Categories
बालविभाग

पंडितांची फसवेगिरी

वार्षिकांक – २०११

एक दिवस राजा श्रीकृष्णदेवराय फारच काळजीत दिसत होते. मंत्र्यांनी त्यांना त्याचे कारण विचारले, तेव्हा राजाने दिर्घ श्वास घेऊन सांगितलं, “माझ्या मातेने आपल्या शेवटच्या घटकेला खायला आंबा मागितला. तो काही आंब्याचा मोसम नव्हता, म्हणून मी तिची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. आपली इच्छा अपूर्ण ठेवूनच ती वारली. मी एवढा मोठा अधिपती असूनही आईची इच्छा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरलो. याचं मला फार वाईट वाटतंय.”

“महाराज, आपण याचा विचार करीत उगीचच चिंता करीत आहात. अजूनही काहीतरी करता येईल. पाच सोन्याचे आंबे बनवून पंडितांना दान द्यावेत. तसं केल्याने आपल्या स्वर्गस्थ मातेची इच्छा पूर्ण होईल. त्यांचा आत्मा शांत होईल.” पंडितांनी उपाय सुचवला.

पंडितांच्या सूचनेमुळे राजाचे अस्वस्थ मन शांत झाले. त्याला आनंद वाटला. मातेचा आत्मा शांत होण्यासाठी पंडितांनी सुचवलेला उपाय राजाला एकदम पटला. त्यासाठी एक शुभ दिवस ठरवण्यात आला. त्या शुभप्रसंगी पाच सोन्याचे आंबे पंडितांना दान म्हणून देण्यात आले. पंडितांनी ते स्वीकारले आणि राजाला आशिर्वाद दिला.

जवळच असलेला तेनाली रामसिंग हा सारा तमाशा बघत उभा होता. त्याला गप्प बसवेना. त्याने पंडितांना सांगितले, “माझ्या आईची देखील एक इच्छा होती, ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यापूर्वीच ती स्वर्गवासी झाली. येत्या अमावास्येला तुम्ही आमच्या घरी आलात की, मी देखील आपल्याला दान देईन आणि माझे कर्तव्य पार पाडीन.

अमावास्येच्या दिवशी पंडित रामलिंगच्या घरी आले. तेनाली रामलिंगने मन:पूर्वक विधी करून आपल्या आईचे श्राद्ध केले. पंडितांना एकेकटे आत बोलावण्यात आले. त्यानुसार ते एकेकजण आत गेले. बाहेर येताना मात्र प्रत्येकाने एक हात कपड्यांत लपेटून घेतलेला होता. त्यांचा चेहरा गंभीर झाला होता.

पंडित सरळ राजाकडे गेले. त्यांनी तेनाली रामलिंगबद्दल तक्रार केली आणि आपले भाजलेले हात राजाला दाखवले. या अपराधासाठी तेनालीला अत्यंत कठोर शिक्षा व्हावी अशी त्यांनी राजाला विनंती केली.

राजाने रामलिंगला बोलावले. तो येताच राजाने चिडून विचारले, “पंडितांना तू आपल्या घरी बोलावलेस. त्यांना दान देण्याचे वचन दिलेस. आणि त्यांना दान न देता, उलट त्यांच्या हातावर जळके लाकूड ठेवून त्यांना भाजवलेस! तू असं का केलंस?”

“महाराज, मी आपली क्षमा मागतो. माझ्या आईच्या सबंध शरीरावर खरजेमुळे आग आग होत होती. ‘आग, आग’ असं म्हणतच ती वारली. मी तिची इच्छा तेव्हा पुरी केली नाही. परंतु आज या पंडितांच्या मार्फत तिची इच्छा पूर्ण केली. त्यांच्या हातावर चटके देऊन तिची आगआग मी दूर केली. आपण दान दिलेल्या सोन्याच्या आंब्यामुळे जर स्वर्गात राहाणार्‍या राजमातेची इच्छापूर्ती होऊ शकते, तर या चटक्यांमुळे माझ्या आईच्या शरीराची तगमग थांबणार नाही का? तिचा आत्मा आता नक्कीच शांत झाला असेल.” रामलिंगच्या या उत्तरामुळे राजा खुश झाला. त्याला आपली चूक समजली.