Categories
संपादकीय

नकली विज्ञानाचे फसवे उपचार

ऑक्टोबर - २०११

दोन तासांत स्मरणशक्ती वाढवा असा चमत्कार घडू शकतो? काही संमोहनतज्ञ हल्ली मोठमोठाल्या जाहिरातींतून असा दावा करतात. त्यांच्या जाहिरातीतील अवास्तव दाव्यांना काही मर्यादाच नाही. संमोहनाने काय काय घडू शकते? तर सकाळी 6 वाजताचा उत्साह रात्री पर्यंत कसा टिकवावा. संपूर्ण पुस्तक पेज नंबरसह काही तासांत अचूकपणे लक्षात ठेवायला शिका. 100 आकडी संख्या एकदा वाचून अचूकपणे पाठ करा. अभ्यासाची गती 100 पट वाढवा. याचबरोबर 40 टक्के गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्याने 80 टक्के गुण कसे मिळवावे नैराश्य व भितीवर मात कशी करावी. अशा अर्थाच्या जाहिराती तथाकथित संमोहनतज्ञ करीत असतात.

            याचबरोबर विविध औषधांच्या जाहिरातींचे गाजरगवत सद्या प्रसारमाध्यमात जोरात फोफावते आहे. अनेक जडी-बुटींनी तयार केलेल्या गोळ्या प्रेमात बेभान करतात. अशा अर्थाच्या जाहिरातींचा प्रसार वाढलाय. गोडधोड सगळे खा व आमच्या गोळ्या घेऊन निर्धास्त रहा अशी लालुच मधुमेहींना दाखवणारी औषधे प्रचारात आलीत. वजन कमी करणारी औषधे, वजन वाढविणारी औषधे यांची तर रेलचेल टी.व्ही. व दैनिक-साप्ताहिकातून आढळते. आयुर्वेदाच्या नावाखाली चाललेला हा फसवेगिरीचा धंदा वाढतच चाललाय. लोक अशा जाहिरातींना का फसतात? याचे मुख्य कारण आहे या औषधांच्या जाहिरातीत खुबीने वापरलेले फसवे विज्ञान. दुसरे कारण म्हणजे आपले प्रश्न सोडविण्याचे शॉर्ट कट उत्तर लोकांना मोहात पाडते. झटपट इलाज पटपट मुक्ती असा हा प्रकार आहे.

            नकली विज्ञानाचा औषध खपासाठी कसा वापर केला जातो याची एक मासलेवाईक जाहिरात पहा – ‘डॉक्टर अमुक अमुक यांनी अशक्त व्यक्तीचे वजन वाढविणार्‍या तमुक तमुक गोळ्या बनविल्या आहेत. हे औषध शरीराचा मेटाबोलीसम(BMR) नियंत्रणात ठेवते व तुमचे वजन वाढविण्यास मदत करते.’

            हे डॉक्टर कोण? त्यांनी एवढे अमूल्य संशोधन कोठे केले? ह्या औषधांच्या चाचण्या झाल्यात काय? आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे काय? त्याची इतरांनी पुर्नचाचणी केली आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवी व मगच असे प्रमाणित औषध स्वीकारायला हवे. पण ह्याची माहिती कोण घेतो? BMR म्हणजे काय हे समजून कोण घेतो? वैज्ञानिक भाषेत दिलेले फसवे स्पष्टीकरण आपण लगेच स्वीकारून झटपट गुण मिळविण्याचा प्रयत्न करतो. गुण तर येत नाहीच उलट खिसा मोकळा होतो. क्वचित जिवावरही बेतते. वजन वाढविणार्‍या किंवा कमी करणार्‍या अशा फसव्या औषधांचे घातक परिणाम शरीरावर झाल्याच्या बातम्या अधूनमधून प्रसारमाध्यमांत येत असतात. पण त्या वाचायला कोणाला फुरसत असते?

            औषधांच्या जाहिरातीत व्हिटॅमीन, हार्मोन, BMR, कॅलरी इ. जीवशास्त्रीय संज्ञाचा बेमालूम उपयोग करून आमचे औषध किती परिणामकारक आहे  याची जाहीरात करणारे लबाडच असतात. झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने बाळगणार्‍यांना साखळी मार्केटवाले जसे हातोहात फसवतात तसेच झटपट बरे वाटावे अशी स्वप्ने बाळगणारे खोट्या औषधांना बळी पडतात. खरं तर गरजूंवर उपाय करणारी अशी औषधे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स का देत नाहीत? कारण वैद्यकशास्त्राचे ते जाणकार असतात व अशा औषधांतील बनवेगिरी त्यांना माहीत असते. प्रसारमाध्यमांनादेखील फसव्या जाहिरातींची कल्पना असते. पण कायदेशीर पळवाट शोधून ही मंडळी यातून सुटका करून घेतात. ‘दैनिक लोकमत’ मधील पुढील निवेदन पहा – “लोकमत वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणार्‍या विविध जाहिरातींतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातदाराच्या दाव्याची आम्ही हमी घेत नाही. दाव्यांची पूर्तता न झाल्यास वृत्तपत्र त्यास जबाबदार नाही.”

            पेपरवाले आपली जबाबदारी झटकून मोकळे होतात. त्यांना आपला व्यवसाय वाढवायचा असतो. मूर्ख आपण बनतो. हा मुर्खपणा टाळण्यासाठी आपला वैज्ञानिक दृष्टिकोन सजग ठेवणे व वैज्ञानिक साक्षरता वाढविणे हा प्रभावी उपाय आहे. वार्तापत्र ही जबाबदारी पार पाडण्याचे कर्तव्य करते. आमचे मासिक व्यावसायिक दृष्टिकोन ठेवत नाही तर नैतिक मूल्यांचा आदर करते याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. या अंकातील आहार विषयक कव्हरस्टोरीचा तोच उद्देश आहे.