Categories
डॉ. दाभोलकर खून तपास

मुख्यमंत्र्यांस आवाहन

जुलै - २०१५

प्रति,

माननीय नामदार देवेंद्र फडणवीसजी,

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई

डॉ. नरेंद्र दाभोलकर व अ‍ॅड. गोविंदराव पानसरेंच्या खुनाच्या तपासाबाबत आढावा घेण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनानंतर आणि मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर विशेष बैठक आयोजित करण्याचे आश्वासन आपण मला प्रत्यक्ष भेटीत दिले होते. त्याची स्मरण पत्रे देऊन देखील कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे अत्यंत उद्विग्न आणि संतप्त भावनेने सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी व खुनाच्या तपासाचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबईत 20 जुलै 2015 रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समविचारींसह राज्यव्यापी निषेध धरणे आम्ही आयोजित करीत आहोत, याची दखल घेऊन आपल्याकडून त्वरीत कार्यवाही अपेक्षित आहे.

या अगोदर वेळोवेळी उल्लेखित केल्याप्रमाणे अपेक्षित विषय असे :

1) शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाच्या तपासाची स्थिती आणि कार्यवाहीच्या तपशिलाबाबत.

2) जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणी प्रभावीपणे वाढण्यासाठी दाखल गुन्ह्यांच्या न्यायालयीन प्रक्रिया, प्रबोधनासाठी आवश्यक यंत्रणा व अनुकूलता, कायद्यातील नियमावली मंजूरी, कायद्यातील सुधारणा आणि प्रशिक्षणाबाबत.

3) जात पंचायतीच्या मनमानी कारभारविरोधी कायदा मसूदा मंजुरीचे आश्वासन पूर्तीसाठी पुढाकार घेऊन कार्यवाही ठरविण्याबाबत.

4) अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या शिक्षण, प्रशिक्षण, प्रचार प्रबोधनासाठी राबविण्याबाबत विविध उपक्रम.

आपल्याकडून सदर विषयांच्या अनुषंगाने संबंधित विभागाचे प्रमुख सचिव, अधिकार्‍यांसह चर्चा करून आपल्या पुढाकाराने नियोेजन व्हावे अशी अपेक्षा आम्ही त्यावेळी केली होती. परंतु, त्याबाबत प्रत्यक्ष भेटीतील चर्चेनंतर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही याचा खेद व्यक्त करतो.

आपण कालसुसंगत, कार्यक्षम प्रशासन आणि आधुनिकतेकडे नेणारा विकास कार्यान्वित करण्यासाठी सहानुभूतीपर्वक विचार करावा असे अपेक्षित आहे. त्याच्यासाठी आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनतेला विश्वासात घेणे आवश्यक आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर व अ‍ॅड. गोविंदराव पानसरेंच्या खुनाचा तपास पूर्ण करून त्यामधील मारेकरी व सूत्रधारांना जगासमोर आणण्यासाठी आपण राजकीय इच्छाशक्ती दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.

आपले स्नेहांकित

प्रा. डॉ. एन. डी. पाटील

अध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस

अविनाश पाटील

कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस