डॉ. विठ्ठल प्रभूंनी स्त्री कामशोषणाविषयी जळजळीत मते मांडली आहेत. कामजीवनासंबंधी आजवर स्त्री आपले विचार मांडत नव्हती, त्यामुळे तिच्या लैंगिकतेसंबंधी पुरुषाच्या मनातले विचार हेच वास्तव मानले गेले व तिचे अधिकाधिक शोषण होऊ लागले. कायदा असूनही हुंडाबळी, बालविवाह, स्त्री–भ्रूणहत्या, लैंगिक छळ, एकतर्फी प्रेम, हत्या, वासनाकांड असे प्रकार वाढताहेत. यावर उपाय? लैंगिक शिक्षण.
सेक्सची उत्क्रांती सांगणारं एक पुस्तक आहे. ‘द रेड क्वीन.’ त्याचा लेखक मॅट रिडली म्हणतो – “जर तुम्हाला मानवाच्या प्रेरणा-इच्छा समजून घ्यायच्या असतील, तर ज्यांना मनं वाचता येतात, त्यांची पुस्तके वाचा. फ्रॉईडपेक्षा शेक्सपियर आणि डुरवाईमपेक्षा जेन ऑस्टीन तो विषय सामान्यांना थेटपणे पोचवतात.”
एखादा विषय अवघड असेल, तर तो सुलभपणे मांडण्याची हातोटी असणारे फार कमी दिसतील. त्यातही विषय जर ‘अवघड जागे’चा असेल, तर संपलेच. लैंगिक व्यवहार-काम-सेक्स हा असा विषय आहे. आजही मित्रांत किंवा मैत्रिणींत लैंगिक समस्यांची चर्चा उघडपणे होणे म्हणजे ‘पापम्’ ‘विनाशम्’ ‘विपरीत’ ‘घाणेरडे’ ‘अश्लील‘ इत्यादी. 1982 साली तर किती वाईट परिस्थिती असेल! म्हणजे 36 वर्षांपूर्वी कामजीवनावर पुस्तक लिहिणे तेवढेच कठीण. त्यावेळी रस्त्यावर पिवळे चकचकीत कागदाचे कव्हर असलेले पुस्तक म्हणजे कामसाहित्य! त्यात नुसती रंगीत चित्रे आणि कामाग्नी भडकविणार्या स्टोर्या. मराठीत प्रा. रघुनाथ कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’ मासिक काढले, ते फक्त ‘सेक्स’ या विषयावर. संततिनियमन हाही एक भाग होताच. त्यांच्यानंतर के. पी. भागवतांनी ‘वैवाहिक जीवन’ नावाचे पुस्तक आणले; पण त्यानंतर मात्र सन्नाटा पसरला. क्वचित ‘किर्लोस्कर’सारख्या मासिकातून योग्य माहिती देणारा लेख येई.
सेक्सवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून संदर्भासहित लिहिलेले पहिले पुस्तक प्रकाशित करण्याचे धैर्य आणि मान घेणारी व्यक्ती म्हणजे डॉ. विठ्ठल प्रभू. कामजीवनाच्या सर्वांगास स्पर्श करून त्यावर विज्ञाननिष्ठ माहिती लिहिणारा माणूस म्हणजे डॉ. विठ्ठल प्रभू.
दादर हे मुंबईचे सांस्कृतिक केंद्र असणार्या काळातील ही गोष्ट आहे. रवींद्र नाट्यमंदिर परिसरात लहानाचे मोठे झालेल्या डॉ. विठ्ठल प्रभूंना घरी जोगवा मागायला आलेल्याला बाप्या म्हणावे की बाई, असे कोडे पडायचे. त्यांच्या वडिलांचा ज्योतिषावर विश्वास नव्हता; पण आईचा होता. त्यावेळच्या एका सुप्रसिद्ध ज्योतिषाकडे आईने नेले, तेव्हा त्याने डॉक्टरांचे भविष्य वर्तविले – “हा मुलगा ‘ढ’ आहे. पुस्तकांवरील धूळ साफ करण्यापलिकडे तो काही एक शिकणार नाही.”डॉक्टरांच्या डोक्यात ही भीती ते एम.बी.बी.एस. होईपर्यंत ठाण मांडून होती. जेव्हा डॉक्टरांनी दवाखाना घेतला आणि मग ते त्याच ज्योतिषाकडे गेले व त्यास त्यांनी ठणकावून सांगितले, “वीस वर्षांपूर्वी तुम्ही वर्तविलेले भविष्य खोटे ठरले आहे. आता दवाखान्याचा मुहूर्त सांगा!” तसा तो ज्योतिषी निरुत्तर झाला. त्यावेळी डॉक्टरांना उमगले की, अनिश्चितता, अस्थैर्य ही ज्योतिषावरील विश्वासाची कारणे आहेत. लग्नावेळी दाखविलेल्या पत्रिकेचेही तसेच. एकाने सांगितले, ‘जुळतेय.’ दुसर्याने सांगितले, ‘नाही जुळत.’ शेवटी त्यांच्या मुलांच्या लग्नावेळी कुणालाही डॉक्टरांनी लग्नपत्रिका दाखविल्या नाहीत! ज्या ज्योतिषाने ‘ढ’आहे, असे सांगितले, त्यांनाच कीर्तन करतानाच पक्षाघाताचा झटका आला आणि गेले. त्यांच्या मृत्यूचा दाखला डॉक्टरांनीच भरला. डॉक्टर त्यावेळचा प्रसंग सांगून म्हणतात – “असा अंत होणार आहे, त्यांना आधी कळले असेल का? की दिव्याखाली अंधार?”
लहानपणी ते राष्ट्र सेवादलाच्या शाखेत जायचे. ‘शिंग फुंकले रणी वाजतात चौघडे’ अशा भक्तिपर गाण्यात ते रंगून जायचे. 14 वर्षांचे असताना 1942 च्या ‘चले जाव’ लढ्यात ते सहभागी झाले. शाळा-दुकाने बंद पाडणे, बुलेटिन वाटणे, निरोप पोचविणे, शाखा चालविणे, बौद्धिक ऐकणे, सूत कातणे अशी अनेक कार्ये शाळा न सोडता केली. चहा-कॉफी प्यायची नाही, खादीच फक्त वापरायची, सिनेमा पाहायचा नाही, सत्यमेव जयतेवर विश्वास ठेवायचा, हे तर चालूच होते. एकदा तर गोर्या सोजिर्याच्या गोळीपासून मरता मरता वाचले.
डॉक्टरांचे मोठे होणे हे केवळ वयाने नव्हते, तर अनुभवाने आणि बौद्धिक समृद्धीने होते. स्वत:च्या ‘मी’पणाबद्दल त्यांचे म्हणणे होते की, माणसाला ‘मी’पणाचा अभिमान असतो. एक शुक्राणू व एक स्त्रीबीज यांच्या संयोगातून हा ‘मी’तयार होतो. यात ‘मी’चे कोणतेही योगदान नसते. ‘मी’ची अनुवंशिकता, त्याचे रंगरूप हे ‘मी’ठरवू शकत नाही, या गोष्टी आई-वडिलांकडून मिळतात. ‘मी’ने कुठे जन्म घ्यावा, हे त्याची आई ठरवते. त्याची भाषादेखील तीच ठरवते. त्याचे वागणे-विचार हे त्याचे पालक, शिक्षक, मित्र, शेजारी, परिवार व समाज ठरवतो. म्हणजे ‘मी’चे स्वत:चे असे काही नसतेच.
एम.बी.बी.एस.ला प्रवेश घेतल्यावर पहिल्या दिवशी त्यांनी अॅनाटॉमी हॉलमधील टेबलावर एका स्त्रीचे उघडे-नागडे प्रेत पहिल्यांदा पाहिले. प्रेताची कटाई केल्यावर मूर्तिमंत क्रौर्य समोर उभे ठाकल्याने ते गर्भगळीत झाले. पुढे सवयीने प्रेत व बिघडलेले यंत्र यात त्यांना फरक वाटेनासा झाला. “मानवी यंत्राच्या ज्ञानाला आम्ही मुकलो नाही, ते केवळ नाव-गाव माहीत नसलेल्या बेवारस प्रेतामुळे,” त्यांचे हे म्हणणे समाजऋणाचे उत्तरदायित्व दाखविणारे ठरते.
याच शवविच्छेदनागाराचा एक अनुभव त्यांनी सांगितला. तिथल्या गॅलरीतच बसून ते रात्रीचा अभ्यास करायचे. आत छिन्नविछिन्न प्रेते असत. त्यांचा भूताखेतांवर विश्वास नसल्याने ते अभ्यास एकाग्रतेने करीत. तिथल्या रखवालदाराने डॉक्टरांना ‘इथे भूत रोज रात्री येते,’ असे सांगितले. कॉलेजच्या पहिल्या मजल्यावरील शेवटच्या खोलीजवळ जमून त्याने डॉक्टरांना नेलं, तेव्हा आतला दिवा अचानक लागला. थोड्या वेळाने बंद झाला. पुन्हा लागला, असे होत राहिले. नंतर त्याने नीट ऐकायला सांगितले. भुताच्या बुटांचा आवाज येतोय, म्हणाला आणि ‘टप टप टप’ असा आवाज येत राहिला. डॉक्टरांना थोडी भीती वाटली. पण नेमके काय असावे, हे जाणून घेण्यासाठी ते दुसर्या दिवशी त्या खोलीत गेले. तेथे डॉ. चाफेकर लेक्चरर होते. त्यांना सर्व सांगितले. ते डॉक्टरांना आत घेऊन गेले व त्यांनी उघडझाप करणारा ‘इनक्युबेटर’ या यंत्राचा दिवा दाखविला आणि कोपर्यातील स्टेनलेस स्टीलचे बेसिन दाखवले. त्यात नळातून पडणार्या थेंब-थेंब पाण्याचा ‘टप टप’ आवाज ऐकविला व ते हसू लागले.
वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांचे चिंतन चालू असायचे. ते विचार करीत.. “पायाच्या नखापासून डोक्यावरील केसापर्यंत पूर्णावस्थेत बनविलेले माणूस नावाचे यंत्र बनविणारा निसर्ग व या निसर्गाच्या किमयेची प्रत्येक पाकळी उकलू पाहणार्या मानवाच्या बुद्धीची झेप कुठंवर असेल, याचा अंदाज मनाला लागत नाही. जीवसृष्टीच्या लघुत्तम घटकातील- प्रोटोप्लाझममधील किमया ओळखणारा मानव व ती किमया घडवून आणणार्या मानवाहून श्रेष्ठ असा निसर्ग या दोघांपुढेही नतमस्तक व्हावे, हेच खरे! ज्या मातीतून हे प्रोटोप्लाझम निर्माण झाले, ज्या प्रोटोप्लाझमपासून माणसाची निर्मिती झाली, त्या मातीशी इमान राखणे, हेच आमचे कर्तव्य.”
डॉ. विठ्ठल प्रभूंचा नशिबावर विश्वास नव्हता. प्रॅक्टीस सुरू करण्यासाठी जागा लवकर मिळत नव्हती. म्हणून ते नशिबाच्या भरवशावर थांबले नाहीत. त्यांच्या दृष्टिकोनातून नशीब म्हणजे कर्तृत्व+संधी. एकदा घरात देवपूजा चालली असताना पेशंट आला. घरचे म्हणाले, ‘देवपूजा होईस्तोवर थांबा.’ पण डॉक्टर उठले, म्हणाले, “जिवंत देवाची सेवा प्रथम! देवपूजा नंतर केली, तरी चालते” आणि ते उठून पेशंटच्या घरी गेले. व्यावहारिक जीवनात माणुसकी जपणारं हे उदाहरण सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी लक्षात घेण्यासारखं आहे. नाही तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी सर्व हॉस्पिटल बंद ठेवण्याची नवी प्रथा हल्ली बोकाळली आहेच.
दादरमध्ये राहणार्या त्या वेळच्या एका मंत्र्याने स्वत:च्या घरी तपासायला बोलवून झाल्यावर आठवड्यातून एक-दोन वेळा तपासायला येत जा, असे फर्मान सोडले. त्यावर डॉक्टर म्हणाले, “तितका वेळ मला नसतो, त्याऐवजी आपण दवाखान्यात पेशंटला पाठवले, तर चालणार नाही का?” मंत्री महोदय गप्प बसले!
डॉक्टरी करत असताना एक प्रकारचे सामाजिक कृतज्ञतेचे भान मोजके डॉक्टर जपत असतात. डॉ. विठ्ठल प्रभू हे भान तर जपतच; पण त्यातही ते सतत रुग्णहित कसे वाढेल, याचा विचार करीत. त्यांच्या मते, देशातील जनतेच्या अनारोग्याचे कारण केवळ गरिबी नाही, तर अज्ञान, गोपनीयता, गैरसमज, पारंपरिक मूल्यांचा पगडा, अंधश्रद्धा, स्त्रीचे कुटुंबातील दुय्यम स्थान, आरोग्यशिक्षणाचा अभाव, नियोजनाचा अभाव, वैद्यकीय शिक्षणातील त्रुटी, नवीन विचारप्रवाहांना नकार, शासन व वैद्यकीय व्यावसायिकांची अनास्था ही देखील कारणे आहेत.
डॉक्टरांच्या सेवाकार्यात अनेक रुग्णांच्या कथा जन्माला आल्या. त्यांनी त्या स्पष्टपणे मांडल्याही. राम कामत भेटतो ते ‘मोशन सिकनेस’ म्हणजे जुलाब रोग समजणारा. आई होऊ शकणार नाही, असे डॉक्टरांना वाटलेली क्लारा फर्नांडिसचे आई होणे. खंगत गेलेली बेबी गुप्ते. आपोआप नव्हे, तर स्वप्रतिकार शक्तीने, कॅन्सर नाहीसा झालेला कुलकर्णी, अशा अनेक ‘रियल लाईफ’ पात्रांना आपण भेटतो. तेव्हा एक वेगळेच वैद्यकीय विश्व डॉक्टर आपणांसमोर ठेवतात. पण डॉक्टरांना मृत्यूचे एक महत्त्वाचे कारण वाटते, ते म्हणजे अंधश्रद्धा व रुढी. अंधश्रद्धेचे अनेक अनुभव त्यांना आल्यावर ते अंधश्रद्धांवर प्रहार करीत राहिले. मूळच्या सातारा जिल्ह्यातील चार भावांच्या मुंबईतील घरातील एक जण पोटात दुखताना डॉक्टरांकडे आला. घरगुती उपाय झाले. उशीर झाला. ‘अॅक्युट अब्डोमेन’ असे निदान करून त्यास ताबडतोब अॅडमिट करण्याचा सल्ला दिला. पत्र न्यायला कोणी आले नाही, म्हणून डॉक्टर स्वत: दुपारी त्याच्या घरी गेले, तर घरात समोरच घुमणारा भगत दिसला. अंगात आलेला, लिंबू, नारळ, कुंकू, अबीर इत्यादी पसारा काढून ठेवलेला. घरातील सर्वजण हात जोडून बसलेले. डॉक्टरांनी एकाला विनवले की, ‘आता ताबडतोब रुग्णास हलवा.’ पण त्यांनी भगताचे ऐकले. रात्री आठपर्यंत भगताचा उपाय चालू असतानाच तो मेला. यावर भाष्य करताना डॉक्टर म्हणतात – “हे ऐकून माझ्या छातीत धस्स झाले. वेळीच रुग्ण इस्पितळात पोचला असता, तर खचित प्राण तर वाचले असते. पण देवा-धर्माच्या नावाखाली आपण झापडं लावून वावरतो; ती दूर करायचा विचारच करत नाही. आपले आरोग्य सुधारण्यासाठी धडाधड मेडिकल कॉलेजेस उघडताहेत. डॉक्टर्स निर्माण करण्यापलिकडे यातून काहीही साध्य झालेले नाही. त्याऐवजी आरोग्य ज्ञानसत्रे काढली, तर लोकांचे अधिक भले झाले असते. मूठ मारणे, जारण-मारण, मंत्र-तंत्र, भूतबाधा, मांत्रिक, भगत यांच्या विळख्यातून आजही आपला समाज सुटलेला नाही. बकरा-कोंबडा कापणे, साप चावला तर मांत्रिकाकडे जाणे, मनोरुग्णांचा छळ करणे, देवळासमोरची ‘माशा’ बसलेली मिठाई ‘प्रसाद’ म्हणून खाणे, नदीचे गढूळ पाणी तीर्थ म्हणून पिणे, गोमूत्र प्राशन करणे, मूल होण्यासाठी अंगारा, गोपाळविधी करणे, मुलांच्या कमरेला गंडेदोरे बांधणे, गोवराचा ताप आल्यावर औषध योजना न करणे, काविळीसाठी गळ्यात माळ बांधणे, असे कितीतरी उपाय ‘श्रद्धापूर्वक’ म्हणजे आपले डोके गहाण ठेवून योजले जातात. हे व असे अनेक ‘उपाय’ कसे अपायकारक ठरतात, हे जरी कळले, तरी लोकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल, पण… लक्षात कोण घेतो?”
दादरमधील पारेख बिल्डिंगमध्ये आकडी आलेल्या आठ वर्षांच्या मुलास जेव्हा तपासायला गेले, तेव्हा त्याचे वडील कांद्याचा चुरा नाकावर इतक्या जोराने दाबून धरून बसलेले की, तो मुलगा घुसमटून मेला! प्रथमोपचाराचा धडा शाळेत नसल्याचा व न शिकल्याचा हा परिणाम आहे, हे डॉक्टरांना जाणवले. त्यासाठी त्यांनी ‘घरच्या घरी शुश्रुषा’ हे पुस्तक नंतर लिहिले.
परंपरा या मृत्यूस कारणीभूत कशा ठरतात, त्याचेही एक उदाहरण डॉक्टर सांगतात. “साकरबाई ही नातेवाईकांकडे कोणीतरी वारले म्हणून गेलेली. तेथे रडारड चालू झाल्यावर डोके आपटून घेणे चालू केले. साकरबाईने वारंवार भिंतीवर डोके आपटल्याने तिचे डोके दुखू लागले. तिला चक्कर येऊन वांती झाली. बेशुद्ध झाल्यावर इस्पितळात दाखल केले, तेथे ती गेली. पोस्टमार्टेमचा रिपोर्ट होता कवटी फुटून मेंदूत रक्तस्त्राव.”
अशातच एक घटना घडली. एका मुलीने लग्न झाल्यावर लगेचच आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण होते की, तिचे पवित्र शरीर नवर्याने अपवित्र केले. संभोगाने शरीर ‘अपवित्र’ झाल्याने तिने, आपण आता जगण्याच्या लायकीचे राहिलो नाही, या समजुतीतून जीवन संपविले. डॉ. विठ्ठल प्रभूंना या घटनेनंतर कळून चुकले की, कामजीवनाबाबतीत आपला समाज मागासलेला आहे. खरे तर लैंगिक ताण हलका करणे, आनंद उपभोगणे आणि संतती प्रसविणे, हेच तर कार्य होते लग्नांतून. त्याचबरोबर हस्तमैथुनाविषयीही अनेक गैरसमज डॉक्टरांच्या लक्षात येत गेले. ‘एक थेंब वीर्य म्हणजे पन्नात थेंब रक्त’, ‘हस्तमैथुनामुळे रोग होतात’ इत्यादी अनेक खुळचट समज समाजात पसरलेले त्यांना ध्यानात आले. मुले वयात आल्यावर त्यांच्या कामभावना वारंवार जागृत होते, हे फूल उमलल्यावर सुगंध दरवळण्याइतकेच नैसर्गिक आहे, असे ते म्हणतात. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, लैंगिक ताण मोकळा करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हस्तमैथुन.
चिंता-भीती ही सेक्सच्या बाबतीत मोठी असते. अशावेळी लिंगास इलेक्ट्रिक करंट देणे, अशासारखे अघोरी उपाय करणार्या बुवांची कृत्ये जेव्हा ते पेशंटकडून ऐकत, तेव्हा त्यांना वाईट वाटे आणि मग समाजात शहाणे करण्यासाठी त्यांनी कामजीवनावर पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पहिल्यांदा लेख छापून आले ते ‘अनुराधा’ या मासिकात (संपादक गिरीजा कीर) ते आरोग्याविषयीचे. पण कामजीवनाविषयी लिहायचे म्हटल्यावर त्यांना वाटले की, लोक निंदानालस्ती करतील. र. धों. कर्व्यांसारखे धैर्य आपल्याकडे नाही, या विचारातच अनेक महिने गेले. मग निर्णय झाला. किन्से, मास्टर्स व जॉन्सन, जॉन मनी, हेलन सिंग कॅप्लॉन अशा सार्यांचे ग्रंथ शोधण्यात खूप वेळ गेला. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे तेव्हाचे अध्यक्ष डॉ. महिंदर वान्सा यांनी या विषयावरील मॅकॅरी, कचरडोरियन, ऑस्टीन, कंफर्ट इत्यादी भरघोस पुस्तके वाचण्यास दिली. श्री वात्सायन मुनीप्रणित ‘कामसूत्रम्’ हे माधवाचार्य खुपेकरांचा ग्रंथ वाचून काढला. र. धों. कर्वे यांची मासिके वाचून काढली. सर्व सामग्री गोळा झाल्यावर लेखनाला सुरुवात करण्यास 1980 साली बैठक मारली. कागदावर मथळा लिहिला ‘सेक्स टॉनिक.’ तारीख लिहिण्यासाठी कॅलेंडरवर लक्ष गेले, तर तो दिवस होता ‘हनुमान जयंती.’ ब्रह्मचार्याच्या जयंतीला ‘सेक्स टॉनिक’पासून सुरुवात! पुस्तक लिहून झाल्यावर प्रकाशित करण्याचा सुरुवातीस धीर वाटत नव्हता. कारण अश्लीलतेचा खटला भरला गेला तर…? कारण त्यावेळी ग. र. मुळे यांच्या ‘अनंतरंग रतिशास्त्र’ या पुस्तकावर खटला भरला गेला होता. (आणि नंतर निकाल मुळे यांच्या बाजूने लागला होता). या पुस्तकाची हस्तलिखित प्रत विजय तेंडुलकरांना दिली होती. तेव्हा ते म्हणाले, “हे पुस्तक लोक वर्तमानपत्रात गुंडाळून नेतील.’‘ पुस्तकाला योग्य नाव सुचविले वामनराव चोरघडे यांनी आणि पुस्तकाचे बारसे झाले – ‘निरामय कामजीवन.’ डॉ. विठ्ठल प्रभूंनी त्याचे अगोदरचे नाव निश्चित केले होते ‘आपले कामजीवन.’ डॉक्टरांचे पहिले पुस्तक ‘आरोग्य-समज आणि गैरसमज ’हे ‘मॅजेस्टिक’ने प्रकाशित केलेले; पण हे पुस्तक कोण प्रकाशित करणार? डॉक्टर गेले जयवंत दळवींकडे. त्यांनी डॉक्टरांना गिरगावातील कोठावळेंकडे नेले. केशवराव व तुकारामशेठ कोठावळे बंधू यांनी पुस्तक चाळल्यावर लगेचच निर्णय घेतला, 5 हजार प्रती काढण्याचा आणि पुढे ‘निरामय कामजीवन’ या पुस्तकाने इतिहास घडविला. चोवीस आवृत्त्या निघालेले कामजीवनावरचे मराठीतील हे एकमेव पुस्तक ठरले आहे. साल होते 1982. किंमत 30 रुपये.
‘निरामय कामजीवन’ या पुस्तकात सुमारे 25 धडे असून कामजीवनाविषयीचा एकही विषय डॉ. विठ्ठल प्रभू यांनी सोडला नाही. त्यानंतर त्यांनी सुमारे 28 मराठी पुस्तके व 6 इंग्रजी पुस्तके लिहिली. बहुसंख्य पुस्तके ‘काम’ विषयावरील आहेत. मातृत्व, बालआरोग्य, ज्येष्ठ नागरिक, शुश्रुषा, प्रथमोपचार, आरोग्य आणि स्वत:चे आत्मचरित्र अशा अनेक विषयांवरील त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. निरामय पुस्तकाच्या विक्रमी खपाविषयी डॉ. विठ्ठल प्रभू नम्रपणे लिहितात- “माझे लेखन कौशल्य हे कारण नसून समाजाची गरज हे कारण आहे, याची मला जाणीव होती.”
एका डॉक्टरांच्या कार्यशाळेत डॉ. विठ्ठल प्रभू मार्गदर्शनासाठी गेले असता, एका डॉक्टराने विचारले – “तुम्ही कामजीवनाविषयी सर्व काही जाणता, म्हणजे तुमची मज्जा असेल.” डॉ. प्रभू म्हणाले – “हलवायाला मिठाईचे आकर्षण वाटते का? अतिउपभोगाची परिणती अतृप्तीत होते. समाधानी वृत्तीच तृप्ती देते. ज्ञानामुळे व विज्ञानामुळे वृत्ती समाधानी बनते.”
व्यक्तीची कामजीवनविषयक मते कशी तयार होतात? डॉ. प्रभू म्हणतात – “माणसाने शाकाहारी किंवा मांसाहारी बनणे, हे जसे त्याच्या हाती नसून तो ज्या घरात वाढला, त्या घरातील माणसांच्या आहारावर अवलंबून असते, तसे व्यक्तीवर जसे संस्कार होतील, त्यानुसार त्याची कामजीवनविषयक विचारसरणी निर्माण होत असते.” हर्बर्ट स्पेन्सर म्हणतो – “असे एक तत्त्व आहे की, जे ज्ञानप्राप्तीला नक्कीच आडकाठी बनते, सर्व वादविवादावर पडदा टाकते व मानवास अज्ञानात ठेवायला चुकत नाही, ते तत्त्व म्हणजे नीट चौकशी करण्यापूर्वीच नापसंती व्यक्त करणे. कामजीवनाबाबतीत हे सुभाषित लागू पडते.” सुरुवातीस शांताबाई किर्लोस्कर किंवा सुहासिनी मुळगावकर या महिला पुस्तक वाचल्याचे धीटपणे सांगत. आज महिला सर्रास हे पुस्तक वाचतात. पु. ल. देशपांडे हे ‘ओरिएंट हायस्कूल’मध्ये डॉ. विठ्ठल प्रभू शिकत असतानाचे त्यांचे शिक्षक. आपल्या विद्यार्थ्याने पुस्तक लिहिल्याचे त्यांना डॉ. प्रभूंनी पुस्तक पाठविल्यावर समजले, तेव्हा त्यांनी अभिनंदनाचे एक सुंदर पत्र डॉ. प्रभूंना पाठविले. ते हे पत्र –
लैंगिकता शिक्षणाची गरज का आहे? डॉ. विठ्ठल प्रभूंच्या मते, कामजीवन हा पुरुषांसाठी सुखाचा व स्त्रीसाठी शोषणाचा विषय ठरतो. तसे न होता दोघांच्याही सुखासाठी असावा. सक्षम बनत चाललेल्या स्त्रीस नवरा शुक्राणूपलिकडे काहीएक देत नाही, कामसुख ओरबाडण्यासाठी जवळ घेतो, तो ती कशाला स्वीकारेल? शुक्राणू पेढीतून शुक्राणू आणून ती माता बनेल. या शतकात असे परिवर्तन घडले, तर आश्चर्य वाटू नये.
‘निरामय कामजीवन’मुळे कधी गोत्यात येण्याचे प्रसंगही घडले. हा किस्सा सांगलीतला. भावे नाट्यगृहात व्याख्यानानंतर एक शिक्षक रागाने लालबुंद होऊन विचारू लागले – “तुम्ही विद्यार्थ्यांना वाईट सवयी लावता. यामुळे धातुक्षय होतो, हे माहिती नाही का?” यावर डॉ. विठ्ठल प्रभूंनी मिश्किलीने त्यांना विचारले, “सर, समोर मारुतीचे देऊळ आहे. त्या मारुतीची शपथ घेऊन सांगा की, तुम्ही आजवर कधीही या वाईट सवयीचा अवलंब केला नाही.” ते शिक्षक गर्दीतून पसार झाले.
डॉ. विठ्ठल प्रभूंनी स्त्री कामशोषणाविषयी जळजळीत मते मांडली आहेत. “कामजीवनासंबंधी आजवर स्त्री आपले विचार मांडत नव्हती, त्यामुळे तिच्या लैंगिकतेसंबंधी पुरुषाच्या मनातले विचार हेच वास्तव मानले गेले व तिचे अधिकाधिक शोषण होऊ लागले. कायदा असूनही हुंडाबळी, बालविवाह, स्त्री-भ्रूणहत्या, लैंगिक छळ, एकतर्फी प्रेम, हत्या, वासनाकांड असे प्रकार वाढताहेत. यावर उपाय? लैंगिक शिक्षण. आपल्या सुखासाठी इतर कुणाच्या स्वातंत्र्यावर घाला घालणे, दुष्कृत्य करणे म्हणजे माणुसकीला काळे फासणे होय. मुलगी ही दुय्यम अशी समजूत निर्माण होण्यास पालक कारणीभूत असतात. योनीशूचितेला अवास्तव महत्त्व देऊ नये, हे खरे; पण त्याचबरोबर कौमार्य जतन करण्याची जबाबदारी केवळ स्त्रीची नसून ती पुरुषाचीही असते.”
स्त्रियांच्या हलाखीच्या कामजीवनाकडे लक्ष वेधताना डॉ. प्रभू अनेक नामवंतांच्या विचारांकडे लक्ष वेधतात. समाजशास्त्रज्ञ डॉ. प्रमिला कपूर म्हणतात, “स्त्रिया प्रेमाअभावीचा संभोग तीव्रपणे अमान्य करतात. विवाहानंतरचा प्रेमाशिवायचा संभोगही त्यांना अमान्य असतो.” शांताबाई किर्लोस्करांचा हवाला देताना डॉ. प्रभूंनी त्यांची पुढील मते मांडली आहेत :
“रतिसुखाचा उत्कट क्षण उभयतांना साधता यावा, ही जाणीव बहुसंख्य पुरुष ठेवत नाहीत. वीर्यपतनानंतर बहुतेक पुरुष चटकन दूर जाऊन झोपी जातात. त्यावेळची पुरुषांची बेपर्वाई स्त्रियांना झोंबते. त्याच पुरुषासमोर आपले शरीर वारंवार पसरावे लागावे, यातल्या नाईलाजाची, अपमानाची सवय त्यांना करावी लागते…”
संभोगातील परमोच्च आनंदासाठी मोठे लिंग वा सुंदर देखणा चेहरा व शरीर उपयोगी नसते. हे सांगताना त्यांनी पाच सूत्रे दिली आहेत : सुदृढ शरीर, निकोप मन, एकमेकांवरील प्रेम, संभोगात रस घेणारा जोडीदार/जोडीदारीण, संभोगपूर्व प्रणय-शृंगार-स्पर्श, समाधानी वृत्ती.
डॉ. विठ्ठल प्रभू यांनी लैंगिकता (डर्शुीरश्रळीूं) आणि काम (डशु) यातला फरक सरळसोप्या भाषेत सांगितला. काम म्हणजे वैयक्तिक सुखाची जाणीव. प्रजोत्पादन व वंशसातत्यासाठी त्याचा वापर. लैंगिकता म्हणजे लिंगविषयक व लिंगअनुसार मानसिकता, विचार, भावना व वर्तन. सहजप्रवृत्ती व संस्कार या दोहोतून माणसाची लैंगिकता आकार घेत असते. काम विशिष्ट वयोमर्यादेपर्यंत साथ देतो; पण लैंगिकता मरेपर्यंत साथ देते. लैंगिकता शिक्षण म्हणजे मूल्यांचे शिक्षण; शरीरसंबंधांचे शिक्षण नव्हे. यात स्त्री-पुरुष समानता आणि स्त्रीसन्मानही येतो. स्त्रीसाठी कामजीवन हे साधन आहे, मातृत्व साध्य आहे. पुरुषाचे कामजीवन हे साध्य असते.
डॉ. विठ्ठल प्रभूंपासून प्रेरणा घेऊन, अनेकांनी लेखन केले. बेळगावचे प्रा. मधुसूदन गोखलेंनी ‘उपेक्षित योगी’ हे र. धों. कर्वेंवर लिहिलेले पुस्तक म्हणजे डॉ. प्रभूंची प्रेरणा. लोणावळा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डॉ. दाभोलकरांनी कार्यशाळा आयोजित केली होती, तेव्हा गोखलेंनी डॉ. प्रभूंना र. धों. कर्वेंवरचा लेख दिला व तिथून पुस्तक लेखनास प्रारंभ झाला.
डॉ. प्रभूंच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती राज्य पुरस्कार ‘निरामय कामजीवन’ पुस्तकास मिळाला. कौन्सिल ऑफ सेन्स एज्युकेशन अँड पेरेंटहूड’ (इंटरनॅशनल) या संस्थेचे ते मानद अध्यक्ष होते. ‘फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफ इंडिया’च्या सेक्स एज्युकेशन, कौन्सिलिंग रिसर्च, थेरपी केंद्राचे मानद सल्लागार होते.
आम्ही सुरू केलेल्या ‘समाजस्वास्थ्य’ मासिकाचे प्रकाशन डॉ. विठ्ठल प्रभूंच्या हस्ते दादर येथे जेव्हा केले होते, तेव्हा ते म्हणाले होते, “कामशिक्षणाची चळवळ घराघरांत पोचावी, यासाठी शासन आणि समाजातील विवेकी लोक यांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज आहे. दु:खाने म्हणावेसे वाटते की, आजही सेक्स हा विषय लज्जेच्या आणि अज्ञानाच्या पिंजर्यात अडकून पडला आहे!“
वयाच्या 90 व्या वर्षी डॉ. विठ्ठल प्रभू यांनी 28 फेब्रुवारी 2019 मध्ये जगाचा निरोप घेतला. कामजीवनाविषयी समाजात वैज्ञानिक मते पेरणार्या झंझावाताचा अंत झाला.
प्रिय डॉ. प्रभू,
‘निरामय कामजीवन’ हे तू लिहिलेले पुस्तक मिळाले. धन्यवाद! कामजीवनावर लिहिणे सोपे नाही. हा विषय नाजूकही आहे आणि आपल्यासारख्या गतानुगतिकीच्या समाजात स्फोटकही आहे. आपल्या श्लील-अश्लीलतेच्या, नीती-अनीतीच्या कल्पना योनीशूचितेच्या कल्पनांशी निगडित असल्यामुळे कामजीवनाविषयी लिहायला तज्ज्ञसुद्धा कचरतात. तुझ्या पुस्तकाची काही समीक्षणे माझ्या पाहण्यात आली होती. सर्वत्र अनुकूल अशीच प्रतिक्रिया होती. समाजात या विषयाबद्दल माहिती करून घेण्याची इच्छा वाढीला लागते आहे, हे चांगले लक्षण आहे. कामवासनेशी सदैव पापाचे नाते जुळविल्यामुळे या बाबतीत एकतर रोगट कुतूहल किंवा ढोंग या दोनच प्रवृत्ती वाढीला लागल्या. त्यात पुन्हा ‘ब्रह्मचर्य हेच जीवन’सारख्या पुस्तकांनी प्रचंड गोंधळ घातला. जडीबुटीवाल्यांनीही लोकांमध्ये अज्ञान टिकून राहील आणि कामजीवन संपुष्टात येण्याची दहशत कायम राहील, याची खबरदारी घेतली. अशा या विषयावर लिहिण्याचे धाडस करणार्या र. धों. कर्व्यांसारख्या माणसाला खूप छळ सोसावा लागला. त्यांनी स्वीकारलेल्या वैज्ञानिक दृष्टीचा पाठपुरावा करून सोप्या शब्दांत आणि बोलक्या शैलीत तू हा विषय समजावून दिला आहेस. अज्ञानामुळे कामजीवनाबाबतीत निराश झालेल्यांना तुझ्या पुस्तकातून खूप धीर लाभेल, गैरसमज दूर होतील. अशा मार्गदर्शक पुस्तकाची गरज होती. तू ही जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडल्याबद्दल तुझे अभिनंदन!
तुझा, पु. ल. देशपांडे