20 डिसेंबर 2003. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील नांदोस गावच्या ग्रामस्थांना जवळच्या जंगलात पोत्यात बांधलेले, सडलेले 10 मृतदेह सापडले. पोलिस तपास सुरू झाला. तपासाअंती जे निष्पन्न झालं ते असं :
मूळचा नांदोसचा असणारा संतोष मनोहर चव्हाण हा बोरिवली-दहिसर इथं 1994 पासून रिक्षा चालवत असे. अपुर्या उत्पन्नावरून त्याचे बायकोशी खटके उडत. म्हणून संतोष भिवंडी इथल्या काशिनाथ थळे या मांत्रिकाकडे गेला. थळेनं त्याला बडोद्याला रामजीबाबाकडं नेलं. रामजीबाबा त्याच्याकडे येणार्या लोकांना त्यांच्या समोर नोटांचा पाऊस पाडून दाखवायचा आणि त्या नोटा एका गाठोड्यात भरून न्यायला सांगायचा. त्याच्या सुचनेनुसार 42 दिवसांनी संबंधितांनी हे गाठोडं उघडून बघितलं की त्यात कागदाच्या चिटोर्या, फुलांच्या पाकळ्या सापडत असत. रामजीबाबाकडून फसवणूक झाल्यानंतरही संतोषनं त्याचे वितुष्ट घेतलं नाही. उलट त्याच्यासाठी नवीन गिर्हाईक शोधून देण्याचं काम पत्करलं. काही दिवसांनी पैसे जमा झाल्यानंतर संतोषनं काही साथीदारांच्या मदतीनं स्वत:च हा धंदा सुरू केला.
आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या लोकांना नोटांचा पाऊस पाडून श्रीमंत करतो असं सांगून भुलवायचं आणि नांदोसला बोलवायचं, तिथं शिकारीचा बहाण करून घराबाहेर पडायचं आणि पैशांचा पाऊस बघायला आलेल्या लोकांना रिक्षानं धारवस आणि माऊ इथं न्यायचं. तिथं जंगलात पिस्तुल, लोखंडी कांब, सुरा अशी हत्यारं वापरून त्यांचा निर्घृणपणे खून करायचा आणि त्यांनी आणलेले पैसे घेऊन परतायचं. अशी त्यांची कार्यपद्धती होती. सप्टेंबर ते नोव्हेंबर 2003 या कालावधीत सात कुटुंबातील दहा माणसांना संतोष आणि त्याच्या साथीदारांनी नांदोस इथं नेऊन ठार मारलं आणि प्रत्येकी 55,000 ते 3 लाख अशी रक्कम लुबाडली. व्यावसायिक मारेकरी किंवा सराईत गुन्हेगाराप्रमाणे पूर्वनियोजित पद्धतीनं, लोकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत हे हत्याकांड चाललं होतं. चार वर्षाच्या सुनवाणीनंतर आणि 128 साक्षीदारांच्या साक्षीनंतर 2009 मध्ये दहापैकी चार मुख्य आरोपींना सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ असा शेरा या माणुसकीला काळिमा फासणार्या कृत्याबद्दल न्यायायलयानं मारला. या निकालाविरोधात अपिलाच्या सुनावणीनंतरही याच मुद्यावर उच्च न्यायालयानं मुख्य आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली. (ऑक्टोबर 2011).
अॅड. अजित उर्फ एस. एन., भणगे यांनी विशेष सरकारी वकील म्हणून खटल्याचं कामकाज चालवलं. भारतीय दंड संहितेच्या (इंडियन पिनल कोड) 302 (हत्या), 201 (पुरावे नष्ट करणे), 364 (हत्येच्या उद्देशानं अपहरण), 120 ब (गुन्ह्याचा कट रचणे), 404 (मालमत्तेचा अपहार) आणि 114 (गुन्ह्यासाठी सहाय्य करणे) या कलमांखाली न्यायालयानं मुख्य आरोपींना दोषी ठरवलं.
नांदोसच्या हा हत्याकांडाला केवळ अंधनद्धेचं एकमेव परिमाण नाही. त्याला ‘हव्यास’ या मानवी वृत्तीची जोड आहे. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं हे आपण समजू शकतो, पण या इच्छा आणि त्यांच्या पूर्तीची क्रिया ही बेभानपणे आणि सुसाटपणे व्हायला लागली तर कशाचाही विधीनिषेध राहिनासा होतो. कोणत्याही मार्गानं हवी असलेली गोष्ट ओरबाडून घ्यायची ही प्रेरणा देणारी चंगळवादाची सुनामी मग काही वेळा अशी नांदोससारखी बरबादी करते. या वाटेवरचे टप्पे आपल्याला मटका-लॉटरी, सचिनच्या खेळापासून ऐश्वर्याच्या बाळापर्यंत कशावरही बोली लावणारा सट्टे बाजार, भांडवली व्यवस्थेत चिणून टाकणारा शेअर बाजार, चुंबकीय गादी किंवा तत्सम उत्पादनं विकणारी ‘मल्टी लेव्हल मार्केटिंग’ ची साखळी अशा कमी-अधिक ‘सॉफिस्टिकेटेड’ रूपात दिसतात. वैभव महालक्ष्मीचं व्रत करणारा कनिष्ठ/मध्यमवर्गीय माणूस, वास्तुशास्त्र किंवा फेंगशुईचा आधार घेऊन घरालाच कोलांट्या मारायला लावणारे नवश्रीमंत घरधनी आणि बाबा-महाराजांच्या दरबारात हजेरी लावून त्यांना ‘प्रतिष्ठित’ करणारे राष्ट्रपती, खेळाडू, कलाकार, राजकारणी हे याच वाटेचे वाटसरू असतात. फार कशाला, मुलांच्या मेडिकलच्या अॅडमिशनसाठी मध्यमवर्गी माणूस लक्षावधी रूपये खर्च करायला तयार होतो किंवा बडी राजकीय धेंडं आपल्या मुलांच्या लग्नांसाठी कोट्यावधी रूपये खर्च करतात, तेव्हा ती वाट अखेर पैशाच्या पावसाकडेच जाणारी असते. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कडक कायदा करून त्याची उत्तम अंमलबजावणी झाली, तरी ज्या वाटेला विवेकाचा सिग्नल नाही ती वाट नांदोसकडंच जाणार हे निश्चित!
-डॉ. आशुतोष मुळ्ये