आजकाल एकंदरच मुलं, त्यांचे अभ्यास, खाणं-पिणं, अभ्यासाव्यतिरिक्त चालणार्या अॅक्टिव्हिटीज् या सगळ्यांमध्ये पालकवर्ग चांगला बुडून गेलेला असतो. त्यातही आया! अभ्यास आणि इतर छंद-कला या गोष्टींचे क्लास लावले, ने-आण केली की आपली जबाबदारी संपते. त्यामुळे प्रत्यक्ष काही करावं लागत नाही. पण ‘आहार’ या गोष्टीचं तसं नाही. मुलंच कशाला, मोठ्यांच्या बाबतीतही जेवण ही गोष्ट महत्वाची असते. आपण सगळेजण जी धावपळ करत असतो ती शेवटी पोटासाठीच! त्यामुळे एका अर्थी जगण्यासाठी आपण खातो, असं वरवर म्हटलं, तरी प्रत्येक माणूस ‘पोटासाठीच’ जगतो.
दिवसभरात मुलांच्या पोटात जे जे घालणार असतो, ते काय घालायचं हे आपणच ठरवत असतो. मुलांचं खाणं ही आजकाल आयांची डोकेदुखी असते. या विषयावर कोणत्याही दोन आयांचा संवाद ऐकला तर “आमच्या लहानणी आमचे नव्हते असले नखरे… लाडू-चिवडा करून ठेवलेले असायचे…. मधल्या सुट्टीत किंवा शाळेतून आल्यावरही तेच….” इत्यादी. विशेषत: पंधरा वर्षांखालच्या मुलांच्याबाबत हटकून आई-मुलांचं दिवसातून एकदा तरी खाण्यावरून वाजतंच. “ही भाजी नको… भात-आमटी नको… गोड नको… रोज-रोज पोळी भाजी काय खायची…” पण वडापाव मात्र सगळ्यांना आवडतो. आपल्या सगळ्यांना माहीत असतं की, या प्रकारचे आणि एकंदर ‘फास्ट फूड’मध्ये मोडणारं कोणतंच खाणं शरीराला योग्य नसतं. बहुतेक आयांनी चौरस आहाराविषयी वाचलेलं आणि शिकलेलंही असतं. पण नोकरी, घर या कसरतीत ते जमत नाही आणि मुलांनाही जाहिरातीतल्या ‘मॅगी’पासून ‘कोक’पर्यंत सगळे प्रकार हवे असतात.

ही सगळी टोकं, आवडी एकत्र आणणं फार कठीण असतं. एकंदरच आरोग्यदायी खाणं आणि जिभेला आवडेल असं खाणं या दोघांची सांगड घालणं फार चतुराईचं काम आहे. त्यातही ते मुलांच्या गळी उतरवणं, म्हणजे अगदी शब्दश: उतरवणं कठीणच. पण थोडा ‘पेशन्स’ आणि नवनवी ‘कॉम्बिनेशन्स’ करून पहायची तयारी दाखवली तर हे जमू शकतं. त्यासाठी महत्वाचं-
1) आहाराबद्दल प्राथमिक शास्त्रशुद्ध माहिती हवी.
2) जुन्या ‘रेसिपीज्’ जुन्या पद्धतीचं खाणं हेच कसं योग्य होतं असा ‘जुनं ते सोनं’ हा हटवाद सोडायला हवा. विशेषत: आज्यांनी हे लक्षात ठेवावं.
3) मुलांचा चौरस आहार, जीवनसत्वं यांचं महत्व पटवून देताना चिकाटी हवी. त्यांच्याशी बोलण्याच्या पद्धती बदलायला हव्यात.
4) आपण कंटाळा न करता स्वयंपाकात प्रयोग करण्याची चिकाटी हवी.
वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षांपर्यंत, वाढीच्या वयात योग्य आहाराचं वळण लागणं गरजेचं असतं. तसं झालं नाही तर मुलं एकतर खूप जाड होतात नाही तर किडकिडीत रहातात, चष्मा लागतो, केस गळणं किंवा अकाली पांढरे होणं, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता अशा तक्रारी सुरू होऊ शकतात. म्हणूनच सकस आहाराचं महत्व पटवण्यासाठी मुलांशी बोलताना काही पथ्यं पाळायलाच हवीत.
1) नकारात्मक बोलायचं नाही. ‘अमुक होणार नाही’ पेक्षा ‘तू उंच होशील’, ‘तुझे डोळे आणि केस चांगले होतील’ असं म्हणण्याचा परिणाम चांगला होतो.
2) ‘हट्टी’, ‘उर्मट’ अशी लेबलं लावू नयेत. खाण्याच्या बाबतीत त्यांचे आवडते स्टार-खेळाडू पैसे मिळतात म्हणून जाहिरात करतात, प्रत्यक्षात त्यांच्या सुदृढपणाचं रहस्य त्यांच्या चौरस आहारातच असतं आणि आहाराबाबत ते अत्यंत सजग असतात हे आवर्जून सांगावं.
3) “हे खाल्लंच पाहिजे, ताट स्वच्छ झालंच पाहिजे, पानातलं पहिलं संपलंच पाहिजे” यातला ‘च’ काढून टाकायला हवा. त्याऐवजी “मी आज ही नवीन भाजी केलीय ती ‘आपण’ खाऊन पाहू या, जरा कशी झालीय ते सांग” असं बोलावं. किंवा “कोणतीही भाजी आधी एक चमचा घालीन, ती खाऊन पाहायची” असा करार करावा. “सकाळी तू नावडती भाजी खाल्लीस तर संध्याकाळी आवडीचं खाणं देईन” असं ठरवावं आणि आपणही आपला शब्द कसोशीनं पाळावा. त्यामुळे त्यांचा आपल्यावरचा विश्वास वाढतो.
4) खाण्यापिण्यात मुलं आपलंच अनुकरण करत असतात. तेव्हा घरातील सर्वांनीच नावं न ठेवता कोणताही पदार्थ खाऊन पहाण्याची सवय लावून घ्यावी. चुकीच्या आवडी-निवडी सोडाव्यात. मोठ्यांनीच शिस्त पाळली की लहानांवर बंधनं घालावी लागत नाहीत.
5) स्वयंपाक करत असताना मुलांना तिथं वावरू द्यावं. मुलांना आणि मुलींना भाजी निवडणं-चिरणं अशी कामं सांगावीत. त्यामुळे त्यांना आई किती काम करते हे तर कळतंच, शिवाय त्यामागचे श्रम कळले की, त्याला किंमत येते. छोट्या मुलांना सँडविच, भेळ असे पदार्थ बनवायला शिकवावेत. घरातील पुरूषांनीही स्वयंपाकघरातील कामात जास्तीत जास्त सहभागी व्हावे.
6. बाहेरचं खाणं, ‘रेडी टू कुक’ पदार्थ, ‘जंक फूड’, ‘डबाबंद पदार्थ’, बाटलीबंद पेये यातील धोके समजावून द्यावेत.
हल्ली वर्तमानपत्रांच्या पुरवण्या, मासिकं व रेडिओ-टीव्हीवरील कार्यक्रम यामधून आहाराबद्दल खूप काही माहिती मिळत असते. थोडक्यात सांगायचं तर आपल्या आहारात पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिनं, जीवनसत्वं, क्षार यांचं प्रमाण संतुलित राहील अशा पद्धतीचा आहार हवा. त्या जोडीला भरपूर चोथा(तंतुमय आहार) आणि पाणीही पोटात गेलं पाहिजे. म्हणजेच रोज जेवणात भात, पोळी, भाकरी, डाळी, कडधान्यं, अंडी, मासे, मांस, दूध, दही, लोणी तूप, तेल, तेलबिया, पालेभाज्या, फळभाज्या आणि फळं यांचा वापर हवा. अर्थात तुम्ही म्हणाल की हे सर्व तर आम्ही खातोच. हे आपण वापरत असलो तरी त्यातील घटकद्रव्यं जास्तीत जास्त प्रमाणात शरीराला मिळतील अशा पद्धतीनं वापर हवा. त्यासाठी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी अशा-
1.कोणताही खाद्यपदार्थ बनवताना एकापेक्षा जास्त प्रक्रिया टाळाव्यात. जेवढ्या प्रक्रिया जास्त, तेवढा घटकद्रव्यांचा नाश जास्त. मुळात माणूस कच्चं खाणारा. अग्नीचा वापर ही गोष्ट निसर्गाला अभिप्रेत नाही. पण काही पदार्थ हे भाजले, शिजले की पचण्यायोग्य होतात आणि चवही छान लागते. तरीही जे पदार्थ कच्चे वापरणं शक्य आहे, ते तसेच वापरावे व खावे. उदा.पालेभाज्या, फळं, मोड आलेली कडधान्यं इत्यादी. त्यामुळे जीवनसत्वांचा नाश होत नाही आणि चोथाही पोटात जातो.
2. शक्य असेल तिथं डाळींच्या ऐवजी पूर्ण धान्य वापरावं, तेही मोड काढून.
3. पावटे, छोले, राजमा सारखी पोटात ‘गॅस’ पकडणारी कडधान्यं सोडून इतर सर्व कडधान्यं घरात कायम ठेवावीत.
4. भाज्या चिरण्यापूर्वी धुवाव्यात. झाकण ठेवूनच शिजवाव्यात. कमी पाण्यात, कमी तेलात शिजवाव्यात. परतण्याच्या भाज्या बारीक चिराव्यात. खाण्याचा सोडा वापरू नये.
5. प्रेशर कुकरचा वापर करावा.
6. स्वयंपाकामध्ये लोखंडाच्या कढईचा वापर असावा.
7. भाजी-आमटीमध्ये चिंच आणि आमसुलाचा वापर जास्त करावा. लिंबाचा वापर गरम पदार्थाबरोबर करू नये. (‘क’ जीवनसत्व नष्ट होतं.)
8. कणीक दळून आणताना त्यामध्ये थोड्या प्रमाणात सोयाबीन आणि मेथीही दळावी. (1 किलोला 100 ग्रॅम सोयाबीन आणि 50 ग्रॅम मेथी)
क्रॅश डाएट करीना कपूरनं ‘झिरो फिगर’ चा ट्रेन्ड आणायच्या कितीतरी आधीपासून ‘वजन कमी करण्यासाठी डाएटिंग’चं फॅड पसरलेलं आहे. आजच्या ‘जंक फूड खादाडी’च्या ‘फास्ट’ जमान्यात वजनसुद्धा वेगानं घटवायचं म्हणून आजच्या यंग जनरेशनचा क्रॅश डाएट करण्यावर भर असतो. पण क्रॅश डाएटिंगचा शरीरावर किती वाईट परिणाम होऊ शकतो, याची जाणीवही बहुतेकांना नसते. शरीराचं कामकाज योग्य पद्धतीने चालावं, असं वाटत असेल तर शरीराला इंधन, ऊर्जा मिळणं आवश्यक असतं. शरीराचं स्वत:चं असं घड्याळ असतं. हे घड्याळ नीट चालावं म्हणून त्याला वेळोवेळी चावी देणं(अन्नाच्या रूपात) आवश्यक असतं. क्रॅश डाएट केल्याने वजन झपाट्याने कमी होतं, हे खरं. पण, यामुळे शरीरातील पाणी आणि स्नायूंवर जमलेली चरबी कमी होते, शरीरातील अतिरिक्त फॅटस् कमी होत नाहीत. शिवाय शरीराला दैनंदिन व्यवहारासाठी लागणारी पोषणमूल्यं न मिळाल्यामुळे एक प्रकारे कुपोषणच होतं. त्यातून अॅनिमिया उद्भवू शकतो, जीवनसत्वं आणि खनिज द्रव्याची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे मग अशक्तपणा, डोकेदुखी, मन एकाग्र करायला न जमणं, थकवा असे त्रास जाणवू लागतात. वजन कमी करण्यासाठी खाणं पिणं बंद करून स्वत:ला उपाशी ठेवण्याची शिक्षा कशाला द्यायची? उत्तम आरोग्य राखायचं, तर एकंदर प्रकृतीचा विचार करून आहार ठरवायला हवा. नाहीतर क्रॅश डाएट करून वजन कमी झालं, की पुन्हा खायला सुरवात करायची आणि मग, कमी झालेलं वजन पुन्हा वाढवायचं, अशा चक्रात अडकून पडायला होतं.
चौरस आहार आणि मुलांची आवड यांचा मेळ घालता यावा म्हणून काही प्रकार सुचवावेसे वाटतात. पदार्थ नेहमीचेच फक्त त्यात काही गोष्टींची भर घालायची. उदा.नाश्त्याकरता उप्पीट बनवताना फ्लॉवर, कोबी, सिमला, गाजर, टोमॅटो अशा भाज्या घालून बनवावे. कधी नेहमीच्या रव्याऐवजी गव्हाचा जाड रवा, वरीचे तांदूळही वापरावेत. पोह्यांमध्ये किंवा फोडणीच्या भातामध्ये मोड आलेली कडधान्यं किंवा आधी सांगितलेल्या भाज्या घालाव्यात. इडली बनवताना उडदाच्या डाळीबरोबर थोड्या प्रमाणात इतर डाळी किंवा कडधान्यंही मिसळावीत आणि नंतर पीठामध्ये गाजर, बीट, कोबी, सिमला अशा भाज्या घालाव्यात. सर्वसाधारणपणे भोपळे, दोडके, पडवळ, दुधी भोपळा अशा भाज्या मुलांना आवडत नाहीत. त्यामध्ये ओले शेंगदाणे वाटून घालावेत, भाज्या चवदार होतात. बीट, नवलकोल उकडून मोड आलेली कडधान्यं घालून भाज्या बनवाव्यात. या सर्वांमध्ये मुलांच्या आवडीप्रमाणे आलं, लसूण, कांदा आणि इतर मसाले जरूर वापरावेत. वेगवेगळ्या पालेभाज्या किंवा किसलेले गाजर, कोबी, दुधी, मुळा, फ्लॉवर यापैकी काहीही घालून पराठे बनवावेत. तीच गोष्ट थालीपीठाची. ज्वारी, बाजरी, नाचणी, मका यांच्या पीठांचा आलटून पालटून वापर करावा आणि त्यामध्ये आवडीप्रमाणे वर सांगितलेल्या भाज्या घालाव्यात. तांदूळ, पिवळे मूग, हिरवे मूग, रवा, बेसन, उडीद, मोड काढलेली मटकी यांच्या पिठांचा वापर करून वेगवेगळ्या चवीच्या आंबोळ्या(धिरडी) शक्यतो ही पिठं आंबवून बनवाव्यात. यातही पालक, मेथी, कोबी, कांदा, लसूण घालून चव वाढवता येते. ब्रेड सँडविच बनवताना आवर्जून भाज्या आणि मोड आलेली कडधान्यं घालून टोस्ट(ग्रिल) करावीत. अंड्याच्या आम्लेटमध्येही मेथीची पानं, पालक, मोड आलेली मेथी, मसूर, मटकी, ओले मटार, मक्याचे दाणे वापरावेत. म्हणजे “टेस्ट की टेस्ट हेल्थ के लिए बेस्ट!”
पुढच्या काळात आपण मुलांना काय देणार? ज्ञान दिवसेंदिवस वाढतंय, पैसा ठेवलेला पुरणार नाहीच, आजची मूल्यंही उद्या उपयोगी ठरतील का सांगता येत नाही. फक्त चांगल्या शरीराची आणि चांगल्या सवयींची शिदोरी मुलांच्या हातात देणं एवढंच आपल्या हातात!
–प्रा. आदिती मुळ्ये