कुरकुरले, चरफडले, नाराज झाले. पण ते काहीही करू शकले नाहीत. अशी एकूण समाजाची सेवा करता आल्याबद्दल नोकरीतही ते समाधान मानून घेऊ शकले. आपल्या देखरेखीखाली मराठा, तत्सम जाती व अस्पृश्यानाही प्रसाद वाटला. त्यावेळची ही क्रांतीच म्हणावी लागेल.

आणखी एका प्रसंगाने माझे वडिलांनी पुजार्‍यांचा रोष त्यांचे एक बिंग बाहेर पाडून ओढवून घेतला. मीही (माधवराव) त्यावेळी हजर होतो. दर गुरूवारी वाडीवर भक्तांचा जमाव भरतो. त्या यात्रेकरूंवर आपल्या दैवी शक्तीचा(?) प्रभाव पाडावा म्हणून पुजार्‍यांनी एक नाटक बसवले होते. अंगात आलेल्या बाईचे भूत गुरव आपल्या मंत्रप्रभावाने काढून टाकी. त्या भुताने पछाडलेल्या बाईला देवळाजवळच्या फरशीवर बसवलेल्या खांबाला बांधून घालीत. नंतर गुरव मंतरलेल्या तांदळाचा मारा करी. त्याबरोबर भूत पछाडलेली ती बाई तो मारा सहन न होऊन ‘जातो जातो’ म्हणून किंकाळ्या फोडी. तरी गुरव मारा चालू ठेवी. अखेर ती तडफडल्यासारखे करून निश्चेष्ट राही. पुन्हा गुरव भुताला विचारी, ‘जाणार की नाही?’ ‘गेलो गेलो’ असे उत्तर येई. मग गुरव तिला बांधलेली दोरी सोडून मुक्त करी व मग ती बाई कृतज्ञतेने गुरवाचे पाय धरी. याचा परिणाम यात्रेकरूंवर होऊन त्याचं गिर्‍हाईक वाढे.

या प्रकारावर वडील धार्मिक असूनही विश्वास बसला नाही. तेथून बाई मोकळी झाल्यावर वडिलांनी पट्टेवाल्याला साध्या पोषाखात पाठवून देऊन तिला आपल्या, मुक्कामात बोलवून घेतले. ती समोर उभी राहताच त्यांनी जमदग्नीचा अवतार धारण केला. पोलिसाला बोलावले. चाबूक आणायला सांगितला व त्याला म्हणाले-

‘या बाईच्या अंगावर चाबूक फोड’ व त्यापूर्वी विचारलं,

‘खरं बोल, हे नाटक तुला कोणी करायला शिकवलं? खरं बोल, नाही तर चाबकानं झोडपायला लावून तुरूंगात डांबतो’

ती म्हणते, ‘सरकार आम्ही गरीब माणसं, पोटासाठी गुरवानं शिकवलं तसं करतो. त्याकरता तो दर खेपेस आठ आणे देतो.’

वडील पोलिसाला म्हणाले, ‘दे तिला सोडून’

वडिलांनी गुरवाची आणखी एक त्यातूनही भयंकर ठकबाजी उघडकीस आणली :

गुरवानी एक स्वामी पकडला. सर्व गुरवांनी त्याच्याविषयी अनेक चमत्काराच्या कथा पसरवून त्याचा भाव वाढवला. ‘स्वामी कुणावर घोंगडे टाकून प्रवास करतात आज इथं आहेत, तर उद्या दोनशे मैलावर प्रकट होता. मनातली इच्छा अंत:शक्तीने जाणून भविष्य सांगतात; वगैरे’…. याचा परिणाम भाविकावर एवढा झाला की, स्वामीच्या पायापुढे त्यांना प्रसन्न करण्याकरता पैशाचा व दागिन्यांचा ढीग पडू लागला. वडिलांनी पोलिस पाळतीवर ठेवले. पण हा सुगावा गुरवांना लागताच स्वामी अकस्मात अदृश्य झाले.

सत्यशोधक हे सर्व अंधश्रद्धांच्या विरोधी होते. पुढील आठवण पहा.

शिरोळ गावी महारवाड्यात दर वर्षी म्हसोबाच्या जत्रेत तक्क्यासमोर रेड्यांची अंगावर काटा उभा राहणारी अत्यंत क्रूर व राक्षसी हत्या होत असे. रेडा बांधून त्याचे मानेवर कुर्‍हाडीचे एकावर एक असे मरेपर्यंत घाव मारण्यात येत असत. त्याची ती भयंकर किंकाळी व ओरड आसपासचा भाग हादरून टाकी. वडिलांनी शाहूमहाराजांच्या कानावर ही गोष्ट घालून ती चाल बंद केली.

शिरोळ पेठ्यानंतर गडहिंग्लज पेठ्यावर बदली झाली. तेथेही गुरूद्वादशीप्रमाणे सामानगडच्या यात्रेत प्रसादाचे केवळ ब्राह्मणानाच वाटप होई. ती प्रथाही वडिलांनी बंद केली.”

नृसिंहवाडीचे महत्व वाढवण्याचे प्रयत्न एका बाजूने ब्राह्मण करत असताना, ब्राह्मणेतरांनी, आपल्यालाही पूजेचा अधिकार मिळावा, म्हणून प्रयत्न केलेले दिसतात.

1927 साली पूजेचा प्रयत्न करणार्‍या मराठ्यांशी त्यांची मारामारी झाल्याची बातमी 11 जुलै 1927 च्या सत्यवादीमध्ये आहे.

“सत्यवादी 11 जुलै 1927-गेल्या आठवड्यात श्री.क्षेत्र नरसोबाचीवाडी येथे काही मराठे व इतर मंडळींनी सत्यनारायणाची पूजा केली; व तेथील दत्ताला अभिषेक करण्याच्या इराद्याने ते देवळात जाऊ लागले. पण त्या देवाच्या ब्राह्मण दलालांनी, त्यांना आत येण्यास प्रतिकार केला. त्यामुळे दोघांची मारामारी होऊन, कित्येकांना मार बसला, असे समजते.”

गैरसमजातून किंवा जुने उट्टे काढायचे म्हणूनही इथे मारहाणीचे प्रसंग, त्यानंतर चालूच राहिले. 1928 सालची बातमी पाहा-

“(वैशाख शुद्ध शके 1850 सत्यवादी)

वाडी क्षेत्रावर ब्राह्मणी अत्याचार-

ब्राह्मण म्हटला की, तो सद्गुणांचा पुतळा असला पाहिजे, हे बोल श्री.क्षेत्र नरसोबावाडीतील ब्राह्मण पुजार्‍यांनी खोटे पाडले. शिरोळ पेठ्याचे मामलेदार मि.जाधव हे देवदर्शनासाठी वाडीस जातात काय, आणि मुंबईतील मवाल्यांप्रमाणे शे दिडशे ब्राह्मण त्यांना चोपतात काय? हा साराच प्रकार संतापजनक होय. दत्ताचे दर्शन घेणे हा काही गुन्हा नव्हे, पण जेथे सनदशीर कट होऊन मार देण्याचीच तयारी झालेली तेथे गुन्ह्याच्या स्वरूपाकडे कोण लक्ष देतो? आणि आम्हाला मराठ्यांनी चोपले म्हणून गव्हर्नरकडे ब्राह्मणांच्या तारा.”

देवाच्या भक्तीसाठी किती हा आटापिटा? पुजार्‍यांना आपली संपत्ती टिकवण्यासाठी प्रसंगी-देवाच्या हातातले त्रिशूळ स्वत:च्या हाती घ्यावे लागते.

धार्मिक युद्धांची कारणे, शोधणार्‍या संशोधकांसाठीही श्री.क्षेत्र नरसोबावाडीचा इतिहास उपयोगी आहे.

स्वर्ग, नरक, पाप, पुण्य इ. धार्मिक कथांनी हित साधत नसेल तर प्रसंगी ‘दोन हात’ करण्याची तयारी पुरोहित ठेवतात.

येणार्‍या भाविकांच्या पूजा, महापूजा, धार्मिक विधी शिवाय त्यांच्या राहण्याची, भोजनाची सोय घरी करूनही उत्पन्न मिळवले जाते.

नव्याने येणार्‍या, परिचय नसलेल्या भाविकांकरिता व्यवस्थापनाने, दोन धर्मशाळा बांधून सोय केली आहे. त्यामध्ये 27 खोल्या व तीन मोठे हॉल आहेत.

देवस्थानाजवळ हॉटेल, लॉजची सोय आहे. ग्रामपंचायतीने वाढत्या प्रवाशांसाठी उतरण्याची सोय केली आहे. संस्थानची धर्मशाळा आणि ग्रामपंचायत तीन लोकांसाठी तीनशे रूपये भाडे आकारतात, तर यात्री निवासात नॉन एसीसाठी हजार तर एसी रूमसाठी पंधराशे रूपये आकारले जातात.

देवालयाजवळ हॉटेल, भोजनालये, रेस्टॉरंट, टपर्‍या, गाडे इ.मधून चहा, नाष्टा व जेवणाची सोय आहे. पुरोहितांकडे उतरणार्‍यांना नैवेद्य आलेले व पवित्र भोजन मिळत असल्याने थोडे अधिक पैसे मोजावे लागतात. शिवाय इथे अनायासे ब्राम्हण भोजनाचे पुण्य लाभते.

ब्राम्हण भोजने

भाविकांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे 1) माधुकरी 2)ब्राह्मण भोजन 3)101 ब्राह्मणभोजन 4) सहस्र ब्राह्मणभोजन घालून प्रचंड पुण्यसंचय करावा, असे सुचवले जाते. पैकी पहिले तीन प्रकार एका दिवसात होतात. पण सहस्रब्राह्मण भोजनाचा चौथा मार्ग मात्र पाच दिवस चालतो. इतके ब्राह्मण एकाच दिवशी मिळू शकत नाहीत. ब्राम्हण भोजनासाठी पानाला दीडशे रूपये दर आहे.

याशिवाय लघुरूद्र, महारूद्र, अतिरूद्र वगैरे धार्मिक विधींच्या वेळीही ब्राह्मण भोजन इच्छेप्रमाणे असतेच. वरील विधी केवळ दक्षिणा व दूध, केळी, मिठाई देऊनही करवले जातात.

व्यवस्थापक मंडळ

पूर्वी पूजेचा अधिकार असणारे पुजारी देवस्थानचा खर्च करत. आता त्यासाठी व्यवस्थापक मंडळ तयार केले आहे. पुजार्‍यांच्या चार विभागांपैकी प्रत्येक विभागातून दोन प्रतिनिधी व चालू विभागातील एक असे नऊ प्रतिनिधींचे व्यवस्थापक मंडळ केले जाते. त्यांची निवडणूक दर चार वर्षांनी होते व अध्यक्ष सेक्रेटरी नेमले जातात.

देवस्थानासाठी औरवाड आणि गौरवाड या शेजारच्या गावातून एक हजार एकर जमिनीचे उत्पन्न मिळते. त्याचे 56 डाग आहेत. त्या शिवाय नृसिंहवाडीमध्येही देवस्थानच्या जमिनी आहेत.

भाविकांकडून मिळणार्‍या देणग्यांची त्यात भर पडते. त्यातून तेल, तूप, केशर, पूजा साहित्य आणि या परिसरातील इतर समाध्यांचे जन्मकाळ, पुण्यतिथ्या, वार्षिक महोत्सव पार पाडले जातात. व्यवस्थापनाने सेवकवर्ग नेमला आहे. त्याशिवाय विनावेतन सेवा करणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे.

वेदपाठशाळा

मंडळाने वेदपाठशाळाही चालवली आहे. त्यातून स्थानिक व बाहेरचे विद्यार्थी तयार होऊन आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यांना शिकवण्यासाठीही विद्वान अध्यापकांची नेमणूक केली जाते. घसघशीत मानधन देऊन त्यांचा सत्कार केला जातो. अर्थात हे सर्व केवळ ब्राह्मणांसाठी राखीव आहे.

माळी व पावित्र्य

देवाच्या पूजेसाठी लागणार्‍या फुलांसाठी देवस्थानने एक सुंदर बाग केली आहे. तेथे उत्तमोत्तम फुले, बेल, तुळशी वगैरे पिकवले जातात. रोज चारपाच किलो फुले लागतात. बाग फुलवणारे माळी वेतनावर आहेत ते अनवाणी चालत रोज देवासाठी फुले आणतात. ही फुले सोवळ्या ब्राह्मणांच्या हातून समाध्या व देवावर चालवली जातात. इथे माळ्यांना प्रवेश नाही. मंदिराचे पावित्र्य राखायचे असल्याने केवळ ब्राम्हणच मंदिरात जाऊ शकतात.

बादशहा आणि मंदिर!

बिदरच्या बादशहाने हे मंदिर बांधले आहे. त्याचे बांधकाम मशिदीसारखे असून पादुकावर तांबड्या रंगाचे उनी वस्त्र घालण्याची आजही परंपरा आहे. या उनी वस्त्रास मशिदीवरील वस्त्राप्रमाणे सात पाने असतात. याच राजाने औरवाड व गौरवाड येथे 1000 एकर जमीन देवाच्या पूजेसाठी दिली. त्याची सनद आज विद्यमान आहे.

या जमिनीचा शेतसारा वर्षातून एकदा देवस्थानाकडे जमा होतो अशी नोंद ‘श्री.क्षेत्र नृसिंहवाडी दर्शन’ पुस्तकात आहे.

मुस्लीम राज्यकर्त्यांनी हिंदू देवालयांना मदत केल्याचे असंख्य दाखले इतिहासात आहेत. हा इतिहास अभ्यासला तर दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक म्हणजे मुस्लीम राज्यकर्तेही सहिष्णु होते. त्यांनी हिंदू प्रजेला त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याची मुभा दिली. मंदिरांना मदत केली. तरवारीच्या जोरावर धर्मप्रसार हे अर्धसत्य आहे. धर्मापेक्षा संपत्ती आणि सत्ता महत्वाची होती. सत्ता आपली असेल तर प्रजेने कोणताही धर्म पाळण्यास हिंदू किंवा मुस्लीम राज्यकर्त्यांची हरकत नव्हती.

दुसरी गोष्ट म्हणजे बादशहा मोठ्या मनाचा होता. तो प्रजेची काळजी घेत होता. हिंदू-मुस्लीम असा भेदभाव न करता प्रजा गुण्यागोविंदाने राहात असे.

पण या सत्य इतिहासातून मुस्लीम द्वेष पसरवता येत नाही. मुस्लिमांची भीती दाखवून ब्राम्हणेतर जातींना आपल्या पंखाखाली घेता येत नाही. बादशहांपेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ हे भाविकांवर ठसवता येत नाही.

इतिहास बदला

म्हणून इतिहासात थोडा बदल करण्यात आला. आता ‘इतिहास’ बदलण्यासाठी दिल्लीत राज्य यावे लागले. त्या काळी ‘धार्मिक पोथी’च्यां नावाखाली पाहिजे ते खपवता येत असे, त्याचा फायदा घेऊन नव्या कथांना जन्म देण्यात आला.

नव्या कथेनुसार बिदरच्या बादशहाला पूर्वजन्मीचा धोबी बनवण्यात आले. धोब्याला राज्योपभोग घेण्याची इच्छा निर्माण झाली. ही बाब श्रीपादस्वामींच्या लक्षात आली. धोब्याला त्याच जन्मी राज्योपभोग देण्याची इच्छा महाराजांना होती. पण धोबीच म्हणाला, “या साठाव्या वर्षी मी काय उपभोग घेणार? तेव्हा पुढील जन्मात हा भोग भोगीन.”

पुजार्‍यांचा पूर्वज श्रीपाद भट याला महाराजांनी ऐंशीव्या वर्षी मुलगा होऊ दिला. त्याला मूल जन्माला घालायला वयाची अट आडवी आली नाही. त्याच्या बायकोला साठाव्या वर्षी मुलगा झाला. तिलाही वयाची आणि शरीरधर्माची अडचण आली नाही.

धोब्याला मात्र, आयुष्यभर कपडे धुताना नदीकाठच्या दगडावर बसून विश्रांती घेण्याची सवय असल्याने, बहुधा राजसिंहासनाची मऊ गादी टोचण्याची भीती असावी. महाराजांनी त्याला पुढच्या जन्मी बादशहा केले. त्याच्या मांडीवर सातपदरी करट आले. त्यामुळे तो नृसिंह सरस्वतींना शोधत आला. त्याचे करट बरे झाले. त्याने आपणहूनच सांगितले की, “आपण गेल्या जन्मीचा तुमचा रजक-धोबीच आहे; आपल्या राज्यात या.” महाराज ऐकत नाही म्हटल्यावर त्याने पाय धरून विनवणी केली. आपण हिंदुच असल्याचे सांगितले. तेव्हा नाईलाजाचे महाराज त्याच्या राज्यात गेले.

पुढे मात्र गाणगापुरात ग्लेंछ-यवन आपल्याला भेटायला आले-तर इतरांना त्रास होईल म्हणून ते गुप्त झाले.

कृतघ्नता

मुस्लीम राजाने दिलेली संपत्ती तर पाहिजे, पण राजा नको, म्हणून त्याच्या तोंडून तो धोबी असल्याचे, तो हिंदू असल्याचे वदवून घेण्याची कल्पना किती बुद्धिमान डोक्यातून निघाली असेल? या कथेने संपत्ती पवित्र बनली.

ज्या बादशहाने दिलेल्या एक हजार एकर जमिनीच्या उत्पन्नावर बांधून दिलेल्या देवळाच्या आश्रयावर एका कुटुंबाच्या वंश वेलाचा विस्तार दिडशे कुटुंबापर्यंत झाला; त्यांच्या एकोणीस पिढ्या जगल्या; पुढच्या एकोणीस पिढ्या जगण्याची आजच खात्री आहे. घरे, बंगले झाले; त्या बादशहाचा पुतळा करून, त्याला कधीतरी वर्षातून एकदा हार अर्पण करावा, असे कोणाला वाटले नाही. त्याच्याबद्दल कृतज्ञ राहून चार शब्द चांगले बोलावेत, त्याचे आभार मानावेत, असे वाटत नाही. एवढंच नव्हे तर त्याच्या नावाचाही कोणी उल्लेख करत नाही.( मराठी विश्वकोशात पान नं.325 वर ‘बिदरचा यवन राजा दुसरा अल्लाउद्दिन’ असा त्याचा उल्लेख आहे.)

“त्याला मिळालेले राज्यच महाराजांनी देऊन त्याला उपकृत केले आहे, नाहीतरी तो गेल्या जन्मी साधा धोबीच होता” अशी तुच्छतेची भावना बाळगली जाते. अशी कृतघ्नता का?

अशी कृतघ्नता हा अपवाद नाही. तो सर्व जातींचा सार्वत्रिक गुण आहे. कोल्हापूरात रा.छ.शाहू महाराजांनी अनेक शिक्षण संस्था स्थापन केल्या, त्यांना प्रेरणा दिली, जमीनी दिल्या, इमारती दिल्या. पण आज त्यातील कितीजणांना त्याची जाणीव आहे? शासकीय पातळीवर जयंती साजरी होईपर्यंत किती शाळांतून शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जात असे?

कोल्हापूरातल्या एका सुप्रसिद्ध हायस्कूलमध्ये दरवर्षी एक ऑगस्ट या दिवशी विद्यार्थी व्यायामाचा संकल्प सोडतात; उद्घाटन कार्यक्रमात त्याचे कारण जाहीरपणे सांगितले जाते- “एक ऑगस्ट रोजी लो.टिळक यांची पुण्यतिथी असते. लो.टिळक हे व्यायामाचे भोक्ते होते; म्हणून या दिवशी आमचे विद्यार्थी व्यायामाचा संकल्प सोडतात.”

गंमत म्हणजे ही शाळा स्थापन करण्यासाठी रा.शाहू महाराजांनी प्रेेरणा दिली, इमारत दिली, उत्पन्नासाठी जमीन दिली; ते शाहू महाराज स्वत: रोज व्यायाम करत होते, उत्तम मल्ल होते, त्यांनी अक्षरश: हजारो मल्ल घडवले, मल्ल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावून आले. हे त्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या गावीही नाही. त्यांच्या जयंतीला व्यायामाचा संकल्प सोडणे दूरच! त्यांना कोल्हापुरात घडलेला इतिहास ठाऊक नाही, पण पुण्यात लो.टिळक व्यायाम करत, याची मात्र माहिती आहे.

पूर्वजन्माचा पुरावा काय?

बादशहाने हजार एकर जमीन दान दिल्याची सनद आज विद्यमान आहे. तसा श्रीपाद वल्लभानी रजकाला बादशहा करण्याचा आशिर्वाद दिल्याचा काही पुरावा उपलब्ध आहे का? बिदरचा बादशहा गेल्या जन्मी रजक असल्याचा काही पुरावा दाखवता येतो का? पण असले प्रश्न भाविकांना पडत नाहीत.

श्रीपादभटांच्या घराची जागा देवस्थानच्या ताब्यात असून तेथे श्रींच्या पादुका स्थापून, एक छोटीशी घुमटी बांधून त्याभोवती तारेचे कुंपण केले आहे. अशी पूर्वजांची स्मृती जागवली आहे.

पूर्वीचा नदीकाठचा कट्टा वाढत्या यात्रेकरूंना गर्दीमुळे अपुरा पडू लागला. तेव्हा राज्य सरकारने मूळ कट्ट्याच्या दोन्ही बाजूस म्हणजे दक्षिणेस व उत्तरेस 100 फूट लांबीचे दोन कट्टे व पायर्‍या बांधून दिल्या. व्यवस्थापनानेही देणग्या गोळा करून कट्टा वाढवला.

देवाच्या पूजेस लागणारे साहित्य म्हणजे नैवेद्य, चंदन, केशर, अत्तर, धूप, दीप, तेल, तूप, फुले वस्त्र प्रावरणे, कद, पितांबर छाटी वगैरे समर्पण करून काही भाविक सेवा करतात. काही भाविकांनी कायमचा निधी ठेव म्हणून ठेवला आहे, त्याच्या व्याजातून त्या व्यक्तींच्या नावे पूजा, अभिषेक केला जातो. काही भाविकांनी अन्नछत्र चालवण्यासाठीही ठेव ठेवली आहे.

अन्नछत्र

वेदमूर्ती भरैंभट जेरे पुजारी प्रसादालयाच्या वतीने भाविकांना सकाळ व संध्याकाळ दोन वेळ मोफत अन्नदान केले जाते. यासाठी मोठा हॉल बांधला असून त्याची स्वच्छता, टापटीप व शिस्त वाखाणण्यासारखी आहे.

रोज हजारो भाविक त्याचा लाभ घेतात.

भैरंभट जेरे शास्त्री म्हणजे महाराजांच्या कृपेने 80 व्या वर्षी वडिलांनी जन्माला घातलेले मूल.

व्यवस्थापन मंडळ लोकोपयोगी उपक्रमही चालवते. निरानिराळ्या देवस्थानांना वस्त्र प्रावरणे देणे, गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, रक्तदान शिबीरे, नेत्ररोग चिकित्सा इ. कार्यक्रम होतात. संस्थेमार्फत रूग्णालय काढणेचा विचारही प्रस्तुत आहे असे ऐकायला मिळाले.

विश्वास नाही

गरीबी नष्ट होणे, आणि आजार बरा होणे यासंबंधी अनेक चमत्कार गुरूचरित्रात ठासून सांगितले आहेत. गुरूचरित्राच्या वाचनानेही अशा अडचणी दूर होतात असे प्रस्तावनेमधून छापले आहे. पण गुरूचरित्राचे वाचन, महाराजांची भक्ती, पूजा अर्चा, सेवा, तोडगे, यावर विसंबून राहण्याऐवजी व्यवस्थापन मंडळ आपणच पुढाकार घेऊन गरीब विद्यार्थ्यांना मदत, रूग्णचिकित्सा, रूग्णालय काढणे, यात वेळेचा व पैशाचा अपव्यय का करते कळत नाही. त्यांचा महाराजांच्या सेवेवर विश्वास नाही की काय?

की तोडगे, पूजा अर्चा, गुरूचरित्राचे महात्म्य, ब्राम्हणभोजने, लघुरूद्र वगैरे केवळ पैसे उकळण्याचे मार्ग आहेत.

गुरूचरित्र

सरस्वती गंगाधरनी नृसिंहसरस्वतींचे चरित्र ओवीबद्ध केले. हा ग्रंथ 51 अध्यायांचा आहे.

एम.ए.पी.एच.डी.असलेल्या डॉ.ज्ञानेश्वर तांदळे यांनी एका ‘श्रीमत गुरूचरित्राचे’ संपादन केले आहे. ते पारायण मार्गदर्शन करताना प्रस्तावनेत म्हणतात- ‘शंकरानी सांगितले आहे की, “यज्ञ, याग, तप, दान, तीर्थयात्रा यापेक्षा गुरूतत्वाचे ज्ञान अधिक महत्वाचे आहे. यासाठी श्री.गुरूंच्या मूर्तीचे सतत ध्यान करावे. श्री.गुरूंच्या नामाचा जप करावा.”

वरील वाक्य हे गुरूचरित्राचे मध्यवर्ती सूत्र आहे. गुरूचा महिमा ठसवणार्‍या अनेक कथा, गुरूसेवा केल्यावर इच्छित वस्तू प्राप्त झाल्याच्या कथा, प्रापंचिक अडचणी दूर झाल्याच्या कथा चरित्रात आहेत.

कथेमधील पात्रे ब्राम्हण आहेत. दोनचार अपवादात्मक कथेमध्ये यवन आणि शूद्रांचा उल्लेख आहे. गुरूमहिमा ठसवताना मनुस्मृतीची कास सोडलेली नाही. वर्णवर्चस्वाचा पुरस्कार प्रच्छन्नपणे केला आहे.

स्त्रियांसंबंधीचे विचारही मनुस्मृतीला धरूनच आहेत. पूर्वजन्म-पूर्नजन्म, कर्मविपाकाचा सिद्धांत, गुरूसेवेतूनच पुण्यप्राप्ती यावर आधारीत कथांमुळे पुरावे शोधण्याचा प्रश्न येत नाही.

37 व्या अध्यायात ब्राम्हणांचा आचार धर्म सांगितला आहे. धान्य, फुले, रंग, दिशा, अन्न, वेळ इ.मध्ये पवित्र-अपवित्र असा भेदभाव करून वर्गीकरण झाल्यावर पुत्र-कन्या जन्माची अशास्त्रीय माहिती मनुस्मृतीप्रमाणेच दिली आहे.

मुलगा की मुलगी होणार?

मुलगा किंवा मुलगी कधी होते-याची कारणे पुढीलप्रमाणे सांगितली आहेत – “दशवर्षेहोता कन्येसी। रजस्वला सर्वत्राची। ऐका तुम्ही समस्त ऋषी। पराशर सांगतसे॥22॥ ऋतू देता चतुर्थ दिवशी। पुत्र उपजे अल्पायुषी। कन्या होय पाचवे दिवशी। सहावे दिनी पुत्र परियेसा॥23॥ विषम दिवशी कन्या जाण। सम दिवशी पुत्र सगुण। दहा दिवस ऋतुकाळ खूण। चंद्रबळ असावे॥24॥

मासिक पाळीपासून दिवस मोजा. गर्भधारणा झाली त्या दिवसाला दोन ने भाग गेला तर मुलगा होणार, भाग गेला नाही तर मुलगी होणार. एवढे सोपे गणित गुरूचरित्रात मांडले आहे. विज्ञानाच्या ढीगभर चाचण्या कशाला हव्यात?

समदिवशी मुलगा, आणि विषम दिवशी मुलगी होईल, याच्या चाचण्या कोणी केल्या? याचे उत्तर काय? आमची श्रद्धा आहे.

हे अज्ञान मनुस्मृतीमधून आहे तसे उचलले आहे. मनुस्मृतीच्या दुसर्‍या अध्यायातील 47 वा श्लोक पाहा- युग्मासु पुत्रा जायन्तं स्त्रियोऽ युग्मासु रात्रिषु। तस्माद्युग्मासु पुत्रार्थी संविशेदार्तने स्यियम्।

समरात्री गमन केल्यास पुत्र होतो, व विषम रात्री गमन केल्यास कन्या होतात. यास्तव पुत्राची इच्छा असल्या ऋतुकाली सम रात्रींमध्ये स्त्रीशी गमन करावे असे सांगून पुढे वीर्य अधिक झाले तर विषमरात्रीही पुत्र होतो असेही मनुस्मृतीने म्हटले आहे. पुढे अकलेचे तारे तोडताना स्त्री व पुरूष यांचे समान बीज झाल्यास नपुसंक पुत्र होतो असेही मनुस्मृती सांगते.

कर्मविपाक सिद्धांत

चांगले वागाल तर पुढच्या जन्मी वरच्या वर्णात, श्रीमंत घरात जन्म घ्याल. वाईट वागाल तर पुढच्या जन्मात पापे फेडावी लागतील; हा कर्मविपाक सिद्धांत. यातील चांगले वागणे म्हणजे धर्माप्रमाणे; जातीभेद, उच्च नीच भेद पाळून, ब्राम्हणांची सेवा करून वागणे.

7 व्या अध्यायात चांडाळ योनीत जन्म मिळण्याचे कारण पूर्वजन्मातील पाप सांगितले आहे. चांडाळ म्हणून जन्मलेली ही स्त्री गेल्या जन्मी ब्राम्हणी होती. पण तिने शूद्राशी लग्न केले. केवढे मोठे पाप. त्यात भर म्हणजे वासरू मारून खाल्ले!

एक वासरू मारल्यावर चांडाळ योनी मिळत असेल तर पूर्वी यज्ञाच्या नावाखाली शेतकर्‍यांची गुरेढोरे कापून फस्त करणार्‍या ऋषीमुनींना किती जन्म चांडाळांचे घ्यावे लागले त्याची माहितीही जाणकारांनी सांगावी.

ब्राम्हणीने शूद्राशी लग्न करून वासरू खाल्ले त्याचा परिणाम काय भोगावा लागला पाहा-

‘ऐसी कितीक दिवसावरी। नांदत होती शूद्रा घरी।

पंचत्व पावली तो नारी। नेली दुती यमपुरी॥107॥

घातले तिसी नरकात। भोगभोगी अतिदु:खित।

पुनरूपि जन्म-चांडाळी जात। उपजली ते नारी ऐका॥108॥

नरकाने तिचे हाल थांबले नाहीत-

‘जाहली उपजताचि आंधळी। विद्रुपवर्णेजैशी काजळी।

मातापिता क्वचितकाळी। प्रतिपाळीती माया मोहे॥109॥

ऐसे असता वर्तमानी। सर्वांगी जाहली कृष्णवर्णी।

पंचत्व पावली पिजजननी। दरिद्री जाहली निराश्रय॥110॥

न मिळे तिसी वस्त्रान्न। दु:ख करी अतिगहन।

ऐसे तिचे पूर्वकर्म। झाली वृद्ध अतिकष्टे॥111॥

एवढे ऐकल्यावर कोणी ब्राम्हण युवती ब्राम्हणेतराशी लग्न करण्याचे धाडस करेल काय? आंतरजातीय लग्नांना पाठींबा मिळेल काय? पूर्वजन्मीच्या पापामुळे या जन्मी दु:ख भोगणार्‍या अनेकांची गाठ नृसिंह सरस्वतींशी पडली, त्यांनी त्यांचा उद्धार कसा केला याच्या सुरस कथा चरित्रात आहेत.

मनुस्मृतीचा अर्क

संपूर्ण चरित्रात मनुस्मृतीमधील विचारच कथारूपाने मांडले आहेत. काही ठिकाणी हे सूत्र रूपानेही आले आहेत.

7 व्या अध्यायातला हा श्लोक पाहा-

स्त्रिया नासती कामत्वे। ब्राम्हण नासती हीन सेवे।

राज्य जाय द्विजक्षोभे। यति नासे विषय सेवने॥98॥

ब्राम्हणाचे ऋण फेडा।

कर्ज काढले तर ते फेडले पाहिजेच! कर्ज कोणाकडून घेतले याच्याशी संबंध नाही. पण गुरूचरित्र ब्राम्हणाच्या कर्जाबद्दल जादा जागृत आहे. ब्राम्हणाचे कर्ज फेडले नाही तर काय होईल ते 20 व्या अध्यायातील कथेत वाचा-

शौनक गोत्री द्विजापाशी। ऋण घेतले द्रव्यासी। मागता तुवा, न देसी। कष्टला बहुत तो ब्राम्हण॥13॥ लोभी होता तो ब्राम्हण। द्रव्यास्तव दिधला प्राण। आत्महत्या केली त्याने।

पिशाच झाला असे॥14॥ गर्भपात करी तो तुज। जाहल्या मृत्यू करी तो द्विज। तुझे कर्म असे सहज। आपुली जोडी भोगावी॥15॥

पुढच्या जन्मात मुले मरणार, गर्भपात घडवणार, त्यापेक्षा ब्राम्हणाचे कर्ज या जन्मीच फेडलेले बरे! इतरांच्या कर्जाचा विचार करायचे कारण नाही.

यवनक्रूर

यवनाचा उल्लेख तीन कथांमध्ये आहे. 14 व्या अध्यायात गुरू कृपेने ब्राम्हणाला क्रूर यवनांपासून सुटका मिळाली. 25 व्या अध्यायात क्रूर यवन राजा ब्राम्हण निंदा करतो. सभेद वेद म्हणणार्‍या ब्राम्हणांना धन देतो; वेदांचा अर्थ ऐकल्यावर म्हणतो, “म्हणे विप्र यज्ञ करिती। पशुहत्या करणे रिती। आम्हा म्लेच्छांते निंदिती। पशुवधती म्हणोनिया॥10॥”

“तुम्ही यज्ञात पशू मारत होता, आणि आम्हाला पशू मारणारे का म्हणताय?” असे प्रश्न विचारणे म्हणजे निंदा करणे आहे; तोच त्याचा क्रूरपणा. 9 व्या अध्यायात क्रूर यवन राजा बिदरचा बादशहा-हजार एकर जमीन दान देणारा आहे.

यवन म्हटला की, तो कितीही चांगला वागला तरी त्याला क्रूर म्हटले पाहिजे, अशा दृष्टिकोनातून कथा रचल्या आहेत.

स्त्रियांचा धर्म

सर्व अध्यायामध्ये मनुस्मृतीने सांगितलेल्या स्त्री धर्माची उजळणी केलेली असून 31 व्या अध्यायात त्याचे सुसुत्रीकरण आहे. पती असताना वेगळ्या धर्माची गरज नाही, आणि मेला तर कर्म करून उपयोग नाही. “पती असता कवन धर्म। अथवा मेलीया कवण कर्म। उभयपक्षी विस्तारून। सांगेन ऐक, एकचित्ते॥3॥”

पुढे स्त्रियांसाठी धर्म म्हणजे आचरणाचे नियम सांगितले आहेत. पती नंतर जेवावे, पतीएवढेच अन्न घ्यावे. पतीची दिवसभर सेवा करावी. पतीला न विचारता काही करू नये; दानधर्मही करू नये. पती उठण्यापूर्वी उठून सडासंमार्जन करावे आणि पती झोपल्यानंतर आपण झोपावे. एकत्र कुटुंबात राहावे.

“दिवस अखंड सेवा करणे। अतिथी येता पुजा करणे।

पतिनिरोपाविणा जाण। दान धर्म न करावा॥28॥

पति निद्रीस्त जाहल्यावरी। आपण मग शयन की जे नारी।

चोळी तानवडे ठेवी दूरी। पुरूष शरीरी न स्पर्शावे॥29॥

जागृत न होता पती देखा। पूर्वी उठीजे सती ऐका।

करणे सडासंमार्जना दिका। करणे निर्मळ मंगलमय॥31॥

पतिपूजा करणे नित्य। सदा घ्यावे पादतीर्थ।

चरणावरी ठेवूनी माथा। म्हणावे तूचि शंकर॥32॥

पति असता उच्छिष्ट त्याचे। भोजन करावे मनोवाचे।

नसतील घरी पुरूष साचे। अतिथी धेनू प्रसाद घ्यावा॥33॥

पुरूषांची निंदा करणार्‍या स्त्रियांशी बोलू नये, आपणही पतीला उलट उत्तर देऊ नये, नाहीतर पुढच्या जन्मी मुके व्हाल. असा धाक दाखवला आहे. (स्त्री निंदा करणारे गुरूचरित्र मात्र भक्तीने वाचावे.)

“पुरूष निंदा करी स्त्रियांशी। बोलो नये पतिव्रता ऐसी।

बोलता महा दोषी। पतिव्रता लक्षण॥42॥

पतिसन्मुख निष्ठु रोनी। उत्तर देता कोपोनि।

उपजे मुकी होऊनी। सप्तजन्म दरिद्रीपण॥49॥”

पतीला गुरू, देव, धर्म, तीर्थ सर्वच समजावे.

“गुरू, देव, धर्म, तीर्थ समस्ती। सर्व जाणावा, आपुला पती।

ऐसी ‘जे’ निश्चये सती। पतिव्रता तेचि जाणा॥50॥

सतीचे समर्थन

मनुस्मृतीतले हे सर्व नियम सांगून झाल्यावर स्त्रियांसाठी पुढचा माणुसकी शून्य धर्म सरस्वती गंगाधरच्या विकृत मेंदूतून बाहेर आला आहे- तो म्हणजे सती जावे!

सहगमन करणे मुख्य जाण। थोर धर्म श्रुतीचे वचन।

पूर्वज बेचाळीस उद्धारण। पतिव्रता धर्माने॥51॥

पुरूष प्रेत झालिया वरी। सहगमना जाता नारी।

एकेक पाऊल निर्धारी। अश्वमेध सहस्य पुण्य॥52॥

विधवेला चितेवर जिवंत जाळून तिला हजारो अश्वमेधांचे पुण्य गुरूचरित्र मिळवून देणार आहे.

स्त्रियांना मंत्र शिकवू नये

स्त्रियांना मंत्र शिकवू नये हा मुद्दा गळी उतरवण्यासाठी 35 व्या अध्यायात कच दमयंती कथा सांगितली आहे. मंत्र शिकवा म्हणणार्‍या स्त्रीला नृसिंह सरस्वती म्हणतात- “श्री गुरू म्हणती तियेसी। स्त्रियांते काय मंत्र। पतीभक्ती करावी हर्षी। मंत्र स्त्रियांचे देऊ नये॥5॥ देता उपदेश स्त्रियेसी। विघ्न असे मंत्रासी।

पूर्वी शुक्राचार्यासी। घडले असे परियेसा॥6॥

पुढे स्त्रीला मंत्र दिल्याने कसा अनर्थ झाला त्यासंबंधीची कचदमयंतीची कथा आहे.

जन्म बदला तरीही जातजाणार नाही.

जात नाही ती जात. असे म्हणतात. जातीच्या जोखडातून मुक्त व्हावे म्हणून अनेकांनी धर्म बदलले; आणि इतरही धर्मात उच्चनीच भाव आले. गुरूचरित्र वाचताना लक्षात येते की, जन्म बदलला तरी जात गेली नाही.

गुरूचरित्रातील कथांचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वजन्मात ब्राम्हण असलेला पुनर्जन्मात पुन्हा ब्राम्हण म्हणूनच जन्माला आला आहे. अपवाद एका ब्राम्हणीचा सांगता येईल. पण तिनेही शूद्राशी विवाह करून आपली जात बदलली, त्यामुळे ती शूद्र जन्मात आली.

शूद्र असलेला कोणीही पुढच्या जन्मात ब्राम्हण बनला नाही. एका शूद्राला वेद म्हणण्यापुरता ब्राम्हण केला, पण लगेच पुन्हा त्याच जन्मात शूद्र केले. त्यालाही ब्राम्हण करण्याचे कारण यवनापुढे वेद म्हणावयाचे आहेत. ते ब्राम्हण कसा म्हणेल?

रजकाला(कृपा करून) महाराजांनी यवन बादशहा केला पण ब्राम्हण केला नाही.

गुरूचरित्राचे खरे स्वरूप

वर्णवर्चस्वाचे संस्कार, स्त्रिया आणि शूद्रांच्या गुलामगिरीचे संस्कार, पूर्वजन्म-पुर्नजन्म, पापपुण्य यावर डोके गहाण टाकून विश्वास ठेवण्याचे संस्कार, दैनंदिन अडचणीवर गुरूसेवेचा उपाय सांगणार्‍या कथा यांनी गुरूचरित्र भरले आहे.

त्याचे पारायण करून पुण्य कसे मिळणार समजत नाही. भारतीय घटनेने दिलेल्या विकासाच्या संधीवर बोळा फिरवणे एवढेच पारायणाने शक्य आहे.

इतर व्यवसाय

देवस्थान म्हटल्यावर इतरही व्यवसाय वाढतात. नारळ, कुंकू, अष्टगंध, शेंदूर, हळद, पेढे, बर्फी, खव्याचे पदार्थ, मुलांची खेळणी, धार्मिक पुस्तके, चहा, वडा, भजी, शिरा पोहे इ.ची दुकाने, हॉटेल्स, ढकलगाड्या, टपर्‍यांचे व्यवसाय जोरात आहेत.

लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा तेही यथाशक्ती घेतात. एका गुरूचरित्राच्या प्रस्तावनेच्या झेरॉक्स मारून घेतल्या तर 18 पानांना 36 रूपये बसले.

एका दुकानदाराने विविध अडचणींवर ‘यंत्रे’ केवळ वीस रूपयांस विक्रीला ठेवली आहेत.

शारीरिक पिडा नष्ट करणे, सुखसमृद्धी मिळवणे, वाहनांचे अपघात टाळणे, ग्रहांची पिडा नष्ट करणे, दृष्टीदोष नाहीसे करणे, विद्या मिळवणे, शक्ती मिळवणे, वास्तूदोष नाहीसा करणे इत्यादी सुमारे 15 इच्छांसाठी 15 प्रकारची यंत्रे म्हणजे पातळ तांब्याच्या दीड इंची चौरसावर आकड्यांचे चौकोन आणि मूर्तीचा छाप उठवून-भाविकांची सोय केली आहे(लुबाडण्याची!)

ग्रामपंचायत

नृसिंहवाडीला आता ग्रामपंचायत आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वी ग्रामपंचायतीचा फलक दिसतो. त्यावर कार, जीप कडून 20 रूपये, टेंपोकडून 50 रू. तर लक्झरी बस कडून 100 रू. प्रवासी कर भरण्याची सूचना आहे.

ग्रामपंचायतीची इमारत बँकेला लाजवेल अशी आहे. लिपिकांसाठी कौंटर, सरपंच केबीन, वेटींग रूम, मिटींग हॉल सर्व चकाचक असून, फर्निचर, टेबल, खुर्च्या, फॅन सुव्यवस्थित आहेत. ऑफीसमध्ये सव्वा दोन बाय दीड फुटाचे एकाच मापाचे सुमारे वीसपेक्षा जास्त थोर पुरूषांचे फोटो लावून ठेवलेले आहेत.

ग्रामपंचायतीनेही भाविकांसाठी अल्पदरात निवासाची सोय केली आहे.

शाळा

गावात प्रवेश कमानीजवळच दत्त एज्युकेशन सोसायटीची श्री.दत्त प्राथमिक शाळा आणि श्री.दत्त विद्यामंदिर हायस्कूल आहे. तीन-साडे तीनशे विद्यार्थ्यांना समता-बंधुता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे शिक्षण देण्याचे आव्हान आम.सा.रे.पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांना पूर्ण करायचे आहे.

गावात हिंदू-मुस्लीम-जैन नागरिक गुण्यागोविंदाने राहात असून भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना अशा पक्षांच्या राहुट्याही आहेत. पूर्वीपासून वाडीची वांगी आणि बासुंदी पंचक्रोशीत प्रसिद्ध असली तरी आता उसाने बहुतेक क्षेत्र व्यापले आहे. भाविकांना इचलकरंजी, जयसिंगपूर, सांगली इ. गावापर्यंत नेण्यासाठी दीडदोनशे वडाप व्यावसायिक धावत असतात. साठ एस.टी.बसही दिवसभर फेर्‍या मारत असतात. स्वत:च्या वाहनामधून येणार्‍यांसाठी इथे शंभरपेक्षा जास्त गाड्यांचा वाहनतळ उपलब्ध असून तो सतत गजबजलेला असतो.

या सर्व अर्थ व्यवहाराला गती देण्याचे काम, भाविकांच्या मनातील मृत्यूनंतरची काल्पनिक भीती करत असते. सत्यशोधकांनी भीती काढून टाकण्यासाठी यापूर्वी काही प्रयत्न केले.

सत्यशोधकांचे प्रयत्न

श्री.शाहू सत्यशोधक समाज कोल्हापूरचे कार्यकर्ते कै.हरिभाऊ चव्हाण यांनी सन 1915 ते 1930च्या दरम्यान अनेक पुस्तके लिहिली. ‘आमचे वडील कावळे’, ‘स्वर्गातील संतांची परिषद’, ‘पुराणातील गडबडगुंडा’, ‘व्रतांचे बंड’, ‘अंत्येष्टी व श्राद्ध’ ही त्यांची काही नावे. ‘अंत्येष्टी व श्राद्ध’ या पुस्तकात ते म्हणतात- “अंत्यष्टीच्या व श्राद्धाच्या योगाने मृताच्या गोत्रजाचे व देशाचे एकंदरीत फारच नुकसान होत आहे. हे फुकटखाऊ भटभिक्षुक मृताच्या मागील माणसास नडवून व थापा देऊन त्यांच्यापासून पैसे उपटून नेतात; व अशा रितीने त्यांना कर्जात खितपावयास लावतात. वरील क्रियाकर्मामुळे आळशी, ठोंबे, पढतमूर्ख, दांभिक शास्त्रीपंडीत, ढोंगी गोसावी, यांची चैन चालून देशात निरोद्योगीपणा व भिकार्‍यांची संख्या वाढते.”

दत्त भक्तीवर बांडगुळाचे कलम

महाराष्ट्रात आजही दत्त हे लोकप्रिय दैवत आहे. तीन पंथांचे एकत्रीकरण आणि वेदांना कुत्र्याच्या रूपात पायाशी बसवणार्‍या दत्तात्रेयांचे सुरवातीचे भक्त महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी, नाथ संप्रदायाचे गहिनीनाथ आणि वारकरी संप्रदायातले संत एकनाथ असल्याची नोंद आहे. यातील महानुभवांचा दत्त एकमुखी आहे. हे तीनही महापुरूष वर्णाश्रम धर्माच्या विरोधी होते. त्यांनी वर्णभेद आणि जातीभेदाच्या विरोधात जागृती केली, वर्तनही केले. नाथ संप्रदायात कोणत्याही जातीच्या संन्याशाला प्रवेश आहे. चक्रधरांनी उच्चनीच भेद अमान्य केला. वारकर्‍यांनी ‘ज्याचे मुखी नाम तो श्रेष्ठ’ अशी जातीभेद विरहित भूमिका घेतली. एकनाथांनी अंत्यजाच्या मुलाला उचलून कडेवर घेतले. ह्या सर्वांचे वर्तन वेदांना पायाशी जागा देणार्‍या दत्तात्रेयांशी जुळणारे आहे.

पण दत्त संप्रदायाच्या नावाखाली प्रसिद्ध केलेले गुरूचरित्र, नृसिंहवाडीला वर्णश्रेष्ठत्वावर आधारीत राखीव जागा, आणि चालणारे पूजापाठ, दत्तभक्तीशी जुळत नाहीत.

म्हणजेच हजार वर्षांपासून लोकप्रिय असलेल्या दत्त या लोकप्रिय दैवताचे नाव घेत दोनशे वर्षांपूर्वी गुरूचरित्रातून मनुस्मृती मांडण्यात आली.

“गुरूचरित्रात दत्तोपासनेला प्राधान्य दिल्याचे आढळत नाही” असे निरीक्षण मराठी विश्वकोशाने पान नं.325 वर नोंदवले आहे. ते बरोबरच आहे.

दत्त संप्रदायामुळे दत्तभक्तीचा प्रसार झालेला आढळत नाही. गुरूकृपेच्या नावाखाली गुरूबाजी वाढवण्यासाठी दत्तसंप्रदायातून प्रयत्न झाले आहेत. या संप्रदायाच्या बाहेर खूप मोठा दत्तभक्त वर्ग आहे. त्यांना संप्रदायाच्या माध्यमातून गुरूबाजीच्या व वर्णाश्रमधर्माच्या जाळ्यात ओढणे हे संप्रदायाचे उद्दिष्ट दिसते.

नृसिंह सरस्वतींच्या विचारात कुठेच दत्तभक्तीचा संबंध आढळत नाही. उलट त्यांच्या नावात ‘सरस्वती’ शब्द आद्यशंकराचार्य प्रणीत श्रृंगेरी पीठाच्या परंपरेतील कृष्ण सरस्वती नामक वृद्ध संन्याशाने त्यांना संन्यास घेण्याचा आग्रह करून (‘सरस्वती’) हा शब्द जोडला आहे.

गुरूचरित्राने दत्तात्रेयांचे नाव वापरले आणि त्यांच्या भक्तीवर आद्य शंकराचार्यांच्या विषमतावादी विचारांचे कलम केले.

मनुस्मृतीची विषारी बाळे पंथ-उपपंथांच्या बिळात लपून बसली आहेत. त्यांना बाहेर काढल्यावरच भारतीय घटनेतील समता प्रत्यक्षात येणे शक्य होईल.

लेखक संपर्क: 9764147483