Categories
पर्यावरण

पक्ष्यांची घरटी होती…

जून – २०१२

पक्षी आणि प्राणी मोर्चे काढीत नाहीत. निषेध नोंदवित नाहीत आणि मुख्य म्हणजे मतदान करीत नाही म्हणून त्यांच्या अस्तित्वाला काहीही अर्थ नाही आणि त्यामुळे ते नामशेष झाले तरी काहीही बिघडत नाही, अशी आधुनिक म्हणवणार्‍या आपल्या संस्कृतीची धारणा असते आणि तसेच आपले वागणे आहे. अमर्याद जंगलतोड, भर जंगलातही उभे राहू लागलेले दूरसंचार यंत्रणांचे मनोरे आणि अज्ञानातून आलेल्या बेफिकीरीमुळे वाढत चाललेले खतांचे आणि कीटकनाशकांचे प्रमाण आदी कारणांमुळे भारतातील काही पक्ष्यांच्या जातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे, लाल डोक्याचे गिधाड, पांढरपोटी करकोचा, वनपिंगळा, तणमोर असे जवळपास 15 जातींचे पक्षी आता लवकरच या पृथ्वीस राम म्हणतील. राज्यपक्षी माळढोक हा देखील या नामशेषांच्या यादीत असल्याचे आंतरराष्ट्रीय अहवाल सांगतो. कोणाही सहृदयीस काळजी वाटावी अशीच ही परिस्थिती आहे. शहरांतून हल्ली घरचिमण्या दिसेनाशाच झाल्या आहेत. कबुतरांचे वाढते प्रस्थ आणि त्याला चार दाणे घालून पापक्षालन करणार्‍या दांभिकांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे बिचार्‍या चिमण्यांकडे कोणाचेच लक्ष नाही. पूर्वी दिवस उगवला की, खिडक्यांतून सूर्यकिरणांच्या कवडशांबरोबर चिमण्याही आत यायच्या. आता त्या खिडक्यांना जाळी असते आणि सूर्यालाही इमारतींच्या जंजाळातून वाट काढणे जमत नाही. त्यामुळे त्याचा कवडसा किंवा गेला बाजार तिरीपदेखील घरात येऊ शकत नाही, तेव्हा चिमण्या कशा येणार? गिधाडेही आता दिसेनाशी झाली आहेत. कदाचित माणसांत आपल्या प्रवृत्तीचा वाढता वावर पाहून त्यांनी काढता पाय घेतला असावा. चिमण्या आणि गिधाडे एकाच वेळी संख्येने कमी व्हावीत हे आपल्याविषयी निसर्गात एकूणच बरे मत नसल्याचे लक्षण समजायला हरकत नाही. पण याची काही कोणाला खंत आहे, असेही दिसत नाही. त्यात आता हवेच्या, पाण्याच्या वगैरे नियमित प्रदूषणांबरोबरच आणखी एक प्रदूषण गंभीर स्वरूपात वाढू लागले आहे. ते म्हणजे प्रकाशाचे. देशांतल्या शहरांतील जगणे अतिअंधारे असले तरी तेथील वाढता प्रकाश हा पक्ष्यांच्या, झाडांच्या आणि माणसांच्याही डोळ्यासमोर अंधारी आणणारा आहे. माणसास आणि निसर्गासही जगण्यासाठी प्रकाशाप्रमाणे  अंधाराचीही तितकीच गरज असते. पण हे आपणास जाणवत नाही. उत्तर गोलार्धावरील नॉर्वे आदी देशांत सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस असतो. सहा महिन्यांच्या अंधार्‍या काळात, सूर्यप्रकाशातील घटकांचे कृत्रिम दिवे तेथे वापरले जातात. वेळ पडल्यास प्रकाश कृत्रिमरित्या तयार करता येतो. पण अंधाराचे काय? डोक्यावरचा सूर्य सहा महिने अस्तासच जाणार नसेल तर माणसास वेड लागायची पाळी येईल आणि तशी ती खरोखरच त्या देशातील नागरिकांच्या आयुष्यात आली आहे. निराशावस्थेने बेजार झालेले सर्वाधिक रूग्ण आज त्या देशात आढळतात. त्यांची ती भग्नावस्था पाहिल्यास अंधाराचे महत्व जाणवावे. आपल्याकडेही हल्ली शहरांत इतका प्रकाश साठलेला असतो की, या अंधाराचा जीव घुसमटून जावा. आपल्याकडे हे प्रकाशप्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यामुळे पक्ष्यांची जीवनशैली पूर्णपणे विस्कटून टाकली गेली आहे. जी काही दोन-पाच शिल्लक राहिली असतील त्या झाडांवर निवांत डोळे मिटून बसावे अशी संधीच पक्ष्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यात वाढती अस्वस्थता असल्याचे अनेक निसर्गाभ्यासकांनी दाखवून दिले आहे. हे कमी म्हणून की काय, वेळीअवेळी फटाके फोडणार्‍या निर्बुद्धांची वाढती संख्याही पक्ष्यांना अस्वस्थ करते. परंतु जगण्याच्या एकूणच तीव्र धडपडीत माणसाचाच निवांतपणा हरवलेला असताना इतरांकडे लक्ष कोण देणार? आणि शिवाय आपल्याला जे मिळत नाही, ते इतरांना मिळावे, असा काही माणसाचा स्वभावधर्म नसतो, त्यामुळे लोकशाही अर्थाने कसलाही आवाज नसलेल्या पक्ष्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज कोणाला वाटणार?

            यातील सगळ्यात दुर्दैवाची बाब ही की, संस्कृतीच्या देदीप्यमान परंपरांच्या गप्पा मारणार्‍या, त्यावरून प्रसंगी हिंसक होणार्‍या मानवी समूहातच हे निसर्गचक्रास अडथळा आणण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत आहेत. जगातील अत्यंत प्राचीन संस्कृतींचा वारसा असलेल्या देशांपैकी एक म्हणजे चीन. परंतु क्षणिक शारीर सुखाचा परमावधी आणखी काही क्षणांनी लांबवता यावा या उद्देशाने हा देश नशंसपणे वाघाची शिकार करीत चालला आहे. भारतातील वाघांच्या शिकारीमागे हे चिनी वनौषधीचे कारण मोठे आहे. वाघासारखा राजबिंडा जीव या पृथ्वीतलावर दुसरा नाही. जीवनचक्रांच्या केंद्रस्थानी तो असतो. त्यामुळे जोपर्यंत वाघ आहे तोपर्यंत हे चक्र सुरळीत सुरू राहील. आता त्याच वाघाच्या मागे माणूस हात धुऊन लागला आहे. मिळेल त्या मार्गाने त्यास संपवण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत आणि हे सर्व आपले माणूसपणास लांच्छनास्पद आहे. चीन आणि त्याच दक्षिण आशियाई परिसरातील अनेक देशांत साप, बेडकांपासून ते माकडांपर्यंत काहीही खाल्ले जाते. किंबहुना थायलंड, मलेशिया, सिंगापूर आदी ठिकाणी बड्या हॉटेलांत माकडांना जिवंत ठेवून त्यांचा मेंदू खायला घालण्याची तारांकित प्रथा अलिकडे रूजली आहे. जपान हाही असा संस्कृतीचा वारसा मिरवणारा देश. परंतु जपान्यांनी देवमाशाची अतोनात शिकार केल्याने तो आंतरराष्ट्रीय समस्येचा विषय बनलेला आहे. हा उदात्त संस्कृती टेंभा मिरवणार्‍यांत आपणही आहोत. पण ज्या घटकांना आपल्या या महान वगैरे संस्कृतीत पंचमहाभुतांचा दर्जा देऊन पूजले जाते, त्या घटकांचीच आज अक्षम्य हेळसांड होताना दिसते. पाण्याचे प्रदूषण आपल्यापेक्षा जास्त आफ्रिकेतील अत्यंत दरिद्री देशांतच असेल. ज्या गंगेचा एक थेंब स्वर्गाच्या वाटेवर घेऊन जातो असे काही मानतात त्या गंगेसारखी प्रदूषित नदी आज जगाच्या पाठीवर अन्य कोणती नाही. तीच गत यमुनेची. कृष्णाच्या लीलांनी ज्या नदीत एकेकाळी तरंग उमटवले असतील त्या श्रद्धाळूंची यमुना सध्या एक विस्तारीत गटार बनली आहे, हे कटू पण वास्तव आहे. म्हणजे आता कृष्ण समजा आलाच तर त्याला कालियामर्दन करावेच लागणार नाही. कारण आजच्या यमुनेच्या पाण्यात कालिया काय गांडुळेही जगू शकणार नाहीत. गाईला आपण देव वगैरेच मानतो. अशा दैवी गोमाता प्लॅस्टिकच्या पिशव्या पोटात फुगून रस्तोरस्ती आचके देत मरत असतात. ज्या झाडांची पूजा करण्याची परंपरा आपली संस्कृती सांगते त्या झाडांची आजची अवस्था काय आहे, हे कोणत्याही प्रदेशातील बोडके माळ सांगू शकतील. बेसुमार जंगलतोडीने आज पश्चिम घाटाला धाप लागलेली आहे. विदर्भाचे समृद्ध जंगल याच वाटेवर आहे. लाकडाचे व्यापारी आणि बेकायदेशीर खाणकाम यामुळे हा हिरवागार परिसर वाळवंटाच्या दिशेने निघालेला आहे. राज्यातील नद्यांचे आधी नाले झाले. काही काळ ओहोळ बनून ते वाहिले. आता नद्यांची पात्रे खेळायची मैदाने झाली आहेत.

            या पार्श्वभूमीवर माणसांची वाढती संख्या आणि एकूणच वाढते आयुर्मान यामुळे आपणास अन्न जास्त लागणार हे उघड आहे. ते मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हल्ली रासायनिक खतांचा सर्रास वापर होतो आणि पिकांना कीटकांपासून वाचवण्यासाठीदेखील मुबलकपणे रसायने वापरली जातात. ती पुढे वाहत जाऊन पाण्यात मिसळतात, पाणी दूषित होते, पानेफुले विषारी होतात आणि मग हे सर्वच प्राणीपक्ष्यांच्या मुळांवर येते. ती नामशेष व्हायला लागतात. आपणही जे पाणी पितो, त्याच्या एकेक ओंजळीमागे दूर कोठेतरी वाहणारा झरा असतो, हे आपणास जाणवत नाही. आणि पक्ष्यांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी…. असा नुकतेच दिवंगत झालेले कवी ग्रेस यांना पडलेला प्रश्नही आपल्याला पडत नाही. हे जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत नामशेष होणे हेच आपल्या प्राणी पक्ष्यांचे प्राक्तन.

-डॉ.आशुतोष मुळ्ये