सर्वसामान्यांच्या समस्यांवर रान उठविणार्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोरे यांचे मंगळवार दि.17 जुलै 2012 रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या व भारताच्या राजकारणातील एक रणरागिणी अंतर्धान पावली आहे. गरीबांचा कळवळा हा मृणालताईंच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. महागाई, अन्नधान्याची व पाण्याची टंचाई किंवा धनदांडग्यांकडून होणारी गरीबांची अडवणूक या समस्यांबाबत त्या उसळून उठत व समस्या सुटेपर्यंत त्यांचा पाठपुरावा करत. समाजवादी विचारवंत एस.एम.जोशी, मधु लिमये यांच्या भाषणांनी प्रभावित होऊन मृणालताईंनी वैद्यकीय शिक्षण मध्येच सोडले आणि सामाजिक कार्यात उडी घेतली. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी राष्ट्र सेवा दलात स्वत:ला झोकून दिले. बंडू गोरे यांच्याशी विवाह झाल्यावर गोरेगावला स्थायिक होऊन त्यांनी सामाजिक कार्याची सुरवात केली.
देशाच्या राजकारणात प्रथम ‘घेराव’ व नंतर लाटणे मोर्चा याची सुरवात करणार्या मृणालताई ‘पाणीवालीबाई’ म्हणून प्रसिद्ध झाल्या. कारण त्यांचा पहिला लढा गोरेगावातील गरीब वस्तींना पाणी मिळवून देण्यासाठी झाला.
सुखवस्तू माहेर असलेल्या कुटुंबातील मृणालताईंनी खादीची साडी नेसून त्याच्या पदरात समाजसेवेचा निखारा ठेवला. तो अखेरपर्यंत धगधगत ठेवला. स्वातंत्र्य चळवळीतील सरोजिनी नायडू व अरूणा असफ अली प्रमाणे त्या तेजस्वी राजकारणी होत्या.
मृणालताई व त्यांचा केशव गोरे स्मारक ट्रस्ट यांचा अंनिस चळवळीला नेहमीच सक्रिय पाठींबा होता. याच ट्रस्टच्या ऑफीसमध्ये अंनिस गोरेगाव शाखेचे कार्यालयही होते. मुंबई व गोरेगावात अंनिसची चळवळ वाढण्यात त्यांचा मोठा आधार होता. त्यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनातील त्याग, सेवा व समर्पण या तीनही शब्दांचा अस्त झाला आहे. त्यांना अंनिस परिवारातर्फे भावपूर्ण सलाम!