Categories
बुवाबाजी

णमोकार मंत्राने पाच मिनिटात रोगमुक्त करणारे निमेशभाई शहा

जून – २०१२

            अहमदाबादचे निमेशभाई शहा हे सर्वसाधारण व्यक्तीमत्व नाही. त्यांना महावीरांची लब्धी(दैवी शक्ती) प्राप्त झाली असून जैन धर्माच्या नमोकार मंत्राच्या पठनाने एकाच वेळी व हजारो लोकांचे कोणतेही आजार फक्त पाचच मिनिटांत बरे करण्याचा त्यांचा दावा आहे. दि.22 एप्रिल 2012 रोजी लासलगाव(जि.नाशिक) येथील त्यांचे ‘निशुल्क रोग निवारण शातावेदनीय शिबीर’ झाले. निमेशभाईचे चमत्कार व दैवी शक्ती तपासण्यासाठी मी या शिबीरात भाग घेतला.

            प्रत्येक एक तासाला एक शिबीर आयोजित करण्यात आले होते. प्रत्येक शिबिरात 3-4 हजार लोकांना प्रवेश देण्यात आला असे दिवसभरात 22 हजार रूग्णांना बरे केल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. सर्व धर्मियांसाठी खुले असणारे हे शिबीर खरे तर जैन धर्मियांच प्रवचनच होते. पूर्णपणे रोगमुक्त होण्यासाठी निमेशभाईंनी दोन अटी घातल्या. एकतर जितकी श्रद्धा तेवढा लाभ व दुसरं मांसाहार व मद्यपान बंद केलं तरच रोगमुक्ती मिळेल. आपण रोगमुक्त होण्यासाठी शांत बसायचं. निमेशभाई आपणास आपल्या आजारानुसार आपल्या शरीराच्या एखाद्या अवयवावर हात ठेवण्यास सांगतात. त्यानंतर चार-पाच मिनिटे नमोकार मंत्र पुटपुटतात. आपल्या हाताने इशारे करतात. नंतर विचारतात “अभी आपको अच्छा लग रहा है ना?” शिबिरार्थी एकाच आवाजात सांगतात, ‘हाँ’ प्रत्येक रूग्णाने आपण बरे झाल्यासारखं वाटून घ्यायचं. खरं तर निमेशभाई शिबिराच्या सुरवातीपासूनच रूग्णांना एका तालासुरात बोलण्यास भाग पाडतात. उदा. ते विचारतात “सभी बोलो – आपको अच्छा होना या नही?” रूग्ण म्हणतात, “हाँ”. निमेशभाई विचारतात “बोलो आप झिरो टका श्रद्धा रखेंगे या सौ टका.” रूग्ण जोरात ओरडतात, “सौ टका” उत्तम संभाषण कौशल्य हीच खरी विशेषता. काही आनंदी चेहर्‍याने तर काही आश्चर्याने बाहेर पडतात.

            निमेशभाई अशा पद्धतीने कोणत्याही दुर्धर आजारावर(एड्स, मुकेपण, बहिरेपण वगैरे) पाचच मिनिटात उपचार करून बरे करतात. आतापर्यंत पंधरा राज्यात त्यांनी अशी शिबीरे घेऊन 35 लाख लोकांना रोगमुक्त केल्याचा दावा त्यांच्या पत्रकात व वेबसाईटवर आहे. शिबिरात हजारो, लाखो किंवा विश्वाचे सर्व रूग्ण असले तरी ते सर्वांना पाचच मिनिटात रोगमुक्त करतील असा स्पष्ट उल्लेख केला गेला आहे. इतकेच नव्हे तर रूग्णाने निमेशभाईंशी भ्रमणध्वनी वर बोलल्यास सुद्धा रोगमुक्ती मिळते.

            निमेशभाईंना अशी दैवी शक्ती मिळाल्याची कथा मोठी रंजक आहे. 15 ऑगस्ट 2007 रोजी सायंकाळी 9.36 वाजता त्यांना ही शक्ती प्राप्त झाली. वृत्तपत्रातील लेख वाचून निमेशभाईंना समजले की, जैन धर्माचे पहिले तिर्थंकर भगवान आदिनाथ यांच्या उजव्या पायावर बैलाच्या प्रतिमेची जन्मखूण होती. (तशीच बैलाची जन्मखूण निमेशभाईंच्या उजव्या पायावर आहे.) चोविसावे तिर्थंकर महावीर भगवानांच्या उजव्या पायावर सिंहाचे चित्र होते(तशाच सिंहाचे चित्र जन्मापासूनच निमेशभाईंच्या उजव्या पायावर आहे. इतकेच नव्हे तर निमेशभाईंच्या सिंहाच्या डोक्यावर ध्वज सुद्धा आहे.) त्यांनी अनेक आचार्यांना ही गोष्ट सांगितली. अचानक एके दिवशी निमेशभाईंचे सासरे आजारी पडले. त्यांच्या पत्नीने त्यांना असे सांगितले की, तुम्हास तिर्थंकरासारखी जन्मखूण आहे त्यामुळे तुम्ही सासर्‍यांना स्पर्श करा ते बरे होतील, निमेशभाईंना ते पटले नाही परंतु स्त्री हट्ट मोडता आला नाही. आणि ह्याच एका क्षणाने त्यांना त्यांच्या दिव्य लब्धीची(दैवी शक्तीची) जाणीव झाली. कारण स्पर्श करून नमोकर मंत्र म्हणताच सासरे बरे झाले. काही दिवसांनी त्यांच्या मुलाला पायास जखम झाली. मुलाने पण निमेशभाईंना आग्रह केला की, माझ्या पायावर हात ठेवून तुम्ही मला बरे करा. आणि मग तेथूनच सुरू झाली ही दैवी उपचार पद्धती. पत्नीने पुन्हा आग्रह केला शिबीर घेण्यासाठी. परंतु प्रश्न होता प्रत्येक व्यक्तीला स्पर्श करणे म्हणजे वेळखाऊ होते. त्यावर त्यांना उपाय सुचला-रूग्णानेच आपापल्या विशिष्ट अवयवावर हात ठेवायचा. निमेशभाईंनी फक्त मंत्र म्हणायचे. हे शक्य यामुळे होते की, पहिल्याच शिबिरात निमेशभाईंच्या हातातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडल्याचं पत्नीने व मुलाने बघितले होते. इतकेच नव्हे तर केव्हा हातातून दूध निघाल्याचा चमत्कार झाला तर केव्हा त्यांचा चेहरा महावीरांसारखा झाला. तर केव्हा काळाठिक्कर पडला हे चमत्कार ज्यांनी पाहिले त्यांचे अभिप्राय निमेशभाईंकडे उपलब्ध आहेत. परंतु लासलगावच्या शिबिरात असं काहीही मला आढळून आलं नाही. कारण जे घडत नाही ते कसे दिसणार?

            खरं तर जैन धर्म विज्ञानवादी आहे. सत्य, अहिंसा, समता, शांतता, त्याग यावर जैन धर्माचा जास्त भर आहे. रत्नत्रयसार ग्रंथात मूर्तीपूजेला विरोध आहे, जैनदर्शन वेदमताच्या विरोधात आहे. बदलत्या काळानंतर वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाले. कर्ता, करविता, रक्षणकर्ता म्हणून ईश्वराला जैन धर्मात स्थान नाही. यज्ञसंस्कृतीला व यज्ञातील पशूआहुतीला भगवान महावीरांनी विरोध केला. वर्ण, वर्ग, लिंग असे भेद अमान्य केले. अनेकांतवाद ही जैन धर्मातील तत्वप्रणाली तर जगाला मिळालेली देणगी आहे. वैदिक परंपरेतील गौण असणार्‍या स्त्रीचा महावीरांनी सन्मान केला. अनेक परित्यक्ता, दासी, विधवा यांना महावीरांनी श्रवणधर्मात घेतले. परंतु शिबिरामध्ये निमेशभाईंनी निक्षून असे सांगितले की, ज्या स्त्रीची मासिक पाळी येऊन सात दिवस पूर्ण झाले नाहीत त्यांनी बाहेर जावे. सात दिवस व अपवित्रता याचा कसला संबंध?

            मुळात नमोकार मंत्र हे पंचरपरमेळींना म्हणजे आदर्शाला वंदन आहे. सर्व अरिहंत, सर्व सिद्ध, सर्व आचार्य, सर्व उपाध्याय, सर्व साधू यांना वंदन आहे. या नंतर चार मंगल(चत्तारी) व केवली यांना वंदन आहे. मनोरथपूर्ती, मोक्षप्राप्ती, पापनाश हे वैयक्तिक लाभ या मंत्राला जोडले गेले. महाराष्ट्र अंनिस इतर धर्मांप्रमाणेच जैन धर्माचा व भाविकांच्या श्रद्धेचा आदर करते. परंतु धर्मश्रद्धेच्या नावाने अंधश्रद्धेस खतपाणी घातल्यास अंनिस त्यास विरोध करते. निमेशभाईचे वर्तन हे ‘ड्रग्ज अ‍ॅन्ड मॅजिक रेमिडीज अ‍ॅक्ट 1954’ च्या अन्वये दखलपात्र गुन्हा आहे. खरे तर शासनाने अशा घटनांमध्ये हस्तक्षेप करून निमेशभाईंवर कायदेशीर कार्यवाही करणे गरजेचे आहे. खरे तर जैन समाजातील धुरीणींनी पुढे येऊन यावर मतप्रदर्शन करण्याची गरज आहे.

            अंनिसचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र दातरंगे व मी यावर काय कार्यवाही होऊ शकते यावर चर्चा केली. डॉ.दाभोलकर व अविनाश पाटील यांनी हा प्रकार गंभीर असल्याचं सांगितलं. सदरचं शिबीर अवैज्ञानिक असून भाविक रूग्णांनी आपापले स्वत:चे उपचार बंद न करण्याचे आवाहन आम्ही वृत्तपत्राद्वारे केले. तसेच निमेशभाईंना जाहीरपणे आव्हान देण्यात आले. अंनिस निमेशभाईंना दहा रूग्ण देईल त्यांच्या रोगाचे निदान करून पाच मिनिटात आमच्यासमोर रोगमुक्त करून दाखवावे. त्यांनी तसे केल्यास अंनिस त्यांना ,अगर त्यांनी सुचविलेल्या व्यक्तीला/संस्थेला 21 लाख रूपये देईल व चळवळ बंद करेल. मात्र रूग्ण रोगमुक्त न झाल्यास निमेशभाईंनी जनतेची माफी मागावी व असे शिबीर घेण्याचे बंद करावे.

            निमेशभाईंनी या अगोदर अशा प्रकारची दोन शिबीरे महाराष्ट्रात दोंडाईचा(जि.धुळे) व चोपडा (जि.जळगाव) येथे घेतली. दोंडाईचामध्ये अंनिसचे कार्यकर्ते डॉ.टोणगावकर व चोपड्यामधून पिंजारी व धनगर यांनी अशाच प्रकारे वृत्तपत्राद्वारे निमेशभाईंचा फोलपणा जनतेसमोर आणला होता. मात्र निमेशभाईंनी पुढील ठिकाणी शिबीरे घेण्याचे थांबविले नाही. म्हणून नाशिक अंनिसने निमेशभाईंच्याविरूद्ध कायदेशीरपणे लढण्याचे ठरविले आहे. यापुढे महाराष्ट्रात कुठेही निमेशभाईंची रोगउपचाराची शिबीरे होणार नाहीत यासाठी प्रत्येक ठिकाणचे अंनिस कार्यकर्ते त्याविरूद्ध लोकशाही पद्धतीने वेगवेगळ्या मार्गांनी विरोध करतील. अंनिसची ही भूमिका वृत्तपत्राद्वारे जाहीर केली आहे. कार्यकर्त्यांनी माहितीसाठी निमेशभाईंची www.shatavedniya.com ही वेबसाईट अवश्य बघावी.

कृष्णा चांदगुडे


            ॥श्री.आदिनाथाय नम:॥                         ॥मानव सेवा भी प्रभू सेवा॥        ॥ श्री.महावीराय नम:॥

नि:शुल्क तथा नि:स्वार्थ रोग निवारण शातावेदनीय शिबीर

श्री.तीर्थंकर प्रभू द्वारा लब्धी प्राप्त

नि:शुल्क                                                निमेशभाई शाह(अहमदाबादवाले)                    नि:स्वार्थ

शुभ संकल्प और प्रभू प्रार्थना तथा नवकार महामंत्र द्वारा

सभी प्रकार के रोगों के निवारण के लिए निमित्त बनेंगे

यह कार्य दुआ और आशीर्वाद से होता है।

दिनांक 22 एप्रिल 2012 प्रात: 9 बजे से शाम 6 बजे तक (हर एक घण्टे का)

शिबीर स्थल -कृषी उत्पन्न बाजार समिती(मार्केट यार्ड), लासलगाव, जि.नाशिक(महा.)

मात्र पाँच मिनिट मे निरोगी बनिये

रोगां के प्रकार : आर्थोपेडिक(हड्डियों मे दर्द), डायबिटीस, ब्लडप्रेशर, श्वास की तकलीफ, कोलेस्ट्रॉल, थॉईराईड, मानसिक रोग डिप्रेशन, रक्त कण, श्वेतकण, प्लेटलेड काऊन्ट, हिमोग्लोबीन, विटामीन, केल्शियम, प्रोटीन, वई, खेच, फिट, टी.बी., एच.आय.व्ही.(एड्स), किडनी, फेपडा, बाल, आतरड, जठर, हृदय, फेपडा, पसली, प्रोस्टेट, अन्ननली, श्वासनली, ओजरी, वजन बढ-घट, चश्मे का नम्बर, आँखो की कमजोरी, बहरापन, बोलने की तकलीफ, गूंगापन, चर्मरोग, गैस, अपचन, पित्ता, पाचन शक्ती, स्टोन(पथरी), चर्बी, हरनिया, अन्य प्रकार के गाँठ, लकवा, विभिन्न प्रकार के कैंसर, थेलीसिमिया मतक्शुलीकरडिसफोसी, कंपन, सर्दी, उदसर, कफ, खांसी, वायरल, गले का इन्फेशन, अलग-अलग प्रकार के बुखार, विकनेस, अशक्ती, थाक, श्रम, स्टेमिना, पावर, एनर्जी शक्ती, रोग प्रतिकारण शक्ती याददश्त तथा अन्य कोई भी रोग निवारण के निमित्त बनेंगे।

जीवदया मित्र मंडल, लासलगाव(नाशिक)

विशेष जानकारी

            15 अगस्त 2008 ते 18 मार्च 2012 तक सम्पन्न शिबीर हुये – जम्मू, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, छत्तीसगड, बिहार, झारखण्ड, उडीसा, राजस्थान, मध्यप्रदेश, आन्ध्रप्रदेश, तामिलनाडू, आसाम, नागालँड आदी 15 राज्योंके विभिन्न शहरों मे कूल 130 शिबीर सफलता पूर्वक सम्पन्न हों चुके है।

* आज तक शातावेदीनीय शिबिरोंमें 35,25,000 रोगी लाभान्वित हो चुके है।

* लाभान्वित व्यक्तियोंद्वारा 35,25,000,00/-(पैतीस करोड पच्चीस लाख रूपये) जीवदया में समर्पित कर चुके है।

* निमेशभाई शाह द्वारा 3790 जैन साधू-साध्वियोंका सफल उपचार कर चुके है।

* निमेशभाई शाह के प्रयासों(उपचार) से 2,45,810 व्यक्ती मांसाहारी से जीवन पर्यंन्त शाकाहारी बनकर मांस, मछली, अंडा, आम्लेट, दारू(शराब), बियर आदि के सेवन का त्याग कर चुके है।


मा.संपादकांनी निमेशभाईची जाहीरात व कृष्णा चांदगुडे यांचा लेख जैनधर्मीय अनेक विचारवंतांना पाठवून त्याची प्रतिक्रिया मागितली. या प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया.

प्रति संपादक,

            उपरोक्त विषयावरचा कृष्णा चांदगुडे यांचा लेख व निमेशभाईंचे पत्रक वाचले. णमोकार मंत्राने साठ रोगांवर मात करणारे निमेशभाई खरे धार्मिक वाटत नाहीत. मधुमेह, रक्तदाब, एड्स, कॅन्सर हेही रोग ते मंत्राने बरे करतात. त्यांना तीर्थंकरांचा आशिर्वाद आहे; असा ते दावा करतात. ते स्वत:ला तीर्थंकर समजतात. तीर्थंकर वृषभनाथ यांचे चिन्ह बैल व तीर्थंकर महावीर यांचे चिन्ह सिंह त्यांच्या उजव्या पायावर जन्मजात आहे; असा ते दावा करतात. म्हणजे ते प्रतितीर्थंकर आहेत. त्यांनी आतापर्यंत 35 लाख लोकांना रोगमुक्त केले आहे असे ते दावा करतात. हे रोगी खरेच रोगमुक्त झाले का? याची चाचणी घेतली गेली नाही.

            जैन धर्म विज्ञानाधिष्ठित आहे असा दावा जैन विचारवंत करतात. विज्ञानात मंत्राने रोग बरा करता येतो हे बरोबर आहे का? जैन धर्मात अंधश्रद्धा नाहीत असा दावा अनेक जण करतात. मग शहांना जाब का विचारला जात नाही? त्यांना प्रतिकार का केला जात नाही? णमोकार मंत्र नाही तर ती प्रार्थना आहे. “अरिहंत सिद्ध, आर्य, उपाध्याय व सर्व साधूंना मी वंदन करतो. जगातील 4 मंगलांना मी वंदन करतो.” असा या प्रार्थनेचा मतितार्थ आहे. ज्ञानेश्वरांनी पसायदानात अशीच प्रार्थना केली आहे.

            निमेश शहा दूर्धर रोग पाच मिनिटांत बरे करतात. त्यांना ही दिव्यशक्ती प्राप्त झाली असे ते म्हणतात. शहा चमत्काराचा दावा करतात पण चाचणी घेऊ देत नाहीत. रीतसर चाचणीला तयार होऊन समितीचे रू.21 लाखांचे बक्षीस ते का घेत नाहीत?

            एकंदरीत निमेश शहा ढोंगी महाराज आहेत. आज जैन धर्मात अनेक विद्वान पंडीत प्राध्यापक, शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकील, न्यायाधीश आहेत. विज्ञानाधिष्ठीत आचार-विचार करणारे श्रावक आहेत. जैन तत्वज्ञान स्पष्ट करणारे मुनी(साधू) आहेत. सदर शहा धर्माची धर्मतत्वाची बदनामी करीत आहेत. त्याला प्रति तीर्थंकर बनून, स्वत:चे महात्म्य वाढवून अंधश्रद्धा पसरवायची आहे.

            अंधश्रद्धा निर्मूलन समिती याचा परामर्ष घेईलच! त्याला आव्हान देऊन त्याचे पितळ उघडे पाडायचे काम अंनिस करीलच! पण हे काम जैन समाजाने करावे. धर्मतत्वांची बदनामी थांबवावी. अन्यथा जैन धर्मात अंधश्रद्धा नाहीत. जैन धर्म विज्ञानवादी आहे असे म्हणणे थांबवावे. आम्ही जैन विचारवंत शहांचा बंदोबस्त करू या व ही कीड वेळीच थोपवूया.

प्रा.विजयकुमार जोखे, शिराळा, जि.सांगली.

मा.संपादक,

            मी कृष्णा चांदगुडे, नाशिक यांनी लिहिलेला ‘णमोकार मंत्राने पाच मिनिटांत रोगमुक्त करणारे निमेशभाई शहा’ हा लेख वाचला. धर्मश्रद्धेच्या नावाखाली समाजाची दिशाभूल करण्याचा जो प्रकार निमेशभाई करत आहेत यास माझा कडाडून विरोध आहे. णमोकार मंत्रामध्ये सर्व आचार्य, साधू आणि उपाध्ये यांना वंदन केले गेले आहे. णमोकार मंत्राचा पवित्र आणि मंगल हेतू बाजूला ठेवून वैयक्तिक लाभासाठी आणि स्वार्थासाठी नको तो अन्वयार्थ काढला जात आहे. णमोकार मंत्राचा वापर स्वार्थी लोक नको त्या कामासाठी करत आहेत. याचा खेद वाटतो.

            निमेशभाईंनी तर कहर केला, शरीरातील आजार फक्त हात ठेवून बरा करणारा भाई अशी फुगीर पहचान केली. सर्व स्तरावरील लोकांनी एकत्र येऊन ह्या प्रकाराचा पर्दाफाश करायला हवा. अशा लोकांना कायदेशीर कारवाई करून रोखले पाहिजे. ह्या बाबतीत अशी काही कठोर पाऊले उचलली पाहिजेत की, परत अशा वाटेला कुणी गेलं नाही पाहिजे. निमेशभाईचे वर्तन हे ‘ड्रग्ज अ‍ॅण्ड मॅजिक रेमिडिज अ‍ॅक्ट 1954’ च्या अन्वये दखलपात्र गुन्हा आहे.

संदीप गारे, मिरज, जि.सांगली.

            अशाच अर्थाच्या प्रतिक्रिया पुरोगामी जैन संघटनेचे बाळासाहेब पाटील(टाकळी, जि.सांगली), शेतकरी संघटनेचे चंद्रकांत वंजाळे(नांद्रे, जि.सांगली) व रमेश माणगावे (जयसिंगपूर, जि.कोल्हापूर) व इतर मान्यवरांकडून आल्या आहेत.