पोपटवाला हळूच तिला बोलवतो. ती पटकन् आली तवा पोपटवाला तिला म्हणतो, ‘ताई पोपटाला विनंती करून बघतो. जमलं 100 रूपयात तर जमलं.’
तिने झेंपरातून छोटे पॉकेट काढले. 100 रूपयांची कोरी नोट ठेवली…. त्याईचा समदा तमाशा आम्ही कॅमेर्यात शूट केला. साला शिकून सवरून लोक सुधारणार नसतील तर ते शिक्षण काय कामाचं? याच्यापेक्षा आमच्या पालावर राहणार्या बायका बर्या आहेत. अशी भोंदूगिरी करणार्या साधूच्या नादी लागत नाही. एक डाव समजावून सांगितल्यावर….
मी चांगल्या सुशिक्षित लोकांच्या भागात राहत होतो एक दिवस मी कामावरून आलो अन् दया पवार यांचं ‘बलुतं’ आत्मकथन वाचत बसलो. मालती दारात तांदूळ निवडत होती. तेवढ्यात शेजार्याच्या घरात गर्दी झाली. ती गेली. जराशा वेळानं परत आली. माझ्याकडे बघत ती म्हणते,
‘काय हो नुसती पुस्तकच वाचीत बसता काय?’
‘मग काय करू?’
‘तुम्हाला शेजारी पाजारी काय चाललं काहीच ठावं नाही.’
‘काय करायचं ठावं होऊन’
‘नाही, मी म्हणते पाहिजेत माणसाला माहीत’
‘बरं सांग, काय चाललं?’
‘आहो, तो पोलीसवाला खूपच ठोकतोय’
‘कोणाला’
‘बायकोला’
‘त्याचं रोजचच तसं आहे. रोजच मडं त्याला कोण रडंं’
‘मरंल हो बिचारी’
‘मग मी काय करू सांग?’
‘तुम्ही सोडवा ना’
‘जाऊ दे ना! आपल्याला काय करायचं, ज्याचा हात तुटंल त्याच्या गळ्यात पडंल.’
‘कशाला पुस्तकं वाचता हो?’
‘काय बोलतेस?’
‘सत्य तेच बोलते’
‘म्हणजे’
‘आहो! तुम्ही ग्यानी ध्यानी हाईत, एवढाली पुस्तकं वाचता लिहता. थोडं सोडवा ना त्या बाईला त्या रानग्याच्या तावडीतून. मला भी आनंद होईल.’
‘काय बोललीस? तुला आनंद होईल?’
‘हो’
‘चला मग’
मी घातले कपडे. गेलो सोडवायला पोलिसाच्या घरी. गेल्यावर बघतो तर काय साला पोलीस दारू घेऊन फुल्ल. बाई जोरजोरात रडत होती. यानं मारल्यानं तिच्या केसाची, झेंपराची व साडीची अवकळा झाली होती. त्या बाईची अवस्था बघून मला राहवले नाही. मी पोलिसावर डोळे काढून जोरात विचारले, ‘तुम्ही का म्हून मारीत आहेत बायकोला’
तो तेवढ्याच जोरात माझ्यावर आवाज काढीत म्हणतो ‘बायको तुझी आहे का माझी?’
मी भानावर आलो. याच्या मायला केस अडुसटच दिसते. मी नमतं घेत म्हणालो, ‘आहो बायको तुमचीच आहे ना, बाईला मारू नये.’
तो : बायको माझी आहे की नाही?’
मी : ‘हो’
तो : ‘मग मी कापून टाकील नसता मारून टाकील. तुम्हाला काय देणं घेणं.’
मी दोन चार जण जमा केले. त्या रात्री ते भांडण मिटवलं. बायकोचा मला खूपच राग येत होता. मला उगाच या मूर्ख माणसाकडे पाठविले. मला राग येणे हा पुरूषी स्वभाव होता. मी पुन्हा भानावर आलो. मालती तिच्या पातळीवर बरोबर होती… पुन्हा ‘बलुतं’ आत्मकथन काढून वाचू लागलो.
दिवस निघाला. मला सुट्टीच होती. मी घरीच होतो. लोडशेडींगमुळे लाईन गेलेली. चंद्रपुरात गरमी खूप होते. येऊन दारात बसलो माणसं न्याहाळत. तेवढ्यात चारपाच बायका ताटं घेऊन आल्या. च्या मायला आल्या वाटतं आपल्या घरी मी स्वत:ला सावरून उठणार तर त्या माझ्याबाजूनं पोलिसाच्या घरी गेल्या. पोलीस घरी नव्हता. बिचारा ड्युटीवर गेला होता. 24 तास ड्युटी असते पोलीसाची. काय करील बिचारा. यांच्या मायला रात्रीला बाईला ठोकलं म्हणून ह्या बायका आल्या वाटतं. जराशा वेळाने त्या बाईला घेऊनच त्या घराबाहेर निघाल्या. तिचं ताट दुसर्या बाईनं हातात धरलेलं. कारण तिच्या हातात दोन ताटं होती. त्यांच्या ताटात नारळ, दोरा, हळद, कुंकू असं बरंच काही होतं. ती पोलिसाची बायको चालता चालता शिव्या देत होती. ‘मेल्याच्या हाताला साप डसो मेल्यानं धिलड्यावानी पाठ केली. आता मह्या भावाईला तेन सांगून याला चांगला हाताखलून काढून घेते. आता मेल्याचा कुदवा काढल्याशिवाय गत्यंतरच नाही….
तिचं बोलणं त्यानं मला नवलच वाटत होतं. एवढे हाडं बुगा करून सुद्धा तरी पोलीसीन बाई सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून चालली वडाच्या झाडाला फेरे मारायला. साला सात जन्म, वडाचे झाड वगैरे काय थोतांड आहे कोणी लावलं हे सारं. ज्यांनी लोकांना मानसिक गुलाम बनविले त्याने. समजा सात जन्म आहेत. एका जन्मातच पोलीसीन बाईचे हाडबुगा करू करू खात आहे तो जालीम पोलीसवाला. सात जन्मात तरी त्या बिचारीला खाऊन हागून येईल मी तर मालतीला समजून सांगितलं होतं. आरे बाबा ह्या वडाचे फिडाचे झाडाला फेरे मारू नको तुला वाटतच असेल तर सात जन्मात सात नवरे मिळू दे म्हणून मनात पक्कं कर. ह्या वडाच्या फिडाच्या नादी लागून आपला जन्म वाया घालवू नको… काळ आणि वेळेने, अनुभवाने आम्हाला आता खूप काही शिकवून टाकले. आम्ही नास्तिकच आहोत यात शंका नाही. शिकलेल्या बायका किती हुशार आहेत पहा… आन् त्यांचे नवरे पण…
ं ं ं
चांगल्या सुशिक्षित लोकांत राहिलं पाहिजे. चांगलं खाल्लं पाहिजे. चांगलं नेसलं पाहिजे. चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे. सुशिक्षित लोकांत राहिल्यावर मुलांवर चांगले संस्कार होतात असं बरंच काही मनावर बिंबलेलं. बायकोने आग्रह केला आणि ताकत नसतानासुद्धा आम्ही स्टँडर्ड एरियात राहायला आलो… दार बंद संस्कृतीत समदे आपापल्या जगण्यात मश्गुल होते. कोणालाच कोणाची गरज वाटत नव्हती. मी सकाळी कामावर जायाचो. संध्याकाळी म्हागारी यायचो.
एक दिवस सकाळी सकाळी कामावर निघालो बघतो तर काय आमच्या घरापसल्या चौकात सात आठ सुशिक्षित बायका बोलत उभ्या होत्या. मला वाटलं निवडणूक वगैरे झाली की काय? ह्या बायका उभ्या आहेत. काय बोलणार काय ऐकू लागलो तवा त्या अशा बोलत व्होत्या.
एक : ‘ह्या गुरूजीला अॅटॅक आलागं’
दुसरी : ‘कवा माय’
तिसरी : ‘काल तर मी बघितले माईला कुत्रं घेऊन फिरतांना’
‘तवा नाही आलागं रात्री अॅटॅक आला.’
‘येणार नाही अॅटॅक तर काय गं’
‘काय’
‘हो माय त्याईची बायको त्याईला मेथीभाजी निवडायला लावते. आलू वांगे कापायला लावते. एवढंच नाहीतर कापड धुयाला लावते.’
‘त्याच्यानच आलाय त्याईला अॅटॅक.’
‘हा शिकलेला माणूस कसा काय काम करते गं’
‘आगं मास्तर माणूस हाय.’
‘नाहीतरी मास्तर लोकं बुळगेच असतात.’
असं आनं असं त्या सुशिक्षित बायका बरंच काही बोलत होत्या. आपल्याला कामावर जायाला उशीर होईल म्हणून मी निघालो. याच्या मायला आलू वांगी चिरल्यावर, मेथीची भाजी निवडल्यावर अॅटॅक येतो का? याच्या मायला या बायकांचा शिकून काय फायदा झाला? सावित्रीबाई तूच बघ आता तुझ्या बायका काय करीत आहेत त्याईलाच ठावं नाही…. महात्मा फुलेच्या बनायाच्या सोडून सत्यवानाच्या सावित्र्या बनत आहेत. साला शाळा, विद्यालय, महाविद्यालयाचा अभ्यासक्रम बनविणारा मेंदू कोणता आहे? शिकलेल्या बायका व निरक्षर बायका यांच्यातला फरकच आजकाल समजेनासा झालाय.
ं ं ं
दिल्लीवरून लेखक दिलीप कठोरिया माझ्याकडे आले होते. मी त्या दिवशी कामाला सुट्टी दिली अनायशेस महाकाली चंद्रपूरची यात्रा सुरू होती. दिलीपला फोटो काढायचा भारी शोक होता. कारण त्याच्या हातात कॅमेरा होता. आम्ही सकाळी 9 वाजता आलो. महाकाली यात्रेत तिथं गर्दी होती. पोतराज नाचत होते तर काहीजण, काही बायका देवीच्या आवारात लोटांगण घेत होत्या. ज्याच्या मनात जसं वाटलं तसे करीत होते. समदा उभा तमाशा चालला होता. बोकडे बका बका कापले जात होते. काही मटणाचे भगुने शिजत होते. आम्ही काही लोकांना ईचारपूस करीत होतो. विदर्भातले लोक फारच कमी होते. मराठवाड्यातून 95 टक्के लोकं आले होते. ही देवी मराठवाड्याच्या लोकांना पावली म्हणं. नाल्याच्या काठावर घाणीत काही बायका सैपाक करीत होत्या. आम्हाला समदं नवलच वाटत होतं. ही देवी नवसाला पावते म्हणं. मी अद्याप गेलो नाही देवीला पाववयाला…. समदा भाविकांची गर्दी बघून आम्ही निघालो. रोडाच्या काठला एक पोपटवाला बसलेला. तेवढ्यात ऑक्टीव्हा गाडी घेऊन एक महिला आली. तिने जिन्स पँट घातली होती. ती खूपच स्टंट वाटत होती. आम्ही बाजूला सरकलो. तिने गाडी बाजूला लावली आन् पोपटवाल्या समोर येऊन बसली. हात लांब केला तवा त्यानं सांगितले संपूर्ण भविष्य सांगतो 151 रू. ठेवा. तवा ती म्हणते, ‘काका माझ्याजवळ 100 रू. आहेत.’
‘जमत नाही. 151 रू. ठेवल्याबिगर पोपट पिंजर्याबाहेर निघतच नाही.’ तिने खूप विनवण्या केल्या पण तो ऐकायला तयारच नाही. तवा ती उठते निघते मग पोपटवाला हळूच तिला बोलवतो. ती पटकन् आली तवा पोपटवाला तिला म्हणतो, ‘ताई पोपटाला विनंती करून बघतो. जमलं 100 रूपयात तर जमलं.’
तिने झेंपरातून छोटे पॉकेट काढले. 100 रूपयांची कोरी नोट ठेवली…. त्याईचा समदा तमाशा आम्ही कॅमेर्यात शूट केला. साला शिकून सवरून लोक सुधारणार नसतील तर ते शिक्षण काय कामाचं. याच्यापेक्षा आमच्या पालावर राहणार्या बायका बर्या आहेत. अशी भोंदूगिरी करणार्या साधूच्या नादी लागत नाही. एक डाव समजावून सांगितल्यावर….
ं ं ं
मी मुलाला भेटायला एका शाळेत गेलो. मुलाची भेट झाली. पायर्या उतरून परतीच्या प्रवासाला लागतो तेवढ्यात एक दोन जण आवाज देतात. मी थांबतो. त्यांच्याजवळ येतो. तवा ते म्हणतात, ‘सर, आपण अशोक पवार का?’
‘हो’
‘सर आपली पुस्तकं आम्ही वाचली. आलो होतो इकडे महाराजांच्या प्रवचनचा कार्यक्रम घेयाचा आहे.’
‘कोणते महाराज आहेत?’
‘फलाने महाराज आहेत. ते खूप सत्ववादी आहेत. ते चमत्कारिक बाबा आहेत. त्यांच्या नादी लागलो तवापासून दारू सुटली. माझं कुटुंब सुखी झालं. तुम्हाला माहीत आहे का एक गोष्ट’
‘नाही’
‘माहीत नाही’
‘नाही?’
‘मी तुमच्यासमोर नाही’
‘मग’
‘मी गडचिरोलीच्या ऑफिसात ड्युटी करीत आहे.’
‘सही मारून आले का?’
‘नाही’
‘आहो, कार्यक्रमाला या मी तुमच्यासमोर समदं समजून जाल. हीच तर महाराजांची खासीयत आहे.’
याच्या मायला हा क्रियाक झाला का गड्या तो माझ्यासमोर उभा असून गडचिरोलीला 75 कि.मी.वर ड्युटी करतो म्हणते. माझ्या मनात असं विचार यायले. मी निरोप घेतला. निघालो.
एखादं महिन्यांनी त्या महाराजाचा फोटो पेपरमध्ये आला. त्याला पोलिसांनी पकडून नेले होते. डोकं साबूत न ठेवता अंधश्रद्धेचे बळी ठरणार्या लोकांना आपण काय सांगाल?
–अशोक पवार
(लेखक भटक्या जातीतील प्रसिद्ध कादंबरीकार आहेत.)